Translate

Sunday, September 27, 2020

#महामानवाची गौरवगाथा

 


        स्टार प्रवाह या मराठी चॅनेलवर सादर केल्या जाणाऱ्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा" ह्या मालिकेत बाबासाहेबांचा जीवनप्रवास अतिशय उत्कृष्ट पध्दतीने उलगडून दाखविला जात आहे. याआधी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर आधारित इंग्रजी, हिंदी आणि मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत पण मालिका पहिल्यांदाच सुरू केली गेली आहे ज्यामुळे घरारात बाबासाहेबांचे विचार पोहचण्यास आणखीन मदत झाली आहे. सर्वसामान्य लोकांचं वाचनासोबतचं नातं तितकंसं दृढ नसतं त्यामुळे महापुरुषांच्या बाबतीत ऐकीव माहितीवरूनच त्यांची मते बनलेली असतात. अशा परिस्थितीत टेलिव्हिजनचं माध्यम हे खूप प्रभावी ठरतं त्यामुळेच ही मालिका सुरू झाल्याचा विशेष आनंद होतो.

        प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी उपलब्ध झाली पाहिजे ही बाबासाहेबांची सर्वसमावेशक अशी भुमिका या मालिकेच्या माध्यमातून अगदी उत्तमप्रकारे अधोरेखित केली जात आहे. बाबासाहेबांनी खोती पद्धत बंद करून कुळांना ( शेतकऱ्यांना) जमिनीचा मालकी हक्क मिळवून दिला, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून धार्मिक आणि पुरुषी गुलामगिरीतून स्त्रियांची मुक्तता केली त्यांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व अधिकार बहाल केले, दारिद्रय शोषण आणि अज्ञान यातून कामगारांची कायमची सुटका करून त्यांना आपल्या हक्कांप्रति जागृत करून संघटित केले 'स्वतंत्र मजूर पक्ष' या नावाने देशातील कामगारांचा पहिला राजकीय पक्ष स्थापन केला, आदिवासी भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी कमिशन नेमून घटनात्मक संरक्षण मिळण्याची तरतुद केली, वीज आणि पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून आधुनिक भारताचा पाया रचला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विविध धर्म, पंथ, जाती, भाषा, संप्रदाय इ. मध्ये विभागलेल्या लोकांना संविधानाच्या माध्यमातून एकत्र जोडले. या सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा मालिकेत अंतर्भाव करून घेतल्यामुळे 'अस्पृश्यांचे उध्दारकर्ते' किंवा 'दलितांचे नेते' अशा संकुचित विचारसरणीत बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला बंदिस्त करण्याचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून जो प्रयत्न केला जात आहे तो हाणून पडण्यास मौलाची मदत होत आहे.

         बाबासाहेबांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाबरोबरच त्यांचे लहानपण, शैक्षणिक प्रवास, कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक बांधिलकी याचे जे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे ते अगदी अचूक वाटते. विशेषतः बाबासाहेबांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहिलेले त्यांचे कुटुंब, बाबासाहेबांचा त्याग, बाबासाहेबांची दूरदृष्टीता याचे जे चित्रण या मालिकेत केले गेले आहे ते खूप कौतुकास्पद आहे. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व हे हिमालयाच्या उंचीचे आहे. त्यामुळे मालिकेच्या माध्यमातून ते चित्रित करणे हे खूप मोठे आव्हानच होते पण हे आव्हान या मालिकेची टीम यशस्वीरित्या पेलत आहे अशीच भावना बाबासाहेबांना मानणाऱ्या आणि त्यांच्या विचारांप्रमाणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्या करोडो अनुयायांमध्ये निर्माण झाली असणार हे नक्की. बाबासाहेबांची व्यक्तीरेखा साकारताना अभिनेते सागर देशमुख यांनी घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येते. तसेच लेखकाने घेतलेले परिश्रमही अचूकपणे अधोरेखित होतात. या मालिकेशी संबंधित प्रत्येक सदस्याचे योगदान हे अतिशय महत्वपूर्ण असे आहे त्यामुळे या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या गौरवगाथेचे साक्षीदार होण्याची जी करोडो लोकांना संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी स्टार प्रवाह आणि टीमला कोटी कोटी धन्यवाद.

         मी आणि माझे कुटुंबीय या मालिकेचे नियमित दर्शक आहोत. सर्वांनी ही मालिका पहावी आणि याच्या प्रचार प्रसारासाठी योगदान द्यावे ही विनांती.

        


Friday, September 25, 2020

#ऑक्टोबर मधील आकाश

       


           सध्या रात्रीच्यावेळी आकाशात मंगळ, गुरू शनि  आणि शुक्र हे ग्रह अगदी ठळकपणे दिसत आहे. दक्षिणपूर्व दिशेला रात्री आठच्या पुढे मंगळ दिसायला सुरू होतो. दिशा जरी नाही कळली तरी आकाशातील सर्वात प्रकाशमान आणि आकाराने मोठी तांबडी चांदणी म्हणजे मंगळ ग्रह असेही ओळखता येते. रात्री  बारा ते एक च्या दरम्यान तर मंगळ अगदी आपल्या डोक्यावर दिसून येतो, सकाळी आठ पर्यंत त्याचे अस्तित्व आपल्याला पाहता येते. याचबरोबर गुरू आणि शनि ही सध्या लगेच ओळखता येतात. चंद्राच्या मागे सरळ रेषेत एक  आकाराने मोठी आणि त्याच्या लगेच मागे आकाराने थोडी छोटी अशा दोन ज्या ठळकपणे चांदण्या दिसतात त्या म्हणजे गुरू आणि शनि ग्रह. मोठा आणि जास्त प्रकाशमान असणारा ग्रह म्हणजे गुरू. हे दोन्ही ग्रह जोडीने असल्यामुळे पटकण ओळखता येतात. रात्री 8 ते 9 च्या दरम्यान साऊथ वेस्ट डायरेक्शन मध्ये यांची उपस्थिती अगदी स्पष्टपणे दिसून येते. आणि पहाटेच्यावेळी  पूर्व दिशेला शुक्रतारा आकाशात आपले लक्ष वेधून घेतो.




          उगवताना, मध्यावर आणि मावळताना या ग्रहांना पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. तसेच अंधार पडायला सुरुवात झाल्यानंतर, अंधाऱ्या रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी जे आकाशात या ग्रहांची जी विविध दृश्यं पाहायला मिळतात ती खरंच अप्रतिम आहेत. जसे जसे तुम्ही ग्रह ताऱ्यांविषयी अधिकाधिक जाणून घेत जाता तसे तसे आकाशाशी एक प्रकारे जोडले जात असल्याचा आणि आकाशाशी जे नाते आहे ते दृढ होत असल्याचा अनुभव येतो.

      तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आकाशातील ग्रह तारे आणि आपल्या मधील अंतर हे एकदम कमी होत आहे. रात्रीचे आकाश कसे दिसेल किंवा विविध ग्रह ताऱ्यांची लोकेशन माहिती करून घेणे हे विविध अँप आणि वेबसाईटमुळे अतिशय सोपे झाले आहे.

खालील वेबसाइटवर ग्रह तारे सूर्यग्रहण चंद्रग्रहण याविषयीची सर्व माहिती दिली आहे तसेच रात्रीचं आकाश लाईव्ह पाहण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

timeanddate.com/astronomy/night/india/solapur