पुराणकथा, मिथके, टी व्ही सिरियल्स, नाटक या माध्यमातून असुरांबद्दल जे सांगितलं जातं किंबहुना समाजात जे प्रचलित केलं गेलं आहे ते संपूर्णतः अनैतिहासिक आहे. शंबर, नमुची, वुत्र, हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, बळी, विरोचन यांसारख्या असुरांच्या पराक्रमी सम्राटांचे चारित्र्य हणन अशाप्रकारे केले गेले आहे की आज असुर हा शब्द ही दुष्ट, वाईट या अर्थाने वापरला जातो. यासाठी प्रामुख्याने वैदीक ग्रंथकारांची लेखणी कारणीभूत ठरते. वैदीक ग्रंथकारांनी लेखणीच्या बळावर स्वतःच्या कल्पनेनुसार वाईट ठरणाऱ्या जितक्या गोष्टी असुरांच्या माथी मारता येतील तितक्या मारल्या, जे जे पवित्र मंगल ते देवांचे आणि जे जे असुरांचे ते तिरस्कार करण्या जोगे अशी मांडणी केली. ऋग्वेद, ऐतरेय ब्राम्हण, शतपथ ब्राम्हण, तैत्तिरीय ब्राम्हण, पद्मपुराण, विष्णुपुराण, महाभारत यांसारखे प्रमुख वैदीक ग्रंथ देवांचे उदात्तीकरण आणि असुरांची निंदा यानेच व्यापली असल्याचे दिसून येते. असे असले तरी असुरांचा गौरवशाली इतिहास पूर्णतः नष्ट करण्यात ते यशस्वी झाले नाहीत. स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या नादात त्यांनी काही अंशी असुरांचा प्रभाव मान्य केला आहे. प्राचीन काळातील वैदिक आणि अवैदिक हा संघर्ष या सर्व मांडणीच्या मुळाशी आहे. त्यामुळे या संघर्षाबाबत जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.
देव आणि असुर हे दोन्ही मानवसमूहच होते. अलौकिक आणि चमत्कारिक शक्तींनी युक्त असे हे दोन्हीही समूह नव्हते. देव ही संज्ञा आर्य लोकांसाठी वापरली जात होती, जे बाहेरून आले होते तर असुर हे या भूमीचे मूळचे रहिवासी होते. देव म्हंटल्या जाणाऱ्या जनसमूहाच्या जीवन मूल्यांपेक्षा वेगळी मूल्ये मानणारा जनसमूह म्हणजे असुर. असुर हा जनसमूह देवांच्या आधीपासून या भूमीत वास्तव्य करीत होता. असुरांची संस्कृती ही देवांच्या संस्कृती पेक्षा प्राचीन होती असे शतपथ ब्राम्हणात सांगितले आहे. काही धर्मग्रंथांनी त्यांना प्रजापतीचे तर काहींनी ब्रह्माची तर काहींनी कश्यापाची अपत्ये असल्याचे सांगितले आहे. मात्र सर्वच वैदिक ग्रंथांनी देव आणि असुर हे भावंडे होती आणि त्यापैकी असुर हे थोरले तर देव हे धाकटे होते अशी मांडणी केली आहे. असुर आणि देवांची उत्पत्ती सांगताना वैदिक ग्रंथकारांनी नीचतेचा कळस गाठला आहे. ऋग्वेदात चार वर्णांची उत्पत्ती सांगताना जेवढी कुत्सित मनोवृत्ती दाखवली होती त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन ही मांडणी केली गेली आहे. देवांची उत्पत्ती प्रजापतीच्या मुखातून तर असुरांची उत्पत्ती प्रजापतीच्या अपान वायूतून म्हणजे गुदद्वारातून बाहेर पडणाऱ्या वायूपासून झाल्याचे शतपथ ब्राह्मणात सांगितले आहे. आपल्या सारख्याच रक्तामांसाच्या माणसांचा जन्म अशा पध्दतीने झाला ही सांगणारी वैदिक ग्रंथकारांची लेखणी किती मनुष्यद्वेष्टी आणि संस्कृतीद्रोही होती हे स्पष्ट होते.
वेद आणि यज्ञ यांना मानणारे वैदिक म्हणजेच देव आणि याला न मानणारे अवैदिक म्हणजेच असुर. वेद, यज्ञ व त्यावर आधारित कर्मकांड ही वैदिकांची संस्कृती होती तर अवैदिकांची संस्कृती ही यापेक्षा वेगळ्या जीवनमूल्यावर आधारित होती. ती नक्की कोणत्या मूल्यांवर आधारित होती आणि दोन्हींमध्ये नक्की काय फरक होता हे खालील गोष्टींवरून स्पष्ट होईल.
अग्नीचा उपयोग - व्यावहारिक जीवन जगण्यासाठी अग्नीचा विधायक उपयोग करणे हा असुरांचा दृष्टिकोन होता. अग्नीवर शिजवलेले अन्न अग्नीमध्येच जाळून वाया घालवण्यापेक्षा माणसाच्या तोंडात चार घास घालून माणसाची भूक भागविणे हे त्यांना अधिक महत्त्वाचे होते. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी उपयुक्त ठरणारे एक महत्वाचे साधन या दृष्टीने ते अग्नीकडे पाहत होते. याउलट देवांनी अग्नीला पवित्र मानुन यज्ञाचे निरर्थक कर्मकांड सुरू केले. यज्ञात आहुती दिल्यानंतर उरलेल्या द्रव्यांवर सगळ्यांचा अधिकार नाकारून देवांनी तो फक्त एका विशिष्ट वर्गाला दिला.
शेती - आर्यांकडे प्रारंभी शेती करण्याचे ज्ञान नव्हते. कोणत्या ऋतूत कोणते पीक घ्यायचे असते याची प्राथमिक माहितीही त्यांना नव्हती. याउलट असुरांकडे मात्र उत्तम शेती करून जास्तीत जास्त पीक कसे घ्यावे त्याची साठवणूक कशी करायची याचे भरपूर ज्ञान होते. सिंधु संस्कृती निर्माण करणाऱ्या असुरांनी पाणी अडविणे, साठविणे आणि त्याचा शेतीसाठी व दैनंदिन व्यवहारासाठी योग्य रीतीने वापर करणे याबाबत खूप प्रगती केली होती. या भूमीशी आणि कृषी संस्कृतीशी असलेले असुरांचे संबंध यावरून सहज स्पष्ट होतात.
वास्तूकला - सिंधू संस्कृती ही वास्तुकलेच्या बाबतीत किती प्रगत होती हे उत्खननात मिळालेल्या पुराव्यानुसार स्पष्ट झालेच आहे. असुरांची समृद्ध नगरे होती. संरक्षक किल्ले होते. त्यांचे जीवन अत्यंत समृद्ध, संपन्न आणि विकसित होते.
शिव आणि विष्णू - शिव हा असुरांचा महान पूर्वज होता आणि वैदिकांनी विष्णूला आपल्या परंपरेचे महान प्रतीक बनवले होते. शिव हे व्यक्तित्व मूळचे आर्यांचे नव्हते नंतरच्या काळात शिवाचे वैदिकीकरण करण्यात आले हे बहुतेक आभ्यासकांनी मान्य केले आहे. शिव हा सदैव असुरांचा पाठीराखा होता आणि विष्णू हा नेहमी असुरांचा नाश करण्याच्या प्रयत्नात होता असे आढळून येते. तैत्तिरीय संहितेने रुद्राला (शिवाला) 'मखघ्न' म्हणजे यज्ञाचा विध्वंस करणारा असे विशेषण लावले आहे तर वैदिकांनी विष्णूला मूर्तिमंत यज्ञच मानले. शंकराचा आणि नागवंशाच्या लोकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता याउलट विष्णूचे मात्र त्यांच्याशी वैर होते हे अनेक मार्गाने सिद्ध होऊ शकते. ( शंकराच्या गळ्यात सदैव नाग असतो याउलट नागाचा शत्रू असलेला गरुड हे विष्णूचे वाहन आहे. नागांना मारणारा त्यांचे भक्षण करणारा पक्षी म्हणून विष्णूसाठी हे वाहन निवडले आहे. नाग आणि गरुड ही अनुक्रमे शिवाशी आणि विष्णुशी जवळीक असलेल्या माणसांची प्रतीके आहेत हे उघड आहे) शेष या नागाच्या हातात नांगर आणि कोयता असणे आणि शंकराचे वाहन नंदी असणे यावरून त्या दोघांचाही कृषी संस्कृतीशी असलेला संबंध स्पष्ट होतो. पुढे हेच नागवंशाचे लोक बौद्ध संस्कृतीचा हिस्सा झाले. मनुस्मृती नंतरच्या प्रतिक्रांती आधी संपूर्ण भारत हा बौद्धमय होता. जैन, चार्वाक हे संप्रदाय ही अवैदिकच होते. (असुरांचा शिव आणि दैवीकरण केलेला वैदिकांचा शिव एक नव्हे)
भाषा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'शूद्र पूर्वी कोण होते' या संशोधन ग्रंथात असुरांच्या भाषेविषयी खालीलप्रमाणे निष्कर्ष नोंदवले आहेत. सुरवातीला दोनच भाषा होत्या एक आर्यांची आणि एक असुरांची. असुरांची भाषा आर्यांच्या भाषेपेक्षा पूर्णतः भिन्न होती. ती इतकी भिन्न होती की आर्यांना वाटत होते असुरांची कोणती भाषाच नाही. यासाठी ते शतपथ ब्राम्हणाचा उल्लेख करतात. ज्यामध्ये म्हंटले आहे, देवांनी वाणीचा स्वीकार केल्यावर असुर वाणी गमावून बसले आणि हेलव: हेलव: असे म्हणत पराभूत झाले. असुर अर्थहीन वाणी बोलले जो अशी वाणी बोलतो तो म्लेच्छ असतो म्हणून ब्राह्मणाने म्लेच्छ भाषा बोलू नये ती असुरी भाषा होय.
अनार्य, असुर, नाग, दास आणि द्रविड हे सर्व एकच असून एकमेकांना पर्यायी शब्द म्हणून वापरले जात होते. त्यांची भाषा द्रविड होती आणि देशाच्या मोठ्या भूभागावर आर्यांच्या आधी नागांचे साम्राज्य होते. असा महत्वपूर्ण निष्कर्ष बाबासाहेबांनी या ग्रंथात पुराव्यानिशी नोंदविला आहे. आर्यांची भाषा ही संस्कृत होती जी देवांची भाषा म्हणून ओळखली जात होती.
भिन्न संस्कृती, भिन्न जीवनशैली हे तर वैदिक - अवैदिक किंवा आर्य - अनार्य संघर्षाचे एक कारण होतेच पण या संघर्षाचे प्रमुख कारण म्हणजे देवांनी असुरांची भूमी, पाणी, नगरे आणि संपत्ती यावर दरोडे घातले आणि त्यांनाच दरोडेखोर ठरवले. देवांनी असुरांची नगरे आणि पाणी हस्तगत करण्यासाठी आर्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांचे वर्णन ऋग्वेदात आहे. देवांनी अनृताच्या म्हणजेच असत्याच्या आधारे असुरांवर मात केली असे तैत्तिरीय ब्राह्मणाने नोंदविले आहे. देवांनी बलपूर्वक यज्ञ करून असुरांची संपत्ती लुटली असे मैत्रायणी संहितीने नोंदविले आहे. देवांनी कपट कारस्थाने करून आणि केलेले करार मोडून फसवणुकीने असुरांचा पराभव केला. प्रसंगी विजयी होण्यासाठी स्त्रियांचा शस्त्राप्रमाणे उपयोग केला. त्यांच्या विजयाला ना नैतिकतेची ना पराक्रमाची जोड होती. महात्मा फुले यांनी 'गुलामगिरी' या विख्यात ग्रंथाला लिहलेल्या इंग्रजी प्रस्तावनेमध्ये आक्रमक आर्य आणि मूळचे एतद्देशीय लोक यांच्यात झालेल्या उग्र संघर्षाचे वर्णन केले आहे. याबरोबरच महात्मा फुलेंनी 'दस्युचा पोवाडा' लिहून दस्युचे म्हणजेच असुरांचे वर्णन केले आहे. दस्यु हे आपले महान पूर्वज होते आणि त्यांनी आर्यांपुढे शरणागती पत्करण्याऐवजी लढता लढता मरण पत्करले हे ऐतिहासिक सत्य आपण नीट ओळखावे असा आशय त्यांनी या पोवाड्यातून मांडला आहे. देव आणि असुर यांच्यात दीर्घकालीन चाललेल्या युद्धात असुर पराभूत झाले, आर्यांनी त्यांना दास ठरवून गुलामी लादली त्यामुळे त्यांचा स्वतःचा असा वस्तूनिष्ठ इतिहास उपलब्ध नाही.
भारतीय संस्कृती ही फक्त आर्यांची आहे असे मानून असुरांचे भारतीय संस्कृती मधील योगदान पुर्णपणे नाकारणे हे सांस्कृतिक दृष्ट्या आणि ऐतिहासिक दृष्ट्या अशक्य आहे. उलटपक्षी असुरांच्या संस्कृतीसोबतच इतरांचे योगदान मिळून भारतीय संस्कृती स्थापित झाली असे म्हणणे अधिक उचित ठरेल. हा वाद वंश श्रेष्ठत्वाचा किंवा वर्चस्वाचा नसून अस्तित्वाचा आहे. ज्यांची या भूमीसोबत हजारो वर्षे नाळ जोडलेली आहे आणि ज्यांच्या रक्तात असुरांचाही अंश आहे त्यांनी आपल्या पूर्वजांच्या विचारधारेशी प्रतारणा करावी का? आपल्या मुळांसोबतचं नातं नाकारून स्वतःच्या अस्तित्वावरच घाला घालावा का?
पूर्वजांचा वारसा जोपासनं जसं आपल्या अस्तित्वासाठी गरजेचं आहे त्याचप्रमाणे तो वारसा आहे तसा न स्वीकारता (म्हणजेच चुकांसकट न स्वीकारता किंवा त्या चुकांचे समर्थन न करता) बुद्धीच्या आधारे कसोट्या लावून तपासून घेणं ही तितकच गरजेचं आहे. आपले पूर्वज महान होते म्हणून आपणही महान ठरत नाही तर त्या महानतेला साजेशी विचारसरणी अंमलात आणून त्याप्रमाणे कृती करणे ही आपली जबाबदारी ठरते.
आज ही एका वर्गाची संस्कृती म्हणजे पूर्ण देशाची संस्कृती असे चित्र निर्माण केले जात आहे, जे की सत्याला धरून नाही. ज्यांना अस्पृश्य ठरवलं गेलं त्या बहुजन समाजाची संस्कृती देशाच्या संस्कृतीत आजही प्रतिबिंबित होताना दिसत नाही. जंगलात, दुर्गम भागात, ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या समाजाच्या संस्कृतीला आजही मुख्य समाजातील संस्कृती प्रमाणे प्रतिष्ठा मिळालेली नाही. जोपर्यंत एकमेकांच्या गोष्टी एकमेकांवर न लादता प्रत्येकाला स्वतःच उपजत वेगळपण जपण्यायोग्य पोषक वातावरण मिळत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. जेव्हा प्रत्येक वर्गातील व्यक्ती आपापल्या श्रद्धा जपून आनंदाने आणि स्वेच्छेने इतरांच्या श्रद्धांचाही सन्मान करेल तेव्हा आपापसांतील बंधुभाव वाढीस लागेल आणि एकदा बंधुभाव वाढला की एकमेकांच्या विरोधात उभे न राहता एकमेकांसोबत उभे राहण्याची मानसिकता दृढ होईल.
विविधतेत एकता ही जी आपल्या देशाची संस्कृती आहे ती वेगवेगळ्या आनुवंशिकतेच्या अस्तित्वावरच आधारित आहे. सर्वसमावेशकता हाच तीचा मूळ गाभा आहे. विषमतेच्या विषाने प्राचीन काळापासून आपला घात केला आहे. त्यामुळे समतेच्या मूल्याची कास धरून ठेवण्याची गरज प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे.
संदर्भ - १. 'गुलामगिरी' - महात्मा फुले.
२. 'शूद्र पूर्वी कोण होते' - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
३. 'बळीवंश' - डॉ. आ.ह. साळुंखे. (लेखात आलेले वैदिक ग्रंथाचे संदर्भ आणि त्याचे स्पष्टीकरण बळीवंश मधून घेतले आहे)