Translate

Wednesday, November 3, 2021

जयभिम - बहिष्कृत समाजाचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट



भारतीय समाजात लहानातल्या लहान किटकापासून ते मोठ्यातल्या मोठ्या प्राण्यांबद्दल भूतदया दाखवली जाते पण याच समाजात माणसा सारखे माणूस असूनही ज्यांचं अस्तित्व जातीयतेच्या आधारे नाकारलं जातं, मुख्य प्रवाहापासून आजही जे कोसो दूर आहेत, सरकार दरबारी ज्यांची अजूनही नोंद नाही, ज्यांना आजही दैनंदिन जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या जाती जमातीचे आणि त्यांच्या समस्यांचे प्रतिनिधित्व करतो जय भिम. 

पोलीस अधिकाऱ्याकडून फक्त जातीच्या आधारे जेलमधू  बाहेर पडलेल्या निर्दोष आदिवासी लोकांना गुन्हेगार ठरविण्याच्या आणि इतर उच्चवर्णीय जातीतील लोकांना सोडून देण्याच्या दृश्याने या चित्रपटाची सुरुवात होते. 
१९९५ मध्ये तामिळनाडू राज्यात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. समाजाने अनिष्ट ठरविलेली कामे करत बहिष्कृतांचं जीवन जगणाऱ्या  ईरुल अदिवासी जमातीतील प्रमाणिक कुटुंब प्रमुख तरुणाची आणि त्याला न्याय मिळावा म्हणून व्यवस्थेशी संघर्ष करणाऱ्या गरोदर पत्नीची ही कथा आहे. प्रस्थापितांकडून जातीयतेच्या समर्थनार्थ  एकत्रित येऊन या जाती जमातींवर कशाप्रकारे अमानवीय आणि अमानुष अत्याचार केला जातो याचे अतिशय वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटात केले आहे. त्याचबरोबर या लोकांच्या जगण्यातील मागासलेपण म्हणजे दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव इत्यादी गोष्टी आणि नव्वदच्या दशकातील काळ अगदी अचूकपणे दाखविला आहे. हायकोर्टातील खटल्याचे चित्रण जराही फिल्मी पध्दतीने केले नसल्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपटातुन पाहिलेल्या कोर्ट सीनपेक्षा वेगळे भासते.

जातिभेद यांसारख्या विषयांवर सार्वजनिकरित्या चर्चा करण्यासाठी जिथे लोकं तयार होत नाहीत तो विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचे धाडस डायरेक्टर टी एस गणानवेल यांनी केले ही खूप उल्लेखनीय बाब आहे. अशा धाटणीचा चित्रपट आणि ज्याची कथा हिच त्याचा हिरो आहे  ती सूर्या सारख्या सुपरस्टार अभिनेत्याने स्वीकारणं हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. कार्ल मार्क्स-आंबेडकर-पेरियार यांच्या विचारांनी प्रभावित जस्टीस चंद्रु यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अभिनेता सूर्याने अतिशय प्रभावीपणे साकारले आहे. अन्यायाविरुद्ध लढणारा, समतेची मांडणी करणारा आणि पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारा वकिल सूर्याच्या रूपाने बघताना आपण भारावून जातो.
मनिकंदन आणि लिजो जोस यांनी पीडित आदिवासी जोडप्याचे साकारलेली पात्रे ही मनाचा ठाव घेणारी आहेत. एकूणच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमची मेहनत ही विशेष कौतुकास्पद आहे.

अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा म्हणजे जयभिम, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे जयभिम, आणि क्रांतीचे प्रतीक म्हणजे जयभिम हा अर्थ या चित्रपटाने खऱ्या अर्थाने अधोरेखित केला आहे.

समाजाला आरसा दाखविणारा हा चित्रपट प्रत्येकाने बघितला पाहिजे.




(२ नोव्हेंबर २०२१ रोजी आमेझॉन प्राईम वरती हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि हिंदी ऑडिओ मध्ये तो उपलब्ध आहे)