"खरे तुकाराम महाराज समजून घेताना" या मागच्या लेखात आपण संत तुकाराम महाराज यांचे त्यांच्या विचार आणि कर्तुत्वाला अनुसरून असणारे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या लेखात आपण चमत्कार नाकारणाऱ्या तुकाराम महाराजांच्या जीवनाचा अंतच कसा चमत्काराने व्यापून टाकला आहे याची माहिती घेणार आहोत. तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठ गमन झाले यावरती श्रध्दा असणारा एक आणि त्यांची हत्या झाली असे मानणारा दुसरा असे दोन मतप्रवाह समाजात प्रचलित आहेत.
चमत्कार -
चमत्कार हे थोतांड आहे मी अशा गोष्टी सांगतही नाही आणि करितही नाही हे असे तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे आणि सविस्तरपणे आपल्या या अभंगात मांडले आहे.
कपट काही एक । नेणे भुलवायाचे लोक।
तुमचे करितो कीर्तन । गातो उत्तम ते गुण।
दाऊ नेणे जडीबुटी । चमत्कार उठाउठी।
नाही शिष्यशाखा । सांगो अयाचित लोकां।
नव्हे मठपति । नाही चाहुरांची वृत्ती।
नाही देवार्चन । असे मांडिले दुकान।
नाही वेताळ प्रसन्न। काही सांगो खाण खुण।
नव्हे पुराणिक । करणे सांगणे आणीक।
नेणे वाद घटा पटा । करिता पंडित करंटा।
नाही जाळीत भणदी । उदो म्हणोनि आनंदी।
नाही हालवीत माळा । भोवते मेळवुनि गबाळा।
आगमीचे कुडे नेणे । स्तंभन मोहन उच्चाटणे।
नव्हे यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा।
मी लोकांना भुलवण्याचं कोणतंही कपट जाणत नाही. मी तुमचं कीर्तन करतो आणि उत्तम गुण गातो. मी जडीबुटी दाखवणं जाणत नाही. मी आकस्मिक म्हणजेच निसर्गातील कारणकार्यसंबंधाच्या विरोधात जाणारे चमत्कार दाखवणं जाणत नाही. माझी शिष्यशाखा नाही. मी बोलावलेले नसताना कोणी लोक आले, तर त्यांना काही सांगतो, इतकंच. मी मठपती नाही. मी उदरनिर्वाहासाठी कुणाकडं चाहूरभर जमीन मागत नाही. मी देवपूजा करण्याचं दुकान मांडलेलं नाही. लोकांना काही खाणाखुणा सांगण्यासाठी मला वेताळ प्रसन्न नाही. मी करायचं वेगळं आणि सांगायचं वेगळं असं करणारा पुराणिक नाही. करंट्या पंडितासारखा घटा-पटाचा वाद करणं मी जाणत नाही. मी 'उदो' म्हणून आनंदानं धूप जाळत नाही. मी गबाळ्या म्हणजेच भोळ्या लोकांना भोवती जमवून माळा हलवीत नाही. मी धर्मशास्त्रातील कोड्यासारख्या गूढ गोष्टी जाणत नाही. मी व्यक्तीला जागच्या जागी थांबवणं, तिला मोहिनी घालणं, तिचं उच्चाटन करणं, अशा वेदातील म्हणजेच या संदर्भात अथर्ववेदातील विद्या जाणत नाही. तुका नरकात वास्तव्य करणाऱ्या म्हणजे दुर्गतीला जाणाऱ्या या लोकांसारखा वेडा नाही.
असाध्य ते साध्य । करिता सायास । कारण आभ्यास । तुका म्हणे।।
मोक्ष -
मोक्षप्राप्ती बद्दल तुकाराम महाराजांचे काय विचार होते आणि त्यांना मोक्षाची अभिलाषा होती का नव्हती हे पुढील अभंगावरून स्पष्ट होते.
सांडूनी सुखाचा वाटा । मुक्ती मागे तो करंटा ।।
का रे न घ्यावा जन्म । काय वैकुंठी जाऊन ।।
येथे मिळतो दहीभात । नाही वैकुंठी ते मात ।।
तुका म्हणे न लागे मुक्ती । राहीन संगे संताचिया।।
सुखाचा वाटा सांडून जो मुक्तीची अपेक्षा करतो तो दुर्देवी आहे, वैकुंठी जाऊन काही लाभ होणार नाही इथे जे आहे त्याला वैकुंठी मात नाही, मला मुक्तीची गरज नाही मी संतांच्या संगतीतच राहीन.
तुकाराम महाराजांनी मोक्षपद फक्त नाकारलेच नाही तर ते लाथाडले आहे. त्याचबरोबर त्यांनी वैदिक परंपरेतील मोक्षाचे अतिउच्च पद सायुज्याता हे ही नाकारले आहे.
भय नाही जन्म घेता । मोक्षपदी हाणो लाथा ।
तुका म्हणे आता । मज न लगे सायुज्याता ।।
मोक्षपद प्राप्त नाही झाले तर मुक्ती न मिळून जन्माच्या चक्रात अडकावे लागते असे जे सांगितले जाते त्याबाबतीत बोलताना तुकाराम महाराज म्हणतात मोक्षपद नाकारले असल्याने पुन्हा पुन्हा जन्म घेणे आम्हाला मान्य आहे.
मोक्षपद तुच्छ केले याकारणे । आम्हां जन्म घेणे युगायुगी
मृत्यूची चाहूल -
विज्ञाननिष्ठ, यत्नवादी आणि समतेवर आधारित असलेले तुकाराम महाराज यांचे विचार तत्कालीन धर्मव्यवस्थेला रुचणारे नव्हते म्हणूनच त्यांचा छळ होत होता. पुढील काही अभंगातून त्यांना अपल्यावरती हल्ला होईल, जीवेमारण्याचा प्रयत्न केला जाईल याची जाणीव झाली होती हे स्पष्ट होते.
संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी तुकोबांबद्दल लिखाण केलं आहे. देहूमध्ये मंबाजी गोसावी, तुकाराम महाराज आणि त्यांच्या अनुयायांचा कसा द्वेष करत होते, याविषयी संत बहिणाबाईंनी लिहिलं आहे.
तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं । तुम्ही गुरुभक्ती नका सांगूं॥ बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला । द्वेषही मांडिला तेच क्षणीं॥
मंबाजी गोसावी त्यांचा कशाप्रकारे छळ करत होता याचा उल्लेख शासनाने प्रकाशित केलेल्या गाथेत गाथा क्रमांक ३५५ ते ३६७ मध्ये उपलब्ध आहे.
लावूनि कोलित। माझा करितील घात॥
ऐसें बहुतांचे संधी। सापडलों खोळेमधीं॥
पाहतील उणें। तेथें देती अनुमोदनें॥
हे दुष्ट लोक पेटलेले कोलीत लावून माझा घात करतील. अशा लोकांच्या तावडीत मी सापडलो आहे. माझ्यात काही उणे दिसले की घात करणाऱ्यांना अनुमोदन देतील.
शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ।
तुका म्हणे केली आधीं । दृढ बुद्धी सावध ।।
माझ्या देहाची शास्त्रधाऱ्यांनी शंभर तुकडे जरी केली तरी मी घाबरणार नाही, मी माझ्या बुद्धीला आधीच येणाऱ्या संकटाबाबतीत जाणीव करून देऊन सावध केले आहे.
रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ।। जीवाही आगोज पडती आघात । येउनिया नित्य नित्य करी ।। तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे। अवघियांचे काळे केले तोंड ।।
रात्रं दिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे, आत मनाशी आणि बाहेर जगाशी, जीवावर आघात होत आहेत, तुझ्या (विठ्ठलाच्या) नावाच्या बळाने मी अशा लोकांशी लढत आहे.
धर्मविरोधी कृत्य केल्याचा आरोप -
त्याकाळात वेदप्रामाण्य, वर्णव्यवस्था, कर्मकांड, मोक्ष, चमत्कार आदींचे प्रस्थ होते. धर्मव्यवस्थेला यांच्या आधारेच बळकटी मिळत होती. तुकाराम महाराजांनी याच सर्व गोष्टी नाकारल्याने आणि या विरोधात भूमिका घेतल्याने धर्ममार्तंड त्यांच्या विरोधात उभे राहिले. त्यांची धर्मपीठाकडे तक्रार केली गेली. वर्णव्यवस्थेनुसार अधिकार नसताना लोकांना धार्मिक उपदेश करत असल्याचा, अभंग लिहल्याचा आणि ब्राम्हणांना शिष्य करून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर धर्मपीठात करण्यात आला. दोषी ठरवून अभंग न लिहण्याची, लिहलेले अभंग इंद्रायणीत बुडविण्याची, संपत्ती जप्त करण्याची आणि गावातून बहिष्कृत करण्याची शिक्षा करण्यात आली. तुकाराम महाराजांनी शिष्या मान्य नाही केली, तेरे चौदा दिवस धरणे दिले अन्नत्याग केला. गावही त्यांच्या सोबत उभा राहिला त्यामुळे शिक्षा अंमलात येऊ शकल्या नाहीत.
सदेह वैकुंठ गमन -
तुकाराम महाराज फाल्गुन वद्य द्वितीयेला शके १५७१ (९ मार्च १६५०) ला सदेह वैकुंठाला गेले असे अनेक चारित्रकारांनी लिहून ठेवले आहे. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असे मानणारा आणि त्यावर श्रद्धा ठेवणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे अस्तित्वात आहे.
सदेह वैकुंठगमनाचा उल्लेख राज्याभिषेक शके ३०च्या देहूगावच्या सनदेत ही आहे असं श्रीधरमहाराजांनी लिहिलं आहे. 'तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले.' वैकुंठात सुखरूप असल्याचे पाच दिवस तुकाराम महाराज पत्रही पाठवत होते आणि त्यानंतरही त्यांनी काही अभंग लिहले असाही उल्लेख आढळतो. यावरून स्पष्ट होते की पुष्पक विमानात बसून त्यांना सदेह वैकुंठाला जाताना कोणीही पाहिले नव्हते. आणि ज्याअधारे रामेश्वरशास्त्रींनी सदेह वैकुंठाला गेले असल्याचा निर्णय दिला (म्हणजेच आकाश मार्गे त्यांचे पत्र आणि सामान आले) हा आधार तर्कावर टिकणारा नाही. त्यामुळे या सर्वच गोष्टी संशयास्पद ठरतात.
कुटुंबाची परवड -
तुकाराम महाराजांच्या निर्वाणानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी देहू सोडावी लागली त्यांच्याही जीवाला धोका होता हे कान्होबांच्या पुढील दोन अभंगावरून स्पष्ट होते.
माझे बुडविले घर । लेकरेबाळे दारोदार ।
लाविली काहार । तारातीर करोनि ॥
काही विपत्ती अपत्या । आता आमुचिया होता ।
काय होईल अनंता ? पाहा,बोलों कासया ? ॥
ज्या कुटुंबातील व्यक्तीला विमान पाठवून स्वतः ईश्वराने बोलवून घेतले त्या कुटुंबाचा किती गौरव केला गेला पाहिजे, त्या कुटुंबातील सदस्यांना किती मानपान मिळाला पाहिजे पण प्रत्यक्षात तसे काहीही न घडता त्यांना गाव सोडून निघून का जावे लागले? आणि ज्या व्यक्तीमुळे देहूला ओळखले जात होते त्याच देहूत तुकाराम महाराजांचे वृंदावन २१ वर्षानंतर का बांधण्यात आले? हे प्रश्न महत्वाचे ठरतात.
वरील सर्व गोष्टींवरून तुकाराम महाराजांच्या हत्येची शक्यता अधिकच दृढ होते. असे असले तरी त्यांच्या हत्येचे ठोस पुरावे उपलब्ध नसल्यामुळे हत्त्याच झाली असे ठामपणे सिद्ध करता येत नाही. आज तीनशे साडेतीनशे वर्षांनंतरही तुकाराम महाराजांचा अंत कसा झाला हे स्पष्टपणे उलगडू शकले नाही ही आपल्या सर्वांसाठीच खेदाची बाब आहे. तटस्थपणे याबाबतीत संशोधन होणे गरजेचे आहे. आपल्या विवेकाचा वापर करून तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्वाच्या साहाय्याने या प्रश्नाचे उत्तर शोधणे हा एकच मार्ग सध्यातरी यासाठी उपलब्ध आहे.
ज्यांनी आपले संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी समर्पित केले, लोकांना सुखाचा आनंदाचा सन्मार्ग दाखविला, मानवतेची शिकवण दिली त्यांचा त्यांच्या हयातीतच छळ का केला जात होता? त्यांच्या कार्यात अडथळे का निर्माण केले जात होते? आणि त्यांचे विचार संपविण्याचा प्रयत्न का केला जात होता? तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व चुकीच्या पद्धतीने का मांडले गेले? त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्य आणि विचारांना जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून ते अध्यात्मापुरतेच मर्यादित असल्याचे चित्र का निर्माण केले गेले? या सर्व प्रश्नांचा प्रामाणिकपणे शोध घेतल्यास जातिव्यवस्थाच याच्या मुळाशी आहे असे आपल्या लक्षात येते.
तुकाराम महाराजांचे विचार हे सर्व मानवजातीसाठी अतिशय उपयुक्त असे आहेत. म्हणूनच जात, धर्म, भाषा, राज्य, देश यांसारखी बंधने तोडून ते जगभरात पोहचत आहेत. आपल्या मनातील सर्व प्रकारच्या विषमतेची जळमटे दूर सारून या मातीवरती या भाषेवरती तुकाराम महाराजांनी जे मानवतेचे संस्कार केले आहेत त्यांच्यासोबत एकरूप होऊन स्वतःचा आणि समाजाचा उत्कर्ष साधणे ही या काळाची गरज आहे.