Translate

Saturday, December 21, 2019

#आरएफआयडी

         
          सध्या टोलबुथशी संबंधित फास्टॅग हा शब्दप्रयोग तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकत असाल, तसेच विविध वस्तूंच्या उत्पादनांवर, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर, वन्यप्राणी आणि पाळीव प्राण्यांच्या शरीरावर जाड प्लास्टिकचे स्क्रूच्या आकाराचे किंवा क्रेडिड कार्डच्या आकाराचे टॅग्सही तुम्ही बघत असाल, ते बघितल्यानंतर असे टॅग्स का? वापरले जात असतील आणि फास्टॅग म्हणजे नक्की काय? असे प्रश्न ही तुम्हाला पडले असतील. या सर्व प्रश्नाचं उत्तर म्हणजे ओळख, स्थान, स्थिती आणि इतर उपयोगी माहिती मिळविण्यासाठी वापरलं जणारं आरएफआयडी  हे तंत्रज्ञान. आजच्या लेखात आपण याच तंत्रज्ञानाची माहिती घेणार आहोत.
           'रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन' हे एक असं वायरलेस तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये रेडिओ लहरींचा वापर  माहिती स्टोर करण्यासाठीआणि रीड करण्यासाठी केला जातो. या तंत्रज्ञानामध्ये  मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलित पद्धतीने वस्तूंची ओळख करून त्यांची माहिती संगणकामध्ये प्रविष्ट केली जाते. पशु आणि मनुष्य यांच्या आयडेंटिफिकेशनसाठी आणि ट्रॅकिंगसाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो.  एक लहान इलेक्ट्रॉनिक चीप आणि अँटेना वापरून आरएफआयडी टॅग बनविला जातो, एका मायक्रोचीपमध्ये २ केबी पर्यंतचा डेटा साठवता येतो.  
           आरएफआयडी म्हणजे काय? हे समजून घेण्याआधी आपण फास्टॅग बद्दल थोडक्यात माहिती करून घेऊ, फास्टॅग हे आरएफआयडीचंच एक एप्लिकेशन आहे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वयंचलीतरीत्या टोलबुथवर पैसे भरण्याची ही सुविधा आहे, हा टॅग वाहनाच्या स्क्रीनवर लावला जातो, फास्टॅगमुळे टोलनाक्यावर वाहनांची ओळख होते आणि त्या वाहनाचा टोल फास्टॅगमधील जमा रकमेतून कापला जातो. टॅगमधील रक्कम संपल्यानंतर फास्टॅग रिचार्ज करावा लागतो. फास्टॅगमुळे टोलबुथवर  लागणाऱ्या वाहनांच्या रांगा बंद होऊन वेळेची बचत होण्यास मदत होईल.
             आरएफआयडी रीडर आणि आरएफआयडी टॅग  हे आरएफआयडी तंत्रज्ञानाचे दोन प्रमुख भाग आहेत, आरएफआयडी रीडरमध्ये ट्रांसरिसीवर आणि अँटेनाचा वापर केला जातो तर आरएफआयडी टॅगमध्ये मायक्रोचीप (ट्रान्सपॉन्डर) आणि अँटेनाचा वापर केला जातो. मायक्रोचीपमध्ये  माहिती स्टोर केली जाते किंवा रीड केली जाते, माहिती प्रसारित करण्याचं किंवा प्राप्त करण्याचं काम ट्रांसरिसीवर करतो आणि अँटेना रेडिओ लहरींच्या माध्यमातून माहितीची देवाण घेवाण करण्याचं काम करतो. फिक्स्ड किंवा हॅण्डहेल्ड प्रकारचा ट्रान्समीटिंग आणि रिसीविंग अँटेना आरएफआयडी मध्ये वापरला जातो. जेव्हा आरएफआयडी टॅग स्कॅनिंग अँटेनाच्या(आरएफआयडी  रीडरच्या) क्षेत्रात प्रवेश करतो तेव्हा तो अँटेनाकडून डिटेक्शन सिग्नल प्राप्त करतो आणि ट्रान्सपॉन्डरला कार्यान्वित करतो त्यानंतर आरएफआयडी रीडर ट्रांसरिसीवरच्या आणि अँटेनाच्या माध्यमातुन त्या टॅगवरील माहिती रिड करून टॅगला आयडेंटिफाय करतो.
              ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे आरएफआयडीचे दोन प्रकार पडतात, ऍक्टिव्ह आरएफआयडी मध्ये बॅटरीचा उपयोग केला जातो, याची  रेंज जास्त असते तर पॅसिव्ह आरएफआयडी मध्ये बॅटरीचा वापर केला जात नाही, त्याची रेंज कमी असते. कॅलिफोर्नियाचे उद्योजक मारिओ डब्ल्यू कारड्यूलो यांनी १९७३ मध्ये आरएफआयडीची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. वेगवेगळ्या वस्तुंना ओळखण्याची त्यांचा मागोवा घेण्याची तसेच पुन्हा पुन्हा वापरण्याची, सुरक्षितरित्या माहितीची देवाण घेवाण करण्याची आणि लाईन ऑफ साईटमध्ये  (दृष्टीक्षेपात) नसतानाही काम करण्याची क्षमता असल्यामुळे हे तंत्रज्ञान भारतातच नाही तर संपूर्ण जगात लोकप्रिय ठरत आहे .