"माझ्यासाठी ट्रेकिंगचा अर्थ फक्त डोंगर चढणं आणि उतरणं, दुर्गम पायवाट निवडून जीव धोक्यात घालणं, जंगलातून फेरफटका मारणं हा नसून जगण्याचा आनंद द्विगुणीत करणारी, मातीशी असलेलं नातं आणखीन घट्ट करणारी, निसर्गाप्रति असणाऱ्या जबाबदारीचे भान ठेवून निसर्गसोबत एकरूप होण्याची धाडसी कृती म्हणजे ट्रेकिंग "
प्रत्येक ट्रेकरला ला नेहमी विचारला जाणार प्रश्न म्हणजे तुम्ही ट्रेकिंग का करता, मलाही हा प्रश्न घरच्यांनी, नातेवाईकांनी, मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी बऱ्याच वेळा विचारला माझ्या परीने मी त्या त्या वेळेस त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न ही केला पण जेव्हा जेव्हा ट्रेकच्या संदर्भातील विषय यांच्यासमोर येतो तेव्हा तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव अजूनही तसाच असल्याचे जाणवते, जेव्हा मी ट्रेकला सुरुवात केली होती तेव्हा मलाही या प्रश्नाचं उत्तर नीटसं माहिती नव्हतं पण जसं जसं ट्रेक करत गेलो तसं तसं या प्रश्नाचं उत्तर ही उमजत गेलं. बघूया आता तरी या सगळ्यांना ट्रेकिंगचं महत्व पटतंय का?
ऊंच डोंगरं, खोल दऱ्या आणि घनदाट जंगल यांचा आमच्या भागात (सोलापूर) असलेल्या आभावामुळे त्यांच्या बद्दल लहानपणापासूनच आकर्षण निर्माण झालं होतं. त्यामुळे हे सर्व जवळून पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी मन ट्रेकिंगकडे वळले.
शहरातून, गावातून जे निसर्गाचे दर्शन आपल्याला घडते त्यापेक्षा अधिक समृद्ध आणि संपन्न निसर्गाचे दर्शन ट्रेकिंगमुळे घडते.
अवघड चढण, तीव्र उताराची दुर्गम पायवाट, ऊन, वारा, पाऊस या सर्वांवर मात करून जेव्हा आपण ट्रेक पूर्ण करतो तेव्हा जो आत्मविश्वास निर्माण होतो त्याच्या जोरावर जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी सामना करण्याचं धैर्य माझ्या अंगी तयार होतं.
स्वतः पेक्षा आधी दुसऱ्यांचा विचार करण्याची, कर्तव्यांपेक्षा जबाबदारिला जास्त महत्त्व देण्याची, आपल्या गरजा नियंत्रित ठेवून आहे त्या परिस्थितिशी जुळवून घेण्याची क्षमता ट्रेकमुळे निर्माण होते.(त्यामुळेच नामांकित कंपन्या टीम स्पिरीट वाढवण्यासाठी ट्रेकचं आयोजन करतात)
छत्रपतींच्या स्वराज्याचा इतिहास फक्त पुस्तकं वाचून, गावामध्ये शहरामध्ये त्यांचा जयजयकार करून समजणार नाही, तो जर समजून घ्यायचा असेल तर गडकोटांच्या पायवाटा तुडविल्या पाहिजे, बुरुजांची तटबंदीची आणि महादरवाज्यांची मजबुती अनुभवली पाहिजे, कर्तृत्ववाचा,शौर्याचा, बलिदानाचा आणि त्यागाचा जो वारसा आहे तो समजून घेतला पाहिजे. त्यासाठी ट्रेकिंग करणं गरजेचं आहे.
ट्रेकिंगला गेल्यानंतर त्या भागातील भाषा, खाद्यसंस्कृती, तिथली जीवनपध्दती यांसोबत ओळख होते आणि सतत आशा वैविध्यपुर्ण जीवनपध्दतींच्या संपर्कात राहिल्यामुळे माझी विचारसरणी प्रगल्भ होऊन उत्तम व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते.
ट्रेकिंगमुळे मला माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमता समजतात, माझ्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टी समजतात ज्यामुळे स्वतःमध्ये काय बदल करणे आवश्यक आहे हे लक्षात येते.
शहरी जीवनशैली मुळे, कामाच्या ताणामुळे जी नकारात्मक विचारांची मरगळ मनावर जमा होते ती झटकून टाकण्यासाठी ट्रेकचा खूप उपयोग होतो. ट्रेकिंगमुळे मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने होते ज्यामुळे माझ्या कार्यक्षमतेत वाढ होते.
निसर्गाला जवळून पाहिल्यामुळे अनुभवल्यामुळे त्याच्या बद्दलचा आदर मनामध्ये आणखीन वाढलाय आणि आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेची काळजी घेण्याची मानसिकता माझ्यामध्ये ट्रेकमुळे तयार झालीय.
ट्रेकिंगमुळे मला माझं अस्तित्व शोधण्यास मदत होते आणि कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे जे आपण फक्त ऐकत आणि बोलत असतो ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळते.
माझ्यासाठी ट्रेकिंगचा अर्थ फक्त डोंगर चढणं आणि उतरणं, दुर्गम पायवाट निवडून जीव धोक्यात घालणं, जंगलातून फेरफटका मारणं हा नसून जगण्याचा आनंद द्विगुणीत करणारी, मातीशी असलेलं नातं आणखीन घट्ट करणारी, निसर्गाप्रति असणाऱ्या जबाबदारीचे भान ठेवून निसर्गसोबत एकरूप होण्याची धाडसी कृती म्हणजे ट्रेकिंग. उंच ठिकाणी जाऊन आजूबाजूचा परिसर पाहणे हा मानवी स्वभावच आहे म्हणुन तर लहान मुलं जेव्हा रांगायला शिकतं तेव्हा ते पायऱ्यांकडे जास्त आकर्षित होताना दिसतं. ट्रेकिंग हा एक प्रवास आहे माणूस आणि माणुसकी यांच्यामधला म्हणूनच जोपर्यंत हा प्रवास सुरू राहील तोपर्यंत माझ्यातली माणुसकी वृद्धिंगत होत राहील.
(तुम्हीही जर ट्रेकर असाल तर ट्रेकिंग का करता हे comment मध्ये नक्की कळवा आणि ही पोस्ट वाचून जर ट्रेकिंग करण्याची इच्छा तुमच्या मध्ये निर्माण झाली असेल तर ते ही नक्की कळवा)