सकाळी झोपेतून उठल्यानंतर रूममधील लाईट, फॅन /ऐसी औटोमॅटिक बंद होतात, स्मार्ट अलार्म क्लॉक गिझर चालू करण्यासाठी सूचना पाठवतो , इलेक्ट्रिक टूथब्रशने ब्रश केल्यानंतर दातांची हेअल्थ कशी आहे याची माहिती डेंटिस्टला पाठवली जाते जर प्रॉब्लेम असेल तर डेंटिस्ट सोबतची अपॉइंटमेंट फिक्स केली जाते , अंघोळ झाल्यानंतर गिझर कॉफी मेकर आणि ओव्हन ला मेसेज पाठवतो त्याप्रमाणे ते चालू होतात, जर फ्रिज मधील दूध, अंडे, फळे, भाज्या संपल्या असतील तर फ्रिज याची माहिती कळवतो आणि त्या मागवून ही घेतो, नाश्ता करून कामाला जाण्यासाठी बाहेर निघाल्यानंतर गाडीचा एसी ऑटोमॅटीक चालू होतो आवडती गाणी किंवा बातम्या प्ले केल्या जातात, त्याचबरोबर गाडीची माहिती जसं पेट्रोल किती आहे, टायर, इंजिन आणि ब्रेक यांची काय स्थिती आहे हे मोबाईलवर दिसेतं आणि त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तसा मेसेज गाडीच्या कंपनीला ही पाठवला जातो त्याप्रमाणे सर्विसिंग कधी करायचं ते ठरवलं जातं , गाडीने जाताना ट्रॅफिक, एन्व्हायर्मेंट यांची उपडेट तुम्हाला मिळत राहते, तुम्हला जिथं पोचायचं आहे तिथं गाडीचं तुम्हला घेऊन जाते, आणि अचानक लक्षात येतं कि घरातला एसी, लाईट बंद करायचा राहून गेलं तर लगेच आहे तिथुन बंद बंद केले जातात. हे कोणत्यातरी हॉलीवूडच्या सिनेमातील हिरोची एन्ट्री दाखवणारं कथानक किंवा संशोधकाची कल्पना आहे असं तुम्हाला वाटत असेल पण तसं काही नाही. हे सर्व सत्य आहे आणि ज्यामुळे हे सर्व घडत आहे त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे इंटरनेट ऑफ थिंग्ज . याच तंत्रज्ञानाची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत.
इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे अशा वस्तू ज्या इंटरनेटने एकमेकांना जोडता येतात. एमआयटी शास्त्रज्ञ केव्हिन अष्टोन यांनी १९९९ मध्ये प्रथमतः इंटरनेट ऑफ थिंग्जची संकल्पना मांडली. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे एक अशी व्यवस्था ज्यात स्वतंत्र ओळख (आयडी) असलेली यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक तसेच डिजिटल उपकरणे जी बंद आणि चालू करता येतात ती इंटरनेटमार्फत मानवाच्या हस्तक्षेपाशिवाय एकमेकांसोबत प्रत्यक्षदर्शी (रिअल-टाइम) माहितीचे आदानप्रदान करू शकतात. म्हणजेच वरती सांगितल्याप्रमाणे मोबाईल, स्मार्ट वॉच, फ्रिज, एसी, फॅन,टीव्ही, ओव्हन, कार यांसारखी अनेक उपकरणं इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधून माहितीची देवाण करून अनेक टास्क परफॉर्म करू शकतात. कोणत्याही उपकरणाला आयपी ऍड्रेस देऊन(IP V-6) इंटरनेट सोबत जोडून त्याचा समावेश आयओटी मध्ये करता येतो. आयओटी मुळे मानवी जीवन ऑटोमॅटिक मोड मध्ये जगणं शक्य होत आहे.
आयओटी कसं काम करतं ते आता आपण बघूया, सेन्सर कडून जी माहिती मिळते ती सर्व माहिती आयओटीने जोडलेली उपकरणं इंटरनेटच्या माध्यमातून क्लाउडवर (व्हर्चुअल सर्व्हर) पाठवतात जिथे त्या माहितीवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रक्रिया करून कामाची माहिती वेगळी केली जाते आणि त्या माहितीच्या आधारावर वेगवेगळ्या टास्क परफॉर्म करण्याची सूचना आयओटी उपकरणांना दिल्या जातात. वेळेची बचत करणाऱ्या, उपकरणांच्या कार्यक्षमतेत वाढ करणाऱ्या आणि कमी खर्चिक असणाऱ्या या तंत्रज्ञानातीला मुख्य अडथळा म्हणजे सुरक्षा, सर्व माहितीची देवाणघेवाण इंटरनेटच्या माध्यमातून केली जात असल्यामुळे ती चोरी होण्याचा आणि तिचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्मार्ट शहरांच्या विकासात इंटरनेट ऑफ थिंग्जची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भविष्यात आयओटीमुळे शहरी जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत त्यामुळेच आयओटीशी जोडल्या जाणाऱ्या उपकरणांची संख्या झपाट्याने वाढत आहे, जवळपास सात बिलियन उपकरणं आतापर्यंत आयओटीशी जोडले गेलेत आणि पुढील काही वर्षातच संपूर्ण जग या तंत्रज्ञानाने व्यापून जाईल यात काही शंका नाही.