Translate
Wednesday, November 3, 2021
जयभिम - बहिष्कृत समाजाचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट
Saturday, October 30, 2021
घोराडेश्वर(शेलारवाडी) - शिवमंदिर नव्हे प्राचीन बुद्ध लेणी
जुना मुंबई पुणे महामार्गावर देहूरोडच्या पुढे डाव्या बाजूला शेलारवाडी येथे जी डोंगररांग पसरलेली आहे त्यामध्येच काळ्या कातळात कोरलेल्या ऐतिहासिक बुद्ध लेण्या आहेत ज्या सध्या घोराडेश्वर शिवमंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रचलित केल्या जात आहेत. विशेष म्हणजे पुरातत्व विभाग पुणे येथील दफ्तरात याची प्राचीन बुद्ध लेणी म्हणून नोंद आहे तरी येथे सुरू असलेल्या अतिक्रमणावर निर्बंध घातले जात नाहीत.
शेलारवाडी हे पायथ्याचे गाव असल्याने त्याच नावाने ही लेणी ओळखली जाते. भाजे, बेडसे, कार्ला या लेण्यांप्रमाणे ही लेणी देखील हीनयान पंथातील आहे (त्याकाळात बुद्धांची मूर्ती प्रचलित नव्हती त्यामुळे चैत्यगृहातील स्तूपाला बुद्धांचे प्रतीक मानून प्रार्थना केली जात असे) इसवीसनपूर्व पहिल्या ते इसवीसना नंतरच्या पहिल्या शतकात या लेण्या खोदल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील इतर लेण्यांप्रमाणे विहार म्हणजे राहण्याच्या खोल्या, चैत्यगृह म्हणजे प्रार्थनेची खोली ज्यामध्ये स्तूपाचा समावेश असतो आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे टाके अशा स्वरूपात हादेखील लेणी समूह आहे. या लेण्यांमध्ये कोणता भिक्खूसंघ वास्तव्य करीत होता तसेच या लेण्यांचे धम्मदान कोणी दिले ते कुठे राहत होते आणि काय व्यवसाय करत होते याची माहिती देणारे धम्मलिपी मधील दोन शिलालेख सुद्धा येथे कोरलेले आहेत. चैत्यगृहात स्तूपाच्या जागेच्या बाजूला म्हणजेच आता जिथे शिवलिंग आहे त्याच्या डाव्या बाजूच्या वरील भिंतीमध्ये एक आणि चैत्यगृहाच्या बाहेरील बाजूच्या भिंतीवर एक असे प्राकृत भाषेतील धम्मलिपी (ब्राह्मीलिपी) मधील दोन शिलालेख उपलब्ध आहेत. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
शिलालेख क्रमांक एक मध्ये धम्माल अनुसरून भदंत सिंहान यांची शिष्या परिव्राजक घप्रा हिने चैत्यगृहाचे(चेतीयघरो) आणि आचार्य यांच्या स्मरणार्थ चैत्यगृहातील खोल्यांचे धम्मदान दिल्याचा आणि त्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे.
शिलालेख क्रमांक २
भाषांतर - धम्माला अनुसरून धेनुकाकटे म्हणजे सध्याचे डहाणू बंदर येथे वास्तव्यास असलेला शेतकरी कुणबी ऋषभनाक आणि त्याची पत्नी सिवगुप्तनिका यांनी त्यांचा पुत्र गृहपती (गावाचा किंवा शेतकऱ्यांचा प्रमुख) याच्यासह लेण्यांचे धम्मदान दिले आहे.
येथील चैत्यगृहात चैत्यस्तुपाच्या ठिकाणी सध्या शिवलिंग ठेवले आहे शिवलिंगाच्या वरील बाजूस छताला लागून स्तुपाच्या हार्मिकेची दगडात कोरलेली चौकट दिसून येते तसेच शिवलिंगाच्या सभोवताली स्तुपाचा गोलाकार पाया ही दिसून येतो. येथे जो स्तूप होता अगदी तसाच म्हणजे छताला लागून असलेल्या हार्मिकेच्या बनावटीचा स्तूप कुडा, गांधारपाले आणि कान्हेरी या लेण्यांमध्ये दिसून येतो. या चैत्यगृहाच्या वरील बाजूस आणखी एक विहार आहे त्यावरही अतिक्रमण करून विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. एकूण सात ते आठ लेण्यांचा येथे समूह आहे.
Friday, June 4, 2021
जगातला पहिला पर्यावरणवादी सम्राट
जग जिंकण्याची आकांक्षा करणारे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे सम्राट हे जगाच्या इतिहासात अनेक होऊन गेलेत पण आपल्या साम्राज्यातील प्रत्येक जीवाच्या हितसुखसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे सम्राट हे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच झालेत ज्यात सम्राट अशोकाचे नाव हे सर्वोच्चस्थानी आहे. त्यांच्या विचारांमधील आणि कर्तुत्वातील वेगळेपण यासाठी कारणीभूत ठरते. आज विसाव्या शतकात स्वतःचे अस्तित्व धोक्यात आल्यानंतर पर्यावरण संरक्षण, संवर्धन या गोष्टींबाबत लोकं गांभीर्याने विचार करीत आहेत पण आजपासून दोन हजार वर्षांपूर्वी याबाबत सम्राट अशोक यांनी विचारपूर्वक कृती केल्याचे आपल्याला दिसून येते.
आपल्या साम्राज्यातील फक्त प्रजेचाच नव्हे तर प्राणी मात्रांचा सुध्दा त्यांनी पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केला. मनुष्यांच्या बरोबरीनेच त्यांनी पशु पक्ष्यांसाठीही चिकित्सालये म्हणजेच दवाखाने सुरू केले, पाणवठे उभे केले असे करणारे ते जगातले पाहिले सम्राट होते. यासोबतच त्यांनी आपल्या साम्राज्यात पशुबळी देण्यास व शिकार करण्यास बंदी घातली होती. जंगलांचे संवर्धन करून जैवविविधता जपण्यास प्राधान्य दिले. मोठ्या प्रमाणात औषधी, फळांची व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड केली. बुद्ध धम्माच्या प्रसाराच्या माध्यमातून बोधी वृक्षाची म्हणजेच पिंपळ वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. प्रजेलाही याबाबत आपले अनुकरण करण्यासाठी उपदेश केला आणि लेखी आदेश दिले. ज्याचे लिखित पुरावे आपल्याला शिलालेख, स्तंभलेख, लघुलेख यांच्या माध्यमातून आजही बघायला मिळतात. (एका वृक्षाच्या प्रजातीला सम्राट अशोक यांचे नाव आहे जी संपूर्ण भारतात आढळते)
सम्राट अशोक यांचे संपूर्ण कार्य व विचार हे आपल्याला त्यांच्या प्रमुख चौदा शिलालेखांच्या माध्यमातून समजून घेता येते. त्यापैकी गिरनार गुजरात येथील द्वितीय शिलालेख त्यांची पर्यावरण विषयक नीती स्पष्ट करतो ज्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.
भाषांतर - देवांचा प्रिय प्रियदर्शि राजा त्याच्या राज्यात सर्वत्र आणि सीमेजवळच्या राज्यात चोल पांड्या सत्यपुत्र, केरलपुत्र, ताम्रपर्णी यवन राजा अंतियोक आणि अंतियोक याच्या जवळच्या राज्यात सर्वत्र देवांचा प्रिय प्रियदर्शि राजा याने दोन चिकित्सालयाची स्थापणा केली. मनुष्य चिकित्सालय आणि पशु चिकित्सालय. मनुष्याच्या उपयोगी आणि पशूंच्या उपयोगी औषधे जेथे जेथे नाहीत तिथे सर्वत्र आणून त्याची लागवड केली आहे. वाटसरू साठी विहरी निर्माण केल्या आहेत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वृक्ष लावले आहेत.
मागच्या काही शतकात विकासाच्या, आधुनिकीकरणाच्या कारणास्तव आपल्याकडून पर्यावरणाचा अगणित ऱ्हास झालेला आहे ज्याची भरपाई करणे केवळ अशक्य आहे. कधीही न संपणाऱ्या आपल्या आकांक्षांच्या मागे धावताना आपण आपल्या अस्तित्वावरच कुऱ्हाडीचे घाव घालतोय याचेही भान आपल्याला आता उरले नाही. आपला मूळ वारसा हा विध्वंसाचा नसून सृजनशीलतेचा आहे हे ही आपण विसरत चाललो आहोत. हे जर असच सुरू राहीले तर आपला विनाश हा अटळ आहे. त्यासाठी पर्यावरणाच्या विरोधात जाणारा मार्ग सोडून पर्यावरणाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करणारा मार्ग निवडण्याची वेळ आली आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. सम्राट अशोक यांचा पर्यावरण संवर्धनाचा वारसा हा आपल्याला पर्यावरणाशी जोडणारा आहे त्यामुळे तो फक्त दगडावर कोरलेल्या शिलालेखापुरता मर्यादित न ठेवता तो काळजात कोरून घेऊन प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून जपला पाहिजे.
(वरील शिलालेखाचे लिप्यांतर व भाषांतर हे धम्मसिरी इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या माध्यमातून मला करता आले. या संस्थेमार्फत माझे धम्मलिपीचे शिक्षण सध्या सुरू आहे)
Sunday, May 30, 2021
तुमची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर खरंच सुरक्षित आहे का?
- अधिकृत व सुरक्षित वेबसाईट आणि अँप वरच आपली वैयक्तिक माहिती द्यायची ती ही जेवढी गरजेची आहे तेवढीच म्हणजे स्टार मार्क असलेली.
- वेबसाईट http ने सुरू होतीय की https ने हे चेक करायचं https ने जर वेबसाइट सुरू होत असेल तर ती सिक्युर आहे. सुरक्षित नसलेल्या वेबसाईटवर माहिती देणे टाळायचं.
- क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड डिटेल्स सेव्ह करण्याचा जो पर्याय वेबसाईट किंवा अँपवर असतो त्याचा उपयोग करायचा नाही.
- एकच पासवर्ड अनेक वेबसाईट किंवा अँप साठी वापरायचं नाही आणि पासवर्ड लक्षात राहायला सोपं असं नाही तर सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रॉंग असे निवडायचे.
- पासवर्ड रिकव्हरीसाठी किंवा सुरक्षेसाठी सेक्युरिटी प्रश्न निवडताना सोप्या प्रश्नांची निवड न करता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य अशा प्रश्नांची निवड करायची. आणि जे आपण प्रश्न निवडतोय त्यासंबंधीत माहिती सोशल मीडियावर शेयर नाही करायची. ( उदाहरणार्थ एखाद्याने सेक्युरिटी प्रश्नांसाठी तुमच्या आवडत्या प्राण्यांचे नाव किंवा तुमचे टोपण नाव किंवा आईचे नाव असे प्रश्न निवडले तर सायबर गुन्हेगारांना तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वरून ही माहिती सहज उपलब्ध होऊ शकते आणि तुमची माहिती चोरी होऊ शकते)
- आपली लोकेशन सुरक्षित ठेवण्यासाठी व्हीपीएन चा उपयोग करायचा.
- मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम आणि कॉम्पुटरचे सॉफ्टवेअर नेहमी अद्ययावत (अप टू डेट) ठेवायचे.
- ओटीपी हा आपल्या इंटरनेट वरील आकाउंटच्या सुरक्षिततेसाठी असतो त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत कोणासोबत शेयर नाही करायचा. आणि ओटीपी साठी बँक किंवा कंपनीकडून कधीच विचारणा केली जात नाही जो काही व्यवहार आहे तो पोस्टाने किंवा ई-मेल आयडीच्या माध्यमातून केला जातो.
Saturday, May 29, 2021
संस्कृती वृक्ष संवर्धनाची
Saturday, May 15, 2021
कर्णन - समाजातील विषमतेचे वास्तव मांडणारा चित्रपट.
स्वातंत्र्याला सात दशके उलटून गेली तरीही विषमतेवर आधारित जातीव्यवस्था ही भारतीय समाजात ठाण मांडून आहे हे वास्तव दाखविण्याचे, जाहिरपणे त्यावरती भाष्य करण्याचे आणि त्याचा विरोध करण्याचे धाडस लोकशाहीचा चौथा खांब असलेली मीडिया आजही करण्यास धजावत नाही तेच धाडस "कर्णन" या तमिळ मेन्स्ट्रीम चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाभारत या पौराणिक कथेतील पात्रे आणि संदर्भ यांच्या आधारे पण वेगळ्या निष्कर्षांसह ही कथा मांडण्यात आली आहे. जातीच्या उतरंडीमध्ये अडकलेला, अज्ञानाच्या बंधनात आणि गुलामगिरीच्या बेड्यात अडकलेला समाज जो पुढे बरोबरीची संधी मिळाल्यावर आपल्या क्षमतांच्या आधारे उन्नतीच्या दिशेने कशी वाटचाल करतो याचे अतिशय वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटात केले गेले आहे
रस्त्याच्या मध्ये फीट येऊन पडलेली सात ते आठ वर्षाची मुलगी जिच्या आजूबाजूने अनेक बस गाड्या निघून जातात पण कोणीही तिच्या मदतीसाठी थांबत नाही आणि शेवटी पायाच्या टाचा घासून तोंडात फेस येऊन ती जीव सोडते, काळजाचा ठाव घेणाऱ्या या दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. या मुलीच्या मदतीसाठी कोणी का थांबले नाही या सामान्य प्रश्नाचं उत्तर म्हणजेच या चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटाची कथा हीच या चित्रपटाचा नायक वाटते इतकी ती शक्तिशाली आहे. 1997 मधील घटनेवर आधारित तामिळनाडू येथील कोडीयनकुलम या गावातील गरीब आणि जातीप्रथेने शोषित गावकऱ्यांनी बरोबरीचे अधिकार मिळविण्यासाठी जातिव्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची ही कथा आहे.
जातीव्यवस्थे नुसार जरी अस्पृश्य ठरविले गेले असले तरी या गावातील लोकं कष्ट करून स्वाभिमानाने, बंधुभावाने, स्वतःची संस्कृती, वेगळी ओळख जपत ताठ मानेने जगत असतात. हिच गोष्ट शेजारच्या मेलूर गाववाल्याना मान्य नसते अस्पृश्यांनी नेहमी त्यांच्या वर्चस्वाखालीच राहिले पाहिजे असे त्यांना वाटत असते म्हणूनच त्यांना कायम आपल्यावरती निर्भर ठेवण्यासाठी कोडीयनकुलम मध्ये बस स्टॉप बांधू दिला जात नाही आणि बस ही थांबू दिल्या जात नाहीत. पुढे एका सीनमध्ये जातीवादी पोलीस एसपी गावकऱ्याची नावं दुर्योधन, अभिमन्यू अशी उच्च वर्णीय असल्याने, तसेच त्याच्यासमोर त्यांनी डोक्यावरची पगडी न काढल्याने व त्याला स्पर्श केल्यामुळे गावकऱ्यांवर अत्याचार करतो. वरवर जरी हा संघर्ष आपल्याला दोन गावातील किंवा काही लोकांमधील वाटत असला तरी तसे अजिबात नाही. हा संघर्ष अनेक पिढ्यांचा आहे. स्वातंत्र्यानंतरही संवैधानिक पदांवर बसून जातीयतेच्या मुखवट्या आडून गरीब दुर्बल लोकांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांविरुद्धचा हा संघर्ष आहे. जो आपण आजही वृत्तपत्रे, न्युज चॅनेल यांच्या माध्यमातून रोज पाहतो.
दिग्दर्शक मारी सेल्वराज यांनी कथा ज्या पद्धतीने पडद्यावर उतरवली आहे आणि प्रत्येक पात्राला कथेच्या माध्यमातून जो न्याय दिला आहे त्याला तोड नाही. कर्णन, द्रौपदी, दुर्योधन, अभिमन्यू आणि इतर पात्रांच्या आधारे महाभारताला समांतर अशी जी कथा उभी करतात ती उलट असूनही आपल्याला बरोबर वाटते. सिनेमॅटोग्राफी हे एक या चित्रपटाचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते. ग्रामीण भागातील प्रतीकं, चित्रपटातील प्राण्यांचा वावर, मुखवट्याचे रूपक यांच्या आधारे कथानकाचे बारकावे मांडण्याचा जो विचारपूर्वक प्रयत्न केला गेला आहे तो अतिशय प्रशंसनीय असा आहे. पुढचे दोन पाय बांधलेले गाढव, कोंबडीच्या पिलाला उचलून नेणारी घार, जेवणाच्या ताटाभोवती फिरणारे मांजर, मुखवटा घातलेली लहान मुलगी, धड नसलेली देवता, धड नसलेले भिंतीवरील चित्र यांची प्रासंगिकता आपल्या स्मरणात राहते. आपण चित्रपट नाही तर त्या गावातील वास्तविक जीवनच पडद्यावर पाहत आहोत असेच आपल्याला वाटत राहते.
अभिनयाच्या बाबतीत प्रत्येक कलाकाराकडून आपापले पात्र हे सशक्त पद्धतीने उभे केले गेले आहे त्यामुळे छोट्या भूमिका असलेली पात्रही लक्षात राहतात. धनुषने कर्णनची व्यक्तिरेखा इतक्या वास्तविकपणे आत्मसात केली आहे की पडद्यावर आपल्याला फक्त कर्णन दिसतो धनुष्य कुठेही दिसत नाही. जराही फिल्मी नसलेला सामाजिक आणि वैयक्तिक बाबींमुळे रागात असणारा, आपल्या लोकांवरील अन्यायाविरुद्ध लढण्यास तत्पर असणारा नायक धनुषने अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. अभिनेता लाल यांनी साकारलेला कर्णनचा मार्गदर्शक, सुख दुःखातील सोबती येमन आणि नटराजन यांनी साकारलेला उच्च वर्णीय जातीयवादी पोलीस एसपी या भूमिकाही अतिशय दमदार झाल्या आहेत. प्रसंगानुसार वेगवेगळी पात्रे हिरो ठरत असल्याचे आपल्याला दिसून येते.
चित्रपट आणि वास्तव यातील अंतर विसरण्यास भाग पाडणारा कर्णन हा तामिळ चित्रपट पाहून याबाबत लिहण्या पासून व्यक्त होण्यापासून स्वतःला रोखता आलं नाही. हा चित्रपट पाहताना आपणही या वास्तवाचाच भाग आहोत हा विचार मनात घर करून जातो. हा चित्रपट पाहताना मराठीतील फँड्री आणि ख्वाडा या चित्रपटांची आठवण होते. या चित्रपटाबाबत मी जे विचार मांडले आहेत त्याच्याशी प्रत्येकजण सहमत होतीलच असे नाही पण सामाजिक प्रश्नावरती वेगळेपणाने भाष्य करणारी ही कलाकृती आहे याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही हे निश्चित.
Thursday, April 29, 2021
राष्ट्रीय एकात्मता आणि कोरोनाचा विषाणू
कोरोनाच्या संकटाने साऱ्या जगाचा ताबा घेतला आहे. सध्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आपल्या देशात स्मशानकळा पसरली आहे. अशा परिस्थितीत एकमेकांप्रतिचा बंधुभाव वाढीस लागून राष्ट्रीय एकात्मतेची भावना आणखीन मजबूत होणे गरजेचे असताना वास्तवात मात्र अगदी याच्या उलट घडतंय. अशा महामारीतही आपल्याच देशवासीयांकडून ऑक्सिजनचा, औषधांचा(रेमडेसीवीरचा), मास्कचा, अन्न धान्याचा व इतर आवश्यक वस्तूंचा काळाबाजार (भ्रष्टाचार) केला जात आहे. राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, पोलीस, उद्योजक, व्यवसायिक, व्यापारी आदी अशा संकटकाळातील व्यवस्थेचा महत्वपूर्ण भाग असतात पण यांच्याकडुनच मोठ्या प्रमाणात देशाची लूट केली जात आहे. (प्रामाणिकपणे आणि प्राणपणाने आपलं काम करणारे अपवादही आहेत पण देशाच्या गरजेच्या प्रमाणात त्यांची संख्या खूपच कमी आहे) याचबरोबर या काळातही नियमांचे उल्लंघन करून धार्मिक उत्सवांचे आयोजन करणे, धार्मिक स्थळांवर गर्दी करणे, लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांचे आयोजन करणे, सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन न करणे, प्रशासनास सहकार्य न करणे असे प्रकार मोठया प्रमाणावर घडताना दिसून येतात. राष्ट्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मानसिकता ही आपल्या देशाच्या नागरिकांमध्ये समप्रमाणात नसल्याचे कोरोनाच्या विषाणूने पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित केले आहे.
कोणत्या थराला जात आहेत ही माणसं आणि कशासाठी? हा प्रश्न सध्या प्रत्येकालाच सतावत असणार. याच उत्तर साधं आणि सोपं आहे, राष्ट्रीय एकात्मतेमचा अभाव. मी, माझं कुटुंब, माझी जात, माझा धर्म, माझी भाषा, माझा प्रांत, आणि शेवटी माझा देश असा प्राधान्यक्रम असल्यामुळे अशा लोकांमध्ये माझा देश आणि माझ्या देशावरील संकट हा विचार डोक्यात तगच धरू शकत नाही. देश सर्वप्रथम ही भावना प्रत्येकात निर्माण होत नसल्याने, वरवर देश म्हणून जरी आपण सर्वजण एकत्र दिसत असलो तरी आपल्यात एकी नाही ही वस्तुस्थिती आहे.
राष्ट्रीय एकात्मतेला ज्यांचा प्रमुख अडसर आहे ते तीन प्रमुख घटक म्हणजे धर्मांधता, जातीयता आणि अज्ञान. धार्मिक कट्टरता, जातीचा विकृत अभिमान, योग्य आणि अयोग्य यातील फरक अधोरेखित करणाऱ्या शिक्षणाचा अभाव या गोष्टींमुळे माणसं विभाजित होतात. सामाजिक बांधिलकी, नीतिमूल्ये यांचा त्यांना विसर पडून मी आणि माझे कुटूंब हीच त्यांची प्राथमिकता बनते. ज्यामुळे देशहिताच्या गोष्टी अशा लोकांकडून घडत नाहीत. ही समस्या आजचीच आहे असं नाही एकतेच्या अभावामुळेच आपल्या देशावर अनेकवेळा प्रदीर्घ काळ गुलामगिरी लादली गेली होती हा इतिहास आपण विसरता कामा नये.
धार्मिक कट्टरता आणि जातीयते मुळेच आपल्या देशाची फाळणी होऊन देशाचे तुकडे झाले, या भेदांमुळेच अजूनही आपल्यात एकता नाही हे जरी सत्य असले तरी अज्ञानामुळे म्हणजेच शिक्षणाच्या अभावामुळे स्वातंत्र्यानंतरही आपल्या देशातील लोकसंख्येचा मोठा वर्ग हा देशासोबत जोडलाच गेला नाही. कारण त्यांच्या मूलभूत गरजाच पूर्ण झालेल्या नाहीत. अजूनही ते दारिद्र्यात आपलं जीवन जगत आहेत. देशाचे नागरिक म्हणून त्यांना हक्कच मिळालेले नाहीत त्यामुळे देशाप्रती असलेल्या कर्तव्याबाबतीत ते अनभिज्ञच आहेत. आजही अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या अनेक नागरिकांना तर आपण भारतीय आहोत हेच माहिती नाही. अशा परिस्थितीत हे लोक देशहितासाठी योगदान देणार कसे? यासाठी सर्वस्वी आतापर्यंतचे राज्यकर्ते जबाबदार आहेत.
जगातील इतर देशही अशाच प्रकारच्या समस्येने ग्रस्त होते पण त्यांचे विभाजित होण्याचे कारण जात, धर्म, वर्ण, अज्ञान हे नव्हते. जपान, अमेरिका यांसारख्या देशातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्यातले भेद नष्ट केले आणि एकता प्रस्थापित करून राष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेले. जपानी इतिहासातील 'मेइजी क्रांती' हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. जपानमधील सामुराई हे प्रतिष्ठित उच्चवर्गीय मानले जात होते ज्याधारे ते इतरांसोबत भेदभाव करीत पण आधुनिक राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांनी आपले सर्व उच्च अधिकार स्वतःहून राष्ट्राच्या चरणी अर्पण केले आणि इतरांच्या बरोबरीने उभे राहिले. याचप्रमाणे अमेरिकेत कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय (काळा गोरा) असा भेदभाव केला जात होता. गोऱ्या लोकांकडून कृष्णवर्णीयांचा छळ केला जात होता. पण पुढे राष्ट्रहितासाठी गोऱ्या लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन हा भेदभाव नष्ट केला. माणसं जेव्हा सर्व भेद विसरून राष्ट्राचे नागरिक म्हणून एका समानपातळीवर येतात तेव्हाच त्यांच्याकडून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते हा जागतिक इतिहास आहे.
जे इतर राष्ट्रात घडू शकतं ते आपल्याही राष्ट्रात घडू शकतं त्यासाठी आपल्या समाजातील तथाकथित उच्चवर्णीयांनी पुढाकार घेऊन धर्म, जात, वर्ण, पंथ, लिंग आदींच्या आधारे केला जाणार भेदभाव नष्ट केला पाहिजे आणि ज्ञानाची दारं सर्वांसाठी खुली केली पाहिजे. खरं तर भारतीय संविधानाच्या कायद्या नुसार हे सर्व भेदभाव नष्ट केले गेले आहेत, परंतु कायद्याच्या धाकाने नव्हे तर स्वयं प्रेरणेने जोपर्यंत प्रत्येक नागरिकाच्या विचारांमध्ये आणि आचरणामध्ये समता आणि बंधुता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आपल्या देशातील या विषमतेचे समूळ उच्चाटन होणार नाही आणि सत्तेचा वाटा हा शेवटच्या घटकापर्यंत पोहचणार नाही.
आज कोरोनाचे संकट आहे पुढे अशीच इतरही संकटे येत राहतील पण आपण जर एक असू व प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय हीच ओळख आत्मसात करू तर प्रत्येक संकटातून सुरक्षितपणे बाहेर पडू व प्रगतीच्या वाटेवर अविरतपणे मार्गक्रमण करीत राहू.
दैनिक दिव्यमराठी मधुरीमा ११/५/२०२१
Sunday, April 18, 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरू का मानले?
जगात जेवढे काही महापुरुष होऊन गेलेत त्या सर्वांना गुरू आहेतच. प्रत्येक महापुरुषाने प्रेरणस्थानी कोणाला ना कोणाला मानलेलेच आहे. अनेक महापुरुषांच्या चरित्रात नंतरच्या काळात गुरूंची नावे जोडली गेल्याचे आणि त्यामुळे वाद निर्माण झाल्याचेही उदाहरणे आहेत. पण बाबासाहेबांच्या बाबतीत मात्र असा कोणताही वाद नाही कारण त्यांनी स्वतःच आपल्या गुरूंचा उल्लेख त्यांच्या लिखाणाच्या आणि भाषणांच्या माध्यमातून कृतज्ञता पूर्वक करून ठेवला आहे. गुरूंच्या शिकवणीमुळेच माझे आयुष्य घडले असे बाबासाहेबांनी सांगून ठेवले आहे.
२८ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबई येथे आयोजित हिरकमहोत्सवी कार्यक्रमाच्या भाषणात बाबासाहेबांनी गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले या आपल्या तीन गुरूंचा उल्लेख केला. महात्मा फुले यांच्या बाबतीत पुढे बोलताना बाबासाहेब म्हणतात, 'ब्रह्मणेतरांचे खरे गुरू तेच होत. शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी, महार, मांग, चांभारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकविले. कोणी कोठेही जावोत, पण आम्ही मात्र ज्योतिबांच्या मार्गानेच जाऊ. जोडीला कार्ल मार्क्स घेऊ किंवा दुसरे काही घेऊ पण ज्योतिबांचा मार्ग सोडणार नाही'. हा झाला पहिला उल्लेख आणि दुसरा उल्लेख, 'शूद्र पूर्वी कोण होते' हा शूद्रांच्या उत्पत्ती संदर्भात बाबासाहेबांनी जो शोध निबंध त्याची अर्पणपत्रिका त्यांनी महात्मा फुलेंच्या स्मृतीला अर्पण केली आहे. याचबरोबर मी जे काम करतो आहे त्याची सुरुवात मी शून्यापासून नाही केली त्याची सुरुवात माहात्मा फुलेंनी खूप आधी करून ठेवली होती असे बाबासाहेब सांगतात. १९५४ साली आचार्य अत्रे दिग्दर्शित 'महात्मा फुले' या चित्रपटाचा मुहूर्त बाबासाहेबांच्या हस्ते करण्यात आला होता.
महात्मा फुले यांचे शिक्षण बाबासाहेबांपेक्षा कमी आहे तरी ते त्यांचे गुरू कसे? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत असणार त्याचं उत्तर साधं आणि सोपं आहे. महात्मा फुले महात्मा फुले यांचा विद्येचा व्यासंग प्रचंड होता. शालेय शिक्षण झाले असले तरी इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. पश्चिमी देशाचा आणि भारतीय प्राचीन इतिहासाचा त्यांनी इंग्रजीतून आभ्यास केला होता. समता, स्वातंत्र्य, मानवी हक्क व तर्कावर आधारित विचारसरणी यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. विद्येच्या माध्यमातून ते जगाशी जोडले गेले होते. म्हणूनच त्यांनी 'गुलामगिरी' या ग्रंथाची अर्पणपत्रिका अमेरिकेतील निग्रो चळवळीला अर्पण केली होती. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी यासारख्या अनेक क्षेत्रात महात्मा फुलेंनी जे कार्य केले त्यातून बाबासाहेबांनी प्रेरणा घेतली आणि त्या कार्याला मूर्त स्वरूप दिले.
शिक्षणाची दारे खुली केली - ज्या काळात महात्मा फुले यांचा जन्म झाला त्या काळात जातीव्यवस्थेवर आधारित विषमतेचे वर्चस्व होते. मनुस्मृतीचा कायदा होता ज्यानुसार अस्पृश्यांना, शूद्रांना आणि स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. इंग्रज सत्तेमुळे महात्मा फुले यांना शिक्षण घेता आले. आणि शिक्षणामुळे त्यांना अज्ञान आणि गुलामगिरी यांच्यातील संबंध लक्षात आला. (जो त्यांनी विद्येविना मति गेली, मतिविना निती गेली या कवितेच्या माध्यमातून मांडला) गुलामगिरीची पाळे मुळे अज्ञानाशी संबंधित आहेत म्हणून त्यांनी मुळाशीच घाव घातला. फिल्टरेशन थेरीला विरोध करून 'एज्युकेशन फ्रॉम बिलो' ची संकल्पना मांडली आणि त्यानुसार शिक्षणाची दारं खुली केली. १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, त्यानंतर अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या आणि त्यानंतर सर्वांसाठीच शाळा सुरू केल्या. महात्मा फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून एकूण अठरा शैक्षणिक संस्था सुरू केल्या होत्या. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांसाठीच शिक्षणाची दारे खुली केली.
अस्पृश्यता निवारण - मनुस्मृतीसारख्या धार्मिक ग्रंथांमुळे अस्पृश्यता ही प्रथा समाजात रुजली. आपल्या जातीचा अभिमान आणि दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष हा धार्मिक ग्रंथांमधील पवित्र अपवित्र, पाप पुण्य अशा संकल्पनेमुळे वाढीस लागला. त्यामुळे महात्मा फुलेंनी विषमतावादी धर्मग्रंथांवर हल्ला चढविला. महात्मा फुले म्हणतात, "मांगा महारा निंदा ठावी नाही व्यथा जाळा मनुग्रंथा अग्निमध्ये" जातिव्यवस्थेचे मूळ हे धर्म ग्रंथात आहे त्यामुळे असे धर्मग्रंथ जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत जातीव्यवस्था नष्ट होणार नाही अशी त्यांची भूमिका होती. महात्मा फुले यांची हीच भूमिका बाबासाहेबांनी कृतीत उतरवली 'मनुस्मृतीचे दहन' करून. 'जातीभेद विवेकसार' या ग्रंथात महात्मा फुलेंनी म्हंटले आहे हिंदूंची गुलामगिरीतून मुक्तता करायची असल्यास त्यांना धर्मग्रंथांच्या पाशातून मुक्त केले पाहिजे पुढे हाच सिद्धांत बाबासाहेबांनी त्यांच्या 'जातिनिर्मूलन' या पुस्तकातुन मांडला.
त्याकाळात जनावरांना सार्वजनिक पाणवठ्यांवर पाणी पिण्यास परवानगी होती परंतु अस्पृश्यांना सार्वजनिक पणावठ्यांवर पाणी पिण्यास बंदी होती. महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी घरातील पाण्याचा हौद खुला केला. पुढे बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यांना पाण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. पाण्याच्या माध्यमातूनच बाबासाहेबांनी मानवी हक्कांसाठीची लढाई सुरू केली.
स्त्री पुरुष समानता - स्त्रीच्या नजरेने जगाकडे बघितले पाहीजे असे महात्मा फुलेंनी सांगितले. स्त्रियांना समान पातळीवर आणण्याची सुरुवात त्यांनी घरातून केली. पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षित केले व आपल्या कार्यात सहभागी करून घेतले. मुलींसाठी शाळा काढल्या, प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना शिक्षित केले. बालविवाहास विरोध, विधवा पुनर्विवाह, बलिकाश्रम, बालहत्या प्रतिबंधक गृह याद्वारे स्त्री पुरुष समानतेचा पाया घातला. बाबासाहेबांनी हिंदू कोडबील आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून महात्मा फुलेंना अपेक्षित सर्व अधिकार महिलांना दिले. समाजाची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे असे बाबासाहेबांचे मत होते.
कृषी क्षेत्रातील कार्य - महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या दुःखाकडे सर्वप्रथम लक्ष वेधले. शेतकऱ्यांची दुःखे काय आहेत, ती दूर कशी करायची याबाबतीतले काळापुढचे विचार महात्मा फुलेंनी 'शेतकऱ्यांचा आसूड' मध्ये मांडली. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन हा ग्रंथ लिहिला. धार्मिक व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या व अस्पृश्यांच्या आर्थिक परिस्थिती वर कसा विपरीत परिणाम होतो हे 'ब्राह्मणांचे कसब' या ग्रंथातून नमूद केले. महात्मा फुलेंनी फक्त शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्षच वेधले नाही तर उपाययोजना ही सांगितल्या आणि स्वतः उत्तम शेती करून दाखविली. उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव, बंद नळातून शेतीला पाणी, आधुनिक शेतीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना परदेशात पाठवणे, आधुनिक अवजारे आणि उत्तम प्रतीचे बियाणे हे त्यांनी सांगितलेल्या काही प्रमुख उपाययोजना होत्या. बाबासाहेबांनी या ही क्षेत्रात महात्मा फुले यांचे कार्य पुढे नेले. त्यांनी पहिला मोर्चा शेतकऱ्यांसाठीच काढला, 'स्मॉल होल्डिंगस इन इंडिया अँड देअर रेमिडीज' या ग्रंथात शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना सुचविल्या, शेतकऱ्यांना खोतांच्या जाचातून मुक्त केले. ब्रिटिश मंत्रालयात मंत्री असताना वीज आणि पाणी यासाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली. सर्वप्रथम नद्या जोड प्रकल्पाची संकल्पना मांडली.
वरील सर्व मुद्द्यांवरून बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना गुरू का मानले ते स्पष्ट होते. महात्मा फुले यांच्या विचारांचे आणि कार्याचे सार संविधानाच्या अनेक कलमांच्या माध्यमातून ठळकपणे अधोरेखित होते. या महान गुरू शिष्याच्या स्वप्नातील भारत फक्त आणि फक्त संविधानरुपी मार्गानेच घडू शकतो हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे.
Tuesday, April 13, 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शैक्षणिक दृष्टीकोन
सिम्बॉल ऑफ नॉलेज अशी ज्यांची जगात ओळख आहे त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे खऱ्या अर्थाने आधुनिक मानवी जीवनातील शिक्षणाचं महत्व विशद करणारं एक सर्वोत्तम असं उदाहरण आहे. जगात किंवा भारतात उच्चविद्या विभूषित अशी अनेक व्यक्तीमत्वे झालीत आणि होत आहेत पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व हे या सर्वांपेक्षा खूपच वेगळे आणि एकमेव असे आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे बाबासाहेबांनी जे ज्ञान मिळवलं ते फक्त स्वतःच्या, कुटुंबाच्या उद्धारासाठी न वापरता लोकांच्या उद्धारासाठी वापरले प्रसंगी जीवघेणा संघर्ष केला, हाल आपेष्टा सोसल्या, त्याग केला पण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बहुजनांच्या हिताचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले. बाबासाहेबांनी ज्या ज्ञान शाखांमधून शिक्षण घेतले होते त्या आधारे त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनून वैयक्तिक आणि कौटुंबिक सुखाची सर्वोच्च पातळी गाठणे सहज शक्य झाले असते पण त्यांनी तसे नाही केले कारण त्यांच्या ज्ञानाला शिलाची जोड होती. बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य हे ज्ञानार्जन करणे आणि त्याचा उपयोग लोकांच्या उद्धाराकरिता करणे या एकाच ध्येयाने प्रेरीत असल्याचे यावरून प्रकर्षाने जाणवते.
बाबासाहेबांची जी ग्रंथ संपदा सध्या उपलब्ध आहे त्यासाठी २२ खंड ही कमी पडत आहेत यावरूनच त्यांचा विद्येचा व्यासंग हा किती दांडगा होता हे लक्षात येते. त्यांनी अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राजकारण, परकीय संस्कृती, शिक्षण, कायदा, शेती आणि इतिहास अशा अनेक विषयांवर इंग्रजी, मराठी व इतर भाषांमध्ये अभ्यासपूर्ण लिखाण केलेले आहे. माणसाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणानेच होतो हे बाबासाहेबांनी स्वतः अनुभवले होते म्हणूनच त्यांनी शिक्षण घेण्याचा संदेश हा सर्वप्रथम दिला. शिक्षणाला बाबासाहेबांनी वाघिणीचे दूध म्हंटले आहे. शिक्षणामुळे माणसाला आपल्या हक्कांची जाणीव होते आणि मग तो ते हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करायला सज्ज होतो.
बाबासाहेब म्हणतात, पोटाची भूक भागवावीच पण एक पाऊल पुढे टाकून शिक्षण घेऊन माणसाने बुद्धीची भूक भागवावी. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो.
मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे पिणे व जगणे ही आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नये. प्रत्येकाने उच्च महत्वकांक्षा बाळगून ती फलद्रुप करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे, ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवायचा आहे त्यांनी तप केला पाहिजे , श्रम केले पाहिजे, स्वतःस वाहून घेतले पाहिजे असे त्यांचे मत होते.
शीलाचे महत्व सांगताना बाबासाहेब म्हणतात शिक्षण ही तलवार आहे, शिक्षण हे एक शस्त्र आहे परंतु विद्येचे हे शस्त्र नेहमी वापरणाऱ्यावर अवलंबुन असते. हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू शकेल. चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम परंतु वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्त्र पशुपेक्षाही क्रूर व भीतीप्रद ठरतो. दिनदुबळ्या, गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही त्यांच्या अज्ञानिपणाचा फायदा शिकले सवरलेले शेठजी, भटजी, वकील वगैरे सर्व लोक घेत आहेत. अशातऱ्हेने गरीब जनतेस नाडण्याकडेच जर या शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर धिक्कार असो या अशा शिक्षणाचा. त्या दृष्टीने पाहता शिक्षणापेक्षा शील फार महत्वाचे आहे.
तरुणांना मार्गदर्शन करताना बाबासाहेब म्हणतात मनुष्य बीए झाला म्हणजे त्याला अधिक शिक्षणाची गरज नाही काय? बीए किंवा एमए झाला म्हणजे त्याने सर्व ज्ञान संपादन केले ही भावना चुकीची आहे. विद्येचा व्यासंग आयुष्यभर केला पाहिजे. विद्येची गोडी निर्माण झाली पाहिजे.
विद्यार्थ्यांनी शिक्षणापेक्षा राजकारणात दंग होणे हा शैक्षणिक ऱ्हास होय असे ते मानत त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनात सर्व ताकतीने फक्त आणि फक्त विद्यार्जनावरतीच लक्ष केंद्रित केले पाहिजे.
चांगल्या सुविधा उपलब्ध असूनही जे विद्यार्थी शिक्षणात मागे राहतात त्यांना उद्देशून बाबासाहेब म्हणतात, मी विद्यार्थी असताना लहानशी आमची खोली होती. तीत आम्ही सर्व कुटुंब राहत होतो . त्यात बहिणीची दोन मुले , एक बकरी, जाते पाटा वगैरे आणि मिणमिण जळणारा तेलाचा दिवा. इतकी हालाखीची परस्थिती असताना मी आभ्यास केला. विद्यार्थ्यांना बोर्डिंगमधून आमच्यापेक्षा किती तरी पटीने चांगली सोय असताना त्यांनी रात्रंदिवस अभ्यास का करू नये?
विद्यार्थी आणि तरुणांनी बाबासाहेबांचे शिक्षण विषयक विचार आत्मसात करून जर कृतीत उतरविले तर त्यांच्या वैयक्तिक भवितव्या सोबत समाजाचे आणि देशाचे भवितव्य ही उज्वल होईल हे निश्चित.
संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग २ व ३ मधील भाषणांतून बाबासाहेबांचे वरील शिक्षणविषयक विचार घेतले आहेत
Friday, April 2, 2021
जंबुद्वीपाचा सर्वोत्तम सम्राट - देवान पियेन पियदसी राया असोको
इतिहासाच्या पानांवर हजारो राजा महाराजांच्या नावांची गर्दी आहे पण एक नाव असे आहे जे या गर्दीपासून वेगळे राहून जगाच्या इतिहासात ताऱ्याप्रमाणे चमकत राहते आणि ते एकमेव नाव म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक! ब्रिटिश इतिहासकार एच जी वेल्स यांनी आऊट लाईन ऑफ हिस्टरी या त्यांच्या ग्रंथात चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या बद्दल काढलेले उद्गार हे किती सार्थ आहेत याची प्रचिती आजही आपल्याला मिळते. जवळपास २४०० वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही सम्राट अशोकाचं आणि त्याच्या साम्राज्याचं नाव हे आजही लोकांच्या काळजात घर करून आहे ही काही साधारण गोष्ट नाही. काळाच्या ओघातही आपली ओळख कायमस्वरूपी टिकवुन ठेवणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाचे नक्की काय वेगळेपण आहे हे आपण त्यांच्या प्रमुख १४ शिलालेखांच्या आधारे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सम्राट अशोक यांचा जन्म इसवीसन पुर्व ३०४ मध्ये चैत्र शुक्ल अष्टमीला मौर्य राजघराण्यात झाला. इसवीसन पूर्व २६९ मध्ये त्यांचा पाटलीपुत्र येथे राज्याभिषेक झाला. तेव्हापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे इसवीसन पुर्व २३२ पर्यंत अखंड भारतावर संपूर्ण जगातील आदर्श असा राज्यकारभार केला.
साम्राज्याच्या सीमा - सम्राट अशोक यांच्या आधी ना त्यांच्या नंतर साम्राज्याच्या एवढ्या विस्तीर्ण सीमा कोणत्याही राज्यकर्त्याच्या नव्हत्या. सम्राट अशोक ह्यांच्या काळात मौर्य साम्राज्याचा विस्तार उत्तरेस हिंदुकुश पर्वत श्रेणी पासून दक्षिणेस गोदावरी नदीला व्यापून कर्नाटकातील म्हैसूर पर्यंत पसरले होते. ह्याव्यतिरिक्त पूर्वेस बंगाल प्रांतापासून पच्छिमेस अफगाणिस्तान पर्यंत दूरवर साम्राज्याचा विस्तार होता. सम्राट अशोक यांचे साम्राज्य आजच्या भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, भूतान, तिबेट, म्यानमार या देशांतील भूभागावर होते. सम्राट अशोकाच्या काळातच अखंड भारताची निर्मिती झाली ज्याला जंबुद्वीप या नावाने ओळखले जात होते.
कुशल प्रशासन - सम्राट अशोकाच्या साम्राज्यात संघराज्य शासन प्रणालीची स्थापना करण्यात आली होती. मेगस्थनीज या ग्रीक इतिहासकाराने याबाबत लिहून ठेवले आहे. संपूर्ण साम्राज्य हे पाच प्रांतांमध्ये विभागले होते. हे प्रांताधिकारी सम्राटाने पारित केलेल्या जनकल्याण योजना राबवत आणि त्या राज्याचे कामकाज पाहत. प्रदेश, जिल्हा आणि ग्राम यानुसार अधिकाऱ्यांची नेमणूक केली जात होती. केंद्रात पाच पाच अधिकाऱ्यांच्या सहा कमिटी बनविल्या होत्या ज्या कृषी, उद्योग, व्यापार, वित्त, कला आणि जनकल्याण संबंधी योजनांच्या नीती बनविण्यासाठी कटिबद्ध होत्या. कायदा सुव्यवस्था आणि करवसुली साठी प्रातांमध्ये गव्हर्नर आणि कलेक्टर यांच्या नेमुनका केल्या गेल्या होत्या. सर्व अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सक्षम आणि प्रभावी असे हेरखाते नियुक्त होते जे सम्राटाच्या निगरानीखाली होते आणि थेट त्यांना अहवाल सादर करीत.
कृषी आणि व्यापार - या दोन गोष्टींवर अधिक भर दिला होता. त्यासाठी केंद्रीय कृषी आणि व्यापार नीती ठरवली, विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी तळे, कालवे, विहरी खोदण्यात आल्या होत्या, तसेच उच्चप्रतिची बियाणे विकसित केले जात होते. शेतीतील उत्पादने तसेच कापड, मसाले निर्यात करण्यसाठी बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या, बदरांची निर्मिती केली. व्यापाराला चालना देण्यासाठी रस्त्यांची निर्मिती करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमांसोबत जोडले. व्यापारी मार्गावर व्यापाऱ्यांसाठी पाण्याची आणि राहण्याची सोय केली. मुद्रा आणि माप यासाठी संपूर्ण राज्यात एकसमान पद्धती विकसित केली. त्याकाळात चीन, रोम, इजिप्त आदी राष्ट्रांसोबत समुद्रामार्गे व्यापार केला जात होता.
अशोकाच्या काळात भारताने जगातली ३३ टक्के बाजारपेठ काबीज केली हाेती म्हणूनच जागतिक बाजारपेठेत भारताचे वर्चस्व होते. चिनी यात्री फाह्यान याने आपल्या प्रवास वर्णनात मौर्यकाळ हा भारताचा सुवर्णकाळ होता असे लिहून ठेवले आहे त्याचबरोबर अशोकाच्या उत्तम प्रशासकीय नेतृत्वाची प्रशंसा चिनी यात्री हुआन त्सुएंग यांच्या प्रवासवर्णनातून पाहायला मिळते.
धर्मनिरपेक्ष आचरण - सम्राट अशोक महान असण्याची जी प्रमुख कारणे आहेत त्यापैकी हे एक महत्वाचे कारण आहे. सम्राट अशोक स्वतः इतर धर्माचा आणि धर्मियांचा आदर करत असे त्यांना सन्मानाने वागवत असे. त्यांच्या साम्राज्यात सर्व पंथांच्या लोकांना समानतेने वागवले जात होते, कोणत्याही प्रकारच्या भेदभावास तिथे थारा नव्हता. आज आपण ज्याला धर्मनिरपेक्षता म्हणतो तसा लेखी आदेशच सम्राट अशोकाने शिलालेख क्रमांक १२ मध्ये दिला आहे. स्वतः सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती पण त्याने स्वतःचा धर्म प्रजेवरती लादला नाही.
नितीमत्तेची शिकवण - प्रजेच्या भौतिक सुखासोबतच त्यांच्या नैतिक उत्कर्षाचा विचार करणारा आणि त्याला कृतीची जोड देणारा जगाच्या इतिहासातील एकमेव सम्राट म्हणजे सम्राट अशोक. प्रजेला नैतिकतेची शिकवण देण्यासाठी त्यांनी "धम्म महामात्रा" हे विशेष अधिकारी नियुक्त केले होते. हे धम्म महामात्रा प्रजेच्या घरोघरी जाऊन मानवतावादी विचारांची शिकवण देत आणि त्याचे पालन करण्यात येते की नाही यावरही लक्ष देत. शिलालेख क्रमांक ५ मध्ये याची माहिती मिळते. स्त्रियांच्या प्रश्नांसाठी स्त्री धम्म महामात्रा यांची नियुक्ती देखील सम्राट अशोकाने केली होती. स्त्री-पुरुष यांना समानतेने वागविले जात होते हे यावरून स्पष्ट होते ( शिलालेख १२). लोकं उत्सवात किंवा लग्नात प्रचंड खर्च करतात पण या दिखाव्यामुळे कोणतेही नीतिमान कार्य होत नाही. त्यापेक्षा त्यांनी घरातील नोकर चाकर, शेजारी, मित्रपरिवार व सागळ्यांशी प्रेमाने वागावे त्यामुळे त्यांचे जीवन नीतिमान होईल आणि त्यांना सूख लाभेल ( शिलालेख ९).
सर्वांप्रती मैत्री आणि करुणा - सम्राट अशोकाच्या ठायी असलेली मैत्री व करुणा ही फक्त स्वतःच्या प्रजेपुरती सीमित नव्हती तर सीमेलगतच्या लोकांसोबतच सम्राज्याबाहेरून येणाऱ्या लोकांबाबतही तशीच होती. यापुढे जाऊन सर्व प्राणिमात्रांविषयीही तसाच मैत्री व करुणा भाव होता. म्हणूनच सम्राज्यामध्ये पशु बळी देण्यास बंदी घातली होती. मनुष्या बरोबरच जनावरांसाठीही चिकित्सालये ( दवाखाने) सुरू केली, पाण्याची सोय केली. औषधालयांसाठी लागणाऱ्या औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड केली. शिकरिस बंदी घालून जंगलांचे संवर्धन केले. शिलालेख क्रमांक १ व २ मध्ये याबाबतचे आदेश दिले आहेत. कलिंगच्या युद्धानंतर तलवार म्यान करून मैत्रीच्या आधारे साम्राज्याचा विस्तार करून लोककल्याणकारी आदर्श साम्राज्य स्थापित केले. ( शिलालेख १३)
लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य - मी शयन कक्षेत असो अथवा बगीशेत असो अथवा अंतःपुरात माझ्या साम्राज्याची मला सर्व माहिती समजली पाहिजे म्हणजे लोककल्याणाचे निर्णय मला ताबडतोब घेता येईल. दिवसातील माझा प्रत्येक प्रहर हा लोकांसाठीच असेल, माझे उर्वरित संपूर्ण आयुष्य त्यांच्यासाठीच असेल. असा लेखी आदेशच सम्राट अशोकाने शिलालेख ६ च्या द्वारे आपल्या अधिकाऱ्यांना दिलेला. फक्त आदेशच नाही दिला तर पुढील आयुष्यात त्याप्रमाणे कृतीही केली. सर्व स्तरातील अधिकाऱ्यांनाही लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आणि यामध्ये कसूर केल्यास कडक शिक्षेचे आदेश सम्राट अशोकाने दिले होते. त्याबरोबरच दर पाच वर्षांनी अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाचा दौरा करून प्रजेच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करणे ही बंधनकारक केले होते.( शिलालेख ३ आणि १०)
कलेच्या नवयुगाची सुरुवात - सिंधू घाटी सभ्यतेनंतर भारतीय शिल्पकलेचा, वास्तुकलेचा उदय हा मौर्यकाळातच झाला. लेणी, शिलालेख, स्तंभलेख यांची ओळख भारताला सर्वप्रथम सम्राट अशोकाने करून दिली. भारतीय लेखन कलेचा इतिहास सम्राट अशोकाच्या शिलालेखांपासून प्रारंभ होतो. सामाजिक शिक्षा आणि संदेश देण्यासाठी लिपीचा अविष्कार केला, सम्राट अशोकाने त्याच्या शिलालेखांत धम्मलिपी, खरोष्टी लिपी आणि अरामाईक या लिपींचा वापर केला ज्यांची भाषा प्राकृत आणि पाली होती. बुद्धांनी भेट दिलेल्या सर्व ठिकाणी स्थापत्य कलेनी युक्त अशा सर्वोत्कृष्ट स्तूप आणि विहारांची निर्मिती केली. महाबोधी विहाराची निर्मिती हे याचे उदाहरण आहे. भव्यदिव्य अशा विश्वविद्यालयांची निर्मिती केली ज्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी परदेशातूनही विद्यार्थी येत होते. प्राचीन भारतात प्रथमच मौर्य राजवटीत प्रत्येक रस्त्यावर गावाचे अंतर कळावे यासाठी “कोस मिनार’ म्हणजे मैलाचे दगड उभारले होते.
भारताची राष्ट्रीय ओळख - भारताची राष्ट्रीय ओळख म्हणून ज्या चिन्हांचा उपयोग केला जातो ती सम्राट अशोकाचीच देण आहे. राष्ट्रीय ध्वजावरील २४ आऱ्यांचे अशोकचक्र आणि राजमुद्रेवरील सारनाथ येथील स्तंभावरील शिल्प ही आपली राष्ट्रीय ओळख आहे. भारताला एका सूत्रात बांधण्याचा आणि संघटित राज्याची संकल्पना साकार करण्याचा सर्वप्रथम प्रयत्न सम्राट अशोकाने केल्याचे दिसून येते आणि तेही व्यक्तीच्या सामाजिक गरजा आणि इच्छा आकांक्षा यांचे दमन न करता.
सौजन्यपूर्ण धर्मप्रसार - बुद्धांचा धम्म जगाच्या पाठीवर नेण्याचे श्रेय हे सम्राट अशोकालाच जाते. बुध्द धर्माचा प्रसार करण्यासाठी अशोकने भारतभर व भारता बाहेर भ्रमण केले धम्म यात्रा केल्या. त्याने स्वतः व्यतिरिक्त आपल्या अपत्यांना सुध्दा श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, मिस्त्र, युनान इत्यादी देशांत पाठविले व बौध्द धर्म प्रसारित करण्याचे कार्य केले. अशोकाने भारत व भारताबाहेरील देशात बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून खास अधिकारी नेमले, आपले दूत व पथके पाठवले.
वरील सर्व मुद्द्यांवरून सम्राट अशोकाचे वेगळेपण आणि त्याची महानता आपल्या अगदी सहज लक्षात येते. लोकशाही राष्ट्रानाही जे अजूनपर्यंत जमले नाही ते सम्राट असून अशोकाने २४०० वर्षा आधी शिक्षा आणि नैतिकतेच्या आधारे करून दाखविले होते. भ्रष्टाचार, सांप्रदायिक दंगे, आत्मनियंत्रण आणि राष्ट्राप्रतिची निष्ठा यांची कमतरता, राज्यकर्त्यांमध्ये लोकहितास प्राधान्य न देता बळावत चाललेली स्वार्थी प्रवृत्ती या व आपल्या राष्ट्रासमोरील अशा अनेक समस्यांसाठी सम्राट अशोकाचे चरित्र हे परिपूर्ण असे उत्तर आहे. भारतीय संविधानात सम्राट अशोकाच्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येते त्यामुळे संविधानाची अंमलबजावणी जर काटेकोरपणे केली गेली तर जंबुद्वीपाने अनुभवलेला सुवर्णकाळ पुन्हा एकदा नव्याने प्रस्थापित होईल यात काही शंका नाही. येणाऱ्या पिढ्यांच्या उत्कर्षासाठी हा समृद्ध वारसा जपणे आणि त्यांच्यापर्यंत पोहचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.