Translate

Monday, October 7, 2019

#आरेच्या निमित्ताने - पर्यावरण की विकास.

           

           मुंबईचे फुफुस अशी आरेची ओळख आहे, शरीरातील फुफुस जर बंद झालं तर काय होऊ शकतं हे माहिती असूनही जर आरेवर चालवली जाणारी कुऱ्हाड थांबत नसेल तर मग आपण अशा टप्प्यावर येऊन पोहचलो आहोत जिथे आपल्यला पर्यावरण कि विकास हा निर्णय घेणं अत्यावश्यक बनतं.  मागच्या काही दशकांपासून पूर, अतिवृष्टी, भूकंप, चक्रीवादळं, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत आहे, पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे यासाठी सर्वस्वी माणूस जबाबदार आहे, निसर्गाच्या होणाऱ्या ऱ्हासाकडे दुर्लक्ष करणे हा मानवाचा स्वाभाविक गुण बनत चालला आहे. स्वतःचं जीवन सुख सोयींनी समृद्ध करण्याच्या हव्यासापोटी विकासाच्या आणि  शहरीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली वृक्षतोड या परिस्थितीस कारणीभूत आहे. काही शतकांपूर्वी पृथ्वीचा सुमारे ६० % भाग वनांनी व्यापलेला होता, सध्या पृथ्वीच्या केवळ २१ % भागातच वने आहेत. निसर्गाच्या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच पण ती चक्रे मोडली तर दुरुस्त करणेही जमण्यासारखे नाही म्हणून ही वृक्षतोड जर अशीच चालू राहिली तर एक दिवस पृथ्वीचा विनाश अटळ आहे. 
             इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स (IISC), बँगलोरच्या नेतुत्वात झालेल्या अभ्यासाने, मागील चाळीस वर्षात पक्के रस्ते आणि काँक्रीटीकारणाच्या प्रक्रियेमुळे मुंबईने ६० % वनसंपत्ती आणि ६५ % जमिनीतील पाण्याचे स्रोत गमावले असल्याचे सिद्ध केले आहे, त्यामुळे मुंबईचा विकास हा पर्यावरणाची किंमत मोजून झाला असल्याचे  स्पष्ट झाले आहे. प्रत्येक व्यक्तीमागे सात झाडं हे गुणोत्तर आदर्श मानलं जातं पण याच संस्थेने २०१४ मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार मुंबईच्या बाबतीत हे गुणोत्तर चार व्यक्तीमागे फक्त एक झाडं इतकं कमी आहे. मुंबईतील लोकांसाठी पुरेसा ऑक्सिजन सुनिश्चित करण्यासाठी शहराचा ३३ % भाग हा हिरवळीखाली असणं गरजेचं आहे पण सध्या फक्त १३% भागच हिरवळीखाली आहे अशा गंभीर परिस्थितीत आणखीन वृक्षतोड करणे हे मुंबईसाठी अत्यंत धोक्याचे आहे. बृहन्मुंबई म्युनसिपल  कॉर्पोरेशनच्या(BMC ) आकडेवारी नुसार मुंबई मध्ये एकूण ३५.९८ लाख झाडं आहेत ज्यापैकी ४,८४,७६१ झाडं एकट्या आरेमध्ये आहेत (विविध प्रजातीच्या वृक्षांसोबतच, पक्ष्यांच्या ७६ प्रजाती, १६ सस्तन प्राणी, बिबट्याच्या ९ प्रजाती आणि ३८ सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती यांचं आरे हे अधिवास आहे) म्हणून येथील जंगलाचे संवर्धन आणि संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. मुंबईला दिवसेंदिवस वाढत असलेल्या पर्यावरणीय समस्यांचा सामना करावा लागत आहे, एन्व्हायर्नमेंट पॉलिसी अँड रिसर्च इंडियाच्या (EPRI ) संशोधकांच्या मते या परिस्थतीत सुधारणा करण्यासाठी शहराला पुढील पाच वर्षासाठी सर्वसमावेशक अशा पर्यावरणीय योजनेची आवश्यकता आहे, सरकारने आणि खाजगी भाग धारकांनी एकत्र येत नागरिकांची सुरक्षा, त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम आणि पर्यावरणाचे रक्षण याचा एकत्रित विचार करून ही योजना तयार करण्याची गरज आहे.      
                    जी अवस्था मुंबईची आहे तीच आपल्या राज्याची आणि देशाचीही आहे, वृक्ष-व्यक्ती हे  गुणोत्तर सर्वात कमी असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे, व्यक्तीमागे २८ वृक्ष हे भारताचे गुणोत्तर आहे तर व्यक्तीमागे १०२ आणि २७६ वृक्ष हे गुणोत्तर अनुक्रमे अमेरिका आणि चीन या देशांचे आहे. देशभरात सर्वात जास्त वृक्षतोड महाराष्ट्रात झाली आहे, २००७ ते २०१६ दरम्यान एकूण १५ लाख वृक्षांची अवैधरित्या कटाई महाराष्ट्रात झाली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळेच वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण यासारख्या  समस्यांमध्ये वाढ होत  आहे.
                    झाडांमध्येही जीव असतो त्यामुळे त्यांना इजा पोहचवू नये अशी शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती, झाडांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे (चिपको आंदोलन)आपले पूर्वज. आपल्या पूर्वजांना पर्यावरण शिक्षणाची कधी गरज पडली नाही कारण त्यांना आपल्या संस्कृतीचा विसर कधी पडला नाही, तसेच पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागते याची त्यांना जाणीव होती. पण आता आपली विचारसरणी बदलली आहे, स्वतःच्या स्वार्थापुढे संस्कृती, पूर्वजांचे विचार पर्यावरणाचे रक्षण या सर्व गोष्टींचा आपल्याला विसर पडला आहे. वृक्षतोड ही फक्त वनसंपत्तीसाठीचं नव्हे तर पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी, कीटकांसाठी आणि तिथल्या संपूर्ण जैवविविधतेसाठी धोकादायक आहे, एकदा का एखाद्या ठिकाणची जैवविविधता धोक्यात आली तर मग तिथल्या पाणी, हवा, जमिन या घटकांवरही त्याचा परिणाम होतो आणि पर्यायाने मानवी जीवनही प्रभावित होते. आपणही पर्यावरणाचाचं एक भाग आहोत याचाही आपल्याला विसर पडला आहे.
                    पर्यावरणाचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, आणि ते करण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या पाहिजेत असे नाही, तर ऊर्जेचा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करणे, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जैववविधतेचं संवर्धन करणं, जास्तीत जास्त झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करणं पुरेसं आहे. देशपातळीवर देशाच्या विकासासाठी जशा योजना राबविल्या जातात तशाच पर्यावरणाच्या संरक्षणासाठीही योजना राबविल्या गेल्या पाहिजेत, त्याचबरोबर पुढील काही दशकांसाठीचं वनधोरण निश्चित केले गेले पाहिजे, अनियोजित शहरिकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे, गावांकडून शहरांकडे येणारे लोंढे थांबविले पाहिजे शहरांबरोबरच गावंही विकसित करण्यावर अधिक भर दिला पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या गरजा नियंत्रित ठेवून, निसर्गाला प्राधान्य देऊन जर प्रगती साधली तर मुबंई समोरच्याच नाही तर जगासमोरच्याही समस्या दूर होतील.
             

Friday, October 4, 2019

#फकिरा

         
"आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी मरायला आणि मारायला सज्ज असणारा लढवय्या म्हणजे 'फकिरा'. गुलामगिरीच्या जगण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठीचं मरण श्रेष्ठ मानणारा, अन्याय सहन न करणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा, दुर्बलांच्या मदतीला धावणारा कर्तृत्ववान पुरुष म्हणजे फकिरा. फकिराच्या संघर्षासोबत वाचकांनी एकरूप होऊन जाणं हेच आण्णा भाऊंच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे."



             'स्मशानातलं सोनं' हा धडा पहिल्यांदी  वाचल्यावर मी या गोष्टीत एवढा हरवून गेलो होतो कि भीमा त्याचं कुटुंब, भाकरीसाठीचा त्यांचा संघर्ष हे सगळं मला आपल्यापैकीच कोणाचंतरी आहे असं वाटत होतं, या गोष्टीचा जो शेवट आहे त्याने मी तेव्हा खूप बैचैन झालो होतो, ती अस्वस्थता अजूनही माझ्यामध्ये तशीच आहे त्यामुळेच दहावीत वाचलेला मराठीच्या पुस्तकातील धडा माझ्या अजूनही जसाच्या तसा लक्षात आहे, शाळेतच नकळत आण्णा भाऊंच्या लेखणीसोबत माझी वैचारिक नाळ जोडली गेली,  'आवडी' (कादंबरी) आणि रशियाच्या प्रवास वर्णनाच्या वाचनानंतर ती आणखीन दृढ झाली, आणि आता 'फकिरा' वाचल्यानंतर  ती खऱ्या अर्थाने समृद्ध झाली आहे असे मला वाटते. फकिरा या कादंबरीमध्ये आण्णा भाऊ साठे यांनी फकिरा राणोजी मांग या आपल्या काकाच्या अन्याय आणि गुलामगिरी विरोधातल्या लढ्याची मांडणी केली आहे.
           फकिरा' हि कादंबरी वाचल्यानंतर फकीराची जी प्रतिमा माझ्या मनात तयार झाली ती अशी, आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी मरायला आणि मारायला सज्ज असणारा लढवय्या म्हणजे 'फकिरा'. गुलामगिरीच्या जगण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठीचं मरण श्रेष्ठ मानणारा, अन्याय सहन न करणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा, दुर्बलांच्या मदतीला धावणारा कर्तृत्ववान पुरुष म्हणजे फकिरा. फकिराच्या संघर्षासोबत वाचकांनी एकरूप होऊन जाणं हेच आण्णा भाऊंच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांचं, वारणेच्या खोऱ्याचं, कृष्णाकाठच्या गावाचं, निवडुंगाच्या कड्यात वसलेल्या उपेक्षित माणसांचं, त्या उपेक्षित माणसांचं माणूसपण नाकारणाऱ्या जातिव्यवस्थेचं आणि इंग्रजांच्या जुलमी राजवटीचं आण्णा भाऊंच्या लेखणीनं केलेलं चित्रण हे त्यांच्या प्रतिभेचं द्योतक आहे. या कादंबरीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक घटना आपल्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते, यातील प्रत्येक व्यक्तीशी आपण जोडले जातो, आपण याचाच एक भाग आहोत असंच आपल्याला वाटत राहतं, या वैशिष्ट्यामुळेच या कादंबरीने मराठी मनावर अधिराज्य गाजविले आणि महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळवला.
            आण्णा भाऊ साठे यांनी ही कादंबरी बाबासाहेबांच्या लेखणीला का अर्पण केली याचं उत्तर ही कादंबरी वाचल्यानंतर समजतं. संघर्ष हा प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य घटक आहे, त्याला सामोरं  कसं जायचं, हार न मानता लढत कसं राहायचं आणि स्वाभिमानानं कसं जगायचं हे फकिरा आपल्याला  शिकवून जातो. फकिराच्या संघर्षाला मानवतेची जोड आहे त्यामुळेच त्याचा संघर्ष सर्वांसाठी प्रेरक ठरतो. जातिव्यवस्थेचे निर्बंध स्वीकारून फकिरा जर गुलामाप्रमाणे जगला असता तर त्याची ओळख  काळाच्या पडद्याआड कधीच पुसून गेली असती पण तसे झाले नाही, कारण फकिराची ओळख ही त्याच्या कर्तृत्वामुळे आहे आणि म्हणूनच ती कधीही पुसली जाणार नाही. फक्त एका विशिष्ट्य जातीत जन्मल्याने कोणीही विद्वान, शूर, पराक्रमी, नम्र, चोर, गुन्हेगार किंवा घाबरट  ठरत नाही कारण हे सर्व माणसाचे गुणविशेष आहेत जातीचे नव्हे, त्यामुळे एखाद्याची योग्यता फक्त जातीच्या आधारे ठरविणे हे पूर्णपणे अनैसर्गिक आहे, माणसाची ओळख ही त्याच्या कर्तृत्वावरूनच केली गेली पाहिजे. जर प्रत्येकाने आपल्यातला फकिरा जिवंत ठेवला तर कुणावरही कुणाची मानसिक किंवा शारीरिक गुलामी करण्याची वेळ येणार नाही.