Translate

Saturday, March 28, 2020

प्रवाहाविरुद्ध पोहणारा लदाखी लढवय्या

          शिक्षण घेऊन, पदवी मिळवूनही बेरोजगार राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि त्यामुळे देशासमोरील समस्यांमध्येही वाढ होताना दिसत आहे. यासाठी प्रामुख्याने कागदी ज्ञान देणारी आपली शिक्षण व्यवस्था आणि गुणवत्तेपेक्षा गुणांना अधिक महत्व देणारे शिक्षक जबाबदार आहेत. शिक्षण घेतल्यानंतरही विद्यार्थी त्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या, समाजाच्या आणि देशाच्या हितासाठी करू शकत नाही हेच आपल्या शिक्षण व्यवस्थेचं सर्वात मोठं अपयश आहे. या परस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणे अत्यावश्यक  बनले आहे.  पण शिक्षण व्यवस्थेत नेमका काय बदल करायचा, शिक्षकांची मानसिकता गुणवत्तेकडे कशी वळवायची आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन अर्थपूर्ण कसं बनवायचं या सर्व प्रश्नांची उत्तरे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या आधुनिक शिक्षक सुधारकांच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये मिळतात अशाच एका आधुनिक शिक्षक सुधारकाची माहिती आपण या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत ज्यांचं नाव आहे 'सोनम वांगचुक'.

सोनम वांगचुक


परिचय:
           लदाखमधील दहावीमध्ये नापास होणाऱ्यांची संख्या ९५℅ वरून  २५℅ वर आणणारे, शाळेत  नापास झालेल्या विद्यार्थ्यांना जीवनाच्या शाळेत यशस्वी बनविणारे, नापास असणं  हे शाळेच्या प्रवेशाची पात्रता ठरविणारे,  आपल्या ज्ञानाचा वापर करून पहाडी लोकांच्या समस्या सोडविणारे, शिक्षण हे मातृभाषेतून मिळालं पाहिजे असा आग्रह धरणारे, स्थानीय संदर्भापासून सुरवात करून जागतिक स्तरापर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखविणारे, प्रतिष्ठेच्या रेमन मॅगसेसे या आवर्डसोबतच इतर अनेक अवार्ड मिळविणारे  सोनम वांगचुक यांचा जन्म ६ सप्टेंबर १९६६ मध्ये लदाखमधील उलेटोकपो या दुर्गम गावी झाला.  त्यांच्या जन्मावेळी गावात फक्त चार ते पाचच घरे होती त्यामुळे जवळपास आठ वर्षे ते शाळेत गेले नाहीत प्राथमिक शिक्षण त्यांना त्यांच्या आईनेच लदाखी या त्यांच्या मातृभाषेतुन दिले. त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी श्रीनगर येथील केंद्रीय विद्यालय या सरकारी शाळेत पूर्ण केले, अकरावी बारावी सायन्समधून सरकारी कॉलेजमधून पूर्ण केले आणि त्यानंतर प्रकाश आणि लेन्सेस यामध्ये रुची असल्यामुळे  श्रीनगरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला.
        प्रथम वर्ष पूर्ण झाल्यानंतर वडिलांनी सिव्हिल या शाखेला लदाखमध्ये वाव असल्या कारणाने प्रवेश घेण्यास सांगितले पण प्रकाश आणि लेन्सेस यांच्या आवडीमुळे घेतलेली मेकॅनिकल ही शाखा सोडणार नाही असे वडिलांना सांगितल्यामुळे वडिलांनी पुढील शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थता दर्शीवली त्यामुळे वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी घरातून बाहेर पडले. इंजिनिअरिंगचा खर्च भागविण्यासाठी दहावीच्या मुलांना विज्ञान आणि गणिताच्या शिकविण्या देण्यास सुरू केले. यादरम्यान त्यांना असे समजले की एवढ्या मोठ्या प्रमाणावर येणारे अपयश हे विद्यार्थ्यांचं नसून शिक्षण व्यवस्थेचं आहे कारण विद्यार्थी तर सामर्थ्यवान आहेत. त्यामुळे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी याच क्षेत्रात काम करण्याचे निश्चित केले. पुढे जाऊन त्यांनी फ्रान्सला मातीचे वास्तुशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
       
शिक्षण क्षेत्रात कार्याची सुरवात :
विद्यार्थ्यांसोबत सोनम वांगचुक

              लोकांना संघटित करून शिक्षणाची समस्या त्यांनी सरकारसमोर मांडली. तेथील शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल केले, स्थानीय गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश केला, शिक्षकांना ट्रेनिंग देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रवाहात आणले. ज्यामुळे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९५℅ वरून २५℅ वर आली राहिलेल्या २५% मुलांसाठी त्यांनी स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ  लदाख(SECMOL) या नावाने शाळा सुरु केली. ही शाळा सामान्य शाळेपेक्षा खूपच वेगळी आहे या शाळेत फक्त नापास झालेल्यांना प्रवेश दिला जातो. या शाळेचं स्वतःचं वर्तमानपत्र आणि रेडिओ केंद्र आहे, ही शाळा पूर्णपणे सौरऊर्जेवर चालते.(बाहेर तापमान उणे असले तरी शाळेच्या आत योग्य प्रमाणात गरमी उत्पन्न केली जाते) या शाळेतील सर्व कामे जसं ऊर्जा निर्माण करणं, शाळेच्या वस्तूची देखरेख करणं, फळभाज्यांची लागवड करणं, पशुपालन करणं, जेवण बनवणं इ विद्यार्थीच करतात. प्रत्येक दोन महिन्यांसाठी निवडणुकीद्वारे  विद्यार्थ्यांमधून सरकार निवडले जाते. जे दोन महिन्यांसाठीची उद्दिष्टे ठरवितात, त्याप्रमाणे कामे करतात, त्यांनी तयार केलेले प्रॉडक्ट मार्केट मध्ये विकतात, सहलीचे आयोजन करतात, अकाउंट सांभाळतात, रिपोर्ट तयार करतात. अशाप्रकारे येथील विद्यार्थी कृतीतून सर्व विषय शिकतात ज्यामुळे त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित होते आणि पुढील जीवनात ते यशस्वी होतात. भविष्यात या शाळेच्या संकल्पनेवर आधारित विद्यापीठ उभे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे त्यावर सध्या कामही सुरू आहे लवकरच हे विद्यापीठ सुरू होईल अशी आशा आहे.
     
बर्फाळ प्रदेशातील समस्यांचे निराकरण :
आईस स्तुपा
आईस स्तुपा : उन्हाळयात बर्फाळ प्रदेशात पाण्याची समस्या खूप बिकट होते. हि समस्या सोडविण्यासाठी सोनम यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून हिवाळ्यामध्ये पाणी गोठवून ठेवण्याचा उपाय शोधला ज्याला नाव दिलं 'आईस स्तुपा'. या पध्दतीत पाणी पाईपच्या माध्यमातून उंचावरून खाली आणले जाते, पाणी प्रेशरने पाईप मधून बाहेर पडायला लागते, जिथून पाणी बाहेर पडते तिथे कारंजे बसविले जाते, हिवाळ्यातील उण्या तापमानामुळे पाणी बाहेर पडताना गोठयला लागते आणि कोनच्या आकाराचा आईस स्तुपा तयार व्हायला लागतो. आकार कोनसारखा असल्यामुळे सूर्याला कमी पृष्ठभाग मिळतो तो वितळविण्यासाठी त्यामुळे हा आईस स्तुपा जून जुलै पर्यंत टिकतो.
सोलर पॉवर मड हाऊस :

सोलर पॉवर मड हाऊस
             बर्फाळ प्रदेशात तैनात असणाऱ्या भारतीय जवानांना हिवाळ्यात हाडे गोठविणाऱ्या थंडीचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत त्यांची राहण्याची वास्तू उबदार ठेवण्यासाठी  हीटर वापरून किंवा लाकडे जाळून ऊब निर्माण केली जाते जी परिणामकारक ही ठरत नाही आणि प्रदूषण ही वाढवते शिवाय खूप पैसाही खर्च होतो या समस्येवर अतिशय कमी खर्चिक, प्रदूषण विरहित आणि परिणामकारक असा उपाय सोनम यांनी शोधला ज्याचं  नाव आहे सोलर पॉवर मड हाऊस. यामध्ये ही वास्तू उबदार ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाचा उपयोग केला जातो, दक्षिणेला तोंड करून असणाऱ्या भिंती काचेच्या बनविल्या जातात आणि त्याच्याविरुद्धच्या भिंती क्ले पासून बनविल्या जातात ज्या दिवसा येणारी सूर्याची गरमी शोषून घेतात आणि ती वस्तू उबदार ठेवतात.
आर्टिफिशिअल ग्लेशिअर : हिमालयाच्या विविध भागात नैसर्गिकरित्या हजारो वर्षांच्या कालावधीत तयार झालेले  ग्लेशिअर वितळण्याची समस्या खूप गंभीर रूप धारण करत आहे, हे थांबवणं काळाची गरज आहे. सिक्कीम सरकारने याच समस्येसंदर्भात सोनम यांची मदत मागितली होती. ग्लेशिअर वितळण्यामुळे अनेक झील (तळे) तयार होतात आणि अतिपाण्यामुळे नंतर फुटतात ज्यामुळे पुराची समस्या निर्माण होते, असंच एक मोठं तळं सिक्कीम साठी धोकादायक बनले होते. सोनम यांनी सायफन तंत्राद्वारे मोठे मोठे पाईप्स वापरून विजेचा आणि मोटोरचा वापर न करता त्या तळ्यातून पाणी काढलं आणि पुढं होणाऱ्या नुकसनापासून लोकांना वाचवलं. भविष्यात सायफन तंत्र आणि आईस स्तुपा हे तंत्र  एकत्रित करून आर्टिफिशल (कृत्रिम बर्फाचे डोंगर) ग्लेशिअर बनविण्याची त्यांची योजना आहे जेणेकरून हिमालयीन पर्वतरांगांचं संतुलन अबाधित रहावं.
आयलिव्हसिम्पली चळवळ :  लोकांनी आपल्या जीवनात साधेपणाचा अवलंब करावा यासाठी सोनम यांनी  जागतिक पातळीवर ही चळवळ सुरू केली आहे ज्याला संपूर्ण जगातून प्रतिसाद मिळत आहे.

        शिक्षा प्रणालीत विद्यार्थ्यांच्या ऊर्जेचा योग्य वापर करण्याची क्षमता असली पाहिजे जर तसे होत नसेल तर मग विद्यार्थ्यांची ऊर्जा चुकीच्या मार्गाने बाहेर पडते जसं सोशल मीडियाचा अतिवापर, गेमिंग, इंटवरनेटचा गैरवापर, व्यसनं, गुन्हेगारी इ. विद्यार्थी जर आपल्या पद्धतीने शिकत नसतील तर त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकविले पाहिजे असे सोनम वांगचुक यांचे मत आहे. आपण जे ऐकतो ते विसरतो, जे बघतो ते लक्षात ठेवतो आणि आपण जे करून बघतो ते आपलं ज्ञान बनतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकलेल्या गोष्टींचा प्रत्यक्षात वापर करण्यावर अधिक भर दिला पाहिजे असे ते सांगतात. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने सोनम यांच्यासारख्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणाऱ्या शिक्षण सुधारकांचे कार्य समजून घेतले पाहिजे आणि ते कृतीतही उतरविले पाहिजे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हे प्रत्येक विध्यार्थ्याचा अधिकार आहे मग तो शहरातला असो वा खेड्यातला, खाजगी शाळेतला असो वा सरकारी शाळेतला. देशातील प्रत्येक भागात मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचविण्यासाठी सर्व देशवासियांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे कारण 'पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया'.