Translate
Friday, February 18, 2022
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय....
जगदंब,
आम्ही शिवाजीराजे शहाजीराजे भोसले बोलतोय. मुगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज व इंग्रज यांची चाकरी करून आम्ही राजे नाही झालो तर या सर्वांसोबत लढून आम्ही आमचे राजेपद निर्माण केले. स्वतंत्र आणि सार्वभौम असे 'स्वराज्य' स्थापन केले. असंख्य पराक्रमी भूमिपुत्रांच्या रक्ताने या स्वराज्याची पायाभरणी केली गेली. कोणत्याही प्रकारच्या अन्याय अत्याचाराला आम्ही स्वराज्यात कधी थारा दिला नाही. तसा संस्कारच आमच्यावर माँसाहेब आणि आबासाहेबांनी केला होता. स्वराज्याचे सैन्य, युध्द पद्धती, आरमार, दुर्गरचना, राज्यकारभार, व्यापार, परस्त्री आणि परधर्म याबाबतची वागणूक, शेतकऱ्यांचे हित, पर्यावरण या सर्वच बाबतीत आम्ही त्याकाळातील राज्यकर्त्यांपेक्षा वेगळा विचार केला म्हणूनच आमचे अस्तित्व आजही टिकून आहे. परंतु सद्यस्थिती पाहता आमच्या या विचारांना कोणीही बांधील नसल्याचेच चित्र दिसून येते.
फक्त आमच्या नावाच्या जयजयकारात रमणारा तरुण वर्ग व आमचे नाव वापरून धार्मिक द्वेष पसरविणारा वर्ग यांस पाहून आम्हास अतीव दुःख होते. शौर्याच्या तेजोमय इतिहासाची साक्ष देणाऱ्या स्वराज्याच्या गडकिल्ल्यांची झालेली दुरावस्था आम्हास बगवत नाही. परकीयांकडून नव्हे तर स्वार्थासाठी फितूर झालेल्या आपल्याच माणसांकडून आपल्या माणसांचे होणारे शोषण पाहून याचसाठी का आम्ही हे स्वराज्य उभे केले असा आम्हांस प्रश्न पडतो?
जयंतीत वाजणाऱ्या डीजे जवळ पोहचणं जेवढे सोपं आहे तेवढं आमच्या गडकोटांवर पोहचणं सोपं नाही म्हणूनच माझ्या अस्सल लढाऊ आणि स्वाभिमानी मावळ्यांची संख्या वरचेवर घटत चालली आहे. माझं खरं अस्तित्व हे तुम्ही उभे करत असलेल्या पुतळ्यांमध्ये आणि स्मारकांमध्ये नसून सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभ्या असलेल्या गडकिल्ल्यांत आहे हे जो जाणतो आणि जो स्वराज्याच्या नीतीमूल्यांप्रमाणे आचरण करतो तोच स्वराज्याचा खरा मावळा.
अजूनही अनेकांना वाटते की आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा, नेहमीच कोणी तरी येऊन आपल्या समस्या सोडवेल या अपेक्षेत का जगता? स्वाभिमानी व्हा. आमच्या विचारांची पेरणी मनामनात करा मग बघा घराघरात एक शिवाजीराजा निर्माण होईल.
Wednesday, February 16, 2022
खरे शिवाजी महाराज समजून घेताना
गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक वाचले अन माझ्या मनात शाळेने अन् समाजाने जे शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटले होते ते किती अस्पष्ट होते हे समजलं. या पुस्तकामुळे माझ्या मनातील महाराजांचं चित्र जे अस्पष्ट आणि अंधुक होते ते आता पूर्णपणे स्पष्ट आणि तेजोमय झाले आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करणाऱ्यांनी फक्त ते आपल्या कुळाचे, जातीचे, धर्माचे आहेत म्हणून त्यांचा जयघोष न करता त्यांचे कार्य, त्यांचे विचार समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.
शिवाजी महाराज ज्या जातीत जन्मले, ज्या कुळात जन्मले, ज्या
धर्मात जन्मले. त्याच कुळात, त्याच जातीत आणि त्याच धर्मात जन्मल्याने आपण ही थोर
आहोत असे मानणारयांना हे कधी कळणार कि
शिवाजी महाराज त्यांच्या कर्तुत्वाने, त्यांच्या विचाराने थोर झालेत. जातीमुळे किंवा
धर्मामुळे नाही. शिवाजी महाराज वारसा हक्काने राजे झाले नव्हते तर त्यांनी स्वकर्तुत्वाने
‘स्वराज्य’ निर्माण केले. शिवाजी महाराज हे संपुर्ण रयतेचे राजे होते. रयतेतील प्रत्येकाच्या
सुखाचा आणि दुखाचा ते विचार करत म्हणूनच त्यांच्यासाठी जीव देण्यास सगळी रयत तत्पर
असायची. त्याच्या अनेक नोंदी इतिहासात आहेत जसे शिवा न्हावी, बाजीप्रभू, मदारी
म्हेतर अन् हिरोजी फर्जद. आपण मेलो तरी चालेल पण महाराज जगले पाहिजे त्यांनी आरंभिलेले
कार्य पूर्ण व्हायला पाहिजे हीच भावना त्या सगळ्यांच्या मनात होती म्हणूनच ते
मुत्यूला कवटाळायलाही तयार झाले.
महाराजांची रयतेच्या मनात अशी वेगळी आणि चांगली भावना निर्माण
होण्याची अनेक कारणे आहेत. आधी वतनदार वाटेल तसा रयतेकडून महसूल गोळा करत, रयतेची
पिळवणूक करत, गोरगरीबाच्या लेकी सुनांची अब्रू लुटत अन् तक्रारीला दाद ही देत नसत.
पण महाराजांनी मन मानेल तसा महसूल वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला, ठरलेला महसुलच
वसूल करण्याचा दंडक घालून दिला दुष्काळात महसूल माफ केला. जमीनदार व वतनदारांची
अव्यवस्था महाराजांनी पार मोडून टाकली. स्त्रियांची अब्रू लुटणाऱ्याविरुद्ध जबर
शिक्षा केल्या व त्यांचा अंमल ही करून घेतला. स्त्रियांच्या अब्रुसंबंधीचा
महाराजांचा दृष्टीकोन हा त्याकाळातील राजांपेक्षा खूपच वेगळा होता.
त्याकाळातील राजांचे सैन्य अन् महाराजांचे सैन्य यामध्ये ही
कमालीचा फरक होता. इतर राजांचे आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूंचे सैन्य होते लुट
करणे हाच तर त्यांचा हेतू होता ते रयतेच्या अब्रूची व संपत्तीची पर्वा कशी करणार? पण महाराजांच्या
शिपाई बनलेल्या शेतकरी सैन्याचा हेतू लुट करणे इतकाच नव्हता तर लुट थांबवणे हा
होता त्यामुळे रयतेला हे संरक्षक सैन्य वाटत होते. रयत सैन्याला सहाय्य करत होती
अन् सैन्य रयतेला वाचवत होते. “रयतेच्या भाजीच्या
देठालाही हात लावता कामा नये”, सैन्याचा रयतेला त्रास
होता कामा नये अशा सक्त आज्ञा महाराज सैन्याला देत.
शिवाजी महाराजांचे युध्द हे धर्मयुध्द होते ते धर्माच्या
रक्षणासाठी, धर्मासाठी लढले म्हणून ते यशस्वी झाले, भवानी मातेने त्यांना
धर्मरक्षणासाठी तलवार दिली म्हणूनच ते यशस्वी झाले असे अनेक गैरसमज पसरवण्यात आलेत
जे चुकीचे आहेत कारण महाराजांनी स्वराज्याची स्थापना संपूर्ण रयतेसाठी केली होती
एका विशिष्ट धर्मासाठी नाही.
सर्वात मोठ्या
प्रमाणात पसरवण्यात आलेला गैरसमज म्हणजे शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरुद्ध होते
पण आपण जेव्हा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करू तेव्हा हा प्रश्न पडेल की महाराज
मुसलमानांच्या विरुद्ध का लढले? ते मुसलमान होते म्हणून? की ते राजे होते म्हणून?
जर ते मुसलमान धर्माच्या विरुद्ध असले असते तर त्यांच्या पदरी एकही मुसलमान सरदार,
वतनदार व इतर चाकर दिसले नसते पण तसे नव्हते. महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
इब्राहिमखान, आरमार प्रमुख दौलतखान, त्यांचा खास अंगरक्षक मदारी म्हेतर आणि
त्यांचा वकील काजी हैदर हे होते.
त्याकाळात
राज्यकर्त्याचा दृष्टीने राज्य म्हत्त्वाचे होते धर्म नाही, राज्य स्थापण्यासाठी आणि
ते स्थिर ठेवण्यासाठी त्यांनी धर्माचा आधार घेतला पण राज्य मुख्य होते धर्म नाही.
जर धर्म हा मुख्य उद्देश असला असता तर या लढाया हिंदू दिरुद्ध मुस्लीम अशाच झाल्या
असत्या पण हिंदू विरुद्ध हिंदू आणि मुसलमान विरुद्ध मुसलमान राजांच्या लढाया हि
झाल्याचे इतिहासात नमुद आहे. जसे हिंदू राज्यकार्त्यांकडे मुसलमान सरदार, सैन्य
होते तसेच मुसलमान राज्यकर्त्यांकडे हिंदू सरदार आणि सैन्य होते जे आपापल्या राजांची
इमाने इतबारी चाकरी करत होते. राज्यकर्त्ये हिंदू असो वा मुसलमान त्यांच्यासाठी
राज्य म्हत्वाचे होते.
शिवाजी महाराजांना
स्वराज्य मिळविण्यासाठी अनेक छोटयामोठया लढाया कराव्या लागल्या त्यातल्या जास्त
लढाया मुसलमान राजासोबत झाल्या कारण त्यावेळेस राज्यकर्ते मुस्लीम धर्माचे होते. फक्त मुसलमान राज्यकर्त्यांनसोबतच लढाया नाही झाल्या तर महाराजांना हिंदू राज्यकर्त्यांविरूद्धही
लढाया कराव्या लागल्या. महाराज हिंदू व मराठा सरदारांविरूद्ध लढले म्हणून ते धर्मच
मानत नव्हते असे मात्र नाही. शिवाजी महाराज हिंदू होते. त्यांची धर्मावर श्रध्दा
होती. त्या श्रद्धेप्रमाने ते वागत देवदेवतांची पूजा करत धर्मासाठी व देवळासाठी
दान देत व खर्च करीत.
शिवाजी महाराज कोणत्या धर्माविरुद्ध नव्हते हे पुढील गोष्टींवरूनही स्पष्ट होते. महराजांनी एकही धार्मिक स्थळ पाडल्याची किंवा लुटल्याची इतिहासात नोंद नाही. महाराजांनी सैनिकांकरिता सक्त नियम केला
होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लुट करण्यास जातील तेथे तेथे त्यांनी धार्मिक स्थळे, धार्मिक ग्रंथ आणि तसेच कोणत्याही स्त्रीस (ती कोणत्याही धर्माची असो) तिला त्रास देता
कामा नये.
आज जर आपण बघितले
तर महाराजांचं जे चित्र सर्वांसमोर उभे केले जातं ते स्वताचा स्वार्थ साधण्यासाठी
चालू असलेला खटाटोपच म्हणावा लागेल कारण महाराजांचे स्वराज्याबद्दलचे, धर्माबद्दलचे
आणि स्त्रीयाबाबतीतचे विचार हे आदर्श आणि आधुनिक होते. चांगला माणूस म्हणून आयुष्य
जगण्यासाठी आज त्या विचारांना समजून घेण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची नितांत
गरज आहे. शिवाजी महाराज हे दूरदृष्टी असणारे, नीतिमान, बुद्धिमान, शूर लढवय्ये आणि
कुशल संघटक होते. त्यांच्या कार्याला एका
विशिष्ट धर्माच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न हा मूर्खपणाचे लक्षण आहे. मुस्लीम
समाजानेहि खरा इतिहास समजून घेऊन जे लोक महाराजांचे नाव वापरून त्यांच्या मनात जातिवाद
रुजवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून सावध राहून अशा लोकाना विरोध केला पाहिजे.
शिवचरित्र आपण
जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्या लक्षात येईल कि प्रत्येक
समस्येचे (जसे जातिवाद, भ्रष्टाचार, बलात्कार इ.) उत्तर हे शिवचरित्रात मिळते फक्त
तसा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. शिवाजी महाराजांचा जयघोष
करण्याआधी आपण तसे करण्यासाठी पात्र आहोत की नाही हे प्रत्येकाने तपासले पाहिजे. जेव्हा
शिवाजी महाराजांचे विचार समजून घेऊन कृतीत उतरवू तेव्हाच आपण खरया अर्थाने त्यांचे
वंशज होऊ.
Saturday, February 12, 2022
आयुका - अंतर्विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र
इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲंड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) म्हणजेच आयुका ही खगोलशास्त्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावरची पुणे विद्यापीठ स्थित संस्था आहे. ज्याची स्थापना १९८८ मध्ये झाली. आंतराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे या संस्थेचे संस्थापक आहेत. सुरवातीचे दहा वर्षे ते संचालक म्हणून कार्यरत होते. खगोलशास्त्रीय संशोधन, शिक्षण आणि विज्ञान प्रसार हे या संस्थेचे मुख्य उद्देश आहे.
खगोलशास्त्रीय संशोधनाच्या मूलभूत व प्रगत शिक्षणासोबतच आयुकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी खगोलशस्त्राची ओळख करून देणारे विविध उपक्रम राबविले जातात. ज्यामध्ये दूरदर्शी दुर्बिणीच्या साहाय्याने आकाश निरीक्षण, विज्ञान केंद्राला भेट, एकदिवसीय कार्यशाळा, कॅम्पस व्हिजिट इ. समावेश आहे. (दर शुक्रवारी दुर्बिणीच्या साहाय्याने आकाशदर्शनाचा उपक्रम आयोजित केला जातो जो सर्वांसाठी खुला आहे)
ज्यांना संशोधन क्षेत्रात शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी आयुकामध्ये पुढीलप्रमाणे संधी उपलब्ध आहे :
१) पीएचडी प्रोग्राम - एमएससी, बीई, एमई पूर्ण झालेले पदवीधर या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत. सर्व प्रवेशप्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने केली जाते.
२) एमएससी प्रोग्राम - बीएस्सी फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स आणि बीई ही पदवी पूर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत. याचीही सर्व प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयुकामध्ये पुढीलप्रमाणे संधी उपलब्ध आहे :
१) व्हॅकेशन स्टुडंट प्रोग्राम - दरवर्षी मार्चमध्ये हा सात आठवड्याचा प्रोग्राम घेतला जातो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आयुका अंतर्गत सूरु असलेल्या रीसर्च प्रोजेक्ट मध्ये सहभागी होण्याची संधी मिळते याबरोबरच दहा हजार रुपये स्टायफंड ही मिळतो. रहाण्याची सोयही मोफत केली जाते. यासाठी एमएससी प्रथमवर्षं आणि बीई तृतीय वर्षाचे विद्यार्थी पात्र आहेत.
२) इन्ट्रोडक्टरी समर स्कुल इन अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स - दरवर्षी मे - जून मध्ये हा पाच आठवड्याचा प्रोग्राम घेतला जातो. अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्सचे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल याचा यामध्ये समावेश आहे. बीएस्सी अंतिम वर्ष, बीई तुतीय वर्ष व त्यापुढील आणि एमएससी प्रथम वर्षाचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.
३) स्टुडंट प्रोजेक्ट प्रोग्राम - पुणे येथील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम आहे. अल्प अवधीच्या (तीन महिने आणि त्यापेक्षा कमी कालावधी असलेल्या) प्रोजेक्ट्स वरती काम करण्याची संधी या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाते. बीएस्सी, बीई, एमएस्सी, एमई या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. या प्रोग्राम साठी ठराविक जागा आहेत ज्याची निवड थेट प्राध्यापकांच्या मार्फत केली जाते.
शालेय विद्यार्थ्यांसाठी आयुकामध्ये पुढील प्रमाणे संधी उपलब्ध आहे :
१) नववी दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी या क्षेत्रातील शास्त्रज्ञांचे व्याख्याने.
२) बेसिक अस्ट्रोनॉमी वर्कशॉप - शालेय विद्यार्थ्यांना खगोलशस्त्राची शास्त्रोक्त ओळख करून देण्यासाठी या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले जाते.
३) सायन्स टॉइज ऍक्टिव्हिटी - हा उपक्रम सुध्दा एकदिवसीय आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आणि खेळण्यांच्या माध्यमातून शिकवल्या जातात.
४) टेलिस्कोप मेकिंग - दूरदर्शी दुर्बीण स्वतः बनविण्याची कार्यशाळा. ही पाच दिवसीय कार्यशाळा आहे ज्यामध्ये रिफ्लेकटिंग प्रकारचा टेलिस्कोप स्वतः बनविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. टेलिस्कोपचे कार्य, त्याचे प्रकार आणि बनविण्याच्या पद्धती याची संपूर्ण माहिती या कार्यशाळेत दिली जाते.
वरील सर्व उपक्रमांच्या अधिक माहितीसाठी आयुकाच्या वेबसाईला भेट द्या. https://www.iucaa.in/
ग्रह, तारे, सूर्यमाला, आकाशगंगा, ब्लॅकहोल, अवकाशयान, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, धूमकेतू, गुरुत्वाकर्षण, गुरुत्वीय लहरी किंवा अवकाशाशी संबंधित कोणत्याही गोष्टीबाबत तुमच्या मनात कुतूहल या संस्थेला एकदा नक्की भेट द्या.
वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा अंधश्रद्धामुक्त समाज आणि युवावर्ग घडवायचा असेल तर अशा प्रकारच्या नव्या वाटांवर मार्गस्थ होणे क्रमप्राप्त ठरते.