Translate

Friday, June 4, 2021

जगातला पहिला पर्यावरणवादी सम्राट


जग जिंकण्याची आकांक्षा करणारे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे सम्राट हे जगाच्या इतिहासात अनेक होऊन गेलेत पण आपल्या साम्राज्यातील प्रत्येक जीवाच्या हितसुखसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे सम्राट हे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच झालेत ज्यात सम्राट अशोकाचे नाव हे सर्वोच्चस्थानी आहे. त्यांच्या विचारांमधील आणि कर्तुत्वातील वेगळेपण यासाठी कारणीभूत ठरते. आज विसाव्या शतकात स्वतःचे अस्तित्व धोक्यात आल्यानंतर पर्यावरण संरक्षण, संवर्धन या गोष्टींबाबत लोकं गांभीर्याने विचार करीत आहेत पण आजपासून दोन हजार वर्षांपूर्वी याबाबत सम्राट अशोक यांनी विचारपूर्वक कृती केल्याचे आपल्याला दिसून येते.

आपल्या साम्राज्यातील फक्त प्रजेचाच नव्हे तर प्राणी मात्रांचा सुध्दा त्यांनी पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केला. मनुष्यांच्या बरोबरीनेच त्यांनी पशु पक्ष्यांसाठीही चिकित्सालये म्हणजेच दवाखाने सुरू केले, पाणवठे उभे केले असे करणारे ते जगातले पाहिले सम्राट होते. यासोबतच त्यांनी आपल्या साम्राज्यात पशुबळी देण्यास व शिकार करण्यास बंदी घातली होती. जंगलांचे संवर्धन करून जैवविविधता जपण्यास प्राधान्य दिले. मोठ्या प्रमाणात औषधी, फळांची व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड केली. बुद्ध धम्माच्या प्रसाराच्या माध्यमातून बोधी वृक्षाची म्हणजेच पिंपळ वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. प्रजेलाही याबाबत आपले अनुकरण करण्यासाठी उपदेश केला आणि लेखी आदेश दिले. ज्याचे लिखित पुरावे आपल्याला शिलालेख, स्तंभलेख, लघुलेख यांच्या माध्यमातून आजही बघायला मिळतात. (एका वृक्षाच्या प्रजातीला सम्राट अशोक यांचे नाव आहे जी संपूर्ण भारतात आढळते)

सम्राट अशोक यांचे संपूर्ण कार्य व विचार हे आपल्याला त्यांच्या प्रमुख चौदा शिलालेखांच्या माध्यमातून समजून घेता येते. त्यापैकी गिरनार गुजरात येथील द्वितीय शिलालेख त्यांची पर्यावरण विषयक नीती स्पष्ट करतो ज्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.

   
   
                 
         (गिरनार द्वितीय शिलालेखाचे लिप्यांतर आणि भाषांतर)

भाषांतर - देवांचा प्रिय प्रियदर्शि राजा त्याच्या राज्यात सर्वत्र आणि सीमेजवळच्या राज्यात चोल पांड्या सत्यपुत्र, केरलपुत्र, ताम्रपर्णी यवन राजा अंतियोक आणि अंतियोक याच्या जवळच्या राज्यात सर्वत्र देवांचा प्रिय प्रियदर्शि राजा याने दोन चिकित्सालयाची स्थापणा केली. मनुष्य चिकित्सालय आणि पशु चिकित्सालय. मनुष्याच्या उपयोगी आणि पशूंच्या उपयोगी औषधे जेथे जेथे नाहीत तिथे सर्वत्र आणून त्याची लागवड केली आहे. वाटसरू साठी विहरी निर्माण केल्या आहेत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वृक्ष लावले आहेत.

मागच्या काही शतकात विकासाच्या, आधुनिकीकरणाच्या कारणास्तव आपल्याकडून पर्यावरणाचा अगणित ऱ्हास झालेला आहे ज्याची भरपाई करणे केवळ अशक्य आहे. कधीही न संपणाऱ्या आपल्या आकांक्षांच्या मागे धावताना आपण आपल्या अस्तित्वावरच कुऱ्हाडीचे घाव घालतोय याचेही भान आपल्याला आता उरले नाही. आपला मूळ वारसा हा विध्वंसाचा नसून सृजनशीलतेचा आहे हे ही आपण विसरत चाललो आहोत. हे जर असच सुरू राहीले तर आपला विनाश हा अटळ आहे. त्यासाठी पर्यावरणाच्या विरोधात जाणारा मार्ग सोडून पर्यावरणाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करणारा मार्ग निवडण्याची वेळ आली आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. सम्राट अशोक यांचा पर्यावरण संवर्धनाचा वारसा हा आपल्याला पर्यावरणाशी जोडणारा आहे त्यामुळे तो फक्त दगडावर कोरलेल्या शिलालेखापुरता मर्यादित न ठेवता तो काळजात कोरून घेऊन प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून जपला  पाहिजे.


(वरील शिलालेखाचे लिप्यांतर व भाषांतर हे धम्मसिरी इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या माध्यमातून मला करता आले. या संस्थेमार्फत माझे धम्मलिपीचे शिक्षण सध्या सुरू आहे)