Translate

Thursday, November 7, 2019

#विद्यार्थी दिवस




           'सिम्बॉल ऑफ नॉलेज' अशी ज्यांची संपूर्ण जगामध्ये ओळख आहे, ज्यांनी जगामध्ये सर्वोत्कृष्ट अशा भारतीय संविधानाची निर्मिती केली त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० या रोजी सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूल मध्ये प्रवेश घेऊन आपल्या शैक्षणिक जीवनाला सुरवात केली. सामान्य बालकाचा महामानवामध्ये रूपांतरीत होण्याचा प्रवास येथूनच सुरु झाला म्हणून इतिहासात या दिवसाचे विशेष महत्व आहे आणि म्हणूनच हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साज्ररा केला जातोय.
           ज्या काळात शिक्षण हे एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती अशा प्रतिकूल परस्थितीत बाबासाहेबांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेबांनी अफाट बुद्धिमत्तेच्या आणि अपार कष्टाच्या जोरावर  MA, Ph.D, Dsc, LL.d, D.Lit आणि Barrister-at-law  अशा तब्बल सहा पदव्या मिळवल्या त्यांनी त्यांचे उच्चशिक्षण कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पूर्ण केले. बाबासाहेबांना वाचनाची अत्यंत आवड होती. बाबसाहेब हे जगातील एकमेव असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी पुस्तकं व्यवस्थित जतन करता यावी आणि त्यांचे व्यवस्थित वचान करता यावे याकरिता ‘राजगृह’ ही वास्तू बांधली. त्यांच्याकडे जवळपास ४००००  पुस्तकांचा संग्रह होता त्यामध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकांचा समावेश होता जे त्यांनी परदेशातून आणले होते.
         शिक्षण ही प्रत्येक व्यक्तीची मुलभूत गरज आहे कारण त्यामुळेच तो स्वताचा, समाजाचा, आणि देशाचा विकास साधू शकतो  हे ओळखून बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत मुलभूत गरजांमध्ये शिक्षणाचा समावेश केला आणि ते प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचेल अशी तरतूद ही केली. सामान्य व्यक्तीलाही असामान्य बनविण्याचे सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे, म्हणून बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला. माणूस हा आजन्म विद्यार्थीच असतो असे ते मानत कारण माणूस जोपर्यंत शिकत राहतो तोपर्यंत त्याची प्रगती होत राहते. जर व्यक्ती आणि समाज यामध्ये निवडायचे झाल्यास समाजाला प्राधान्य दिले पाहिजे,  समाज आणि देश यामध्ये निवडायचे झाल्यास देशाला प्राधान्य दिले पाहिजे या मताचे बाबासाहेब होते. मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे असे ते म्हणत. भारतीयत्वाची बीजे विद्यार्थाच्या मनात खोलवर रुजविण्यासाठी बाबासाहेबांचे हे विचार खूपच  पोषक आहेत.
         देशाचे भवितव्य हे विद्यार्थ्यांवरच अवलंबून असते त्यामुळे विद्यार्थी हा सक्षम असणे हे फार  गरजेचे आहे. बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार आणि कर्तृत्व हे जर विद्यार्थ्यांनी समजून घेतले आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते सक्षम बनतील आणि देशाला आणखीन समृद्ध बनविण्यासाठी योगदान देतील.