महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणुन मान्यता मिळाली असली तरी बेडसे लेणी ही दुर्लक्षितच राहिली आहे. अतिशय सुंदर व सुबक शिल्पकला अणि कोरीवकाम हेच इसवीसनाच्या पाहिल्या शतकातील या वास्तूचे वेगळेपण अधोरेखित करते.परिपूर्ण स्तूप आणि 26 कोरीव स्तंभाने युक्त असे भव्य चैत्यगृह, चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारात उमलत्या कमळाची रचना असणारे दोन तीस फुटी भव्यदिव्य रेखीव स्तंभ, बोधीवृक्षाच्या आकाराच्या कमानी असलेले विहार, बाहेरच्या बाजूस अरिहंत भिक्खूच्या स्मरणार्थ बांधलेले छोटे स्तूप आणि कातळात खोदलेल्या पाण्याचे टाके अशी या संपूर्ण लेणीची रचना आहे. लेणी पर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास चारशे दगडी पायर्या चढून जावे लागते.
लेणीचे नाव (मारकुट), या लेणीचे आणि पाण्याचे टाके याचे धम्मदान कोणी दिले आहे यासंदर्भातील प्राकृत भाषेतील धम्मलिपी मधील एकूण तीन शिलालेख येथे उपलब्ध आहेत. बोरघाट या प्राचीन व्यापारी मार्गावर ही लेणी स्थित आहे. या भागाचे प्राचीन नाव मामडे आहार होते सध्या आपण या भागाला मावळ प्रांत या नावाने ओळखतो. भाजे आणि पाटण लेण्या ज्या डोंगर रांगेत आहेत त्याच डोंगररांगेच्या दक्षिणेला बेडसे लेणी समूह आहे.
अशा वास्तूंना भेट देताना हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा अनुभवण्याचा आणि आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याची संधीच या वास्तू आपल्याला उपलब्ध करून देतात अशी भावना मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
बेडसे लेणी, कामशेत, पुणे. (जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून कामशेत कडून पवना धरणाकडे जाणार्या रस्त्यावर ही लेणी आहे. लेणीच्या पायथ्या पर्यंत दोनचाकी आणि चारचाकी वाहणे जाऊ शकतात)
 |
पायथ्यापासून लेणीकडे जाणार्या पायर्या. |
 |
विहार किंवा संघाराम( बौद्ध भिक्खूच्या निवासाची जागा )
|
 |
बाहेरील बाजूस असलेले छोटे स्तूप |
 |
बोधीवृक्षाच्या (पिंपळ)पानाच्या आकाराच्या कमानी |
 |
चैत्यगृह
|