Translate

Wednesday, January 26, 2022

भारतीय प्रजासत्ताक दिन - लोकशाहीचा स्थापना दिवस


          Image source - allindiaroundup.com


ऐतिहासिक महत्त्व- 
आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतुन १५ ऑगस्ट १९४७ रोजी मुक्त झाला. पण लगेच त्या दिवसापासून राज्यकारभार आपल्या देशाच्या हाथी नाही आला. स्वातंत्र्यानंतर ही ब्रिटीश कायद्यानुसारच आपला राज्यकारभार सुरू होता म्हणजेच स्वातंत्र्य जरी मिळाले असले तरी आपले राष्ट्र हे सार्वभौम नव्हते, भारतीय कायदा अस्तित्वात नव्हता. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना केली गेली होती. एकूण ३०८ सदस्य या घटना समितीत होते. २४ जानेवारी १९५० रोजी मसुदा समितीचे काम सर्वांगाने पूर्ण झाले. इंग्रजी, हिंदी या दोन भाषेतील हस्तलिखित प्रतिवर सर्व सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २६ जानेवारी १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार प्रजेच्या हाती देण्यात आला म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

प्रजासत्ताक दिन म्हणजे ज्या दिवशी प्रजेच्या हाती सत्ता आली तो दिवस. आधी राजा राणीच्या पोटातून जन्माला येत होता पण संविधान लागू झाल्यानंतर तो मतदाराच्या पेटीतून निर्माण होऊ लागला. एक व्यक्ती एक मत यानुसार प्रत्येक  भारतीयाला राज्यकर्ता निवडीचे समान अधिकार मिळाले. भारतीय कायद्यानुसार देशाची वाटचाल सुरू झाली. लोकशाही राष्ट्र  म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.

राष्ट्रीयत्वाची भावना -
संविधानाच्या स्वीकृती मुळे खंडांमध्ये विभाजित असलेल्या प्रदेशाला एकसंध राष्ट्र ही ओळख मिळाली. नागरिकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्यास सुरुवात झाली. विविध धर्म, जाती, भाषा, वंश, परंपरा यामध्ये विभागला गेलेला आपला देश एकत्रित जोडला गेला. 

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन फरक -
आज देशाला स्वातंत्र्य मिळवून सात दशके उलटून गेली तरी अनेकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातला फरक समजलेला नाही. स्वातंत्र्य दिनाला देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. ध्वजाला खालून वर नेले जाते आणि फडकविले जाते. ब्रिटिशांचा जॅक युनियन खाली उतरून  तिरंगा फडकविला होता. याला ध्वजारोहण म्हणतात. राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असतात त्यामुळे प्रजासत्ताकदिनी देशाच्या राष्ट्रपतींकडून राजपथावर झेंडावंदन केले जाते. म्हणजेच वरती बांधलेल्या ध्वजाला फडकविले जाते. २६ जानेवारीला लष्कर, निमलष्करी दल आणि पोलीस दलाची परेड होते. सर्व राज्यांचे चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. लष्कर, वायूदल आणि नौदल आपल्या शक्ती आणि संस्कृतीचं प्रदर्शन करतात. प्रजासत्ताक दिनाला दुसऱ्या देशांचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जातात. स्वातंत्र्य दिनाला सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत.

प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय -
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान हे मानवी मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य  देणारे जगातील एकमेव असे संविधान आहे. संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला ज्ञान मिळविण्याचे, आपापल्या धर्माची उपासना करण्याचे, व्यवसाय निवडण्याचे, स्वतंत्र विचार मांडण्याचे अधिकार प्राप्त झाले. सर्व स्तरातील व्यक्तींना समान संधी मिळू लागल्याने देश एक एक क्षेत्रात प्रगतिपथावर अग्रेसर होत आहे. परंतु अजूनही आपल्या देशाचा सर्वांगीण विकास झालेला आहे असे म्हणता येत नाही. त्यासाठी सर्वांनी धार्मिक, भाषिक, प्रांतिय आणि वांशिक मतभेद विसरून भारतीय म्हणून एक होऊन एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन दिवसांसाठी बेगडी राष्ट्रप्रेम न दाखवता वर्षाचे सर्वच दिवस देशाला सर्वोच्च प्राधान्य देणारी कृती केली पाहिजे. धार्मिक उत्सव ज्या पद्धतीने साजरे केले जातात त्यापेक्षा अधिक उत्साहात राष्ट्रीय सण साजरे केले पाहिजेत जेणेकरून राष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ होऊन देशाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

Wednesday, January 12, 2022

स्वामी विवेकानंद - विवेकावर आधारित विचारसरणी असणारे विचारवंत

                                         
 Image source - ramkrishna mission Indore


स्वामी विवेकानंद यांची भगवा परिधान केलेला संन्यासी, अध्यात्मिक पुरुष, धर्मप्रसारक अशा प्रकारची एकांगी ओळख समाजात प्रचलित केली गेली आहे पण त्यांच्या साहित्याचा (भाषणे, पुस्तके, पत्रे ई.) आधार घेऊन पाहिले असता ही ओळख त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देणारी नाही हे सहज लक्षात येते. विवेकावर आधारित विचार करणारे विचारवंत, बुद्धिप्रामाण्यवादी, समाजवादी, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवता हाच सर्वोच्च धर्म मानणारे स्वामी विवेकानंद समजून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत.

देशाच्या मुक्तीचा मार्ग
शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील भाषणानंतर स्वामी विवेकानंद हे जागतिक स्तरावर पोहचले. त्याआधी तीन वर्षे त्यांनी संपूर्ण भारत भ्रमंती करून देशातल्या समस्या जाणून घेतल्या होत्या. देशातील सर्व धर्माचे आणि विविधतेचे आकलन त्यांना होते. देशाच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू होती ज्याची माहिती पुढील पत्रावरून मिळते. सर्वधर्म परिषदेनंतर केवळ एका वर्षात आपला शिष्य अळसिंग पेरूमल यास पत्र पाठवून त्यांनी कळवलं, मी साधू नाही संत नाही. मी गरीब आहे मला गरिबांच्या बद्दल प्रेम वाटतं. दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांच्या गाळात रुतून बसलेल्या वीस कोटी भारतीयांच्या मुक्तीचा मार्ग मी शधतोय. देशाला झालेला रोग आणि त्याचं औषध मला समजलेलं आहे.

मानवतेला सर्वोतोपरी मानले 
माणसाला माणसाचं दुःख दिसत नाही, अनुभवता येत नाही. त्याला माणूस का म्हणावं? असा प्रश्न ते विचारत. २० जून १८९४ रोजी हरिदास बिहारीलाल देसाई यांना लिहलेल्या पत्रात ते म्हणतात, हे माझे अभागी भाऊ खेड्यात, झोपडीत राहतात आणि हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या तिन्ही राजवटीत ते भयानकपणे चिरडले गेले आहेत. त्यामुळे आपण माणूस आहोत हेच ते विसरून गेलेत. त्यांना त्यांच्या मनुष्यत्वाची जाणीव करून देण्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. १ नोव्हेंबर १८९६ च्या मेरी हेल यांना लिहलेल्या पत्रात ते लिहितात, प्रिय मेरी मी समाजवादी आहे. १० जून १८९८ च्या पत्रात ते सांगतात, जिथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबल नाही अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचं आहे आणि हे काम आपणाला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावं लागेल. 

वेगळा शैक्षणिक दृष्टिकोन
आपल्या गरीब देशवासियांना अज्ञानाच्या अंधारातून मुक्त करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहचविणे हे किती महत्वाचे आहे ते त्यांनी ओळखले होते. कोणताही भेदभाव न करता सर्वांना शिक्षण दिले पाहिजे असे त्यांचे मत होते. त्याकाळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना शिक्षण देण्याबाबत ते म्हणतात, आपण त्यांना अनेक शतके शिक्षण दिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला एक शिक्षक लागत असेल तर त्यांना सात शिक्षक लागतील. त्यांच्यासाठी सातपट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय आपल्याला करावी लागेल. त्यांना कशाप्रकारचे शिक्षण अपेक्षित होते हे सांगताना ते म्हणतात, मला प्रत्येक खेड्यात दोन संन्यासी ठेवायचेत ते संध्याकाळी चावडीवर एकत्र जमलेल्या लोकांना धर्मग्रंथ समजावून देतील पण त्यांच्याबरोबर पृथ्वीचा गोल असेल. भूगोलाच्या मदतीने ते इतिहास सांगतील. त्यांच्याकडे लोहचुंबक व रसायने असतील. प्रकाशचित्रे असतील. ते त्यांना विज्ञान समजावून देतील.

चमत्कार, रहस्य, अंधश्रद्धा  नाकारल्या
धर्मवेड हा मानवी मनाला होणारा भयावह रोग आहे. मी सेंट पॉल प्रमाणे धर्माचे वेड पांघरलेला एक विचारवंत आहे असे ते सांगत. चमत्कार हे सत्य प्राप्तीच्या मार्गतले सर्वात मोठे अडथळे आहेत असे त्यांचे मत होते. विवेकानंदांनी फॅसिडोना येथे अमेरिकन स्त्रीयांच्या सभेत जे भाषण केले. त्यात ते म्हणतात, आकाशात फिरणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणाऱ्या माणसाच्या कर्तृत्वावर परिणाम करतात यासारखा मानवी मनाला होणार दुसरा भयावह रोग नाही. ३० नोव्हेंबर १८९४ ला त्यांनी सिंगवहा वेलमुलियाला पत्र पाठवलं त्यात ते लिहितात, तू रामकृष्ण यांच्यावर चरित्र लिहतोस ही फार चांगली गोष्ट आहे पण आपल्या मनातले चमत्कार त्यांच्या नावावर खपवू नकोस. रामकृष्णांचा जन्म काही चमत्कार करण्यासाठी झालेला नव्हता. विवेकानंदांनी भविष्य आणि चमत्कार नाकारला. हातावरच्या रेषा पाहण्यापेक्षा आपल्या मनगटातील सामर्थ्य पाहायला हा देश कधी शकेल? असे ते म्हणत. 

धर्मविषयक विचार
धर्मातली मूलतत्त्वे समजून घेणं महत्वाचे आहे असे ते मानत. "धर्म : उद्देश आणि त्याच्या कार्यपद्धती" या निबंधात विवेकानंद लिहितात, अरे एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे किंवा फार मोठा साधू सांगतोय पण ती तुमच्या बुद्धीला पटत नसेल तर ती तुम्ही स्वीकारू नका. कारण परमेश्वराने माणसाला दिलेली सर्वात मोठी देणगी ही विचार करण्याची शक्ती आहे. ती वापरून तुम्ही धर्माज्ञा नाकारलीत तर तुम्ही माणूस आहात म्हणून परमेश्वराला आनंद होईल. तुमची विचारशक्ती न वापरता स्वीकाराल तर तुम्ही पशु आहात असे परमेश्वर म्हणेल. १८९५ मध्ये मित्र राखालला (ब्रह्मानंद) लिहलेल्या पत्रात ते म्हणतात, सहा वर्षाच्या मुलीचा चाळीस वर्षांच्या घोडनवऱ्याशी विवाह होतोय. या विवाहासाठी आई वडिलांना आनंद होतोय आणि त्याला मी विरोध केला तर तुम्ही आमचा धर्म बुडवताय  असं म्हणता.  मुलगी वयात येण्यापूर्वी तीला आई बनवायला निघालेल्या समाजाला कसला आलाय धर्म? 
१९ नोव्हेंबर १८९४ रोजी लिहलेल्या पत्रात ते सांगतात, माणसाला जिवंत रहायला केवळ हवा, पाणी, अन्न पुरेसं नाही. माणसाला जिवंत रहायला स्वातंत्र्य लागतं पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ विचारस्वातंत्र्य आणि उच्चार स्वातंत्र्य नव्हे, तर जोपर्यंत इतरांचं नुकसान होत नाही तोपर्यंत माणसाने काय खावं कोणते कपडे घालावेत आणि कोणाशी विवाह करावा हा व्यक्तीचा संबंध आहे समाजाचा नाही.

स्वामी विवेकानंद हे काळाच्या पुढे पाहणारे महापुरुष होते. त्यांचे विचार त्याकाळातील प्रचलित विचारसरणीला अनुसरून नव्हते त्यामुळे त्यांची विचारसरणी त्याकाळात समाजाला नीटशी समजलेली नाही आणि आजही परस्थितीत फार बदल झालेला नाही. त्यांचे विचार समजून न घेता आपले स्वार्थी धार्मिक हित साधण्यासाठी आज त्यांच्या नावाचा सर्रास वापर केला जात आहे. धर्माला नव्हे तर देशाला वैचारिक दृष्टीने  समृद्ध  बनविणारे त्यांचे विचार आहेत. युवकांपर्यत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत जर ते योग्य पद्धतीने पोहचविले तर आपल्या देशाचा सर्वांगीण विकास म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचा विकास होण्यास नक्कीच मोलाची मदत होईल.

संदर्भ - "शोध : स्वामी विवेकानंदांचा" , डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर.
(मराठीत 'विवेकानंद ग्रंथावली' या नावाने एकूण दहा व्हॉल्युम्स मध्ये स्वामी विवेकानंद यांचे सर्व साहित्य प्रकाशित केले गेले आहे)







Saturday, January 8, 2022

फातिमा शेख - पहिल्या भारतीय मुस्लिम शिक्षिका

      

 ९/१/२०२२ रोजी फातिमा शेख यांच्या जन्मदिनी गुगलने डुडलच्या स्वरूपात त्यांचा सन्मान केला आहे.
साभार - गुगल इमेज.


महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या जुलुमी गुलामगिरीतून स्त्रियांची मुक्तता करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला हा इतिहास सर्वांना ठाउक आहेच पण या कार्यात त्यांना सर्वतोपरी सहकार्य करून आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांची ओळख ही आजही पडद्याआडच आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अशाच एका सहकाऱ्याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत ज्यांचं नाव आहे 'फातिमा शेख'.

पुणे या शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या शहराशी ज्यांचा ज्यांचा संबंध आला आहे त्यांनी 'फातिमा नगर' हे नाव नक्कीच ऐकले असेल पण ते स्त्री शिक्षण पुरस्कर्त्या, स्त्रीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या, शिक्षणाचा प्रसार समाजातील सर्व स्तरात पोहचविण्यासाठी झटणाऱ्या समाजसुधारक फातिमा शेख यांच्या नावावावरून दिल्याचे अनेकांना आजही माहिती नसेल. देशातील पहिली मुलींची शाळा जी पुण्यात सुरू करण्यात आली होती, त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या साहशिक्षिका म्हणून फातिमा शेख यांनी काम केले होते. महात्मा फुले यांनी आधुनिक विचारसरणीवर आधारित स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांचा सहभाग होता. स्त्रीयांना मानवी हक्क मिळवून देण्याच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सावित्रीबाई फुलेंना ज्याप्रकारचा त्रास धर्ममार्तंडांकडून देण्यात आला तशाच प्रकारचा त्रास फातिमा शेख यांनाही त्याकाळात झाला असणार पण त्यांनीही आपले कार्य सुरूच ठेवले आणि शेवटपर्यंत सावित्रीबाई फुले यांची साथ दिली.

सनातन्यांनी समाज बहिष्कृत करण्याची धमकी दिल्यानंतरही महात्मा फुले यांनी स्त्रीया आणि अस्पृश्यांच्या उद्धाराचे आपले कार्य सुरूच ठेवल्याने त्यांच्या वडीलांनी त्यांना घराबाहेर काढले. तेव्हा उस्मान शेख या महात्मा फुले यांच्या सहकाऱ्या त्यांना राहायला जागा दिली. फातिमा शेख या उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या. शैक्षणिक संस्था ज्या महात्मा फुलेंनी सुरू केल्या त्यामध्ये उस्मान शेख यांनी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख महात्मा फुले समग्र वाङमय मध्ये मिळतो. 

सावित्रीबाई फुले यांचा फातिमा शेख या आपल्या सहशिक्षिकेवर असलेला विश्वास त्यांनी महात्मा फुले यांना १०/१०/१८५६ रोजी लिहलेल्या पत्रावरून दिसून येतो. तोपर्यंत या दाम्पत्याने महिलांसाठी, अस्पृश्यांसाठी पुण्यात अनेक शाळा उभ्या केल्या होत्या. या पत्रात आपल्या तब्येतेची खुशाली कळविताना सावित्रीबाई फुले म्हणतात,  "काळजीत असू नये. फातीमास त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही". या उल्लेखावरून फातिमा शेख यांची शैक्षणिक कार्यातील ओढ आणि सावित्रीबाई यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास  स्पष्ट होतो. याचबरोबर सावित्रीबाई यांच्या अनुपस्थितीत शाळेची सर्व जबाबदारी घेण्यास फातिमा शेख या सक्षम होत्या, एक सहशिक्षिका सहकारी म्हणून त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या त्या चोखपणे बजावत होत्या हे ही स्पष्ट होते. 

फातिमा शेख यांच्याबद्दल माहिती देणारी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांचा आपल्या विद्यार्थ्यांसमवेत असलेले अस्सल छायाचित्र हे सावित्रीबाई फुले समग्र वाङमय मध्ये उपलब्ध आहे.

       चित्र सौजन्य - डॉ.मा.गो.माळी लिखित सावित्रीबाई फुले समग्र                                    वाङमय 

फातिमा शेख यांचे संपुर्ण चरित्र सर्वांसमोर आणण्यासाठी  अभ्यासपूर्ण शोधकार्य होणे गरजेचे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचार व कर्तुत्वाला मनःपूर्वक अभिवादन. 


(गुगलने फातिमा शेख यांची दिलेली जन्मतारीख ही अधिकृत नाही तसे दस्तऐवज अजून तर उपलब्ध नाहीत)








Sunday, January 2, 2022

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले - एक विचारधारा



१८४८ च्या आधीही विद्येची देवता सरस्वती असल्याचे मानले जात होते  तरीही स्त्रियांना विद्या घेण्याची अनुमती नव्हती. त्यांचे आयुष्य चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होते. धर्माच्या नावाखाली त्यांचे माणूसपण नाकारून गुलामासारखी वागणूक दिली जात होती. घरातून बाहेर पडण्याची, शिक्षण घेण्याची, आपले स्वतंत्र विचार मांडण्याची, जीवनपद्धती निवडण्याची असे कोणतेही अधिकार त्यांना नव्हते. अशा  परिस्थितीत स्त्रियांची मदत करायला कोणी देवता नाही तर एक स्त्रीच पुढे सरसावली आणि त्या म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले.

समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी स्त्रियांनी ज्ञान मिळविणे हे अत्यंत गरजेचे आहे असे महात्मा फुले यांचे मत होते त्यामुळेच त्यांनी त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून सावित्रीबाईंना शिक्षित करून केली. सावित्रीबाई यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे महात्मा फुले यांच्याकडून मिळाले पुढील शिक्षण त्यांनी सखाराम परांजपे आणि केशव भावळकर या महात्मा फुले यांच्या सहकाऱ्यांकडून घेतले. सावित्रीबाईंनी अहमदनगर येथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कुलमध्ये अध्यापनाचे  प्रशिक्षण ही घेतलं अशी नोंद तत्कालीन दस्ताऐवजामध्ये आपल्याला पहायला मिळते.

धर्म, रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा याच्या गाळात रुतून बसलेलं स्त्रीमुक्तीचं चक्र हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नांतून आणि अविरत परिश्रमातून गतिमान झाले आहे म्हणूनच त्यांना भारतीय स्त्री उद्धाराचे जनक म्हंटले जाते. फुले दाम्पत्याने १ जानेवारी १८४८ मध्ये पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि सावित्रीबाई फुले या आपल्या देशाच्या पहिल्या शिक्षिका झाल्या. असे असले तरीही सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिमत्त्वची ओळख ही फक्त स्त्रियांच्या शिक्षण क्षेत्रापुरती मर्यादित स्वरूपाचे नसून ती आधुनिक भारताच्या जडणघडणीतील परिपूर्ण अशी एक विचारधारा आहे. त्यांच्या याच विचारधारेच्या विविध पैलूंची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

शिक्षणतज्ञ - फक्त साक्षर करणे हा शिक्षण देण्यामागचा त्यांचा हेतू नव्हता तर ज्ञान मिळवून प्रत्येकाने सर्वांगीण विकास साधावा यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. शाळा कशी असावी, अभ्यासक्रम कसा असावा, मुलींचं शिक्षणाचं प्रमाण कसं वाढवलं पाहिजे, मुलांची गळती कशी थांबवावी, शिक्षकांना प्रशिक्षण देणे याबाबत जे त्यांचे विचार आहेत त्यावरून त्या फक्त शिक्षिका नाही तर शिक्षणतज्ञ होत्या हे स्पष्ट होते. कौशल्यावर आधारित शिक्षण, मध्यान्ह जेवण, वसतिगृह, शिष्यवृत्ती, प्रौढशिक्षण या ज्या गोष्टी सध्या शासनाकडून राबविण्यात येतात त्या त्यांनी त्यावेळेस त्यांच्या शाळेत अंमलात आणल्या होत्या. १८४८ ते १८५२ पर्यंत महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी एकूण १८ शाळा सुरू केल्या. त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दफ्तरात झाली तेव्हा १२ फेब्रुवारी १८५२ मध्ये मेजर कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले. 

समाजसुधारिका - त्याकाळात धर्माच्या नावाखाली जे कर्मकांड केले जायचे त्याला विरोध करणे म्हणजे स्वतःचा विनाश ओढवून घेणे अशी परिस्थिती होती तरीही सावित्रीबाईंनी सतीप्रथा, विधवा केशवपन यांसारख्या अमानुष प्रथांचा कडाडून विरोध केला. विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंधकगृह, आंतरजातीय विवाह यांच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना अमानुष प्रथांच्या जोखडातून मुक्त केले. त्याकाळात जातीच्या आधारे वर्णव्यवस्थेने शूद्र (मांग, महार आदी) ठरविलेल्या लोकांवर धर्ममार्तंडांकडून अमानवीय अन्याय अत्याचार केले जात होते त्यालाही त्यांनी विरोध केला. त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली करून अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले. हे करत असताना धर्माच्या ठेकेदारांकडून धर्म बुडविण्याचा आरोप करून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला गेला पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. पुढे काशीबाई या ब्राम्हण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. शिक्षित करून डॉक्टर बनविले. त्याचा आंतरजातीय विवाह घडविला. जोतीरावांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईंनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला आणि अंत्यसंस्कार केले. महात्मा फुले यांच्या पश्चात सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले. 

साहित्य - सावित्रीबाई यांचं साहित्य हे स्वप्नरंजक नसून ते वास्तवदर्शी आहे. शिक्षणाचं महत्व सांगणारं, अंधश्रध्देच्या विरोधातलं, निसर्गसोबतचं नातं सांगणारं, अन्यायाची जाणीव करून देणारं,  जगायला आणि जगवायला शिकवणारं असं त्यांचं साहित्य आहे. सावित्रीबाई या समाजभान असणाऱ्या कवयित्री होत्या हे त्यांच्या कवितांच्या विषयांवरून सहज स्पष्ट होते. त्यांचा "काव्यफुले" हा कवितासंग्रह १८५४ साली प्रकाशित झालेला होता. या कवितासंग्रहात एकूण ४१ कवितांचा समावेश आहे. ज्यामध्ये बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी छत्रपती ताराबाई यांचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला आहे. "बावन्नकशी सुबोध रत्नाकर" हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह १८९२ मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. यामध्ये जोतिरावांकडून आपल्याला कशी प्रेरणा मिळाली हे व्यक्त करून देशाचा प्राचीन काळापासूनचा सामाजिक इतिहास काव्यस्वरूपात थोडक्यात पण अचूक सांगितला आहे. "सावित्रीबाईंची भाषणे आणि गाणी" या पुस्तकात त्यांची भाषणे आहेत. त्यांच्या भाषणांचे विषय उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने आणि कर्ज  असे होते. यात त्यांनी या विषयांचे महत्व सांगून यावर आपल्या देशाचे भवितव्य कसे अवलंबून आहे हे स्पष्ट केले आहे. याचबरोबर महात्मा फुले यांची भाषणे त्यांनी संपादित केली आहेत. महात्मा फुलेंना  सावित्रीबाई यांच्याकडे असलेल्या ग्रंथसंपदेवरून त्यांचा विद्याव्यासंगाची कल्पना येते. त्यांना खगोलशस्त्रासारख्या विषयात ही रस होता हे त्याच्या उपलब्ध असलेल्या टिपणांतून दिसून येते. 

आपल्या गरीब विद्यार्थ्यांची शाळेत, विधवा ब्राम्हण महिलांची बाळंतपणात ज्याप्रकारे त्या काळजी घेत त्याचप्रकारची करुणा त्यांनी दुष्काळ आणि प्लेगने पीडित लोकांप्रति दाखवली प्रसंगी जीवाची पर्वा न करता त्यांच्या मदतीला त्या धावून गेल्याचे दिसून येते. 1876-77 मधला दुष्काळ हा एकोणिसाव्या शतकातला सर्वांत भीषण दुष्काळ मानला जातो. या दुष्काळात सावित्रीबाई सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत गावोगाव फिरून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे काम करत होत्या. दुष्काळाची भीषणता, तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि इंग्रज सरकारला याबाबतची करून दिलेली जाणीव याबाबतची माहिती त्यांनी महात्मा फुले यांना २० एप्रिल १८७७ रोजी लिहलेल्या पत्रावरून कळते. १८९७ मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. सावित्रीबाईंनी आपला  डॉक्टर मुलगा यशवंत याला बोलावून घेतले आणि लोकांवर उपचार सुरू केले. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहिती असूनही त्या रुग्णांची देखभाल करत होत्या, लोकांना मदत करत होत्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. शेवटच्या श्वासापर्यंत त्या लोकांसाठी जगल्या आपलं संपूर्ण आयुष्यच त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी अर्पण केले.

आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवत आहेत. यामागे सावित्रीबाईंची विचारधारा आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे आणि त्याप्रति नेहमीच कृतज्ञ राहिलं पाहिजे.


संदर्भ -

१. सावित्रीबाई फुले समग्र वाङमय, महाराष्ट्र शासन, डॉ.मा.गो. माळी.

२. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, प्रा. हरी नरके.