Translate

Saturday, May 30, 2020

#प्रजाहितदक्ष राणी अहिल्याबाई होळकर

       
         ज्याकाळात स्त्रीयांना शिकण्याचा, शस्त्र चालविण्याचा स्वतंत्रपणे विचार करण्याचा अधिकार नव्हता. त्यांचे जीवन फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित होते त्याकाळात ज्यांनी स्त्रियांची फौज उभी केली, शस्त्र हाती घेऊन आपल्या राज्याचं रक्षण केलं, उत्तम प्रकारे राज्यकारभार सांभाळून राज्याची भरभराट केली, राज्यात सुशासन निर्माण करून राज्याचा नावलौकिक सर्वत्र केला, प्रजेचा आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करून कल्याणकारी राज्याची संकल्पना कृतीत उतरविली. त्या पराक्रमी, तत्वज्ञानी, प्रजाहितदक्ष वीरांगना म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर होय. त्यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. वडील माणकोजी शिंदे यांनी त्याकाळात स्त्रीशिक्षण प्रचलित नसतानाही अहिल्याबाई यांना लिहण्या वाचण्याचे, घोडेस्वारीचे, शस्त्र चालविण्याचे शिक्षण दिले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह माळवा राज्याचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचा पुत्र खंडेराव यांच्यासोबत झाला. त्यांना मुक्ता आणि मालेराव अशी दोन अपत्ये होती.
           अहिल्याबाई यांना घडविण्यात मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा होता. मल्हाररावांनी वेगवेगळ्या मोहिमेवर असताना अहिल्याबाई यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारावरून हे सष्ट होते. मल्हाररावांनी त्यांना शस्त्रास्त्रांचे, राज्यकारभाराचे, युद्धनीतीचे, न्यायदानाचे शिक्षण देऊन  त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. अहिल्याबाई यांच्या क्षमतांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता म्हणूनच कुंभेरच्या लढाईत (१७५४) खंडेरावांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अहिल्याबाई यांना त्याकाळच्या प्रथेप्रमाणे सती जाण्यापासून परावृत्त करून प्रजेच्या हितास प्राधान्य देण्यास सांगितले. पुढे मल्हारराव आणि पुत्र मालेराव यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढील एकोणतीस वर्षे राज्याचा कारभार अतिशय कुशलतेने सांभाळला.
   
मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासात अहिल्याबाई होळकर हे नाव सुवर्णाक्षरांनी लिहले गेले आहे. होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट राज्यकर्त्यांसोबत त्यांची तुलना केली जाते. आज दोनशे वर्षानंतरही त्यांचं अस्तित्व अबाधित राहण्यामागे नक्की कोणत्या गोष्टी आहेत, काय वेगळेपण होतं त्यांच्या विचारांचं आणि कर्तृत्वाचं हे समजून घेणे आवश्यक ठरते.

पराक्रमी आणि मुत्सद्दी योद्धा
राणी अहिल्याबाई उत्कृष्ट धनुर्धर होत्या. शस्त्र चालविण्यात आणि युद्धतंत्रात त्या पारंगत होत्या. त्यांनी स्त्रियांना शस्त्र चालविण्याचे, युद्धनीतीचे प्रशिक्षण देऊन जगातली पहिली स्त्रियांची फौज तयार केली होती. राणी अहिल्याबाई यांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व करून राज्यावर आलेल्या संकटांना परतावून लावले होते. तुकोजीराव होळकर हे त्यांच्या सैन्याचे सेनापती होते. तुंग, राजस्थानचा चांद्रवत(१७७१), मुघल (१७८९), शिंद्याचा सरदार गोपाळराव (१७९२) यांचा त्यांनी युद्धात पराभव केला. हत्तीवर बसून त्या युद्धात सहभागी होत असल्याचे अनेक उल्लेख आढळून येतात.(त्यांच्या भैरव या आवडत्या हत्तीचा जेथे मृत्यू झाला तेथे त्याची  समाधी बांधण्यात आली. आजही अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण राजवाड्याच्या मागच्या बाजूला हत्तीच्या समाधीची वास्तू उभी आहे) शौर्यासोबतच त्यांच्या अंगी असलेल्या मुत्सद्देगिरीचा उपयोग करून त्यांनी पन्नास हजाराची फौज घेऊन राज्यावर चालून आलेल्या रघुनाथराव पेशव्यास माघार घेण्यास भाग पाडले. याच मुत्सेद्दीगिरीच्या जोरावर त्यांनी  आजूबाजूच्या राज्यांसोबत उत्तम हितसंबंध जोपासले होते. जगातील महिला राज्यकर्त्यांचे अभ्यासक ब्रिटिश लेखक लॉरेन्स यांनी राणी अहिल्याबाई होळकर यांना "भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट" असे संबोधले आहे. (त्यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्यासोबत केली आहे.)

कुशल प्रशासक
राणी अहिल्याबाई यांच्या प्रशासनाबद्दल समकालीन इतिहासकार स्टीवर्ट गॉडर्न  म्हणतो "राणी अहिल्याबाईंचे राज्य हे अठराव्या शतकातील सर्वात स्थिर राज्य होते". यावरून आपल्याला त्यांच्या राज्यातील प्रशासनाची कल्पना येऊ शकते. समान न्याय करणाऱ्या राज्यकर्त्या अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या प्रशासन आणि न्यायदानाबद्दल ब्रिटिश सेनानी आणि इतिहासकार जॉन माल्कम याने अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली आहे तो म्हणतो,
"Her first principle of government appears to have been moderate assessment, and an almost sacred respect for the native rights of village officers and proprietors of land. She heard every complaint in person; and although she continually referred cases to courts of equity and arbitration, and to her ministers for settlement, she was always accessible. So strong was her sense of duty on all points connected with the distribution of justice, that she is represented as not only patient but unwearied in the investigation of the most insignificant cases, when appeals were made to her decision."
राणी अहिल्याबाई होळकर यांनी आपली राजधानी इंदूरवरून महेश्वरी या ठिकाणी वसविली. विविध राज्यांतील विद्वान, कारागीर, कलाकार, आदींचा दरबारात सन्मान करून देणग्या देऊन त्यांना राज्यात समाविष्ट करून घेतले. महेश्वरीला वस्त्रोद्योग, वास्तुकला, शिक्षण, पर्यटन, व्यापार यांचे प्रमुख केंद्रे बनविले. 


प्रजाहितदक्षक राज्यकर्त्या
राणी अहिल्याबाई होळकर यांनी प्रजेचे हित समोर ठेऊनच राज्यकारभार केला. धर्म, रूढी, परंपरा यापेक्षा जास्त प्रजेच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांनी प्रजेवरती जाचक अंमल केला नाही. प्रजेचे हित लक्षात घेऊन जाचक कायद्यात बदल केले करपद्धती सौम्य केली. गावोगावी लोकांना तत्काळ न्याय मिळावा म्हणून अधिकाऱ्यांची नेमणूक केली. सर्वसामान्यांची पिळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना कठोर शासन केले.

शेतीसाठी विहिरी, बारवा, तलावे बांधून शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध करून दिले. शेतीपूरक उद्योगधंदे करण्यास प्रोत्साहन दिले. विविध उद्योगांना चालना देऊन प्रत्येकाच्या हाताला काम दिले. कठीण परिस्थितीत लोकांना सरकारातून मदत केली.

दुर्गम भागात राहून वाटसरूंना लुटणाऱ्या भिल्ल आणि गौंड या जमातींना कसण्यासाठी जमिनी देऊन, त्यांच्या भागातून येणाऱ्या सामानावर कर घेण्याचा अधिकार देऊन त्यांचे जीवन स्थिरस्थावर केले.

प्रजेच्या हितासाठी त्यांनी मुलीचे आयुष्यही पणाला लावले होते. राज्यातील चोर, दरोडेखोरांचा जो बंदोबस्त करेल त्याच्याशी आपल्या मुलीचे लग्न लावून देण्यात येईल अशी दवंडी दिली आणि ती कृतीतही उतरविली. चोर, दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुक्ताबाईचा विवाह लावून त्याकाळातील पहिला आंतरजातीय विवाह घडवून आणला.  (त्याकाळात असलेली मुलीचे लग्न आठव्या वर्षी करण्याची परंपराही त्यांनी मोडीत काढली मुक्ताबाई यांचे वय लग्नावेळी अठरा वर्षे होते.मुक्ताबाईचा जन्म १७४८ आणि लग्न १७६६)

त्याकाळात पतीच्या निधनानंतर निपुत्रीक विधवांची संपत्ती सरकारजमा केली जात असे आणि दत्तक पुत्र घेण्यासाठी संपत्तीतील हिस्सा राज्याला द्यावा लागत होता. राणी अहिल्याबाई यांनी या दोन्ही  प्रथा बंद केल्या. तसेच विधवांना मोफत दत्तकपुत्राचा अधिकार दिला.

राज्यात हुंडा देण्यावर आणि घेण्यावर बंदी घातली. याबाबतीला त्यांचा हुकूम पुढीलप्रमाणे होता. "श्री शंकर आज्ञेवरुन हुकूम जारी करण्यात येतो की, कोणत्याही जाती किंवा जमातीत विवाहाचे समयी कोणी कन्येचे, द्रव्य देईल त्यांच्याकडून जितके द्रव्य मिळाले असेल तेवढे सरकारकडून भरणा करून घेतले जाईल याशिवाय दंडही भरावा लागेल विदित होय"

राणी अहिल्याबाई यांनी वैयक्तिक आयुष्यात खूप जास्त दुःख सहन केले. त्यांनी पती, सासरे, मुलगा, सुना, जावई आणि मुलगी या सर्वांचे मृत्यू डोळ्यांनी बघितले. पण त्यांनी आपल्या या दुःखाची झळ प्रजेपर्यंत कधीही पोहचू दिली नाही. शेवटपर्यंत त्यांनी प्रजेच्याहितालाच प्राधान्य दिले.

जोआना बेली या स्कॉटिश कवयितत्रीने १८४९ मध्ये त्याच्या प्रजावात्सल्याचं वर्णन करणारा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. त्यातील काही ओळी खालील प्रमाणे आहेत.
“For thirty years her reign of peace,
The land in blessing did increase;
And she was blessed by every tongue,
By stern and gentle, old and young.
Yea, even the children at their mothers feet
Are taught such homely rhyming to repeat"
“In latter days from Brahma came,
To rule our land, a noble Dame,
Kind was her heart, and bright her fame,
And Ahlya was her honored name.”

            राणी अहिल्याबाई होळकर या धार्मिक होत्या पण त्या धर्मांध नव्हत्या. त्यांची धर्मावर श्रद्धा होती त्याप्रमाणे त्या दान धर्म करीत. त्यांनी राज्यात तसेच राज्याबाहेरही अनेक मंदिरे बांधली, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, मंदिरांना देणग्या दिल्या. फक्त मंदिरेच बांधली नाहि तर मस्जिद, दर्गेही बांधले, मुस्लिम फकीरानाही दान दिले. यासोबतच त्यांनी राज्यातील आणि राज्याबाहेरील लोकांच्या कल्याणासाठीही विहरी खोदल्या, बारवे बांधले, नदीवर घाट बांधले, रस्ते केले, पूल बांधले, धर्मशाळा आणि अन्नछत्रे सुरू केली.  त्यांच्या कार्याचा गौरव करताना ऐनी बेझंट लिहते, "त्यांच्या राज्यातील रस्ते दुतर्फा वृक्षांनी वेढलेले होते. प्रवाश्यांसाठी जागोजागी विहिरी आणि धर्मशाळा बांधल्या होत्या. गरीब आणि बेघर लोकांच्या गरजा नेहमी पूर्ण केल्या जात होत्या. आदिवासी जमातींना त्यांनी जंगलातलं भटके जीवन सोडून गावांमध्ये शेती करून स्थायिक होण्यास तयार केले होते. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोकांची राणीवर समान श्रद्धा असून ते राणीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात".

           राणी अहिल्याबाई होळकर यांच्या सारख्या वीरांगना घडविण्यासाठी माणकोजी शिंदे, खंडेराव होळकर आणि मल्हारराव होळकर यांच्यासारखे पुरुष निर्माण होणे गरजेचे आहे जे स्त्रियांच्या क्षमतांवर संपूर्ण विश्वास दाखववून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. वरील सर्व माहितीवरून असे म्हणता येईल की हातात पिंड घेतलेल्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्या धार्मिक प्रतिमेपेक्षा पराक्रमी, तत्वज्ञानी, कर्तृत्ववान, लोककल्याणकारी राज्यकर्त्या ही प्रतिमाच स्त्रियांच्या, युवकांच्या पर्यायाने समाजाच्या आणि देशाच्या उत्कर्षास अधिक उपयुक्त ठरेल.

संदर्भ -
१) "A memoir of central India including Malwa and adjoining" - John Malcolm.
२) "आहिल्या बाई" कविता संग्रह - जोआना बेली.
       (या कथासंग्रहाची लिंक - Ahalya baee )
३) "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" - श्यामा घोणसे.
४)"Children of The motherland" - Anni Besant










          

Tuesday, May 26, 2020

#खरे तुकाराम महाराज समजून घेताना.....

       
         महाराष्ट्राच्या, भारताच्या साहित्य क्षेत्रातच नव्हे तर जागतिक साहित्य क्षेत्रात ज्यांच्या मानवतावादी तत्वज्ञानाचा गौरव केला जातो त्या संत तुकाराम महाराज यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून करून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत. खरी ओळख म्हणण्याचे कारण म्हणजे फक्त भक्तीमध्ये रमणारा, व्यावहारिक ज्ञान नसणारा, स्वभावाने भोळसट असणारा, संसाराकडे दुर्लक्ष करणारा आणि चमत्कार करणारा संत अशी चुकीची प्रतिमा जनमानसात प्रचलित केली गेली आहे. 
              कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेतून तुकाराम महाराजांनी अभंग आणि कीर्तन यांच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले, सुखी आणि आनंदी जीवनाचा मार्ग त्यांना दाखवला. सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेचा उपयोग त्यांनी यासाठी केला. नुसताच उपदेश केला नाही तर आधी स्वतः तसे आचरण केले मग लोकांना सांगितले. तुकाराम महाराजांना शेती आणि व्यापाराची उत्तम जाण होती. गृहस्थ जीवणाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. शेवटपर्यंत त्यांनी संसाराची जबाबदारी अगदी योग्यप्रकारे पार पाडली. शेती आणि व्यापार सांभाळून लोकांना मार्गदर्शन केले.

साक्षात्कार -
बुडता हे जन न देखवे डोळां। येतो कळवळा म्हणउनी।। लोकांना मदत करण्याची वृत्ती तुकारामांमध्ये सुरवातीपासूनच होती म्हणूनच त्यांनी दुष्काळ काळात स्वतःच्या घरातील धान्याची कोठारे लोकांसाठी खुली केली होती. दुष्काळ काळात त्यांनी मानवी जीवनातील दुःखाचे जे विदारक चित्र पाहिले त्यानंतर त्यांनी त्यावरती चिंतन मनन करायला सुरुवात केली. यासाठी भंडारा, भामचंद्र या अजूबाजूच्या परिसरात ते एकांतात राहू लागले. यादरम्यान त्यांना साक्षात्कार झाला असे सांगितले जाते, पण साक्षात्काराचे जे दैवी स्वरूप सांगितले जाते ते सत्याला धरून नाही. त्यांना जो साक्षात्कार झाला होता तो नक्की कोणत्या प्रकारचा होता हे त्यांनी त्यानंतरच्या काळात केलेल्या गोंष्टींवरून आपल्याला समजू शकतो. पाहिले काम त्यांनी जे केले ते म्हणजे लोकांची कर्जखते जी त्यांच्याकडे होती त्यातला बंधू कान्होबाचा हिस्सा त्यांना देऊन आपल्या हिस्स्याची कर्जखते इंद्रायणीत बुडवली. लोकांना दुखमुक्त करण्याच्या त्यांच्या या कृतीवरून त्यांना झालेला साक्षात्कार दैवी स्वरूपाचा नसून विवेकावर आणि स्वानुभवावर आधारित होता हे स्पष्ट होते.

धर्मसत्तेला आव्हान -
तुकाराम महाराजांनी चातुर्वर्ण्य, वेदप्रामाण्य, अंधश्रद्धा, कर्मकांड आदी गोष्टी नाकारल्या. सर्व प्रकारच्या विषमतेचा त्यांनी कडाडून विरोध केला. जातिआधारे जो भेदाभेद केला जात होता त्याबाबतीत तुकाराम महाराज म्हणतात
वर्ण अभिमाने। कोण झाले पावन। ऐसें द्या सांगून। मजलागी।। उच्चनीचता मानून कोणी आतापर्यंत श्रेष्ठ ठरला आहे का? आपणा लागे काम। वाण्याघरी गूळ। त्याचे यातिकुळ काय थिजे।। दुकानदाराकडे गूळ आहे ते घेताना आपल्याला त्याची जाती बघण्याची गरज काय?
'गाळुनीया भेद प्रमाण तो ऐसा वेद' वेदांची चिकित्सा करून त्यातून योग्य ते घ्यावेअशी भूमिका त्यांनी वेदांच्या  बाबतीत घेतली. वेदांमध्ये जे सांगितले आहे, त्या सर्व गोष्टीं जशाच्या तशा स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.
नवसे कन्यापुत्र होती। मग का करणे लागे पती।।, भुके नाही अन्न। मेल्यावरी पिंडदान। अशाप्रकारचे  वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित प्रश्न विचारून त्यांनी अंधश्रद्धेवर घणाघाती हल्ला केला.  बुबाबाजी आणि भोंदूगिरी याबाबतीत सांगताना ते म्हणतात  तयांचे स्वाधीन देवही असति। तरी का मरती तयांची पोरे। अशा ढोंगी लोकांच्या वर्तूणूकीबद्दल सांगताना ते म्हणतात
ऐसें संत झाले कळीं। तोंडी तमाखूचि नळी।।
स्नानसंध्या बुडविली। पुढें भांग ओढवली।।
भांगभुर्का हें साधन। पची पडे मद्यपान।।
तुका म्हणे अवघें सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।।
कर्मकांडाची व्यर्थता स्पष्ट करताना ते म्हणतात तीळ जाळीले तांदूळ। काम क्रोध तैसिचे खळ।। कर्मकांड करताना तीळ तांदूळ इ. जाळले जाते पण स्वतःमधल्या काम क्रोध या विकारांना नष्ट केले जात नाही त्यामुळे अशाप्रकरचे कर्मकांड हे व्यर्थ आहे.

समतेचे तत्व -
वर्णव्यवस्थेने वेदांचा अधिकार फक्त ब्राह्मणांना दिला होता त्याला आव्हान देताना तुकाराम महाराज म्हणतात वेदांचा अधिकार हा सर्वांना आहे.
सकळ शास्त्रांचे सार। हें वेदांचे गव्हर।
पाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।
बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।।


यातीहीन झाला गाविचा मोकाशी। त्याच्या वचनाशी मानू नये।

जातीने जो हीन ठरवला गेला आहे तो जर मोकाशी झाला तर त्याचे आदेश मानायचे नाहीत का? असा प्रश्न विचारून त्यांनी जातीपेक्षा कर्तुत्व महत्वाचे आहे हे अधोरेखित केले आहे. माणसा माणसात केला जाणारा भेद हा अमंगळ आहे हे त्यांनी अत्यंत कठोरपणे सांगितले आहे. महारासी शिवे, कोपे ब्राम्हण तो नव्हे। तया प्रायश्चित्त कांही। देह त्याग करितां नाहीं। त्याकाळात महार या जातीला वर्णव्यवस्थेने अस्पृश्य ठरविले होते, त्यांच्या स्पर्शानेही विटाळ होतो असे मानले जात होते. अशा अस्पृश्य व्यक्तीच्या स्पर्शाचा ज्याला राग येतो, जो विटाळतो त्याने देहांत प्रायश्चित घेतले तरी ते कमीच आहे. सर्व  प्रकारचे भेदाभेद अमंगळ असून मनाची निर्मळता सर्वात महत्त्वाची आहे हे सांगताना ते म्हणतात
काय बा करिसी सोवळे ओवळे। मन नाही निर्मळ वाऊगेंचि।।
समाजातील अस्पृश्यता, अंधश्रद्धा कर्मकांड या गोष्टींना विरोध करून त्यांनी समतेचा आग्रह धरला. मानवतेला सर्वोच्च प्राधान्य दिले.


ईश्वर आणि भक्ती -
तुकाराम महाराजांचा ईश्वर अणि पारंपरिक ईश्वर यामध्ये जमिन आसमानाचा फरक आहे. त्यांच्या भक्तीचा मार्गही पारंपरिक भक्तिमार्गापेक्षा वेगळा आहे. तुकाराम महाराज यांच्या ईश्वराचे आणि भक्तीचे स्वरूप कसे होते हे पुढील
काही अभंगावरून स्पष्ट होते.
जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले।
तो चि साधु ओळखावा। देव तेथे चि जाणावा।।
मृदु सबाह्य नवनीत। तैसे सज्जनाचे चित्त।
ज्यासि आपंगिता नाही। त्यासि धरी जो ह्रदयीं।।
दया करणे जे पुत्रासी। ते चि दासा आणि दासी।
तुका म्हणे सांगू किती ?। तो चि भगवंताची मूर्ती।।
संतांचे महत्व सांगताना ते म्हणतात
करिता देवार्चन। घरा आले संतजन। देव सारावे परते। संत पुजावे अरते।।  शाळीग्राम विष्णुमूर्ती। संत हो का भलते याति। तुका म्हणे संधी। अधिक वैष्णवांची मांदि।। देवाची पूजा करताना जर संत आले तर आधी संतांचे आदर स्वागत करावे मग देवाची पूजा करावी. मग ती देवाची मूर्ती शालिग्रामची विष्णुमूर्ती का असेना आणि संत कोणत्याही यातीतला का असेना, वैष्णवांचा समुदाय घरी येण्याची संधी ही मोठी सुवर्ण संधी आहे त्याचा यथायोग्य उपयोग करावा. तीर्थी धोंडपाणी। देव रोकडा सज्जनी।
देव हा सज्जनांमध्ये आहे तो तीर्थक्षेत्री असलेल्या दगड धोंडयामध्ये आणि पाण्यामध्ये नाही.
बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥
अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥
त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ॥
तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ॥
जो जसा बोलतो त्याप्रमाणेच वागतो त्याच्या पाउलांना मी वंदन करतो. त्याच्या घराचे अंगण मी स्वतःच्या अंगाने झाडीन, त्याचा दास बनून राहीन.त्याचा दास होऊन त्याच्या सेवेसाठी नेहमी त्याच्यासमोर हात जोडून उभा राहीन. माझ्यासाठी तोच देव आहे आणि त्याच्या चरणीच माझा प्रेम भाव आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनात शब्दांना किती अनन्यसाधारण महत्त्व होते हे पुढील अभंगावरून कळून येते.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन। शब्द वांटू धन जनलोका।। तुका म्हणे पहा शब्दचि देव। शब्देंंची गौरव पूजा करू।।
या अभंगाला कोणत्याही स्पष्टीकरनाची गरज नाही. मानवी जीवनात असलेले ज्ञानाचे सर्वोच्च स्थानच या अभंगातून प्रतिबिंबित झाले आहे

वरील सर्व बाबींचा विचार केला असता संत तुकाराम महाराजांची आज आपल्यासमोर जी प्रतिमा उभी केली जातेय ती सर्वार्थाने त्यांच्या विचार आणि कर्तुत्वाला अनुसरून आहे असं म्हणता येत नाही. त्यांच्या  अभंगांतुन आणि कार्यातून व्यक्त होणारं व्यक्तिमत्व आणि समाज व्यवस्थेत प्रचलित असलेलं व्यक्तिमत्त्व यामध्ये जमीन असमानाचं अंतर आहे हे स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांचा बारकाईने अभ्यास केल्यावर, सिंहाचं व्यक्तिमत्त्व शेळीच्या रुपात मांडलं गेलं आहे हे डॉ. आ. ह. साळुंखे यांचं मत अगदी योग्य वाटतं.
                                                              क्रमशः
(पुढील लेखात त्यांच्या सदेह वैकुंठ गमनाचे विवेचन असणार आहे) 









Wednesday, May 20, 2020

#नेताजी

     
झाशी रंजिमेंटची पाहणी करताना सुभाषचंद्र बोस सोबत कर्नल लक्ष्मी 
         

 'नेताजी' या शब्दाचा प्रभाव आजही जनमानसात इतका दृढ असण्यास जी व्यक्तिमत्वं कारणीभूत आहेत त्यापैकी सर्वात आघाडीवर असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात सुभाषचंद्र बोस यांचे अद्वितीय असे स्थान आहे. स्वातंत्र्याच्या ध्येय प्राप्तीसाठी आपले संपूर्ण जीवन त्यांनी अर्पण केले. शेवटच्या श्वासापर्यंत ते गुलामीच्या अंधारावर स्वातंत्र्याचा सूर्य बनून तेजाने तळपत राहिले. जरी त्यांनी स्वातंत्र्यासाठी निवडलेला मार्ग त्याकाळातील ततत्कालीन  नेत्यांपेक्षा वेगळा असला तरी त्यांची जनमानसातील लोकप्रियता ही सर्वोच्च शिखरावर होती. इंग्रज त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा सर्वात मोठा शत्रू मानत होती. अश्या या भारताच्या महानायकाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

शिक्षण -
         नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म कटक येथे एका  सधन बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील वकील होते. त्यांच्या वडिलांना म्हणजे जानकिनाथ बोस यांना इंग्रजांनी 'रायबहादूर' हा 'किताब दिला होता. बालवयात आईवडिलांनी त्यांच्यावर केलेले संस्कार हे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात महत्वपूर्ण आहेत. लहानपणापासूनच गुलामी विरोधात त्यांच्या मनामध्ये चीड होती. रेव्हॅनशॉ कॉलेजिएट स्कुलमध्ये प्रथमिक शिक्षण घेताना इंग्लडच्या राणीची प्रार्थना म्हणण्यास त्यांनी नकार दिला होता. शालेय जीवनातच त्यांच्यावर स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांचा आणि क्रांतिकारी संघटनेच्या विचारसरणीचा प्रभाव पडला होता. अभ्यासात ते अतिशय हुशार होते. मॅट्रिकच्या परीक्षेत ते दुसरे आले होते. पुढे कॉलेज जीवनात भरतीयांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या शिक्षकासोबतील संघर्षामुळे त्यांना प्रसिध्द प्रेसिडेन्सी कॉलेजातून काढण्यात आले. त्यांनी हार न मानता शिक्षण पूर्ण केले आणि तत्कालीन श्रेष्ठ अशा आयसीएस या परीक्षेच्या तयारीसाठी इंग्लंडला गेले. या परीक्षेत ते गुणवत्ता यादीत चवथे आले. पण त्यांनी ब्रिटिश सरकारातील उचपदस्थ नौकरी नाकारून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला.

राजकीय जीवनाची सुरुवात - 
          १९२१ मध्ये ते भारतात आले, गांधीजींना भेटले आणि त्यांच्या सांगण्यावरून देशबंधु चित्तरंजन दास यांच्यासोबत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम करायला सुरूवात केली. प्रिन्स ऑफ वेल्सविरोधात निदर्शने केल्यामुळे त्यांना आणि देशबंधूंना सहा महिने कारावासाची शिक्षा झाली. यादरम्यान त्यांनी इतिहास, धर्मशास्त्र, मानसशास्त्र या विषयांवरील अनेक पुस्तके वाचली. देशबंधूंच्या स्वराज्य पक्षाच्या नेतृत्वाखाली त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली. देशबंधु कोलकात्याचे महापौर झाले आणि सुभाषचंद्र मुख्यअधिकारी. मुख्यअधिकारी म्हणून काम पाहताना त्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबाना मदत केली, अनेक लोकोपयोगी कामे केली. यादरम्यान इंग्रजांनी खोट्या आरोपांखाली त्यांना आधी स्थानबद्ध केले नंतर काही काळाने अटक करून जेलमध्ये टाकले, पुढे त्यांना मंडालेच्या जेलमध्ये पाठवण्यात आले. अशक्त प्रकृती आणि क्षय रोगाच्या त्रासामुळे त्यांना इंग्रजांनी १९२७ मध्ये मुक्त केले. त्यानंतर काहीकाळ भारतीय राजकारणाचा अभ्यास करून ते काँग्रेस पक्षात सहभागी झाले.
            तरुणांना संघटित करण्यावर त्यांनी भर दिला, नेतृत्व आणि वक्तृत्व या गुणांमुळे अल्पावधीतच ते तरुणांमध्ये लोकप्रिय झाले. अहिंसेच्या लढाईला त्यांचा विरोध होता रक्त सांडल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असं त्यांचं मत होतं त्यामुळे गांधीजींशी त्यांचे वैचारिक मतभेद होते. काँग्रेसच्या कलकत्ता येथील राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी वसाहतीचे स्वराज्य या मागणीला विरोध दर्शीविला, आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. याच अधिवेशनात त्यांनी लष्करी गणवेश परिधान करून लष्करी पद्धतीने काँग्रेस अध्यक्षांना मानवंदना दिली होती. पुढे १९३० मध्ये सविनय कायदेभंग आंदोलनावेळी नेताजींना पुन्हा अटक झाली. गांधी-आयर्विन करारानंतर त्यांची सुटका झाली. भगत सिंग यांची फाशी वाचवू शकत नसल्यामुळे व प्रत्यक्ष काहीच सवलती न मिळाल्यामुळे त्यांनी गांधी-आयर्विन कराराचा तीव्र विरोध केला होता. सुटकेनंतर ते कोलकात्याच्या महापौरपदी त्यांची निवड होते. १९३२ मध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळीशी संबंध जोडून त्यांना इंग्रजांकडून पुन्हा अटक होते. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांचा जेलमध्ये मृत्यू झाला तर परस्थिती खूपच गंभीर होऊ शकते या भीतीमुळे इंग्रज त्यांना तुरुंगातून मुक्त करून देशातून हद्दपार करतात. १९३३-३६ हा काळ ते ऑस्ट्रीयातील व्हीएन्ना येथे ते वास्तव्यास राहिले. यादरम्यान त्यांनी विविध देशातील स्वातंत्र्य चळवळीवर आधारीत पुस्तकांचे वाचन केले युरोपातील राजकीय परिस्थितीचा सर्वांगीणआढावा घेतला. याचकाळात त्यांची एमिली शेंक्ल या ऑस्ट्रियन युवतीशी ओळख होते आणि पुढील काळात तिच्याशी ते गुप्तपणे विवाह करतात.
    १९३६ मध्ये हद्दपारीची आज्ञा भंग करून भारतात आल्यावर त्यांना अटक होते.कौन्सिलच्या निवडणुका झाल्यानंतर १९३७ मध्ये त्यांची सुटका करण्यात येते. नेताजींनी दोनवेळा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. गांधीजींचा विरोध असतानाही लोकांनी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली. उग्र आणि क्रांतिकारी मार्गानं चळवळ छेडल्याशिवाय स्वराज्याची प्राप्ती होणार नाही तसेच काँग्रेसने आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा बदलत्या राजकारणात अनुकूल फायदा करून घेतला पाहिजे या त्यांच्या विचारांना गांधीजी आणि त्यांच्या समर्थकांडून विरोध झाल्याने आणि अध्यक्ष असूनही स्वतंत्रपणे काम करण्यास आडकाठी होत असल्याने नेताजी १९३९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापणा करून स्वतंत्रपणे कार्य करण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय आंदोलनाच्या आवाहनानंतर त्यांना इंग्रज सरकारकडून राहत्या घरातच नजरकैदेत ठेवले. आपण एकांतवासात राहून आध्यात्म साधना करणार आहोत असे भासवून १६ जानेवारी १९४१ रोजी वेषांतर करून इंग्रजांच्या तावडीतून निसटतात.

आझाद हिंद सेनेची स्थापना -
          इंग्रजांना गुंगारा देऊन नेताजी पेशावरला गेले. तेथे पुन्हा वेषांतर करून कॉम्रेड भगतराम यांच्यासोबत पायी डोंगर दऱ्या ओलांडून काबुल आणि तेथून जर्मनी असा जीवघेणा प्रवास केला. जर्मनीमध्ये राहून त्यांनी हिंदी लोकांना ब्रटिशांविरोधात लढाईसाठी संघटित करण्यास सुरुवात केली. तेथील नेत्यांच्या भेटी घेतल्या. आझाद हिंद रडीओची स्थापणा करून आकाशवाणीवरून आपल्या लढ्याची माहिती  देशबांधवांपर्यंत पोहचवून त्यांना आवाहन केले. स्वतंत्र्याच्या ध्येयाकडे नेणाऱ्या प्रत्येक मार्गाचा अवलंब करायची त्यांची तयारी होती, त्यामुळेच धाडसाने नेताजींनी हुकूमशहा हिटलरचीही भेट घेतली पण त्यातून इच्छित साध्य न झाल्याने आणि जर्मनीकडून अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळत नसल्याने त्यांनी जपानला जाण्याचा निर्णय घेतला. जीव धोक्यात घालून जर्मनी ते जपान असा अडीच महिन्यांचा खडतर प्रवास नेताजींनी पाणबुडीतून केला.
        नेताजींनी रासबिहारी बोस यांच्या सहकार्याने ब्रिटिश हिंद लष्करातील युद्धकैद्यांना आझादीच्या लढ्यासाठी एकत्रित करून आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आपसातील मतभेद विसरून आझाद हिंद सेनेत प्रखर राष्ट्रवादाची भावना निर्माण केली. देशातील स्त्रीशक्ती जर जागृत झाली तर ब्रिटिशांच्या मुळावर घाव बसेल या विचाराने नेताजींनी आझाद हिंद सेनेमध्ये झाशी रेजिमेंट या महिला रेजिमेंटचाही समावेश केला होता. डॉ. लक्ष्मी  या रेजिमेंटच्या प्रमुख होत्या. संघटन, कौशल्य, समयसूचकता, व मुत्सेद्दीगिरी या गुणांमुळे भारतीय स्वातंत्र्याचा लढा आतंरराष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात  नेताजींना यश मिळाले. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी  सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. या सरकारला जपान, इटली, जर्मनी, ब्रम्हदेश आदी नऊ राष्ट्राचा पाठिंबा मिळाला होता. जपानने नेताजींना एक व्यक्ती न मानता एक मित्रराष्ट्र मानून भरघोस सहकार्य केले, अंदमान व निकोबार या बेटांचा ताबाही आझाद हिंद सरकारला दिला.
         'चलो दिल्ली' या नेताजींच्या घोषणेनंतर आझाद हिंद सेनेत बर्मा, मलाया येथून हिंदी जनता मोठ्या प्रमाणात सहभाग झाली. सेहगल, धील्लन, शहानवाज, डॉ.लक्ष्मी या लढवय्यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना युद्धात सहभागी झाली होती. आझाद हिंद आणि जपानी सेनेने इंफाळ, कोहिमा या दोन्ही युद्धात इंग्रजांना घाम फोडला होता. प्रतिकूल नैसर्गिक परस्थिती, अपुरी युद्ध सामग्री, पुरेशी रसदही सोबत नसताना आझाद हिंद सेनेने गाजविलेले शौर्य हे केवळ असामान्य असे होते. पुढे हिरोशिमा आणि नागासाकी वरील अणुबाँब हल्ल्यामुळे जपानने १५ ऑगस्ट १९४५ रोजी शरणागती पत्करली, नेताजींनी युद्धात पराभव होत असतानाही आझाद हिंद सेनेचे नितीधैर्य खचू न देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि युद्ध चालूच ठेवले. पण नंतर त्यांनाही माघार घ्यावी लागली. शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्य युद्ध सुरूच ठेवायचे असा निर्धार करून नेताजी रशियाला निघाले, यासाठी जपानने त्यांना सहकार्य केले. रशियाला जात असताना १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवान विमान तळाजवळ  विमान अपघातात नेताजींचे दुर्दैवी निधन झाले.
     
         

       


       
         
       

Friday, May 15, 2020

#कोरोना आणि सामाजिक परिवर्तन


            निसर्गाला जसा कोरोना आणि लॉकडाऊनचा फायदा झालाय तसाच एका दृष्टीने त्याचा समाजालाही फायदा झाला आहे.  जागृत, नवसाला पावणाऱ्या, सर्व अडचणी दूर करण्याचा दावा करणाऱ्या स्थळांमध्ये,  गंडे दोरे अंगारे धुपारे अशा उपयांमध्ये, आणि हे सर्व मार्ग सांगणाऱ्या भोंदू व्यक्तींमध्ये अडकून पडलेल्या समाजाला कोरोनामुळे अंधश्रद्धा मुक्त वातावरणात मोकळा श्वास घेता येत आहे. अंधश्रद्धेचा बाजार बंद असल्याने समाजाला माणुसकीचे दर्शन घडत आहे. अडचणीच्या काळात माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
          दैवी शक्तीची देणगी माझ्यामध्ये आहे असे म्हणणारे, ईश्वराशी थेट संवाद साधून लोकांच्या अडचणी दूर करणारे, ग्रह ताऱ्यांची दिशा सांगणारे, भूत प्रेतांना वश करणारे  असे सगळेच सध्या कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहेत. मास्क, सॅनेटायजर, डॉक्टर यांची यांनाही गरज भासत आहेत. कोरोनाने या सर्वांचे पितळ उघडे पाडले आहे.
          अशा परिस्थितीत वैज्ञानिक उपाययोजनांमुळेच जीव वाचू शकतो हे उमगल्याने समाजाचा विज्ञानाकडील ओढा वाढत आहे. दैवी शक्ती, चमत्कार यांची निष्प्रभता डोळ्याला दिसत असल्यामुळे अशा गोष्टींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत आहे. अंधश्रद्धेची दुकानं ही स्वतःची पोटं भरण्यासाठी निर्माण केली जातात हे ही समाजाच्या लक्षात येत आहे. 
         मनुष्यावर येणाऱ्या सर्व संकटांना त्याला स्वतःलाच तोंड द्यावे लागते आणि एकमेकांच्या सहकार्याने त्याला स्वतःलाच त्यातून मार्ग काढावा लागतो हे सत्य जर समाजाने कायमचे आत्मसात केले तर समाजातील अंधश्रद्धा कायमचीच संपून जाईल.
१६/५/२०२० दैनिक तरुण भारत, सोलापूर.


Wednesday, May 13, 2020

छत्रपती संभाजी महाराज


      
 शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. जन्मानेच त्यांना स्वराज्याचा वारसा लाभला होता, पुढे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारामुळे तो आणखीनच दृढ होत गेला. त्यांना उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण देण्यात आले होते. लहानपणीच  शस्त्र आणि शास्त्र यामध्ये ते पारंगत बनले होते. 

सुसंस्कृत युवराज  - १६७० सालापासूनच शिवाजी महाराजांनी युवराज म्हणून संभाजीराजांना  शिक्षण देण्यास प्रारंभ केला होता. राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या कुलमुखत्यार होत्या त्यांच्या साहवासात राहून युवराज संभाजीने राज्यकारभाराचे धडे घेतले. २६ जानेवारी १६७१ पासून त्यांनी राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली होती. फौज हाताखाली देऊन त्यांना मुलूखगिरी करण्यासही पाठवले जात होते. युद्ध आघाडीवर असताना युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या वीर सेनानींचा आणि सैनिकांचा बक्षिसरूपाने गौरव करणारा युवराज असा त्यांचा लौकिक झाला होता. प्रवासी अॅबेकॅरे १६७२ साली लिहतो, युवराज संभाजी वयाने लहान आहे, तरी धैयशील व बापाच्या किर्तीला  साजेसा शूर वीर आहे. युद्धकलेत तो अत्यंत तरबेज असून तो अत्यंत देखणा आहे. फौजांचे त्याच्यावर अतोनात प्रेम असून, बापाने हेवा करावा इतका तो लोकप्रिय आहे. 

साहित्यिक  - संभाजी महाराज हे संस्कृततज्ञ होते. त्यांनी एकूण चार  ग्रंथांची निर्मिती केली आहे. बुधभूषण, नायिकाभेद, नखशिखान्त  आणि सातसतक. बुधभूषण हा संस्कृत भाषेत तर इतर तीन ग्रंथ हिंदी (ब्रज) भाषेत आहेत. युवराजपदी असताना वयाच्या एकोणिसाव्या वर्षी संभाजीराजांनी 'बुधभूषण' हा राजनीतिपर ग्रंथ लिहिला होता. (या ग्रंथात त्यांनी आपण काव्यलंकार, शास्त्रे, पुराणे, संगीत आणि धनुर्विद्या यांचा सखोल अभ्यास केल्याचे म्हंटले आहे) राजा व त्याचे गुण, मुख्य प्रधान, राजाचे सल्लागार, राजपुत्राचे शिक्षण व कर्तव्ये, राज्याचे इतर घटक, खजिना, किल्ले, राजाचे हेर खाते, राजसभा, परमुलूखावर स्वारी इ विषय या ग्रंथांत चर्चिले आहेत. नायिकाभेद आणि नखशिखान्त हे शृंगारप्राधान ग्रंथ आहेत तर सातसतक हा अध्यात्मवादी ग्रंथ आहे. ते एक उत्कृष्ट कवीही होते.

पराक्रमी  योद्धा - मोगल, सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज या शत्रूंशी एकाचवेळी लढताना संभाजी महाराजांनी शौर्य, धाडस, युद्धकौशल्य, कुशलनेतृत्व या गुणांच्या जोरावर शत्रूंवर दहशत निर्माण केली होती. मोगलांचा सरदार आणि इतिहासकार खाफिखान लिहतो, दुष्ट संभाजी हा धामधूम आणि उच्छाद करण्यात शिवाजीपेक्षा दहापटीने अधिक तापदायक ठरला.

लाखोंची फौज, नामांकित सेनानी यांच्या जोरावर हा हा म्हणता आपण स्वराज्य धुळीस मिळवू असे औरंगजेबाला वाटले होते पण प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. विविध आघाड्यांवर त्याला शिकस्तच खावी लागत होती. वर्ष झाले तरी म्हणावं तसं यश मिळत नसल्यामुळे त्याची निराशा होत होती. त्याच्या त्या वेळच्या मनःस्थितीचे वर्णन इंग्रजांनी दिले आहे, मोगल पातशहा संभाजीविरुद्ध इतका चिडला आहे की त्याने पगडी उतरली आणि शपथ घेतली की त्याला मारल्याखेरीज किंवा त्याला राज्यातून हाकलून लावल्याखेरीज ती परत डोकीवर धारण करणार नाही.

सिद्दी हा मराठी राज्याचा सगरावरील प्रमुख शत्रू होता. त्याच्या उपद्रवाचा बंदोबस्त करण्यासाठी १६८२ मध्ये संभाजी महाराजांनी सिद्द्यांचे किनारपट्टीवरील  प्रमुख ठाणे दंडराजापुरीस वेढा दिला, सतत १५ दिवस तोफांचा मारा करून किल्ल्याची तटबंदी जमीनदोस्त करून टाकली. पण ऐनवेळी मोगली सरदार हसनअल्लीखान मोठ्या फौजेसह कोकणात उतरला त्यामुळे संभाजी महाराजांना ही लढाई अर्ध्यावर सोडावी लागली. सिद्दी बचावला पण त्याच्यावर चांगलीच दहशत बसली. पुढे संभाजी महाराजांनी उंदेरी बेटावरही आरमारी  हल्ले केले.

फोंडा, चौल, जुवे बेट या लढायांमध्ये संभाजी महाराजांनी पोर्तुगीज सैन्याची दाणादाण उडविली, जुवे बेटावरील लढाईत खुद्द व्हाइसरॉयचा पराभव संभाजी महाराजांनी केला व त्याला गोव्याला पळवून लावले. पोर्तुगीजांना जबरदस्त दहशत दाखवून त्यांचे अतोनात नुकसान करून तह करण्यास भाग पाडले.

मुंबईकर इंग्रज  सिद्दीला मदत करत होते, राजपुरीच्या वाखारीवर सैन्य पाठवून इंग्रजांवर जरब बसविली आणि इंग्रजांनाही तह करण्यास संभाजी महाराजांनी भाग पाडले.

दक्षिणेतील कर्नाटक स्वारी दरम्यान त्रिचनापल्लीच्या चिक्कदेवरायाचा बंदोबस्त करून त्याला जबर खंडणी बसविली.

संभाजी महाराजांच्या काळात मराठ्यांच्या फौजा शिवाजी महाराजांच्या काळापेक्षा अडीच पटीने मोठ्या झाल्या होत्या. संभाजी महाराजांनी आरमारात ही वाढ केली होती.  संभाजी महाराज जेव्हा पकडले गेले होते तेव्हाही सर्व किल्ल्यांवर शिबंदी आणि दारुगोळा योग्यप्रणात उपलब्ध होता.

प्रजाहितदक्षक राजा -  संभाजी महाराजांनी स्वराज्यात गुलामगिरीच्या प्रथेस बंदी घातली होती. संभाजी महाराजांनी इंग्रजांसोबत जो करार केला होता त्यात 'इंग्रजांना माझ्या राज्यातील कोणाही माणसास गुलाम किंवा ख्रिश्चन करण्यासाठी विकत घेता येणार नाही' या कलमाचा समावेश करण्यात आला होता. स्वराज्याच्या आणि स्वराज्यातील रयतेच्या स्वातंत्र्याला सार्वभौमत्वाला सर्वोच्च प्राधान्य संभाजी महाराजांनी दिले असल्याचे यावरून स्पष्ट होते

किल्ले प्रचंडगडावर व पायथ्याशी गडरक्षणासाठी असलेल्या लोकांच्या गाईम्हशींच्या चराईबद्दल संभाजी महाराजांचे आज्ञापत्र उपलब्ध आहे, गाईंची चराई शिवाजी महाराजांनीच माफ केली होती. तेच धोरण संभाजी महाराजांनी चालू ठेवले.

किल्ल्यावर धान्यसाठा भरपूर ठेवण्याची शिवाजीमहाराजांची पद्धती संभाजी महाराजांनीही स्वीकारली होती. आपत्कालीन परिस्थितीत धान्याचा उपयोग रयतेसाठी व्हावा अशी त्यांची धारणा होती. आत्यंतिक भयानक असे औरंगजेबरूपी मोगली संकट स्वराज्याचा घास घेण्यासाठी आतुर  असताना सुध्दा आलेल्या दुष्काळतही महाराजांनी रयतेचा लेकराप्रमाणे सांभाळ केला. युद्धामुळे रयतेकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी घेतली.

पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले, त्याचबरोबर लागवडीखालील जमीन काही विशेष कारणामुळे पडीक रहात असेल तर ते दूर करण्यासाठी वैयक्तिक लक्ष पुरविले.

संभाजी महाराजांनी स्वराज्यातील धार्मिक स्थळांना, यात्रांना संरक्षण दिले, देणग्या दिल्या. तशी आज्ञापत्रे उपलब्ध आहेत. बलात्काराने बाटुन मुसलमान झालेल्या हरसुलच्या गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यास शुद्ध करून पुन्हा हिंदुधर्मात घेतले.

मोगल मराठा संघर्षात मंगळवेढ्याच्या मुस्लीम जहागिरदारांना स्वराज्याच्या  सेवेत येण्याचे आवाहन संभाजी महाराजांनी केले होते पण त्यांनी त्यास नकार दिला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या गौरवशाली परंपरेला धरूनच सर्व धर्म व जातीमधील प्रजाजनांना समभावाने वागविण्याचे धोरण अवलंबिले होते.

छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा  आणि अर्थ -
श्री। शंभो: शिव । जातस्य मुद्राद्यौ । रिव राजते ।।
यदं । क सेविनो लेखा । वर्तते कस्यनो । परी।
अर्थ - संभाजीची ही मुद्रा सुर्यप्रभेप्रमाणे शोभते व ज्या मुद्रेचा आश्रय करणारी लेखासुद्धा कोणावरही सत्ता चालविते, ती ही शिवाजीपुत्र शंभुची-संभाजीची मुद्रा प्रकाशमान होत आहे.

       छत्रपती संभाजी महाराजांची स्वराज्याप्रतीची निष्ठा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग होती त्यामुळेच साक्षात मृत्यूही त्यांच्या या स्वराज्य निष्ठेला विचलित करू शकला नाही.


संदर्भ- 
"छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ" संपादक - डॉ.जयसिंगराव पवार.







Sunday, May 10, 2020

#महात्मा

     
        

         आजच्याच दिवशी म्हणजे ११ मे १९८८ रोजी मुंबईतील भायखळा जवळील मांडवी कोळीवाडा येथे  रघुनाथ महाराज सभागृहात एका महामानवाच्या मानवी उद्धाराच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शानदार अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो लोकांच्या उपस्थितीत 'महात्मा' ही पदवी देऊन त्या महामानवाला गौरविण्यात आले. हा सोहळा होता जोतिराव फुले यांच्या सन्मानाचा.
        त्याकाळात इंग्रजांकडून पदव्या दिल्या जात होत्या पण लोकांकडून अशा पद्धतीने पदवी बहाल करण्याची देशातली ही पहिलीच घटना होती. नारायण मेघाजी लोखंडे, रावबहादूर वंडेकर, दामोदर सावळाराम यंदे, स्वामी रामय्या व्यंकय्या आय्यावारु, मोरो विठ्ठल वाळवेकर, भाऊ डुंबरे पाटील आदींनी पुढाकार घेऊन या सोहळ्याचे आयोजन केले होते. अनेक जाती धर्माचे लोक यावेळी उपस्थित होते. महात्मा फुले यांनी सुरू केलेली चळवळ ही खऱ्या अर्थाने समानतेची होती म्हणून त्यांच्यासोबत सर्वच स्तरातील लोकं जोडली जात होती. 
         आपल्या सहकाऱ्यांनी आणि अनुयायांनी केलेल्या या अनोख्या सत्काराला उत्तर देताना जोतिबा फुले गहिवरले होते. याप्रसंगी बोलताना महात्मा फुले म्हणाले, माझ्या कनिष्ठ, दलित बंधूंच्या बाबतीत जे माझे कर्तव्य होते ते मी केले, त्यासाठी मी झगडलो, लढलो. माझ्या अनुयायांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याचा आणि संदेशाचा अदम्य उत्साहाने, नेटाने आणि चिकाटीने खेड्यापाड्यातून प्रसार करावा. लोखंडे आणि वंडेकर यांनी फुलेंना महात्मा म्हणून गौरवणे किती योग्य आहे, हे आपल्या भाषणात मांडलं. या कार्यक्रमाच्या सविस्तर बातम्या त्यावेळी वर्तमानपत्रात झळकल्या होत्या. फुलेंच्या चरित्रात त्याचा उल्लेख आढळतो.
          या घटनेला आज १३२ वर्षे पूर्ण होतात. इतक्या वर्षानंतरही महात्मा फुले यांचे विचार हे काळाच्या कसोटीवर टिकून आहेत. सध्याच्या परिस्थितीत ही ते मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांना बहाल केलेली महात्मा ही पदवी किती सार्थ आहे हे त्यांच्या विचार आणि कर्तुत्वातुन स्पष्ट होते. 
       महात्मा फुले यांनी सर्वांना शिक्षण, ज्ञान निर्मिती, कौशल्य निर्मिती, स्त्री-पुरुष समता, आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, जातिनिर्मूलन, धर्मचिकित्सा, संसाधनांचे फेरवाटप  आणि सामाजिक न्याय या कार्यक्रमपत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम केले. वैश्विक मूल्यांवर आधारित समाज व्यवस्थेच्या  निर्मितीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.


संदर्भ -
१) भारतीय कामगार चळवळीचे जनक "नारायण मेघाजी लोखंडे" संपादक - मनोहर कदम.
२) "महात्मा फुले समग्र वाड्मय" संपादक - प्रा.हरी नरके.

(महात्मा फुले यांच्या विचार आणि कार्यबद्दल आणखीन जाणून घेण्यासाठी या ब्लॉग पेजवरील "महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्वाचे दुर्लक्षित पैलू"  हा ब्लॉग पहा)








         
           
      

Thursday, May 7, 2020

#तथागत गौतम बुद्ध

       
         
           संपूर्ण जगाला भारतभूमीकडे आदराने बघण्यास आणि कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होण्यास प्रवृत्त करणारा सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणजे 'तथागत गौतम बुद्ध'. काळाच्या कसोटीवर आजही बुद्धांचे विचार आपले अस्तित्व टिकवून आहेत, त्यामुळेच अडीच हजार वर्षानंतरही जगात बुद्धांचा प्रभाव अबाधित आहे. आतापर्यंत अब्जावधी लोकं बुद्धाकडे आकृष्ट होत आले आहेत आणि पुढेही होत राहतील. बुद्धांचा जनमानसावर असलेला हा प्रभाव समजून घेण्यासाठी त्यांच्या विचारातील आणि आचरणातील वेगळेपण समजून घेणे आवश्यक आहे. या लेखात आपण त्याचीच माहिती घेणार आहोत.
       सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म इसवीसन पूर्व ६२३ मध्ये शाक्य प्रमुख राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी झाला. वयाच्या २९ व्या वर्षी राजकुमार सिद्धार्थाने गृहत्याग केला. एक दिवशी अचानक एक रोगी, एक वृद्ध आणि एक प्रेत बघून सिद्धार्थाने गृहत्यागाचा निर्णय घेतला हे सत्य नाही. लहानपणापासूनच त्याचा स्वभाव संवेदनशील आणि चिंतनशील होता. त्याने दुःख पाहिले, माणसांच्या चुका पहिल्या, आक्रोश पहिला. माणसे दुःखी का आहेत, त्यांचे दुःख दूर करणे शक्य आहे का? अशा वैश्विक आणि व्यापक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने गृहत्याग केला. आपल्या ध्येयाची आणि ते प्राप्त करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाची त्याने घरच्यांना कल्पना देऊनच हा निर्णय घेतला होता. बुद्ध ही ज्ञानाची सर्वोत्तम अवस्था आहे सिद्धार्थाने विविध मार्गांचा अवलंब करून,स्व प्रयत्नाने, आत्यंतिक कष्टाने ही अवस्था ग्रहण केली. बोधी (सर्वोच्च ज्ञान) प्राप्त करून सिद्धार्थ बुद्ध झाला. ज्ञान प्राप्तीनंतर धम्माचा उपदेश करताना, प्रव्रज्या देताना, संघाची स्थापणा करताना बुद्धाने वर्ण, जात, उच्च-नीच, स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब असे कोणतेच भेदभाव पाळले नाहीत. आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे ते बहुजनांच्या सुखासाठी बहुजनांच्या हितासाठी वापरण्याच्या उद्देशाने त्यांनी ४५ वर्षे चारिका केली.

चिकित्सक दृष्टिकोन : बुद्धांच्या विचारांमध्ये आणि इतरांमध्ये असलेले एक महत्वाचे वेगळेपण म्हणजे, एखादी गोष्ट ऐकीव माहितीवरून स्वीकारू नका, परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका, कोणीतरी  सांगितली आहे म्हणून स्वीकारू नका. विविध कसोट्यांच्या आधारे  तपासून स्वतः अनुभव घेऊन, ती गोष्ट हितकारक आहे की अहितकारक आहे हे ठरवून तिचा स्वीकार किंवा त्याग करा. ज्या गोष्टी स्वीकारल्या असता हिताला व सुखाला कारणीभूत होतात त्या स्वीकारा आणि त्याचे अनुकरण करा. असे बुद्धाने सांगितले आहे. बुद्धाने स्वतःच्या विचारांनाही चिकित्सेच्या कक्षेत आणले, आपण सांगितलेल्या धम्मविचारांवरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे.

 वैज्ञानिक दृष्टिकोन : बुद्धांचे विचार हे त्याकाळातील प्रस्थापित विचार प्रवाहाच्या विरोधात होते. त्यांचा धम्म प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारा आहे. बुद्धाचे विचार हे वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहेत, त्यामुळेच बुद्धाने ईश्वर,चातुर्वण्य व्यवस्था, कर्मकांड, यज्ञ, पशुहत्या, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग-नर्क, अंधश्रद्धा इ. गोष्टी नाकारल्या. कारण असले की कार्य घडते आणि कारण नसले की कार्य घडत नाही. अज्ञान असले की दुःख निर्माण होते आणि अज्ञान दूर झाले की दुःख नाहीसे होते हा कार्यकारणाचा सिद्धांत बुद्धाने स्वीकारला. बुद्धाने सर्वाना समान मानणारा, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती कल्याणकारी असणारा, मानवी बुद्धीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा विचार धम्माच्या रूपाने जगाला दिला.

सुधारणा करण्यास आणि दुरुस्तीस अनुकूल : बुद्धाने मी जे सांगतोय तेच अंतिम अशी भूमिका घेतली नाही. विशिष्ट परिस्थितीमध्ये घेतलेला निर्णय वेगळ्या परस्थितीमध्ये योग्य वाटत नसल्यास त्यामध्ये इष्ट तो बदल करण्यास किंवा प्रसंगी तो निर्णय बाजूला सारण्यासही त्यांची तयारी असे, आपण मांडलेल्या सिद्धांताचा एखादा नवा पैलू ध्यानात आला तर ते आपल्या मांडणीमध्ये आवश्यक तो बदल करण्यास तयार असत. संघाला त्यांनी बारीक सारीक नियम रद्द करण्याचे अधिकार दिले होते. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनी संघाला दिले होते. धम्म नेहमी प्रवाही राहिला पाहिजे असे त्यांचे मत होते.

अहिंसेचा मध्यम मार्ग : कोणत्याच परिस्थितीत हिंसा करायची नाही किंवा फक्त हिंसेलाच प्राधान्य ही दोन्ही टोकं बुद्धांनी नाकारली. बुद्धाची अहिंसा मध्यम मार्गास अनुसरून आहे, जीवहत्येची इच्छा आणि आवश्यकता ह्यामध्ये त्यांनी फरक केला आहे. ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी प्रतिबंध केला आणि ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्याठिकाणी जीवहत्येला प्रतिबंध केला नाही.

बुद्धांनी मध्यम मार्गाचा उपदेश केला : कोणत्याही गोष्टीला दोन टोक असतात हे टोक किंवा ते टोक त्या दोघांचा मध्य स्वीकारला पाहिजे, संतुलित वृत्तीने जगणे हाच जगण्याचा खरा आनंदमार्ग आहे असे त्यांनी सांगितले. मध्यम मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्ग. सम्यक (योग्य) दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम(प्रयत्न), सम्यक स्मृती (जागरूकता), सम्यक समाधी  ही या मार्गाची आठ अंगे आहेत.

सर्वसामान्यांच्या भाषेत उपदेश : बुद्धाने धम्म उपदेश आपल्या भाषेत सांगण्याची भिक्खुंना अनुमती दिली होती. सर्वसामान्यांच्या जीवनात आरपार परिवर्तन घडविण्यासाठी त्यांच्या भाषेतून उपदेश करणे महत्वाचे होते. माणूस स्वतःच्या भावना, विचार, भूमिका यांना स्वतःच्या भाषेतून योग्य आणि प्रभावी रीतीने व्यक्त करू शकतो तसेच इतरांनी व्यक्त केलेल्या भावना आपल्या भाषेत असतील तर त्याचे नीट आकलन होते. बुद्धानेही समजायला सोपे आणि शंका राहणार नाही असे दृष्टांत वापरून सर्वसामान्यांना धम्माचा उपदेश केला. 

मुलीच्या जन्माचे स्वागत : बुद्धाने पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा अधिकारही मान्य केला होता म्हणूनच संघामध्येही स्त्रियांचा समावेश दिला. आपल्या पोटी मुलगी जन्माला येणे ही अत्यंत दुःखकारक गोष्ट होय. असे ज्याकाळात मानले जात होते त्या काळात त्यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याच्या  प्रेरणा समाजाला दिल्या.

गृहस्थ जीवनासाठी उपदेश : गृहस्थाने आपला प्रपंच नीटपणे कसा करावा आणि आपल्या कुटुंबासह सुखासमाधानाने कसे जगावे याचे अचूक विवेचन बुद्धाने केले आहे. गृहस्थही निर्दोष आचरणाने भिक्खू इतका श्रेष्ठ ठरू शकतो असे त्यांनी सांगितले आहे. 

मी मार्गदाता आहे मोक्षदाता नव्हे : मोक्षाचे आश्वासन न देणारा  बुद्ध हा एकमेव गुरू आहे. फक्त आपला उपदेश ऐकल्याने, आपली भक्ती केल्याने, पूजा केल्याने कोणाचा उद्धार होणार नाही तर फक्त धम्माच्या आचारणानेच प्रत्येकाचा उद्धार होईल असे बुद्धाने सांगितले आहे. प्रत्येकाला स्वतःच्या जीवनाचा प्रवास स्वतःच करावा लागतो बुद्धाने जरी धम्मरूपी मार्ग दाखविला असला तरी त्या मार्गावरून चालण्याची जबाबदारी मात्र ज्याची त्याचीच आहे. बुद्धाने आपण ईश्वराचा अवतार, अंश, पुत्र, दूत, प्रेषित वगैरे काही नाही असे स्पष्ट केले आहे. 

        मनुष्य हा जन्माने किंवा वर्णाने श्रेष्ठ ठरत नाही तर शीलाने (नीतिमत्ता) आणि प्रज्ञेने श्रेष्ठ ठरतो हा धम्माचा मूलभूत सिद्धांत आहे. बुद्धाने आचरणाला अत्यंत महत्व दिले आहे, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी ही धम्माचे आचरण किती महत्वाचे आहे हे सांगताना बुद्ध म्हणतात जो धम्माला पाहतो तो मला पाहतो, धम्माचे आचरण करणे हाच माझा सर्वात मोठा आदर सत्कार आहे. बुद्धाने आपला वारस म्हणून कोणाची नेमणूक नाही केली, माझ्यानंतर हा धम्मच तुमचा शास्ता आहे असे त्यांनी सांगितले. 
         प्रत्येक मनुष्यात बोधी प्राप्त करण्याची, बुद्ध होण्याची  क्षमता असते आणि स्व प्रयत्नाने  प्रत्येक मनुष्य  ज्ञान प्राप्त करून बुद्ध होऊ शकतो हा आत्मविश्वास तथागत गौतम बुद्धांनी स्वतःच्या आचरणातून मनुष्यामध्ये निर्माण केला आहे.



(धम्म - बुद्धांना अनेक प्रयोगानंतर बोधी प्राप्त झाली, या प्रक्रियेत त्यांना जी सत्ये गवसली, त्यांचा धम्म बनला.
संघ - लोकांच्या कल्याणासाठी धम्म लोकांपर्यंत पोचविण्यासाठी बुद्धांनी जे मध्यम निर्माण केलं ते म्हणजे भिख्खू संघ.
पबज्जा - प्रव्रज्या, गृहस्थ जीवनाचा त्याग करून श्रामणेर बनून संघात प्रविष्ट होणे)

संदर्भ - 
१) "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" संपादक - डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
२) "सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध" संपादक - डॉ.आ. ह.साळुंखे.
       
               
         

       
     
   
         
       
     





   

       


       
         
       

Monday, May 4, 2020

#महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्वाचे दुर्लक्षित पैलू.

     
           
             महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख ही स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यांच्या समस्या यापुरतीच मर्यादित स्वरूपाची नसून ती सर्वसमावेशक अशी आहे. प्रत्येक महापुरुषाला जसं एका जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला जातो त्याप्रमाणे तो महात्मा फुले यांच्या बाबतीतही केला जात आहे. स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता या समस्या तर संपल्या मग आता महात्मा फुले यांच्या विचारांची प्रस्तुतता काय असा प्रश्नही विचारला जात आहे. आजच्या या लेखात आपण महात्मा फुले यांच्या व्यापक व्यक्तिमत्वाची तोंडओळख करून घेणार आहोत. 

कृषीतज्ञ महात्मा फुले : 'शेतकऱ्यांचा आसूड' या पुस्तकात महात्मा फुले यांनी शेतीच्या विकासाचे संकल्प चित्र रेखाटले आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी परदेेेशात पाठवले पााहिजे,  शेतकऱ्यांनी कोरडवाहु शेतीवर अवलंबून न राहता जलसिंचनाच्या माध्यमातून  बारमााही शेतीला प्राधान्य दिले पाहिजे, व्यपारी पिके घेतली पाहिजे, शेतीला पूरक उद्योगधंंदे सुुरु केेले पाहिजे असे त्यांचे मत होते. याबरोबरच 'ब्राह्मणांचे कसब' या पुस्तकात त्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांच्या आधारे शेतकऱ्यांचे शोषण कसे केले जाते हे स्पष्ट करून शेतकऱ्यांचे प्रबोधन केले आहे.
महात्मा फुले हे स्वतः एक यशस्वी शेतकरी होते.

उद्योजक महात्मा फुले : 'पुना कमर्शिअल अँड काँट्रॅकटिंग कंपनी' ची सुरुवात महात्मा फुले यांनी केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी रस्ते, पूल, कालवे, सुंदर इमारती आणि बोगदे निर्माण केले. कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल, खडकवासला धरणाचा कालवा ही त्याची काही उदाहरणे आहेत. मुंबई महानगरपालिकेची इमारत, गेट वे ऑफ इंडिया जवळील जुनं विधानभवन, सयाजी राजे गायकवाड यांचा बडोदा येथील राजवाडा, सोलापूर येथील लक्ष्मी-विष्णू मिल यांसारख्या सुंदर,भव्य आणि मजबूत इमारतींची निर्मिती त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेल्या आणि सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेल्या मित्रांनी केली आहे. त्यांची पुस्तक प्रकाशन कंपनी आणि पुस्तक विक्रीचे दुकानही होते, सोन्याचे दागिने बनविण्यासाठी लागणारे साचे बनविण्याची मुंबई प्रांताची एजन्सी त्यांच्याकडे होती. तसेच ताजा भाजीपाला पुण्याहून मुंबईला नेऊन विकण्याचा व्यावसायही त्यांनी केला होता.
या सर्व व्यवसायातून मिळणारा पैसा त्यांनी सामाजिक कार्यावर खर्च केला.

कमिशनर महात्मा फुले : १८७६ ते १८८३  सात वर्षे महात्मा फुले यांनी पुण्याचे कमिशनर म्हणून काम पाहिले. ब्रिटीशांनी त्यांची नियुक्ती केली होती. कमिशनर असताना त्यांनी बंद नळातून घरोघरी पाणी पुरवठा करणे, रस्ते बांधणे रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, दिवाबत्तीची सोय करणे, शाळा आणि दवाखाने बांधणे अशी भरीव कामे केली. याकाळात त्यांनी दारू दुकानांना विरोध केला. ब्रिटिशांकडून अतिथींच्या स्वागतासाठी होणाऱ्या भरमसाठ खर्चाला विरोध करून तेच पैसे शाळा आणि दवाखाने यांच्या उभारणीसाठी वापरण्याची
आग्रही भूमिका त्यांनी मांडली होती.          

आद्य शिवचरित्रकार महात्मा फुले : मराठीतील  बखरी, फरशीमधील दस्तावेज, इतिहास ग्रंथ, इंग्रजी भाषेतील ऐतिहासिक पुस्तके या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून महात्मा फुले यानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर  पहिला पोवाडा लिहला आणि १८६९ मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित रकेला. १००० ओळींचा प्रदीर्घ असा हा पोवाडा सध्याही उपलब्ध आहे. महात्मा फुले यांनी या पोवाड्यात 'कुळवाडी भूषण' म्हणजे शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, रयतेचा राजा असा छत्रपतींचा उल्लेख केला आहे. १८८० साली रायगडाला जाऊन विस्मरणात गेलेली महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली. समाधीची स्वछता केली, फुले अर्पण करून पूजा केली. याबद्दलची माहिती स्वारगेट येथील हिराबाग येथे सभा घेऊन दिली.  शिवजयंती पुण्यात साजरी करून महात्मा फुले यांनी सार्वजनिक शिवजयंतीची सुरुवात केली.

आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा फुले : १९ ऑक्टोबर १८८२ साली हंटर आयोगासमोर साक्ष देताना महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सार्वत्रिक केले पाहिजे अशी मागणी केली होती. अशी मागणी करणारे भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील ते पहिले व्यक्ती होते. त्यांच्या शाळेत वयाच्या सहाव्या वर्षांपासून मुलामुलींना कृषी आणि औद्योगिक शिक्षण दिले जात होते. स्वतःच्या पायावर सक्षमपणे  उभे राहण्यासाठी मुलामुलींमध्ये कौशल्य निर्माण होणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते. विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी त्यांनी विद्यावेतन (स्कॉलरशिप) देण्यास सुरवात केली होती. १८५४ मध्ये प्रौढ शिक्षणाची सुरुवातही त्यांनीच केली. महिला व पुरुषांसाठी रात्रशाळा सुरू केल्या, स्त्रियांना सावित्रीबाई तर पुरुषांना महात्मा फुले शिकवित. स्त्री आणि पुरुष दोघांनाही व्यावहारिक ज्ञान मिळावे हा त्यांचा यामागचा हेतू होता.


आधुनिक समाजाचे निर्माते महात्मा फुले : २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी वैश्विक मूल्यांवर आधारित  'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली. निर्मिक आणि माणूस यांच्यामध्ये दलाल किंवा मध्यस्थी नको या सूत्रावरती सत्यशोधक समाजाची रचना केली होती. या समाजातील विवाह पद्धती ही खूप आधुनिक होती, लग्न हे आईवडिलांनी न ठरवता गुणवत्तेच्या आधारे मुलाने आणि मुलीने एकेमेकांची निवड करायची, हुंडा द्यायचा किंवा घ्यायचा नाही, लग्न साधेपणाने करून शैक्षणिक संस्थाना मदत करायची, विधीसाठी भटजीला न बोलावता मंगलाष्टके  नवरा मुलगा आणि नवरी मुलीने म्हणायचे. स्त्री पुरुष समानता, आंतरजातीय विवाह हे या समाजाचे महत्वाचे वैशिष्ट्य होते. 'सार्वजनिक सत्य धर्म' या पुस्तकात महात्मा फुले यांनी या समाजासाठीची मार्गदर्शक तत्वे मांडली आहेत.


महात्मा फुले हे सामाजिक क्रांती घडविणारे ग्रंथकर तर होतेच त्याबरोबरच ते कवी आणि नाटककार ही होते. त्यांनी सामाजिक विषयांवर अनेक कविता लिहल्या आहेत, नफा मिळवावा पण तो योग्य पद्धतीने चुकीच्या पद्धतीने नाही या आशयाची शेयर मार्केट वर त्याकाळात त्यांनी कविता लिहिली होती. 'तृतीय रत्न' हे नाटक ही त्यांनी लिहले होते.

    सर्वांना शिक्षण, स्त्री पुरुष समता, ज्ञाननिर्मिती, धर्मचिकित्सा, जातिनिर्मूलन, आंतरजातीय विवाह, नैसर्गिक संसाधनांचे फेरवाटप या सूत्रांच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी भारताच्या उभारणीत योगदान दिले आहे.

        वरील सर्व पैलूंवरुन आपल्या लक्षात येते की महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य हे काळाच्या किती पुढे होते. आज आपल्यासमोर  शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, गुणवत्ता आणि कौशल्य यांचा अभाव असणारी शिक्षण पद्धती, स्त्रियांवरील अत्याचार, स्त्रीभ्रूणहत्या, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा यांसारख्या ज्या प्रमुख  समस्या आहेत, त्यांचे उपाय फुले चरित्रात उपलब्ध आहेत. प्रश्न हाच आहे की आपण प्रामाणिकपणे त्यांचा शोध घेणार का आणि त्याची अंमलबजावणी करणार का?

संदर्भ -
१) "महात्मा फुले - समग्र वाड्मय" संपादक प्रा.हरी नरके.
२) "आम्ही पाहिलेले महात्मा फुले" संपादक प्रा. हरी नरके.