Translate

Saturday, December 21, 2019

#आरएफआयडी

         
          सध्या टोलबुथशी संबंधित फास्टॅग हा शब्दप्रयोग तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकत असाल, तसेच विविध वस्तूंच्या उत्पादनांवर, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर, वन्यप्राणी आणि पाळीव प्राण्यांच्या शरीरावर जाड प्लास्टिकचे स्क्रूच्या आकाराचे किंवा क्रेडिड कार्डच्या आकाराचे टॅग्सही तुम्ही बघत असाल, ते बघितल्यानंतर असे टॅग्स का? वापरले जात असतील आणि फास्टॅग म्हणजे नक्की काय? असे प्रश्न ही तुम्हाला पडले असतील. या सर्व प्रश्नाचं उत्तर म्हणजे ओळख, स्थान, स्थिती आणि इतर उपयोगी माहिती मिळविण्यासाठी वापरलं जणारं आरएफआयडी  हे तंत्रज्ञान. आजच्या लेखात आपण याच तंत्रज्ञानाची माहिती घेणार आहोत.
           'रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन' हे एक असं वायरलेस तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये रेडिओ लहरींचा वापर  माहिती स्टोर करण्यासाठीआणि रीड करण्यासाठी केला जातो. या तंत्रज्ञानामध्ये  मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलित पद्धतीने वस्तूंची ओळख करून त्यांची माहिती संगणकामध्ये प्रविष्ट केली जाते. पशु आणि मनुष्य यांच्या आयडेंटिफिकेशनसाठी आणि ट्रॅकिंगसाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो.  एक लहान इलेक्ट्रॉनिक चीप आणि अँटेना वापरून आरएफआयडी टॅग बनविला जातो, एका मायक्रोचीपमध्ये २ केबी पर्यंतचा डेटा साठवता येतो.  
           आरएफआयडी म्हणजे काय? हे समजून घेण्याआधी आपण फास्टॅग बद्दल थोडक्यात माहिती करून घेऊ, फास्टॅग हे आरएफआयडीचंच एक एप्लिकेशन आहे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वयंचलीतरीत्या टोलबुथवर पैसे भरण्याची ही सुविधा आहे, हा टॅग वाहनाच्या स्क्रीनवर लावला जातो, फास्टॅगमुळे टोलनाक्यावर वाहनांची ओळख होते आणि त्या वाहनाचा टोल फास्टॅगमधील जमा रकमेतून कापला जातो. टॅगमधील रक्कम संपल्यानंतर फास्टॅग रिचार्ज करावा लागतो. फास्टॅगमुळे टोलबुथवर  लागणाऱ्या वाहनांच्या रांगा बंद होऊन वेळेची बचत होण्यास मदत होईल.
             आरएफआयडी रीडर आणि आरएफआयडी टॅग  हे आरएफआयडी तंत्रज्ञानाचे दोन प्रमुख भाग आहेत, आरएफआयडी रीडरमध्ये ट्रांसरिसीवर आणि अँटेनाचा वापर केला जातो तर आरएफआयडी टॅगमध्ये मायक्रोचीप (ट्रान्सपॉन्डर) आणि अँटेनाचा वापर केला जातो. मायक्रोचीपमध्ये  माहिती स्टोर केली जाते किंवा रीड केली जाते, माहिती प्रसारित करण्याचं किंवा प्राप्त करण्याचं काम ट्रांसरिसीवर करतो आणि अँटेना रेडिओ लहरींच्या माध्यमातून माहितीची देवाण घेवाण करण्याचं काम करतो. फिक्स्ड किंवा हॅण्डहेल्ड प्रकारचा ट्रान्समीटिंग आणि रिसीविंग अँटेना आरएफआयडी मध्ये वापरला जातो. जेव्हा आरएफआयडी टॅग स्कॅनिंग अँटेनाच्या(आरएफआयडी  रीडरच्या) क्षेत्रात प्रवेश करतो तेव्हा तो अँटेनाकडून डिटेक्शन सिग्नल प्राप्त करतो आणि ट्रान्सपॉन्डरला कार्यान्वित करतो त्यानंतर आरएफआयडी रीडर ट्रांसरिसीवरच्या आणि अँटेनाच्या माध्यमातुन त्या टॅगवरील माहिती रिड करून टॅगला आयडेंटिफाय करतो.
              ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे आरएफआयडीचे दोन प्रकार पडतात, ऍक्टिव्ह आरएफआयडी मध्ये बॅटरीचा उपयोग केला जातो, याची  रेंज जास्त असते तर पॅसिव्ह आरएफआयडी मध्ये बॅटरीचा वापर केला जात नाही, त्याची रेंज कमी असते. कॅलिफोर्नियाचे उद्योजक मारिओ डब्ल्यू कारड्यूलो यांनी १९७३ मध्ये आरएफआयडीची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. वेगवेगळ्या वस्तुंना ओळखण्याची त्यांचा मागोवा घेण्याची तसेच पुन्हा पुन्हा वापरण्याची, सुरक्षितरित्या माहितीची देवाण घेवाण करण्याची आणि लाईन ऑफ साईटमध्ये  (दृष्टीक्षेपात) नसतानाही काम करण्याची क्षमता असल्यामुळे हे तंत्रज्ञान भारतातच नाही तर संपूर्ण जगात लोकप्रिय ठरत आहे .   
                   


Thursday, November 7, 2019

#विद्यार्थी दिवस




           'सिम्बॉल ऑफ नॉलेज' अशी ज्यांची संपूर्ण जगामध्ये ओळख आहे, ज्यांनी जगामध्ये सर्वोत्कृष्ट अशा भारतीय संविधानाची निर्मिती केली त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० या रोजी सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूल मध्ये प्रवेश घेऊन आपल्या शैक्षणिक जीवनाला सुरवात केली. सामान्य बालकाचा महामानवामध्ये रूपांतरीत होण्याचा प्रवास येथूनच सुरु झाला म्हणून इतिहासात या दिवसाचे विशेष महत्व आहे आणि म्हणूनच हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साज्ररा केला जातोय.
           ज्या काळात शिक्षण हे एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती अशा प्रतिकूल परस्थितीत बाबासाहेबांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेबांनी अफाट बुद्धिमत्तेच्या आणि अपार कष्टाच्या जोरावर  MA, Ph.D, Dsc, LL.d, D.Lit आणि Barrister-at-law  अशा तब्बल सहा पदव्या मिळवल्या त्यांनी त्यांचे उच्चशिक्षण कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पूर्ण केले. बाबासाहेबांना वाचनाची अत्यंत आवड होती. बाबसाहेब हे जगातील एकमेव असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी पुस्तकं व्यवस्थित जतन करता यावी आणि त्यांचे व्यवस्थित वचान करता यावे याकरिता ‘राजगृह’ ही वास्तू बांधली. त्यांच्याकडे जवळपास ४००००  पुस्तकांचा संग्रह होता त्यामध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकांचा समावेश होता जे त्यांनी परदेशातून आणले होते.
         शिक्षण ही प्रत्येक व्यक्तीची मुलभूत गरज आहे कारण त्यामुळेच तो स्वताचा, समाजाचा, आणि देशाचा विकास साधू शकतो  हे ओळखून बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत मुलभूत गरजांमध्ये शिक्षणाचा समावेश केला आणि ते प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचेल अशी तरतूद ही केली. सामान्य व्यक्तीलाही असामान्य बनविण्याचे सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे, म्हणून बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला. माणूस हा आजन्म विद्यार्थीच असतो असे ते मानत कारण माणूस जोपर्यंत शिकत राहतो तोपर्यंत त्याची प्रगती होत राहते. जर व्यक्ती आणि समाज यामध्ये निवडायचे झाल्यास समाजाला प्राधान्य दिले पाहिजे,  समाज आणि देश यामध्ये निवडायचे झाल्यास देशाला प्राधान्य दिले पाहिजे या मताचे बाबासाहेब होते. मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे असे ते म्हणत. भारतीयत्वाची बीजे विद्यार्थाच्या मनात खोलवर रुजविण्यासाठी बाबासाहेबांचे हे विचार खूपच  पोषक आहेत.
         देशाचे भवितव्य हे विद्यार्थ्यांवरच अवलंबून असते त्यामुळे विद्यार्थी हा सक्षम असणे हे फार  गरजेचे आहे. बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार आणि कर्तृत्व हे जर विद्यार्थ्यांनी समजून घेतले आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते सक्षम बनतील आणि देशाला आणखीन समृद्ध बनविण्यासाठी योगदान देतील.

Monday, October 7, 2019

#आरेच्या निमित्ताने - पर्यावरण की विकास.

           

           मुंबईचे फुफुस अशी आरेची ओळख आहे, शरीरातील फुफुस जर बंद झालं तर काय होऊ शकतं हे माहिती असूनही जर आरेवर चालवली जाणारी कुऱ्हाड थांबत नसेल तर मग आपण अशा टप्प्यावर येऊन पोहचलो आहोत जिथे आपल्यला पर्यावरण कि विकास हा निर्णय घेणं अत्यावश्यक बनतं.  मागच्या काही दशकांपासून पूर, अतिवृष्टी, भूकंप, चक्रीवादळं, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत आहे, पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे यासाठी सर्वस्वी माणूस जबाबदार आहे, निसर्गाच्या होणाऱ्या ऱ्हासाकडे दुर्लक्ष करणे हा मानवाचा स्वाभाविक गुण बनत चालला आहे. स्वतःचं जीवन सुख सोयींनी समृद्ध करण्याच्या हव्यासापोटी विकासाच्या आणि  शहरीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली वृक्षतोड या परिस्थितीस कारणीभूत आहे. काही शतकांपूर्वी पृथ्वीचा सुमारे ६० % भाग वनांनी व्यापलेला होता, सध्या पृथ्वीच्या केवळ २१ % भागातच वने आहेत. निसर्गाच्या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच पण ती चक्रे मोडली तर दुरुस्त करणेही जमण्यासारखे नाही म्हणून ही वृक्षतोड जर अशीच चालू राहिली तर एक दिवस पृथ्वीचा विनाश अटळ आहे. 
             इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स (IISC), बँगलोरच्या नेतुत्वात झालेल्या अभ्यासाने, मागील चाळीस वर्षात पक्के रस्ते आणि काँक्रीटीकारणाच्या प्रक्रियेमुळे मुंबईने ६० % वनसंपत्ती आणि ६५ % जमिनीतील पाण्याचे स्रोत गमावले असल्याचे सिद्ध केले आहे, त्यामुळे मुंबईचा विकास हा पर्यावरणाची किंमत मोजून झाला असल्याचे  स्पष्ट झाले आहे. प्रत्येक व्यक्तीमागे सात झाडं हे गुणोत्तर आदर्श मानलं जातं पण याच संस्थेने २०१४ मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार मुंबईच्या बाबतीत हे गुणोत्तर चार व्यक्तीमागे फक्त एक झाडं इतकं कमी आहे. मुंबईतील लोकांसाठी पुरेसा ऑक्सिजन सुनिश्चित करण्यासाठी शहराचा ३३ % भाग हा हिरवळीखाली असणं गरजेचं आहे पण सध्या फक्त १३% भागच हिरवळीखाली आहे अशा गंभीर परिस्थितीत आणखीन वृक्षतोड करणे हे मुंबईसाठी अत्यंत धोक्याचे आहे. बृहन्मुंबई म्युनसिपल  कॉर्पोरेशनच्या(BMC ) आकडेवारी नुसार मुंबई मध्ये एकूण ३५.९८ लाख झाडं आहेत ज्यापैकी ४,८४,७६१ झाडं एकट्या आरेमध्ये आहेत (विविध प्रजातीच्या वृक्षांसोबतच, पक्ष्यांच्या ७६ प्रजाती, १६ सस्तन प्राणी, बिबट्याच्या ९ प्रजाती आणि ३८ सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती यांचं आरे हे अधिवास आहे) म्हणून येथील जंगलाचे संवर्धन आणि संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. मुंबईला दिवसेंदिवस वाढत असलेल्या पर्यावरणीय समस्यांचा सामना करावा लागत आहे, एन्व्हायर्नमेंट पॉलिसी अँड रिसर्च इंडियाच्या (EPRI ) संशोधकांच्या मते या परिस्थतीत सुधारणा करण्यासाठी शहराला पुढील पाच वर्षासाठी सर्वसमावेशक अशा पर्यावरणीय योजनेची आवश्यकता आहे, सरकारने आणि खाजगी भाग धारकांनी एकत्र येत नागरिकांची सुरक्षा, त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम आणि पर्यावरणाचे रक्षण याचा एकत्रित विचार करून ही योजना तयार करण्याची गरज आहे.      
                    जी अवस्था मुंबईची आहे तीच आपल्या राज्याची आणि देशाचीही आहे, वृक्ष-व्यक्ती हे  गुणोत्तर सर्वात कमी असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे, व्यक्तीमागे २८ वृक्ष हे भारताचे गुणोत्तर आहे तर व्यक्तीमागे १०२ आणि २७६ वृक्ष हे गुणोत्तर अनुक्रमे अमेरिका आणि चीन या देशांचे आहे. देशभरात सर्वात जास्त वृक्षतोड महाराष्ट्रात झाली आहे, २००७ ते २०१६ दरम्यान एकूण १५ लाख वृक्षांची अवैधरित्या कटाई महाराष्ट्रात झाली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळेच वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण यासारख्या  समस्यांमध्ये वाढ होत  आहे.
                    झाडांमध्येही जीव असतो त्यामुळे त्यांना इजा पोहचवू नये अशी शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती, झाडांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे (चिपको आंदोलन)आपले पूर्वज. आपल्या पूर्वजांना पर्यावरण शिक्षणाची कधी गरज पडली नाही कारण त्यांना आपल्या संस्कृतीचा विसर कधी पडला नाही, तसेच पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागते याची त्यांना जाणीव होती. पण आता आपली विचारसरणी बदलली आहे, स्वतःच्या स्वार्थापुढे संस्कृती, पूर्वजांचे विचार पर्यावरणाचे रक्षण या सर्व गोष्टींचा आपल्याला विसर पडला आहे. वृक्षतोड ही फक्त वनसंपत्तीसाठीचं नव्हे तर पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी, कीटकांसाठी आणि तिथल्या संपूर्ण जैवविविधतेसाठी धोकादायक आहे, एकदा का एखाद्या ठिकाणची जैवविविधता धोक्यात आली तर मग तिथल्या पाणी, हवा, जमिन या घटकांवरही त्याचा परिणाम होतो आणि पर्यायाने मानवी जीवनही प्रभावित होते. आपणही पर्यावरणाचाचं एक भाग आहोत याचाही आपल्याला विसर पडला आहे.
                    पर्यावरणाचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, आणि ते करण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या पाहिजेत असे नाही, तर ऊर्जेचा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करणे, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जैववविधतेचं संवर्धन करणं, जास्तीत जास्त झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करणं पुरेसं आहे. देशपातळीवर देशाच्या विकासासाठी जशा योजना राबविल्या जातात तशाच पर्यावरणाच्या संरक्षणासाठीही योजना राबविल्या गेल्या पाहिजेत, त्याचबरोबर पुढील काही दशकांसाठीचं वनधोरण निश्चित केले गेले पाहिजे, अनियोजित शहरिकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे, गावांकडून शहरांकडे येणारे लोंढे थांबविले पाहिजे शहरांबरोबरच गावंही विकसित करण्यावर अधिक भर दिला पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या गरजा नियंत्रित ठेवून, निसर्गाला प्राधान्य देऊन जर प्रगती साधली तर मुबंई समोरच्याच नाही तर जगासमोरच्याही समस्या दूर होतील.
             

Friday, October 4, 2019

#फकिरा

         
"आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी मरायला आणि मारायला सज्ज असणारा लढवय्या म्हणजे 'फकिरा'. गुलामगिरीच्या जगण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठीचं मरण श्रेष्ठ मानणारा, अन्याय सहन न करणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा, दुर्बलांच्या मदतीला धावणारा कर्तृत्ववान पुरुष म्हणजे फकिरा. फकिराच्या संघर्षासोबत वाचकांनी एकरूप होऊन जाणं हेच आण्णा भाऊंच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे."



             'स्मशानातलं सोनं' हा धडा पहिल्यांदी  वाचल्यावर मी या गोष्टीत एवढा हरवून गेलो होतो कि भीमा त्याचं कुटुंब, भाकरीसाठीचा त्यांचा संघर्ष हे सगळं मला आपल्यापैकीच कोणाचंतरी आहे असं वाटत होतं, या गोष्टीचा जो शेवट आहे त्याने मी तेव्हा खूप बैचैन झालो होतो, ती अस्वस्थता अजूनही माझ्यामध्ये तशीच आहे त्यामुळेच दहावीत वाचलेला मराठीच्या पुस्तकातील धडा माझ्या अजूनही जसाच्या तसा लक्षात आहे, शाळेतच नकळत आण्णा भाऊंच्या लेखणीसोबत माझी वैचारिक नाळ जोडली गेली,  'आवडी' (कादंबरी) आणि रशियाच्या प्रवास वर्णनाच्या वाचनानंतर ती आणखीन दृढ झाली, आणि आता 'फकिरा' वाचल्यानंतर  ती खऱ्या अर्थाने समृद्ध झाली आहे असे मला वाटते. फकिरा या कादंबरीमध्ये आण्णा भाऊ साठे यांनी फकिरा राणोजी मांग या आपल्या काकाच्या अन्याय आणि गुलामगिरी विरोधातल्या लढ्याची मांडणी केली आहे.
           फकिरा' हि कादंबरी वाचल्यानंतर फकीराची जी प्रतिमा माझ्या मनात तयार झाली ती अशी, आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी मरायला आणि मारायला सज्ज असणारा लढवय्या म्हणजे 'फकिरा'. गुलामगिरीच्या जगण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठीचं मरण श्रेष्ठ मानणारा, अन्याय सहन न करणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा, दुर्बलांच्या मदतीला धावणारा कर्तृत्ववान पुरुष म्हणजे फकिरा. फकिराच्या संघर्षासोबत वाचकांनी एकरूप होऊन जाणं हेच आण्णा भाऊंच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांचं, वारणेच्या खोऱ्याचं, कृष्णाकाठच्या गावाचं, निवडुंगाच्या कड्यात वसलेल्या उपेक्षित माणसांचं, त्या उपेक्षित माणसांचं माणूसपण नाकारणाऱ्या जातिव्यवस्थेचं आणि इंग्रजांच्या जुलमी राजवटीचं आण्णा भाऊंच्या लेखणीनं केलेलं चित्रण हे त्यांच्या प्रतिभेचं द्योतक आहे. या कादंबरीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक घटना आपल्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते, यातील प्रत्येक व्यक्तीशी आपण जोडले जातो, आपण याचाच एक भाग आहोत असंच आपल्याला वाटत राहतं, या वैशिष्ट्यामुळेच या कादंबरीने मराठी मनावर अधिराज्य गाजविले आणि महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळवला.
            आण्णा भाऊ साठे यांनी ही कादंबरी बाबासाहेबांच्या लेखणीला का अर्पण केली याचं उत्तर ही कादंबरी वाचल्यानंतर समजतं. संघर्ष हा प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य घटक आहे, त्याला सामोरं  कसं जायचं, हार न मानता लढत कसं राहायचं आणि स्वाभिमानानं कसं जगायचं हे फकिरा आपल्याला  शिकवून जातो. फकिराच्या संघर्षाला मानवतेची जोड आहे त्यामुळेच त्याचा संघर्ष सर्वांसाठी प्रेरक ठरतो. जातिव्यवस्थेचे निर्बंध स्वीकारून फकिरा जर गुलामाप्रमाणे जगला असता तर त्याची ओळख  काळाच्या पडद्याआड कधीच पुसून गेली असती पण तसे झाले नाही, कारण फकिराची ओळख ही त्याच्या कर्तृत्वामुळे आहे आणि म्हणूनच ती कधीही पुसली जाणार नाही. फक्त एका विशिष्ट्य जातीत जन्मल्याने कोणीही विद्वान, शूर, पराक्रमी, नम्र, चोर, गुन्हेगार किंवा घाबरट  ठरत नाही कारण हे सर्व माणसाचे गुणविशेष आहेत जातीचे नव्हे, त्यामुळे एखाद्याची योग्यता फक्त जातीच्या आधारे ठरविणे हे पूर्णपणे अनैसर्गिक आहे, माणसाची ओळख ही त्याच्या कर्तृत्वावरूनच केली गेली पाहिजे. जर प्रत्येकाने आपल्यातला फकिरा जिवंत ठेवला तर कुणावरही कुणाची मानसिक किंवा शारीरिक गुलामी करण्याची वेळ येणार नाही.



Sunday, June 9, 2019

#इंटरनेट ऑफ थिंग्ज (Iot)

                                                 


                                                        
           सकाळी झोपेतून उठल्यानंतर  रूममधील लाईट, फॅन /ऐसी  औटोमॅटिक बंद होतात, स्मार्ट अलार्म क्लॉक  गिझर चालू करण्यासाठी  सूचना  पाठवतो ,  इलेक्ट्रिक टूथब्रशने ब्रश केल्यानंतर  दातांची हेअल्थ कशी आहे याची माहिती डेंटिस्टला पाठवली जाते जर प्रॉब्लेम असेल तर डेंटिस्ट सोबतची अपॉइंटमेंट फिक्स केली जाते , अंघोळ झाल्यानंतर गिझर कॉफी मेकर आणि ओव्हन ला मेसेज पाठवतो  त्याप्रमाणे ते चालू होतात, जर फ्रिज मधील दूध, अंडे, फळे, भाज्या संपल्या असतील तर फ्रिज  याची  माहिती कळवतो  आणि त्या मागवून ही  घेतो, नाश्ता करून  कामाला  जाण्यासाठी  बाहेर निघाल्यानंतर  गाडीचा एसी ऑटोमॅटीक चालू होतो आवडती  गाणी किंवा बातम्या प्ले केल्या जातात, त्याचबरोबर गाडीची माहिती जसं पेट्रोल किती आहे, टायर, इंजिन आणि ब्रेक यांची काय स्थिती आहे हे   मोबाईलवर दिसेतं  आणि त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तसा मेसेज गाडीच्या कंपनीला ही  पाठवला जातो त्याप्रमाणे सर्विसिंग कधी करायचं ते ठरवलं जातं , गाडीने जाताना ट्रॅफिक, एन्व्हायर्मेंट यांची उपडेट तुम्हाला मिळत राहते, तुम्हला जिथं पोचायचं आहे तिथं गाडीचं तुम्हला घेऊन जाते, आणि अचानक लक्षात येतं  कि घरातला एसी, लाईट बंद करायचा राहून गेलं तर लगेच आहे तिथुन बंद बंद केले जातात. हे कोणत्यातरी हॉलीवूडच्या सिनेमातील हिरोची एन्ट्री दाखवणारं कथानक किंवा संशोधकाची कल्पना आहे असं तुम्हाला वाटत असेल पण तसं काही नाही. हे सर्व सत्य आहे आणि ज्यामुळे हे सर्व घडत आहे त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे इंटरनेट ऑफ थिंग्ज . याच तंत्रज्ञानाची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत.  
          
          इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे अशा वस्तू ज्या इंटरनेटने एकमेकांना जोडता येतात. एमआयटी शास्त्रज्ञ केव्हिन अष्टोन यांनी १९९९ मध्ये प्रथमतः इंटरनेट ऑफ थिंग्जची संकल्पना मांडली. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे एक अशी व्यवस्था ज्यात स्वतंत्र ओळख (आयडी) असलेली यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक तसेच डिजिटल उपकरणे जी बंद आणि चालू करता येतात ती  इंटरनेटमार्फत मानवाच्या हस्तक्षेपाशिवाय एकमेकांसोबत प्रत्यक्षदर्शी (रिअल-टाइम) माहितीचे आदानप्रदान करू शकतात. म्हणजेच वरती सांगितल्याप्रमाणे मोबाईल, स्मार्ट वॉच, फ्रिज, एसी, फॅन,टीव्ही, ओव्हन, कार यांसारखी अनेक उपकरणं  इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधून  माहितीची देवाण करून अनेक टास्क परफॉर्म करू शकतात. कोणत्याही उपकरणाला आयपी ऍड्रेस देऊन(IP V-6) इंटरनेट सोबत जोडून त्याचा समावेश आयओटी मध्ये करता येतो. आयओटी मुळे मानवी जीवन ऑटोमॅटिक मोड मध्ये जगणं शक्य होत आहे.  
              
        आयओटी कसं काम करतं ते आता आपण बघूया, सेन्सर कडून जी माहिती मिळते ती सर्व माहिती आयओटीने जोडलेली उपकरणं इंटरनेटच्या माध्यमातून क्लाउडवर (व्हर्चुअल सर्व्हर) पाठवतात जिथे त्या माहितीवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रक्रिया करून कामाची माहिती वेगळी केली जाते आणि त्या माहितीच्या आधारावर  वेगवेगळ्या टास्क परफॉर्म करण्याची  सूचना आयओटी उपकरणांना दिल्या जातात. वेळेची बचत करणाऱ्या, उपकरणांच्या  कार्यक्षमतेत वाढ करणाऱ्या आणि कमी खर्चिक असणाऱ्या या तंत्रज्ञानातीला मुख्य अडथळा म्हणजे सुरक्षा, सर्व माहितीची देवाणघेवाण  इंटरनेटच्या माध्यमातून केली जात असल्यामुळे ती चोरी होण्याचा आणि तिचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्मार्ट शहरांच्या विकासात इंटरनेट ऑफ थिंग्जची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भविष्यात आयओटीमुळे शहरी जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत त्यामुळेच आयओटीशी जोडल्या जाणाऱ्या उपकरणांची संख्या झपाट्याने वाढत आहे, जवळपास सात बिलियन उपकरणं आतापर्यंत आयओटीशी जोडले गेलेत आणि पुढील काही वर्षातच संपूर्ण जग या तंत्रज्ञानाने व्यापून जाईल यात काही शंका नाही.
                                                                                         

Friday, June 7, 2019

#तंत्रशिक्षण आणि उपलब्ध संधी

     

  काही दिवसातच दहावीचे निकाल जाहीर होतील, निकाल लागताच विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात  कुठलं शिक्षण क्षेत्र निवडायचं? कोणत्या क्षेत्रात नौकरीच्या सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत? कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचं यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित व्हायला सुरू होतात, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जर त्यांना मिळाली तरच ते योग्य तो निर्णय घेऊ शकतात, पण बऱ्याच वेळा पालक आणि विद्यार्थी ज्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून या प्रश्नांची उत्तरं मिळविण्याऐवजी ऐकीव व चुकीच्या माहितीच्या आधारे निर्णय घेतात ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. विद्यार्थी व पालकांचे चुकीच्या निर्णयामुळे होणारे नुकसान टाळणे आणि त्यांना योग्य निर्णय घेण्यास उपयुक्त असे मार्गदर्शन करणे हाच या लेखाचा मुख्य उद्देश आहे.

तंत्र शिक्षणाला प्रचंड मागणी
 करिअरच्या विविध क्षेत्रांबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये चुकीच्या माहिती मुळे अनेक गैरसमज तयार झाले आहेत त्यापैकीच एक गैरसमज म्हणजे तंत्र शिक्षण या (डिप्लोमा) अभ्यासक्रमाला आता वाव उरलेला नाही. एखाद्या अभ्यासक्रमाला वाव आहे किंवा नाही हे तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर  रोजगाराच्या संधी किती प्रमाणात उपलब्ध आहेत यावरून ठरविले जाते. त्यामुळे नौकरीची उपलब्धता सांगणाऱ्या ज्या सध्याच्या नामांकित वेबसाईट आहेत (जसं नौकरी.कॉम, सारकरिनौकारी.कॉम) त्याची आकडेवारी आणि तंत्रज्ञानावर आधारित काम करणाऱ्या ज्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत त्यांची मागच्या वर्षात झालेल्या भरतीची आकडेवारी पाहून डिप्लोमानंतर नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत की नाहीत याचं उत्तर प्रत्येकजण स्वतः मिळवू शकतात.

तंत्र शिक्षणाची माहिती
          नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत की नाहीत हे तर स्पष्ट झालं आता तंत्रशिक्षण या क्षेत्राची अधिक माहिती आपण करून घेऊ. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई हे विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि उद्योजक या गुणांना विकसित करणारे, इंजिनिअरिंगचे विविध विभाग, टेक्सटाईल आणि प्रिंटिंगशी संबंधित विविध ७० अभ्यासक्रम राबविते. या सर्व अभ्यासक्रमांना दहावी आणि बारावी वरून थेट प्रवेश दिला जातो  आणि पदविका अभ्यासक्रमानंतर इंजिनिअरिंगला थेट व्दितीय वर्षाला प्रवेश दिला जातो यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रवेश परीक्षेची गरज नाही. उद्योगांना आवश्यक असं कुशल मनुष्यबळ निर्माण  करण्यासाठी मंडळाकडून  दर चार ते पाच वर्षाला या अभ्यासक्रमामध्ये बदल केला जातो.२०१७-१८ पासून आउटकम बेस्ड  एज्युकेशन(OBE) अंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता यावर भर देणारा आय स्कीम हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे, या अभ्यासक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे मायक्रो प्रोजेक्ट तयार करणे  आणि सहा आठवड्याचे इंटर्नशिप (इंडस्ट्री मध्ये  प्रशिक्षण घेणं) करणे बंधनकारक आहे.या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनांना आणि कल्पकतेला वाव मिळून रोजगाराच्या संधी मध्ये वाढ निर्माण होत आहे.    तंत्र शिक्षण हा फक्त रोजगाराच्या संधीच उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम आहे असे नाही तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे ज्ञान आणि बळ देणारा हा अभ्यासक्रम आहे, प्रात्यक्षिक ज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर तसेच सर्वांगीण विकासावावर भर असल्याने सद्य परिस्थितीत उद्योगांकडून नौकरीसाठी पदविका अभ्यासक्रम पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात आहे.

गैरसमजुती
            तंत्र शिक्षणाच्या विशिष्ट अभ्यासक्रमलाच मागणी आहे आणि तंत्र शिक्षणला नेहमीच मागणी राहील असे नाही  अशा काही गैरसमजुती विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसून येतात. भारतासारख्या विकसनशील देशाला विकसित होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या कुशल मनुष्यबळाचीही तितकीच आवश्यकता आहे. जर भारताचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर हे मनुष्यबळ एका विशिष्ट तंत्रज्ञानाशी संबंधित असून चालणार नाही तर ते  मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आणि कॉम्प्युटर यांसारख्या सर्व तंत्रज्ञानाशी निगडित असणे गरजेचे आहे. घरांची, रस्त्यांची, कपड्यांची, वाहनांची, इलेक्ट्रिसिटीची, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची माणसाला असणारी गरज ही कधीही न संपणारी आहे त्यामुळे तंत्र शिक्षणाची मागणी बंद होणं अशक्य आहे, जोपर्य तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे तोपर्यंत तंत्र शिक्षणाला मरण नाही.

उपलब्ध संधी
         तंत्र शिक्षण अभ्यासक्र पूर्ण केल्यानंतर रेल्वे,मेट्रो ट्रेन, बीएसएनएल, डीआरडीओ, इसरो,एचएएल, एमएससीबी, आकाशवाणी, प्रसारभारती, पर्यटन विभाग, पेट्रोलियम कंपन्या, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिलिटरी, नेव्ही, ऐरफोर्स यामध्ये सरकारी नौकरीच्या आणि अनेक खाजगी कंपन्यांसोबतच परदेशातही नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातही सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्या प्रमाणात केला जात आहे त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला म्हणजे सगळं झालं असं नाही तर योग्य महाविद्यालयाची निवड करणे आणि विद्यार्थ्यांने ही या अभ्यासक्रमात रुची घेऊन मेहनत करणे आवश्यक आहे हे पालकांनी समजून घेतले पाहिजे. पालकांनी विद्यार्थ्यांची आवड आणि योग्यता समजून घेऊन त्याप्रमाणे  करिअरचे क्षेत्र निवडण्यात मदत केली आणि खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिले तर प्रत्येक विद्यार्थी यशाचे शिखर गाठेल यात काही शंका नाही.
                                          
प्रा.अमित बनसोडे.
एस.व्ही.आय.टी कॉलेज
 सोलापूर.

Tuesday, May 14, 2019

#धर्मवीर नव्हे तर स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज.



"स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची प्रेरणा देणारे भारतीय इतिहासातील महान  व्यक्तिमत्व म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती  संभाजी महाराज.  साडेतीनशे  वर्षांनंतरही जनमानसात या व्यक्तिमत्वाबद्दलचं आकर्षण अबाधित राहण्याचे कारण म्हणजे स्वराज्याच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी केलेले आत्मबलिदान हे होय." 
                संभाजी महाराजांचा स्वराज्याप्रतीचा दृष्टिकोन हा शिवाजी महाराजांना जसा अभिप्रेत होता अगदी तसाच होता. स्वराज्याच्या हितासमोर संभाजी महाराजांनी कशाचीही पर्वा केली नाहीशेवटच्या श्वासापर्यंत  स्वराज्याच्या  हिताचा विचार केला. 'राजश्री आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्यया भावनेनी त्यांनी  स्वराज्याचा राज्यकारभार सांभाळलात्यांनी स्वराज्याचा विस्तार दक्षिणेकडील त्रिचनापल्लीच्या पाषाणकोटापर्यंत आणि उत्तरेकडे बुऱ्हाणपुरापर्यंत वाढवलास्वराज्याची फौजआरमार आणि खजिना यामध्ये वाढ केली.  सात लाखांची फौज घेऊन  जेव्हा औरंगजेब स्वराज्यावर चालून आला तेव्हा धैर्याने आठ वर्षे त्याच्याशी लढा दिलास्वराज्यातील एकही महत्वपूर्ण किल्ला औरंगजेबाला मिळू दिला नाही त्याचदरम्यान आलेल्या प्रचंड दुष्काळाच्या काळातही रयतेकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. दुष्काळाच्या काळातही स्वराज्यातील प्रत्येक किल्ला जास्तीत जास्त काळ लढता राहावा यासाठी धान्यदारुगोळा इ. व्यवस्था चोखपणे बजावली त्यामुळेच तर रामशेज सारखा टेकडीवरील किल्ला घ्यायलाही औरंगजेबाला पाच वर्षे लागली. संभाजी महाराज एकाचवेळी मोगलसिद्दीपोर्तुगीज आणि इंग्रज अशा  चार आघाड्यांवरती लढत होते. संभाजी महाराजांना परकीयांसोबतच आप्तस्वकीयांशी आणि राजद्रोही वतनदाराशी लढावे लागले.

       छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र नाटककारकादंबरीकार आणि काही इतिहासकारांनी विकृत स्वरूपात मांडलेयासाठी मुख्यतः मल्हारराव रामराव चिटणीसांची बखर जबाबदार आहे जी त्यांनी शंभूराजांच्या मृत्यूनंतर १२२ वर्षांनंतर लिहली आपले पूर्वज बाळाजी आवजी यांना हत्तीच्या पायी तुडवून मारल्याचा राग या बखरीतून दिसून येतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात चुकीची प्रतिमा निर्माण झाली. कारण बहुसंख्य मराठी माणसं नाटक कादंबऱ्यातुन इतिहास पाहतात व वाचतात आणि त्यामधला इतिहास खरा मानतात. वा.सी बेंद्रे ,डॉ. कमल गोखलेजयसिंगराव पवार यांसारख्या इतिहास संशोधकांनी उपलब्ध कागदपत्रेपुरावे यांच्या आधारे महाराष्ट्रामध्ये शेदीडशे वर्षे रूढ असलेली संभाजी महाराजांची विकृत प्रतिमा नष्ट करून पराक्रमीशूरमुत्सद्दीदूरदर्शी व कर्तव्यदक्ष अशी तेजस्वी प्रतिमा जगासमोर मांडली. ही प्रतिमा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविणे हे प्रत्येक शिवशंभू अनुयायाचे कर्तव्य आहे.      

                   इतिहास हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहला जातो. तत्कालीन पत्रव्यवहारबखरीप्रवास वृंतांतताम्रपट इत्यादी गोष्टी ऐतिहासिक साधनात मोडतात पण एकाही तत्कालीन साधनांमध्ये संभाजी महाराजांनी धर्मासाठी मृत्यू पत्करल्याचे नमूद केलेलं नाही. त्यामुळे धर्मवीर संभाजी ही महाराजांची प्रतिमा इतिहासाला धरून नाही. औरंगजेबाचा चरित्रकार साकी मुस्तैदखान हा संभाजी महाराजांना बादशाही छावणीत आणले तेव्हा हजर होता. औरंजेबाकडून धर्मांतराचा प्रस्ताव मांडला गेला असता तर खात्रीनेच त्याने तसा उल्लेख आपल्या ग्रंथात केला असता पण त्याच्या ग्रंथात तसा  कुठे उल्लेख नाही. औरंगजेबाने  संभाजी महाराजांना राहुल्लाखान या खास अधिकाऱ्यामार्फत फक्त दोनच प्रश्न विचारले स्वराज्याचा खजिना कोठे आहेआणि बादशहाचे कोण कोण सरदार फितूर झालेतयाव्यतिरिक्त कसलेही प्रश्न किंबहुना  प्रस्ताव औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर मांडल्याचा उल्लेख नाही. ऐतिहासिक गोष्टी आत्मसात करताना प्रत्येकाने त्या पडताळून बघणे गरजेचं आहे

     संभाजी  महाराजांची स्वातंत्र्यवीरस्वराज्यरक्षक हीच प्रतिमा इतिहासाला धरून आहे त्यामुळे तीच प्रतिमा सर्वानी स्वीकारली पाहिजे. आज देशाला संभाजी महाराजांच्या याच स्वातंत्र्यप्रिय आणि स्वाभिमानी विचारांची गरज आहे. देश सर्वप्रथम ही भावना तयार होण्यासाठी प्रत्येकाने संभाजी महाराजांचे विचार समजून घेऊन ते कृतीत उतरविणे अत्यावश्यक आहे. 





Saturday, February 16, 2019

#शिवछ्त्रपतींची खरी ओळख.





   "या जगामध्ये लढाया करणारे खूप होऊन गेले, पराक्रम गाजवणारेही खूप होऊन गेले पण काळाच्या ओघात हळू हळू त्यांचा प्रभाव कमी कमी होत गेला पण शिवाजी या तीन अक्षरांचा प्रभाव साडेतीनशे वर्षानंतरही कायम आहे. हि तीन अक्षरे  कानांवर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात. काय जादू आहे या तीन अक्षरात? काय वेगळेपण आहे या तीन अक्षरांचे? खरे तर जादू या तीन अक्षरांची नाही, वेगळेपण या तीन अक्षरांचे नाही. ती जादू आहे या तीन अक्षरांचे नाव धारण करणारया एका उज्वल आणि उदात्त चरित्राची, ते वेगळेपण आहे एका नैतिक आणि निरामय चारित्र्याचे."
         वयाच्या सातव्या वर्षापासून ते बाराव्या वर्षापर्यंतचे प्राथमिक दर्जाचे शिक्षण शिवरायांनी कर्नाटकातील बेंगलोर या ठिकाणी शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्या देखरेखीखाली पूर्ण केले. शहाजीराजांनी शिवरायांना वयाच्या बाराव्या वर्षी कर्नाटकातून पुण्याचा राज्यकारभार सांभाळण्यासाठी पाठवले, त्यांनी शिवारायांसोबत हत्ती, घोडे, आणि पायदळातील सैन्य दिले, पिढीजात विश्वासू अमात्य आणि निष्णात अध्यापकही दिले, बिरुदे आणि उंच उंच ध्वज दिले, मोठा खाजानाही दिला. शहाजी राजांनी उत्तम तयारी करून घेऊनच शिवरायांना पुण्याकडे पाठवले. शहाजी राजांनी केवळ एक जहागिरी सांभाळण्यासाठी शिवरायांना पुण्याला पाठवले नव्हते तर स्वराज्याचा अधिपती बनण्यासाठीच पाठवले होते. शिवरायांना घरातूनच राज्यकारभाराचे, युधतंत्राचे, प्रजापालनाचे, आणि कृतज्ञतेचे संस्कार प्राप्त झाले. शहाजी राजे आणि जिजामाता यांनी केलेले स्वराज्यस्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते.
          शिवाजी महाराजांनी फक्त लढाया नाही केल्या, नुसते पराक्रम गाजवले नाही तर माणसांची मने स्वतंत्र केली, त्यांचा स्वाभिमान जागृत केला. शिवपूर्वकाळातही मराठे (जे मराठी बोलत ते मराठे, महाराष्ट्राबाहेर ब्राम्हण, मराठा किंवा इतर जातींना मराठे म्हणूनच ओळखले जात) कर्तबगार होते, पराक्रमी होते. पण ते निजामशाही, आदिलशाही किंवा मोगलांची चाकरी करत होते. मनसबदार, जहागीरदार, वतनदार, सरदार म्हणून ते काम करत होते. ही गुलामीची मानसिकता महाराजांनी मोडून काढली. भूमिपुत्राचं राज्यच त्या भूमीत असलं पाहिजे असा स्वतंत्र आणि स्वाभिमानी विचार महाराजांनी मांडला आणि पुढे स्वराज्याची निर्मिती करून तो कृतीतही उतरविला.
         शिवाजी महाराज वारसा हक्काने राजे झाले नव्हते तर त्यांनी राजेपद निर्माण केलं, त्यांनी राज्य निर्माण केले हिंदवी स्वराज्य. हिंदवी म्हणजे फक्त हिंदू नव्हे, हिंदवी मध्ये फक्त हिंदू नाही तर त्यांच्या बरोबर सर्वच जाती धर्माचे लोक होते. स्वराज्य म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाचं राज्य, समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला आपले वाटणारे राज्य. स्वराज्यामध्ये स्त्रियांना सन्मानाने वागवले जात, त्यांच्या बाबतीत जर कोणी अनुचित वर्तन केले तर त्याला कठोर शासन केले जात होते.महाराजांचं सैन्य हे रयतेच्या जीवितेचं, अब्रूचं संरक्षण करणारं सैन्य होतं बाकीच्या राज्याकर्त्यांसारखं ते लुटारुंचं  सैन्य नव्हतं. महाराजांनी अनेक आक्रमणे केली, दोनदा सुरत लुटली पण परधर्मातील धार्मिक स्थळांना इजा पोहचविल्याची  इतिहासात नोंद नाही. स्वधार्मासोबतच परधर्माचाही सन्मान करण्याची वृत्ती महाराजांमध्ये होती. सत्य न्याय यावरील निष्ठा आणि सर्वाना समान न्यायपूर्ण वागणूक हीच स्वराज्याची वेगळी ओळख होती. स्वराज्याची संकल्पना ही संकुचित, मर्यादित, सीमित नव्हती. महाराजांचा जो संघर्ष होता तो सत्तेसाठीचा संघर्ष होता, तो धार्मिक संघर्ष नव्हता. जर महाराजांचा संघर्ष हा  धार्मिक असता तर सर्व मराठा सरदार, हिंदू राज्यकर्ते महाराजांच्या बाजूने लढले असते पण तसे नव्हते अनेक मराठा सरदार हिंदू राज्यकर्ते माराजांच्या विरोधात लढत होते. महाराजांचा संघर्ष जर धार्मिक असता तर त्यांच्या पदरी एकही मुसलमान सरदार सैनिक इतर चाकर दिसले नसते पण तसे नव्हते. महाराजांच्या पायदळाचा सेनापती नूर बेगम, तोफखानाचा प्रमुख इब्राहीम खान, आरमाराचा प्रमुख दौलतखान आणि त्यांचा वकील काजी हैदर हे होते. त्याकाळात जसे हिंदुराज्यकर्त्यांकडे मुसलमान सरदार आणि सैन्य होते तसेच मुसलमान राज्यकार्त्यांकडेही हिंदू सरदार आणि सैन्य होते.
         शिवाजी महाराज हे बुद्धीप्रामाण्यवादी होते म्हणजे बुद्धीला जे पटेल तेच करणारे होते हे खालील गोष्टींवरून स्पष्ट होते. ज्या काळात धर्मपरंपरे नुसार समुद्रपर्यटनास बंदी होती त्या काळात त्यांनी सिंधुदुर्गासारखे जलदुर्ग बांधले आणि आरमाराची निर्मिती केली. शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक आहेत. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतले प्रसंगी त्यांच्याशी स्वताचे नाते जोडले. त्याकाळात सतीची प्रथा होती जेव्हा शहाजी राजांचे निधन झाले तेव्हा जीजाऊंना   सती जाण्यापासून परावृत्त केले. आग्र्याच्या सुटकेनंतर संभाजी महाराज गडावर सुखरूप पोहोचावे म्हणून त्याचं निधन झाल्याची वार्ता पसरविल्यानंतर येसुबाईनांही  सती जाण्यापासून रोखलं. पण याचा अर्थ असा नाही की महाराज धर्मच मानत नव्हते. त्यांची धर्मावर श्रद्धा होती त्या श्रद्धे प्रमाणे ते वागत देवदेवतांची पूजा करत, धर्मासाठी, देवळांसाठी देणग्या देत, खर्च करीत, धार्मिक यात्रांना संरक्षण देत.
           महाराजांकडे नेतृत्व, व्यवस्थापन, दुरदर्शीता, द्रष्टेपणा, राजकीय शहाणपण, मुलकी आणि लष्करी प्रश्सानाविषयीचे प्रभावी धोरण, भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन, नियोजित प्रकल्प तडीस नेण्याचे कौशल्य, स्थापत्य शास्त्राचे अत्युच्च  ज्ञान, भौगोलिक परस्थितीशी जुळवून घेऊन तिचा योग्य प्रकारे वापर करण्याची कला . असंख्य गुण होते. महाराजांचे स्वराज्याबद्दलचे, धर्माबद्दलचे आणि स्त्रीयांबाबतीतचे विचार हे आदर्श आणि आधुनिक होते त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचते. सत्ता मतांच्या राजकारणासाठी त्यांच्या तत्वज्ञानला एका धर्मापुरतं राज्यापुरतं मर्यादित केलं जात आहे. महाराजांचा फक्त जयजयकार करुन त्यांचे तत्त्वज्ञान समजणार नाही त्यासाठी त्यांचे कर्तुत्व, त्यांचे विचार समजून घेणे फार महत्वाचे आहे. त्यांचे तत्त्वज्ञान जर प्रत्येकाने कृतीत उतरविण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला तर नक्कीच एका नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती होईल ज्यामुळे आपला देश आणखीन समृद्ध आणि सामर्थ्यवान बनेल.