जुना मुंबई पुणे महामार्गावर देहूरोडच्या पुढे डाव्या बाजूला शेलारवाडी येथे जी डोंगररांग पसरलेली आहे त्यामध्येच काळ्या कातळात कोरलेल्या ऐतिहासिक बुद्ध लेण्या आहेत ज्या सध्या घोराडेश्वर शिवमंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रचलित केल्या जात आहेत. विशेष म्हणजे पुरातत्व विभाग पुणे येथील दफ्तरात याची प्राचीन बुद्ध लेणी म्हणून नोंद आहे तरी येथे सुरू असलेल्या अतिक्रमणावर निर्बंध घातले जात नाहीत.
शेलारवाडी हे पायथ्याचे गाव असल्याने त्याच नावाने ही लेणी ओळखली जाते. भाजे, बेडसे, कार्ला या लेण्यांप्रमाणे ही लेणी देखील हीनयान पंथातील आहे (त्याकाळात बुद्धांची मूर्ती प्रचलित नव्हती त्यामुळे चैत्यगृहातील स्तूपाला बुद्धांचे प्रतीक मानून प्रार्थना केली जात असे) इसवीसनपूर्व पहिल्या ते इसवीसना नंतरच्या पहिल्या शतकात या लेण्या खोदल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील इतर लेण्यांप्रमाणे विहार म्हणजे राहण्याच्या खोल्या, चैत्यगृह म्हणजे प्रार्थनेची खोली ज्यामध्ये स्तूपाचा समावेश असतो आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे टाके अशा स्वरूपात हादेखील लेणी समूह आहे. या लेण्यांमध्ये कोणता भिक्खूसंघ वास्तव्य करीत होता तसेच या लेण्यांचे धम्मदान कोणी दिले ते कुठे राहत होते आणि काय व्यवसाय करत होते याची माहिती देणारे धम्मलिपी मधील दोन शिलालेख सुद्धा येथे कोरलेले आहेत. चैत्यगृहात स्तूपाच्या जागेच्या बाजूला म्हणजेच आता जिथे शिवलिंग आहे त्याच्या डाव्या बाजूच्या वरील भिंतीमध्ये एक आणि चैत्यगृहाच्या बाहेरील बाजूच्या भिंतीवर एक असे प्राकृत भाषेतील धम्मलिपी (ब्राह्मीलिपी) मधील दोन शिलालेख उपलब्ध आहेत. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
शिलालेख क्रमांक एक मध्ये धम्माल अनुसरून भदंत सिंहान यांची शिष्या परिव्राजक घप्रा हिने चैत्यगृहाचे(चेतीयघरो) आणि आचार्य यांच्या स्मरणार्थ चैत्यगृहातील खोल्यांचे धम्मदान दिल्याचा आणि त्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे.
शिलालेख क्रमांक २
भाषांतर - धम्माला अनुसरून धेनुकाकटे म्हणजे सध्याचे डहाणू बंदर येथे वास्तव्यास असलेला शेतकरी कुणबी ऋषभनाक आणि त्याची पत्नी सिवगुप्तनिका यांनी त्यांचा पुत्र गृहपती (गावाचा किंवा शेतकऱ्यांचा प्रमुख) याच्यासह लेण्यांचे धम्मदान दिले आहे.
येथील चैत्यगृहात चैत्यस्तुपाच्या ठिकाणी सध्या शिवलिंग ठेवले आहे शिवलिंगाच्या वरील बाजूस छताला लागून स्तुपाच्या हार्मिकेची दगडात कोरलेली चौकट दिसून येते तसेच शिवलिंगाच्या सभोवताली स्तुपाचा गोलाकार पाया ही दिसून येतो. येथे जो स्तूप होता अगदी तसाच म्हणजे छताला लागून असलेल्या हार्मिकेच्या बनावटीचा स्तूप कुडा, गांधारपाले आणि कान्हेरी या लेण्यांमध्ये दिसून येतो. या चैत्यगृहाच्या वरील बाजूस आणखी एक विहार आहे त्यावरही अतिक्रमण करून विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. एकूण सात ते आठ लेण्यांचा येथे समूह आहे.