Translate

Saturday, February 16, 2019

#शिवछ्त्रपतींची खरी ओळख.





   "या जगामध्ये लढाया करणारे खूप होऊन गेले, पराक्रम गाजवणारेही खूप होऊन गेले पण काळाच्या ओघात हळू हळू त्यांचा प्रभाव कमी कमी होत गेला पण शिवाजी या तीन अक्षरांचा प्रभाव साडेतीनशे वर्षानंतरही कायम आहे. हि तीन अक्षरे  कानांवर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात. काय जादू आहे या तीन अक्षरात? काय वेगळेपण आहे या तीन अक्षरांचे? खरे तर जादू या तीन अक्षरांची नाही, वेगळेपण या तीन अक्षरांचे नाही. ती जादू आहे या तीन अक्षरांचे नाव धारण करणारया एका उज्वल आणि उदात्त चरित्राची, ते वेगळेपण आहे एका नैतिक आणि निरामय चारित्र्याचे."
         वयाच्या सातव्या वर्षापासून ते बाराव्या वर्षापर्यंतचे प्राथमिक दर्जाचे शिक्षण शिवरायांनी कर्नाटकातील बेंगलोर या ठिकाणी शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्या देखरेखीखाली पूर्ण केले. शहाजीराजांनी शिवरायांना वयाच्या बाराव्या वर्षी कर्नाटकातून पुण्याचा राज्यकारभार सांभाळण्यासाठी पाठवले, त्यांनी शिवारायांसोबत हत्ती, घोडे, आणि पायदळातील सैन्य दिले, पिढीजात विश्वासू अमात्य आणि निष्णात अध्यापकही दिले, बिरुदे आणि उंच उंच ध्वज दिले, मोठा खाजानाही दिला. शहाजी राजांनी उत्तम तयारी करून घेऊनच शिवरायांना पुण्याकडे पाठवले. शहाजी राजांनी केवळ एक जहागिरी सांभाळण्यासाठी शिवरायांना पुण्याला पाठवले नव्हते तर स्वराज्याचा अधिपती बनण्यासाठीच पाठवले होते. शिवरायांना घरातूनच राज्यकारभाराचे, युधतंत्राचे, प्रजापालनाचे, आणि कृतज्ञतेचे संस्कार प्राप्त झाले. शहाजी राजे आणि जिजामाता यांनी केलेले स्वराज्यस्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते.
          शिवाजी महाराजांनी फक्त लढाया नाही केल्या, नुसते पराक्रम गाजवले नाही तर माणसांची मने स्वतंत्र केली, त्यांचा स्वाभिमान जागृत केला. शिवपूर्वकाळातही मराठे (जे मराठी बोलत ते मराठे, महाराष्ट्राबाहेर ब्राम्हण, मराठा किंवा इतर जातींना मराठे म्हणूनच ओळखले जात) कर्तबगार होते, पराक्रमी होते. पण ते निजामशाही, आदिलशाही किंवा मोगलांची चाकरी करत होते. मनसबदार, जहागीरदार, वतनदार, सरदार म्हणून ते काम करत होते. ही गुलामीची मानसिकता महाराजांनी मोडून काढली. भूमिपुत्राचं राज्यच त्या भूमीत असलं पाहिजे असा स्वतंत्र आणि स्वाभिमानी विचार महाराजांनी मांडला आणि पुढे स्वराज्याची निर्मिती करून तो कृतीतही उतरविला.
         शिवाजी महाराज वारसा हक्काने राजे झाले नव्हते तर त्यांनी राजेपद निर्माण केलं, त्यांनी राज्य निर्माण केले हिंदवी स्वराज्य. हिंदवी म्हणजे फक्त हिंदू नव्हे, हिंदवी मध्ये फक्त हिंदू नाही तर त्यांच्या बरोबर सर्वच जाती धर्माचे लोक होते. स्वराज्य म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाचं राज्य, समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला आपले वाटणारे राज्य. स्वराज्यामध्ये स्त्रियांना सन्मानाने वागवले जात, त्यांच्या बाबतीत जर कोणी अनुचित वर्तन केले तर त्याला कठोर शासन केले जात होते.महाराजांचं सैन्य हे रयतेच्या जीवितेचं, अब्रूचं संरक्षण करणारं सैन्य होतं बाकीच्या राज्याकर्त्यांसारखं ते लुटारुंचं  सैन्य नव्हतं. महाराजांनी अनेक आक्रमणे केली, दोनदा सुरत लुटली पण परधर्मातील धार्मिक स्थळांना इजा पोहचविल्याची  इतिहासात नोंद नाही. स्वधार्मासोबतच परधर्माचाही सन्मान करण्याची वृत्ती महाराजांमध्ये होती. सत्य न्याय यावरील निष्ठा आणि सर्वाना समान न्यायपूर्ण वागणूक हीच स्वराज्याची वेगळी ओळख होती. स्वराज्याची संकल्पना ही संकुचित, मर्यादित, सीमित नव्हती. महाराजांचा जो संघर्ष होता तो सत्तेसाठीचा संघर्ष होता, तो धार्मिक संघर्ष नव्हता. जर महाराजांचा संघर्ष हा  धार्मिक असता तर सर्व मराठा सरदार, हिंदू राज्यकर्ते महाराजांच्या बाजूने लढले असते पण तसे नव्हते अनेक मराठा सरदार हिंदू राज्यकर्ते माराजांच्या विरोधात लढत होते. महाराजांचा संघर्ष जर धार्मिक असता तर त्यांच्या पदरी एकही मुसलमान सरदार सैनिक इतर चाकर दिसले नसते पण तसे नव्हते. महाराजांच्या पायदळाचा सेनापती नूर बेगम, तोफखानाचा प्रमुख इब्राहीम खान, आरमाराचा प्रमुख दौलतखान आणि त्यांचा वकील काजी हैदर हे होते. त्याकाळात जसे हिंदुराज्यकर्त्यांकडे मुसलमान सरदार आणि सैन्य होते तसेच मुसलमान राज्यकार्त्यांकडेही हिंदू सरदार आणि सैन्य होते.
         शिवाजी महाराज हे बुद्धीप्रामाण्यवादी होते म्हणजे बुद्धीला जे पटेल तेच करणारे होते हे खालील गोष्टींवरून स्पष्ट होते. ज्या काळात धर्मपरंपरे नुसार समुद्रपर्यटनास बंदी होती त्या काळात त्यांनी सिंधुदुर्गासारखे जलदुर्ग बांधले आणि आरमाराची निर्मिती केली. शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक आहेत. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतले प्रसंगी त्यांच्याशी स्वताचे नाते जोडले. त्याकाळात सतीची प्रथा होती जेव्हा शहाजी राजांचे निधन झाले तेव्हा जीजाऊंना   सती जाण्यापासून परावृत्त केले. आग्र्याच्या सुटकेनंतर संभाजी महाराज गडावर सुखरूप पोहोचावे म्हणून त्याचं निधन झाल्याची वार्ता पसरविल्यानंतर येसुबाईनांही  सती जाण्यापासून रोखलं. पण याचा अर्थ असा नाही की महाराज धर्मच मानत नव्हते. त्यांची धर्मावर श्रद्धा होती त्या श्रद्धे प्रमाणे ते वागत देवदेवतांची पूजा करत, धर्मासाठी, देवळांसाठी देणग्या देत, खर्च करीत, धार्मिक यात्रांना संरक्षण देत.
           महाराजांकडे नेतृत्व, व्यवस्थापन, दुरदर्शीता, द्रष्टेपणा, राजकीय शहाणपण, मुलकी आणि लष्करी प्रश्सानाविषयीचे प्रभावी धोरण, भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन, नियोजित प्रकल्प तडीस नेण्याचे कौशल्य, स्थापत्य शास्त्राचे अत्युच्च  ज्ञान, भौगोलिक परस्थितीशी जुळवून घेऊन तिचा योग्य प्रकारे वापर करण्याची कला . असंख्य गुण होते. महाराजांचे स्वराज्याबद्दलचे, धर्माबद्दलचे आणि स्त्रीयांबाबतीतचे विचार हे आदर्श आणि आधुनिक होते त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचते. सत्ता मतांच्या राजकारणासाठी त्यांच्या तत्वज्ञानला एका धर्मापुरतं राज्यापुरतं मर्यादित केलं जात आहे. महाराजांचा फक्त जयजयकार करुन त्यांचे तत्त्वज्ञान समजणार नाही त्यासाठी त्यांचे कर्तुत्व, त्यांचे विचार समजून घेणे फार महत्वाचे आहे. त्यांचे तत्त्वज्ञान जर प्रत्येकाने कृतीत उतरविण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला तर नक्कीच एका नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती होईल ज्यामुळे आपला देश आणखीन समृद्ध आणि सामर्थ्यवान बनेल.