२९/७/२०२० रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने देशाचे नवे शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डॉ. कंस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. ३४ वर्षानंतर शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहेत. शालेय शिक्षणासोबतच उच्च शिक्षणातही आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. नक्की कोणते कोणते बदल या नव्या शैक्षणिक धोरणात केले गेले आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.
१०+२ पॅटर्न रद्द - नव्या धोरणानुसार १०+२ हा पॅटर्न रद्द करून ५+३+३+४ हा नवीन पॅटर्न लागू करण्यात येईल. तीन वर्षाच्या अंगणवाडी शिक्षणासोबत बारा वर्षाच्या शालेय शिक्षणाचा यात समावेश असेल. पहिल्या टप्प्यात म्हणजेच पहिल्या पाच वर्षात पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरीचे शिक्षण देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण असेल.
तिसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवीपर्यंतचे शिक्षण असेल.
चौथ्या टप्प्यात उर्वरित चार वर्षम्हणजे नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण असेल. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे महत्व कमी करण्यात आले आहे.
मातृभाषेतून शिक्षण - सुरुवातीचे शालेय शिक्षण म्हणजेच पाचवी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
व्यावसायिक शिक्षणाचा समावेश - सहावीपासून व्यवसायिक शिक्षणाच्या विषयांचा समावेश अभ्यासक्रमात केला जाईल. सहावी ते आठवी दरम्यान व्यवसायिक कौशल्ये आणि कलाकुसर याविषयी संपूर्ण एक वर्षाचा सर्वेक्षण कोर्स करावा लागेल. इयत्ता नववी ते बारावीमधील मुलांना पारंपरिक शैक्षणिक विषयांसोबतच व्यवसायिक विषयांची निवड करण्याची संधी असेल.
लवचिक आभ्यासक्रम - नववी ते बारावीमध्ये शिक्षणासाठी कोणतीही एक शाखा नसेल तर विद्यार्थ्यांना विविध विषय निवडण्याची संधी असणार आहे. कला व विज्ञान किंवा व्यावसायिक व शैक्षणिक असा स्पष्ट भेद नसेल. कला, क्रीडा, संगीत, योग, समाज सेवा अशा विविध विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल.
महाविद्यालयीन शिक्षणात कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तीन शाखा प्रवेश प्रक्रियेत आहेत. पण नवीन मसुद्यानुसार कला आणि विज्ञान या शाखांमधले काही विषय निवडून विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. यामध्ये मानवी शिक्षण, विज्ञान, कला, स्पोर्ट्स, वोकेशनल कोर्स असे पर्याय असतील. एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा अधिक काळानंतर दुसरा अभ्यासक्रम घ्यायचा असल्यास तसे करता येईल (तो अभ्यासक्रम जेवढा पूर्ण केलेला असेल तेवढे क्रेडिट ग्राह्य धरून दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाईल) विषय जरी विविध निवडले असेले तरी पदवी त्या मुख्य शाखेचीच दिली जाईल.
तिहेरी मूल्यांकन - विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं तिहेरी रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार आहे. विद्यार्थी स्वत:चं मूल्यांकन करणार, याशिवाय त्याचे मित्रही आणि शिक्षकही मूल्यांकन करणार. रिपोर्ट कार्डमध्ये विद्यार्थी, वर्गमित्र आणि शिक्षक यांचाही शेरा असणार आहे. शिक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थी काय शिकला याचाही उल्लेख रिपोर्ट कार्डमध्ये केला जाणार. मूल्यांकनासठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
उच्चशिक्षण विषयक बदल - संशोधनासाठी चार वर्षांचा पदवी कालावधी आणि जे नौकरी करू इच्छितात त्यांना तीन वर्षांचा कालावधी. संशोधनासाठी एक वर्षाचयस एमएसह चार वर्षाचा पदवी कालावधी पूर्ण केल्यावर पीएचडी करता येईल.
एम फीलची डिग्री कायमची बंद होणार, एमफीलची डिग्री न घेता पीएचडी करता येणार.
पाली, पर्शियन आणि प्राकृतसाठी भाषेसाठी विशेष सोय- स्वतंत्र संस्था उभी केली जाणार.
स्थानिक आठ भाषांमध्ये ई-कोर्सेस विकसित केले जाणार आहेत. व्ह्रर्च्यूअल लॅबदेखील तयार करण्यात येणार असून राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच (NETF) निर्माण केला जाणार आहे.
खासगी आणि सार्वजनिक उच्च शिक्षण संस्थांना समान नियम लागू होणार. राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्याची शिफारस.
देशात ४५ हजाराहून अधिक महाविद्यालय आहेत. त्यांना ग्रेड देण्यासाठी उच्च शिक्षण नियामक अशी एकच संस्था संपूर्ण देशासाठी स्थापन करण्यात येईल.
शिक्षक आणि शैक्षणिक वातावरण - शिक्षकाांना वारांवार प्रशिक्षण देऊन त्याांचे ज्ञान व कौशल्य अद्ययावत ठेवणे, शैक्षणिकदृष्ट्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटाांमधील किंवा वंचित गटाांमधील शिक्षकाांच्या भरतीसाठी पर्यायी मार्ग खुले करणे. छळ, धमक्या व लिंग आधारित हिंसा याविषयी उपाययोजना करणारी यंत्रणा प्रस्थापित करून सर्वसमावेशक शालेय वातावरण निर्माण करणे, बहिष्कार टाकण्याच्या कृती बंद पाडणे. सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाांमध्ये सुधारणा करणे.
काळानुसार शिक्षणपद्धतीत बदल होत राहिले तरच एक गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली अस्तित्वात येऊ शकते.
आधुनिक काळाला साजेशे बदल या नव्या शैक्षणिक धोरणात केले गेले आहेत. या धोरणाची परिणामकारकता ही याच्या अंमलबजावणी वरच अवलंबून आहे. तसेच यासाठी शिक्षकांच्या मानसिकतेत बदल घडविणे ही अत्यावश्यक ठरते. भारतातील शालेय शिक्षण व्यवस्थेच्या आणि पायाभूत सुविधांच्या परस्थितीत आमूलाग्र सुधारणा करणे या नव्या शैक्षणिक धोरणासामोरल सर्वात मोठे आव्हान असेल. सरकारी शाळा आणि महाविद्यलयांची निर्मिती, प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांला परवडेल आणि उपलब्ध होईल असे उच्च शिक्षण, शिक्षणाच्या अधिकाधिक खासगीकरणास विरोध आणि शैक्षणिक संस्थाचं मूल्यमापन स्वतः संस्थांनी करणे इ. गोष्टींवरून या नव्या धोरणावर टीका होत आहे याची सरकारने दखल घेऊन यात योग्य ती सुधारणा करून या शैक्षणिक धोरणाच्या सक्षमीकरणास प्राधान्य दिले पाहिजे.