उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्काराची अमानवीय घटना आणि उपचारादरम्यान पीडितेचा झालेला मृत्यू हे सर्व मन सुन्न करणारं आहे. जिवंतपणी त्या चार नराधमांकडून तर मृत्यनंतर पोलीस आणि प्रशासनाकडून त्या मुलीच्या शरीराची विटंबना केली गेली आहे. त्या मुलीचा मृतदेह कटुंबीयांच्या स्वाधीन न करता पोलिसांकडून परस्पर अंत्यसंस्कार का केले गेले? उत्तर प्रदेशात पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला जाणाऱ्यांना का अडवलं जात आहे? उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? या सर्व गोष्टींमुळे उत्तर प्रदेशात कायदयाचं राज्य अस्तित्वात आहे कि नाही असा प्रश्न मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
सारे भारतीय माझे बांधव आहेत ही भावना सत्तर वर्षांनंतरही आपण आपल्या देशवासीयांमध्ये उतरवू शकलो नाही ही खरंच खूप खेदाची बाब आहे. भरतीयत्वाच्या भावनेनं जर आपण खऱ्या अर्थाने जोडले गेलो असतो तर अशा घटना आपल्या देशात घडल्याच नसत्या. प्रशासन, पोलीस आणि राजकारण यामध्ये सक्रिय असणारे नीच आणि स्वार्थी मनोवृत्तीचे लोकंच अशी हिंस्र आणि क्रूर श्वापदे जन्माला घालण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्याचबरोबर जोपर्यंत आपल्या घरापर्यंत अशा घटनांची धग पोहचत नाही तोपर्यंत निपचित पडून राहणारा आणि आपल्या जबाबदाऱ्या विसरून स्वयंकेंद्री होत जाणारा समाज ही अशा घटनांसाठी तितकाच जबाबदार आहे. अशा घटना घडल्यानंतर काही दिवसांपुरतं त्वेषाने व्यक्त होणं आणि त्यानंतर सर्व विसरून आपापल्या जीवनात व्यस्त होणं हे आपल्या समाजाच्या अंगवळणी पडलं आहे. मेणबत्ती मार्च, सोशल मीडिया निषेध यांसारख्या गोष्टीं व्यतिरिक्त ठोस आणि परिणामकारक अशा गोष्टी करणे हे अत्यंत गरजेचे आहे. ज्यांना आपण निवडून दिले आहे त्या राजकारण्यांना संसदेत, विधिमंडळात यासंबंधी प्रश्न विचारण्यास, सक्षम असे नवे कायदे बनविण्यास आणि कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी भाग पाडले पाहिजे. अशा घटनांमध्ये जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम न करणाऱ्या राजकारणी, पोलीस आणि प्रशकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी सर्व स्तरांतून एकत्रितरीत्या प्रयत्न केले गेले पाहिजेत.( जोपर्यंत अशा लोकांना शिक्षा होत नाही तोपर्यंत देश आणि राज्य पातळीवर जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींना जसे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री मुख्यमंत्री इत्यादींना करोडोंच्या संख्येने पत्रं लिहली पाहिजेत)
कुटुंब, समाज, राज्य आणि देशपातळीवर स्त्रीयांप्रति असणाऱ्या संकुचित मानसिकतेत बदल घडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. (स्त्रियांना सुरक्षेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनविण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये अशा सर्व स्तरांवर प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे)
वरील सर्व गोष्टी होण्यासाठी जात, धर्म, वंश, वर्ण, लिंग, भाषा, आर्थिक परिस्थिती, राहणीमान अशा सर्व प्रकारच्या भेदभावाची आणि द्वेषाची भावना नष्ट होऊन प्रत्येक भारतीयामध्ये भरतीयत्वाची भावना निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सरतेशेवटी अशी क्रूर आणि अमानवीय कृत्ये करणारी जनावरं समाजात निर्माण होण्याच्या मुळाशी जाऊन त्यावरती घाव घालणे हीच आपल्या सर्वांची आणि पर्यायाने देशाची प्राथमिकता होणे ही काळाची गरज आहे