Translate

Sunday, May 30, 2021

तुमची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर खरंच सुरक्षित आहे का?




मागच्या काही महिन्यापासून अनेक नामांकित कंपन्यांच्या नावाने  (लेन्सकार्ट, डॉमिनोज, फ्लिपकार्ट, जस्ट डायल इ.)  लॉग इन साठीचे ओटीपी मेसेजेस सतत मोबाईलवरती येण्याचा आणि त्या ओटीपी मेसेज बाबत विचारणा करण्यासाठी अनधिकृत कॉल येण्याचा अनुभव अनेकांना आला असेल. आपण तर लॉग इन करत नाहीये तरी ओटीपी मेसेजेस कसे जनरेट होत आहेत हा प्रश्नही अनेकांना सतावत असेल, आपण कंपन्यांना ऑनलाईन पद्धतीने जी वैयक्तिक माहिती पुरवितो ती सुरक्षित नसणे हे यामागचं एकमेव कारण आहे. टेक्निकल भाषेत याला डेटा ब्रीच ( data breach) असे म्हणतात.

मागच्याच महिन्यात डॉमिनोज आणि एअर इंडिया या कंपनीचा भारतातील मागील दहा वर्षाचा डेटा चोरी झाल्याच्या बातम्याही अनेकांनी ऐकल्या असतील, तुम्ही जर डॉमिनोज मधून काही ऑर्डर केले असेल आणि एअर इंडियाचे तिकिट बुक केले असेल तर लीक झालेल्या डेटा मध्ये तुमची ही माहिती असू शकते. या कंपन्यांकडून ग्राहकांची जी वैयक्तिक माहिती घेतली जाते त्याचा या डेटा चोरी मध्ये समावेश असतो. नाव, मोबाइल क्रमांक, घरचा पत्ता, ई-मेल आयडी, डेबिट- क्रेडिट कार्ड  डिटेल्स यांचा समावेश वैयक्तिक माहिती मध्ये असतो त्यामुळे हा डेटा वापरून आपली आर्थिक फसवणूक करणे सायबर गुन्हेगारांना सहज शक्य होते. सायबर गुन्हेगार बॅंकेकडून किंवा कंपनीकडून बोलत असल्याची बतावणी करून लीक झालेल्या माहितीच्या आधारे आपल्याला अपल्याबाबतची सर्व वैयक्तिक माहिती अगदी अचूक सांगतात त्यामुळे बरेच जण त्यांच्यावर विश्वास ठेवून ओटीपी सांगतात किंवा ते सांगतील त्या गोष्टी करतात आणि फसवणुकीस बळी पडतात.

इंटरनेटवर आपली वैयक्तिक माहिती १००% सुरक्षित नाही पण योग्य ती खबरदारी घेतली तर आपण फसवणुकीपासून आणि डेटा चोरीपासून स्वतःला वाचवू शकतो. याबाबतचे काही उपाय पुढीलप्रमाणे आहेत.
  • अधिकृत व सुरक्षित वेबसाईट आणि अँप वरच आपली वैयक्तिक माहिती द्यायची ती ही जेवढी गरजेची आहे तेवढीच म्हणजे स्टार मार्क असलेली.
  • वेबसाईट http ने सुरू होतीय की https ने हे चेक करायचं https ने जर वेबसाइट सुरू होत असेल तर ती सिक्युर आहे. सुरक्षित नसलेल्या वेबसाईटवर माहिती देणे टाळायचं.
  • क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड डिटेल्स सेव्ह करण्याचा जो पर्याय वेबसाईट किंवा अँपवर असतो त्याचा उपयोग करायचा नाही. 
  • एकच पासवर्ड अनेक वेबसाईट किंवा अँप साठी वापरायचं नाही आणि पासवर्ड लक्षात राहायला सोपं असं नाही तर सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रॉंग असे निवडायचे.
  • पासवर्ड रिकव्हरीसाठी किंवा सुरक्षेसाठी सेक्युरिटी प्रश्न निवडताना सोप्या प्रश्नांची निवड न करता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य अशा प्रश्नांची निवड करायची. आणि जे आपण प्रश्न निवडतोय त्यासंबंधीत  माहिती सोशल मीडियावर शेयर नाही करायची. ( उदाहरणार्थ एखाद्याने सेक्युरिटी प्रश्नांसाठी तुमच्या आवडत्या प्राण्यांचे नाव किंवा तुमचे टोपण नाव किंवा आईचे नाव असे प्रश्न निवडले तर सायबर गुन्हेगारांना तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वरून ही माहिती सहज उपलब्ध होऊ शकते आणि तुमची माहिती चोरी होऊ शकते)
  • आपली लोकेशन सुरक्षित ठेवण्यासाठी व्हीपीएन चा उपयोग करायचा. 
  • मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम आणि कॉम्पुटरचे सॉफ्टवेअर नेहमी अद्ययावत (अप टू डेट) ठेवायचे.
  • ओटीपी हा आपल्या इंटरनेट वरील आकाउंटच्या सुरक्षिततेसाठी असतो त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत कोणासोबत शेयर नाही करायचा. आणि ओटीपी साठी बँक किंवा कंपनीकडून कधीच विचारणा केली जात नाही जो काही व्यवहार आहे तो पोस्टाने किंवा ई-मेल आयडीच्या माध्यमातून केला जातो.
फेसबुक, वॉट्सऍप आणि ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट यांच्या बाबतीतल्या सुरक्षितेतच्या उणिवा बाबत आणि डेटाच्या गैरवापराबाबत  आपण याआधीही अनेकदा ऐकले असेल आपल्या देशातील सायबर गुन्हेगारी संबंधातील कायदे इतर देशांच्या तुलनेत कडक नाहीत तसेच इंटरनेट वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी कंपन्यांवर  सरकारच्या माध्यमातून कडक निर्बंध घातले जात नाहीत त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालणे कठीण जाते. युरोपियन राष्ट्रांमध्ये अशा कंपन्यांवर वापरकर्त्यांचा फक्त गरजेचा डेटा घेण्यासंबंधात आणि ते ही काही काळानंतर डिलीट करण्याबाबत तसेच  माहितीची गोपनीयता राखण्यासाठी कडक नियम लागू आहेत. हळू हळू याबाबत आपल्याकडेही सुधारणा होत आहे पण तोपर्यंत प्रत्येकाने जागरूक आणि सावध राहून स्वतःला इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबत अद्ययावत करणे हे अत्यंत आवश्यक आहे.




Saturday, May 29, 2021

संस्कृती वृक्ष संवर्धनाची

             



        मानव आणि वृक्ष यांचे नाते मानवाच्या उत्पत्तीपासूनच जडलेले आहे. अनादी काळापासून मानवाच्या मूलभूत गरजा वृक्षांकडून पूर्ण केल्या जात आहेत. मानवी जीवनाच्या प्रगतीमध्ये वृक्षांचे अनन्यसाधारण असे योगदान आहे. मानवी जीवनातील वृक्षांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे.
          मानवी जीवनाचा अविभाज्य अंग असलेले, मानवाच्या ऐहिक व आध्यात्मिक जीवनात सतत साथ देणारे, सर्वांग उपयोगी पडणारे, वनचरे व पक्षी यांनाही अन्न, वस्त्र, निवारा देणारे जाती, धर्म, वंश, लिंग, शत्रू-मित्र, गरीब- श्रीमंत, रोगी-निरोगी, साक्षर-निरक्षर, काळा-गोरा, खुजा-उंच असा कसलाही भेदभाव न करता सर्वाना समभावनेने अंगाखांद्यावर खेळवणारे, वृक्ष हे केवळ मानवच नव्हे, तर सर्व सजीवांचे जीवनदायी तत्त्व आहेत. वृक्षांमध्ये असलेल्या या जीवदायिनी तत्वाचे महत्त्व आपल्या पूर्वजांनी जाणले होते म्हणूनच त्यांनी वृक्षांना ईश्वराचे रूप मानून धार्मिक श्रद्धांशी निगडित करून त्यांच्या संरक्षणाला आणि संवर्धनाला सबल अधिष्ठान प्राप्त करून दिले, म्हणूनच सर्व धर्मांमधील सण, उत्सव, परंपरा आदींमध्ये वृक्षाला महत्वपूर्ण स्थान दिले गेले असल्याचे दिसून येते. वृक्ष संवर्धनाची आणि पर्यावरण संवर्धनाची आपल्याला वारसा हक्काने मिळालेली संस्कृती ही किती प्राचीन आणि समृद्ध आहे हे खालील महापुरुषांच्या विचार आणि कार्यातुन स्पष्ट होते.

तथागत गौतम बुद्ध : जगामध्ये दुःख आहे, त्या दुःखाला कारण आहे आणि दुःख दूर करण्याचा मार्ग आहे हे सर्वोच्च ज्ञान म्हणजेच बोधी बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली प्राप्त झाली होती. मानवी जीवनातील ज्ञानाची सर्वोच्च उंची गाठण्यात पिंपळ वृक्षाचे महत्वपूर्ण योगदान आहे त्यामुळेच बोधीवृक्ष असा त्याचा सन्मान जगात केला जातो. बुद्धांच्या जीवनाची सुरुवात आणि अंत म्हणजेच जन्म आणि महापरिनिर्वाण हे देखील साल वृक्षाच्या सानिध्यातच घडले. ( लुम्बिनी येथे प्रवासा दरम्यान साल वृक्षाची फांदी पकडून माता महामाया प्रसूत झाल्या होत्या आणि कुशीनगर येथे दोन साल वृक्षांच्या मध्ये बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले) 
पुढे त्यांनी धम्माचा उपदेश देण्यासाठी जी पायी चारिका केली तीही वृक्षांच्या सोबतीनेच केली. वर्षावासा दरम्यान विविध वनांमध्ये जसे जेतवन, वेळूवन आदींमध्ये ते वास्तव्य करीत होते. फक्त मनुष्याप्रतिच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांबाबत करुणा बाळगली पाहिजे अशी शिकवण तथागत गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला दिली. बुद्धांची भूमिस्पर्श मुद्रा ही त्यांच्या प्रकृति विषयक विचारांचे प्रतीक ठरते.

सम्राट अशोक : सर्वोत्तम सम्राट अशी जी सम्राट अशोकाची ओळख आहे ती फक्त लोकांच्या हिताला प्राधान्य दिले म्हणून नव्हे तर आपल्या साम्राज्यातील प्रत्येक जिवाच्या हिताला प्राधान्य दिले म्हणून आहे. सम्राट अशोक हा पाहिला असा राजा आहे ज्याने मानुष्यांसाठीच नाही तर पशु पक्ष्यांसाठीही चिकित्सालये सुरू केली, त्यांच्यासाठी पाण्याची सोय केली. मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड केली, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. साम्राज्यात पशुबळी देण्यास बंदी घातली, शिकार करण्यास बंदी केली. सम्राट अशोकाच्या प्रमुख चौदा शिलालेखांमधून याबाबतची माहिती मिळते. तसेच रामपुर्वा येथील स्तंभशिलालेखात वडाची झाडे आणि आंब्यांच्या राया लावल्याचा, विहिरी खोदल्याचा, विश्रांतिगृहे (धर्मशाळा) आणि पाणपोया घातल्याचा उल्लेख असून आपल्या अशा सत्कृत्यांचे मानवजात अनुकरण करील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराज :  विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात आजीवन संघर्ष करणारे आणि आपल्या अभंगातून मानवतेची शिकवण देणारे   महान संत तुकाराम महाराज हे निसर्गाशी समरस झालेले, निसर्गाशी नाते सांगणारे संत होते. त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात राहूनच ज्ञानसाधना केली. वृक्षवेलीं पशुपक्षी यांना त्यांनी आपले सगेसोयरे मानले, कुटुंबीय मानले. त्यांच्या सहवासात परमसुख लाभते असे त्यांनी सांगितले आहे.
                    
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |
पक्षीही सुस्वरे आळवीती ||

येणे सुखे रुचे एकांताचा वास |
नाही गुणदोष अंगा येत ||

आकाश मंडप पृथिवी आसन |
रमे तेथे मन क्रीडा करी ||

कंथा कमंडलु देह उपचारा |
जाणवितो वारा अवसरु ||

हरिकथा भोजन परवडी विस्तार |
करुनि प्रकार सेवू रुचि ||

तुका म्हणे होय मनाशी संवाद |
आपुलाचि वाद आपणासी ||

संत तुकाराम महाराज यांचा पर्यावरणवादी दृष्टिकोन त्यांच्या वरील अभंगाच्या माध्यमातून स्पष्ट होतो.

छत्रपती शिवाजी महाराज : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे तत्कालीन राज्यकर्त्यांच्या राजवटीपेक्षा वेगळे असण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे महाराजांची पर्यावरण नीती. स्वराज्याच्या हिताला प्राधान्य देत असताना त्यांनी सहयाद्रीच्या समृध्द पर्यावरणालाही तितकेच महत्त्व दिले, त्याच्या सोबतीनेच त्यांनी स्वराज्याला समृद्ध केले. स्वराज्याच्या युद्ध, संरक्षण, स्थापत्य, जलव्यवस्थापन, आरमार निर्मिती, व्यापार आदींवर महाराजांच्या पर्यावरण नीतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. निसर्गाच्या क्षमतांचा इतक्या प्रभावीपणे वापर करणारा राजा इतिहासात दुसरा कोणी नसेल. त्यांनी रयतेलाही पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता. खालील पर्यावरण विषयक आज्ञापत्रावरून महाराजांची पर्यावरण नीती स्पष्ट होते.
  
"आरमारास तख्ते, सोट, डोलच्या काठ्याआदिकरून थोर लाकूड असावे लागते, ते आपले राज्यात अरण्यामध्ये सागवानादि वृक्ष आहेत.  त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लेहून (लिहून घेऊन) हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. या विरहित जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणवित जावे.  स्वराज्यातील आंबे, फणस आदिकरून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची, परंतु त्यास हात लाऊ न द्यावा. काय म्हणोन का ही झाडे वर्षा-दो वर्षानी होतात ऐसे नाही. रयतेने ही झाडे लेकरासारखी बहुतकाल जतन करून वाढविली.  ती झाडे तोडलियावरी त्यांचे दु:खास पारावार काय.  येकास दु:ख देऊन जे कार्य करीन म्हणेल, ते कार्य करणारासहित स्वल्पकाळेच बुडोन नाहीसेच होते, किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडणाचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावे हानिही होते.  याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचित् येखादे झाड, जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे न्यावे.  बलात्कार सर्वथा न करावा".

महात्मा गांधी : गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार हे काळाच्या पुढचे होते ज्यांची उपयुक्तता आजही कायम आहे. त्यांनी आपल्या हिंद स्वराज्य या पुस्तकात वाढते औद्योगिकीकरण आणि त्याचा पर्यावरणावरील परिणाम यावर भाष्य केले आहे. त्यांचे हे पुस्तक शाश्वत विकासाचे घोषणपत्र आहे. ज्यात त्यांनी आधुनिक शहरी औद्योगिकीकरणाच्या सभ्यतेच्या विनाशाची बीजे ही तीच्या उत्पत्तितच सामावली असल्याचे सांगितले होते. वायू प्रदूषणा बाबत बोलताना ते म्हणतात, उचित उपचार आणि उपाय याद्वारे वायू प्रदूषण नियंत्रित करणे हा स्थिर आणि टिकाऊ विकासासाठी आवश्यक असा पैलु होय. 
टू हेल्थ या आपल्या लेखात त्यांनी स्वच्छ हवेच्या गरजेविषयी मांडणी केली आहे. यात ते म्हणतात, शरीराला तीन प्रकारच्या प्राकृतिक पोषणाची आवश्यकता असते हवा, पाणी आणि भोजन. पण स्वछ हवा ही सर्वात जास्त आवश्यक असते. पर्यावरणाने स्वछ हवा आपल्याला मोफत उपलब्ध करून दिली पण आधुनिक सभ्यतेने त्याचीही किंमत ठरवली. स्वच्छ हवेसाठी काहींना दूर जावे लागते तर काहींना किंमत मोजावी लागते. लोकशाहीची परिभाषा सांगताना त्यांनी स्वच्छ हवा, पाणी आणि अन्न हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे असे सांगितले होते.

सुंदरलाल बहुगुणा : सत्तरच्या दशकात विकासाच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात जी जंगलतोड केली जात होती त्याला आपल्या प्राणांची पर्वा न करता विरोध करणारे महान पर्यावरणवादी म्हणजे सुंदरलाल बहुगुणा. 'चिपको आंदोलनाच्या' माध्यमातून त्यांनी देशभरात वृक्ष संवर्धनाची चळवळ उभी केली होती ज्याची दखल जगाने घेतली. चिपको आंदोलनात बहुगुणा यांचे सहकारी (महिला- पुरुष) एकत्र येऊन साखळी करून झाडांना मिठी मारून तोडण्यापासून वाचवत आधी आम्हाला मारा मग झाड तोडा असे त्यांचे ब्रीद वाक्य होते. हिमालय क्षेत्रातील जंगलांच्या संरक्षणासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. १९८१ ते १९८३ मध्ये त्यांनी पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन हिमाचल प्रदेशातील चंबाच्या लंगेरा गावापासून ५००० किलोमीटरची पदयात्रा केली. संपूर्ण जीवन त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या कार्यासाठी समर्पित केले.


वृक्ष संवर्धनाच्या संस्कृतीला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त करून देण्यात आणि ते नागरिकांमध्ये रुजविण्यात भारतीय संविधानाचा महत्वाचा वाटा आहे त्यामुळे त्याचा इथे अंतर्भाव करणे गरजेचे आहे.

भारतीय संविधान : जैवविविधतेचा समृद्ध वारसा भारताला लाभला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरण संवर्धन संघटनेने (आययूसीएन) दुर्मिळ म्हणून जाहीर केलेल्यांपैकी १७२ प्रजाती भारतातील आहेत. जैवविविधते बाबत भारताची गणना जगातील पहिल्या १७ देशात केली जाते. भारतीय संविधानाने ज्याप्रकारे विविधतेत एकता ही आपल्या देशाची ओळख जपली आहे त्याच प्रकारे जैवविविधतेच्या बाबतीतही ती ओळख जपली आहे. संविधानाच्या चौथ्या विभागात राज्य व संघ स्तरावरील सरकारे तसेच संसदा आणि विधानसभा यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. यातील कलम ‘४८-अ’ मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, ‘राज्य हे, देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील.’ अशा प्रकारे, राज्यांना त्यांच्या सीमाक्षेत्रात येणाऱ्या पर्यावरणीय संसाधनांचे रक्षण करण्यासाठी संबंधित योजना आणि नियम बनवण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, संविधानाच्या याच भागात समाविष्ट करण्यात आलेल्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या कलम ‘५१-क(छ)’ मध्ये असे स्पष्ट करण्यात आलेले आहे की ‘वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसगिर्क पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे तसेच प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.’

अतिप्राचीन अशा या वृक्ष संवर्धनाच्या संस्कृतीची ओळख नव्याने करून देणे आणि तिला अधिक व्यापक आणि सशक्त स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. या जीवसृष्टीचा एक घटक, पूर्वजांची परंपरा, धार्मिक विधी, महापुरुषांची शिकवण आणि देशाप्रतिचं कर्तव्य यापैकी जे कारण आपल्या बुद्धीस पटेल ते आत्मसात करून त्या नुसार जर प्रत्येकाने स्वतःला वृक्ष संवर्धनाच्या संस्कृतीशी जोडून घेतले तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या भयंकर परिणामांपासून पर्यावरणाला मुक्त करता येईल. आतापर्यंत पर्यावरणाची जी हानी झाली आहे ती एका पिढीकडून भरून निघण्यासारखी नाही त्यामुळे या संस्कृतीचा वारसा जपून तो येणाऱ्या पिढ्यांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विकास ही कधी न संपणारी प्रक्रिया आहे त्यामुळे आपल्या गरजांवर नियंत्रण ठेवून साध्या आणि पर्यावरणपूरक राहणीमानाचा अवलंब करीत पर्यावरण संवर्धनाला आपल्या जीवनाचा भाग बनविल्यास आपल्या वसुंधरेचे गतवैभव पुन्हा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. 

(सरकार, देश किंवा अजून इतर कोणाला दोष न देत बसता आपल्या आजूबाजूला होत असलेल्या वृक्षतोडीस विरोध करून झाडांना संरक्षण दिल्यास आणि आपापल्या परिसरात नवीन झाडे लावून त्यांचे संवर्धन केल्यासही मोठया प्रमाणात पर्यावरण संवर्धनाचे काम होऊ शकते.)








        

Saturday, May 15, 2021

कर्णन - समाजातील विषमतेचे वास्तव मांडणारा चित्रपट.




स्वातंत्र्याला सात दशके उलटून गेली तरीही विषमतेवर आधारित जातीव्यवस्था ही भारतीय समाजात ठाण मांडून आहे हे वास्तव दाखविण्याचे, जाहिरपणे त्यावरती भाष्य करण्याचे आणि त्याचा विरोध करण्याचे धाडस लोकशाहीचा चौथा खांब असलेली मीडिया आजही करण्यास धजावत नाही तेच धाडस "कर्णन" या तमिळ मेन्स्ट्रीम चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले  आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाभारत या पौराणिक कथेतील पात्रे आणि संदर्भ यांच्या आधारे पण वेगळ्या निष्कर्षांसह ही कथा मांडण्यात आली आहे. जातीच्या उतरंडीमध्ये अडकलेला, अज्ञानाच्या बंधनात आणि गुलामगिरीच्या बेड्यात अडकलेला समाज जो पुढे बरोबरीची संधी मिळाल्यावर आपल्या क्षमतांच्या आधारे उन्नतीच्या दिशेने कशी वाटचाल करतो याचे अतिशय वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटात केले गेले आहे

रस्त्याच्या मध्ये फीट येऊन पडलेली सात ते आठ वर्षाची मुलगी जिच्या आजूबाजूने अनेक बस गाड्या निघून जातात पण कोणीही तिच्या मदतीसाठी थांबत नाही आणि शेवटी पायाच्या टाचा घासून तोंडात फेस येऊन ती जीव सोडते, काळजाचा ठाव घेणाऱ्या या दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. या मुलीच्या मदतीसाठी कोणी का थांबले नाही या सामान्य प्रश्नाचं उत्तर म्हणजेच या चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटाची कथा हीच या चित्रपटाचा नायक वाटते इतकी ती शक्तिशाली आहे. 1997 मधील घटनेवर आधारित तामिळनाडू येथील कोडीयनकुलम या गावातील गरीब आणि जातीप्रथेने शोषित गावकऱ्यांनी बरोबरीचे अधिकार मिळविण्यासाठी जातिव्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची ही कथा आहे.

जातीव्यवस्थे नुसार जरी अस्पृश्य ठरविले गेले असले तरी या गावातील लोकं कष्ट करून स्वाभिमानाने, बंधुभावाने, स्वतःची संस्कृती, वेगळी ओळख जपत ताठ मानेने जगत असतात. हिच गोष्ट शेजारच्या मेलूर गाववाल्याना मान्य नसते अस्पृश्यांनी नेहमी त्यांच्या वर्चस्वाखालीच राहिले पाहिजे असे त्यांना वाटत असते म्हणूनच त्यांना कायम आपल्यावरती निर्भर ठेवण्यासाठी कोडीयनकुलम मध्ये बस स्टॉप बांधू दिला जात नाही आणि बस ही थांबू दिल्या जात नाहीत. पुढे एका सीनमध्ये जातीवादी पोलीस एसपी गावकऱ्याची नावं  दुर्योधन, अभिमन्यू अशी उच्च वर्णीय असल्याने, तसेच त्याच्यासमोर त्यांनी डोक्यावरची पगडी न काढल्याने व त्याला स्पर्श केल्यामुळे गावकऱ्यांवर अत्याचार करतो. वरवर जरी हा संघर्ष आपल्याला दोन गावातील किंवा काही लोकांमधील वाटत असला तरी तसे अजिबात नाही. हा संघर्ष अनेक पिढ्यांचा आहे. स्वातंत्र्यानंतरही संवैधानिक पदांवर बसून जातीयतेच्या मुखवट्या आडून गरीब दुर्बल लोकांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांविरुद्धचा हा संघर्ष आहे. जो आपण आजही वृत्तपत्रे, न्युज चॅनेल यांच्या माध्यमातून रोज पाहतो.

दिग्दर्शक मारी सेल्वराज यांनी कथा ज्या पद्धतीने पडद्यावर उतरवली आहे आणि प्रत्येक पात्राला कथेच्या माध्यमातून जो न्याय दिला आहे त्याला तोड नाही. कर्णन, द्रौपदी, दुर्योधन, अभिमन्यू आणि इतर पात्रांच्या आधारे महाभारताला समांतर अशी जी कथा उभी करतात ती उलट असूनही आपल्याला बरोबर वाटते. सिनेमॅटोग्राफी हे एक या चित्रपटाचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते. ग्रामीण भागातील प्रतीकं, चित्रपटातील प्राण्यांचा वावर, मुखवट्याचे रूपक यांच्या आधारे कथानकाचे बारकावे मांडण्याचा जो विचारपूर्वक प्रयत्न केला गेला आहे तो अतिशय प्रशंसनीय असा आहे. पुढचे दोन पाय बांधलेले गाढव, कोंबडीच्या पिलाला उचलून नेणारी घार, जेवणाच्या ताटाभोवती फिरणारे मांजर, मुखवटा घातलेली लहान मुलगी, धड नसलेली देवता, धड नसलेले भिंतीवरील चित्र यांची प्रासंगिकता आपल्या स्मरणात राहते. आपण चित्रपट नाही तर त्या गावातील वास्तविक जीवनच पडद्यावर पाहत आहोत असेच आपल्याला वाटत राहते.

अभिनयाच्या बाबतीत प्रत्येक कलाकाराकडून आपापले पात्र हे सशक्त पद्धतीने उभे केले गेले आहे त्यामुळे छोट्या भूमिका असलेली पात्रही लक्षात राहतात. धनुषने कर्णनची व्यक्तिरेखा इतक्या वास्तविकपणे आत्मसात केली आहे की पडद्यावर आपल्याला फक्त कर्णन दिसतो धनुष्य कुठेही दिसत नाही. जराही फिल्मी नसलेला सामाजिक आणि वैयक्तिक बाबींमुळे रागात असणारा, आपल्या लोकांवरील अन्यायाविरुद्ध लढण्यास तत्पर असणारा नायक धनुषने अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. अभिनेता लाल यांनी साकारलेला कर्णनचा मार्गदर्शक, सुख दुःखातील सोबती येमन आणि नटराजन यांनी साकारलेला उच्च वर्णीय जातीयवादी पोलीस एसपी या भूमिकाही अतिशय दमदार झाल्या आहेत. प्रसंगानुसार वेगवेगळी पात्रे हिरो ठरत असल्याचे आपल्याला दिसून येते.

चित्रपट आणि वास्तव यातील अंतर विसरण्यास भाग पाडणारा कर्णन हा तामिळ चित्रपट पाहून याबाबत लिहण्या पासून व्यक्त होण्यापासून स्वतःला रोखता आलं नाही. हा चित्रपट पाहताना आपणही या वास्तवाचाच भाग आहोत हा विचार मनात घर करून जातो. हा चित्रपट पाहताना मराठीतील फँड्री आणि ख्वाडा या चित्रपटांची आठवण होते. या चित्रपटाबाबत मी जे विचार मांडले आहेत त्याच्याशी प्रत्येकजण सहमत होतीलच असे नाही पण सामाजिक प्रश्नावरती वेगळेपणाने भाष्य करणारी ही कलाकृती आहे याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही हे निश्चित.