माझा देश हि भावना बहुतांश भारतीयांमध्ये स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि क्रिकेट मॅच याचदिवशी प्रकर्षाने जाणवते इतरवेळी त्यांच्या भावना धर्म, जात, पंथ, भाषा यामध्ये गुंतलेल्या असतात. धार्मिक उत्सवाप्रमाणेच राष्ट्रीय सण ही तशाच उत्साहात आणि जल्लोषात साजरे करण्याची मानसिकता ७० वर्षांनंतरही आपल्या देशात दिसून येत नाही, भारतीयत्वाच्या भावनेचा अभाव हे या मागचं प्रमुख कारण होय.
"एका व्यक्तीमुळे कुठं देश बदलत असतो का? एकट्याच्या करण्याने कुठं जास्त काय बदल होत असतात का ? असाच जर विचार आपण करत राहिलो तर काहीच बदल होणार नाही पण प्रत्येकाने स्वतःपासून सुरवात केली तर नक्कीच चांगले बदल देशात घडू शकतात, अशी अनेक उदाहरणे आपण पहिली आहेत "
आपल्या देशाने २६ जानेवारी १९५० पासून संविधानाची अंमलबजावनी करुन या देशाची सत्ता प्रजेच्या हाती दिली बहुतांश लोकांना आजही प्रजासत्ताक दिन अणि स्वातंत्र्य दिन यांच्यातील फरक ही माहिती नाही देशातील समस्यांचा पाढा प्रत्येकाकडूनच वाचला जातो परंतु त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. भ्रष्टाचार हि आपल्या देशासमोरील एक प्रमुख समस्या आहे ज्यामुळे आपल्या देशाचा प्रगतीचा वेग मंदावत आहे तरीदेखील दिवसेंदिवस भ्रष्टाचार हा वाढतच चालला आहे यासाठी देशहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देणारी विचारसरणीच जबाबदार आहे. देशासमोर असलेल्या समस्या सोडविण्याची जबाबदारी फक्त सरकारची नसून ती प्रत्येक भारतीयाची आहे. जशी जनता तसेच सरकार असणार त्यामुळे फक्त सरकारला दोष देऊन समस्या सुटणार नाहीत. प्रत्येक भारतीयाने (सरकारी अधीकारी, नेता, शिक्षक, डॉक्टर, अभियंता, वकील पत्रकार, पोलीस , व्यावसायिक, शेतकरी, कामगार इ.) जर आपले काम प्रामाणिकपणे पार पडले तरी देशासमोरील निम्म्याहून अधिक समस्या कमी होताना दिसतील. यासाठी देशाच्या प्रगतीमध्ये योगदान कशाप्रकारे देता येईल हे समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करणे गरजेचे आहे. देशाच्या प्रगतीचा वेग हा पाणी आणि वीज यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो त्यामुळे त्यांचा योग्य वापर करून अपव्यय टाळणे हे देखील देशकार्यच आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीचे नियम पाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे, सार्वजनिक वास्तूंची काळजी राखणे, भ्रष्टाचार न करणे, कुटुंबनियोजन करणे , महिलांचा सन्मान करणे, सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा सन्मान करणे, राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे, अशा कामातूनच आपण आपलं राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राप्रतीची निष्ठा व्यक्त करणं योग्य ठरेल.
एका व्यक्तीमुळे कुठं देश बदलत असतो का? एकट्याच्या करण्याने कुठं जास्त काय बदल होणार आहेत असाच जर विचार आपण करत राहिलो तर काहीच बदल होणार नाही पण प्रत्येकाने स्वतःपासून सुरवात केली तर नक्कीच चांगले बदल देशात घडू शकतात, अशी अनेक उदाहरणे आपण पहिली आहेत. एका व्यक्तीच्या पुढाकारामुळे संपूर्ण राज्य दुष्काळ मुक्त होऊन पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण कास होऊ शकतं हे पाणि फाउंडेशनच्या कामाच्या रूपानं आपण बघत आहोत. देशाची प्रगती हि त्या देशातील लोकांच्या प्रगतीवर अवलंबून असते त्यामुळे देशातील एका वर्गाच्या प्रगतीमुळे देश प्रगत नाही होणार तर देशातील प्रत्येक वर्गातील लोकांच्या प्रगतीमुळेच देश प्रगत होऊ शकतो. त्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीला विकासाच्या प्रक्रियेत सामील करून घेणे गरजेचं आहे. आज हि आपल्या देशात असे असंख्य लोक आहेत ज्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजाच पूर्ण होताना दिसत नाही त्यामुळे देशप्रेम आणि देशाच्या विकासामध्ये योगदान या सर्व गोष्टींची त्यांच्याकडून अपेक्षा करणे व्यर्थ ठरते. हि परिस्थिती देशाचा फक्त जयजयकार करून नाही बदलणार त्यासाठी संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे, जेव्हा समता खऱ्या अर्थाने आपल्या देशात प्रस्थापित होईल तेव्हा प्रत्येकामध्ये देश सर्वप्रथम हि भावना जागृत होईल ज्यामुळे आपल्या देशाच्या प्रगतीचा वेग वाढेल आणि आपला देश विकसनशील न राहता विकसित होईल.