उन्हाळयात गावाकडे तीव्र पाणी टंचाई निर्माण व्हायची. पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वणवण फिरावं लागायचं. शहरा प्रमाणे पाणी साठवण्यासाठी मोठं मोठ्या टिपा किंवा हौद तेव्हा ग्रामीण भागात नव्हते. मातीचे रांजण, डेरा, स्टीलच्या टाक्या आणि घागरी एवढीच काय ती पाणी साठवायची साधनं सगळ्याच्या घरांनी दिसायची. त्यामुळे घरातील लहानथोर सगळेच सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असे दोन वेळ पाण्यासाठी भटकत. 'येतांव का पाण्याला' हे इचारत इचारतंच दिवसाची सुरुवात व्हायची आणि शेवट सुद्धा.
वरलाकडं आणि खाल्लाकडं यांच्या मधोमध पार होता. जिथे एक भलं मोठं पिंपळाचं झाड होतं. समाजमंदिर व अंगणवाडी बरोबर एकमेकांच्या समोरासमोर अन् दोन्हीच्या मध्ये मोकळी जागा आणि अंगणवाडीला लागूनच मोठी पाण्याची टाकी. ग्रामपंचायतीने बांधलेल्या या पारावरच्या पाण्याच्या टाकीवरच प्रामुख्याने सगळा म्हारवाडा आणि मांगवाडा व इतर पाण्यासाठी अवलंबून असत पण उन्हाळ्यात त्याला पाणी नसायचं. पारावर दिवसा प्रमाणेच रात्रीही वर्दळ असायची. रात्रीच्या वेळी अनेक तरुण मुले या टाकी शेजारी असणाऱ्या अंगणवाडीच्या स्लॅबवर रेडिओ ऐकत बसायचे आणि तिथेच झोपायचे, आम्हीही क्रिकेट मॅच असली की कामेंटरी ऐकायला येथे जाऊन बसायचो. अंगणवाडीत सुगडी आणि मसलाभात याचे वाटप केले जायचे विशेषतः सुगडीची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे.
टाकीला पाणी नसलं की सगळे खाल्ला कडच्या हिरीवर जायचे. लोकवस्ती पासून थोडीशी लांब असल्यामुळे आणि हिरीच्या आजूबाजूला काहीच नसल्यामुळे बायका पोरं एकटं जायला दिवसाही थोडं बिचकायचीच. एक दोघे हिरीत पडून मेल्याचं पण सगळ्यांकडून सांगितलं जायचं. माझी माय (आजी) मला हिरीला जाऊ द्यायची नाही मला घेऊन जाता म्हणून भावांवर कावायची (रागवायची) पण मी हट्ट करून जायचोच. शहरातला असूनही खांद्यावर घागरी घेऊन पाणी भरतो याचं अनेकांना अप्रूप वाटायचं, 'निब्बर हाय की वाघ' असं वाड्यातील म्हातारी माणसं म्हणायची पण माझे भाऊ लोकं ज्या लोखंडी मोठ्या घागरी उचलायचे ते मला जमायचं नाही प्लास्टिकची घागर किंवा हंडा मी सहज न्यायचो. एकावेळी दोन दोन घागरी खांद्यावर नेणारी माणसं पोरं आणि डोक्यावर एक अन् कमरेवर एक घागर नेणाऱ्या महिला आणि पोरी बघून मला माझ्या शहरी असण्याचा थोडा कमीपणा वाटायचा.
दगडी बांधकाम आणि कठडा असलेली ही हिरचं सगळ्यांची तहान भागवायची. जिवंत झरे असल्यामुळे सकाळी पाणी कमी झालं की संध्याकाळी परत वाढायचं. वीस तीस फूट दोरीने शेंदून पाणी काढावं लागायचं. पाणी शेंदण्यासाठी दोरी, कळशी किंवा हंडा सगळ्यांकडे नसायचा त्यामुळे एकमेकांचा वापरला जायचा. कळशी हंडा आदळून चेमटण्यावरून वाद व्हायचा. काहीजण अगदी सराईतपणे पणे एकदाही कळशी न आदळता चार ते पाच हिसक्यात वर घ्यायचे यात लहान पोरही असायची पण मला जेव्हा जेव्हा ही संधी मिळाली माझ्याकडून खूप वेळा कळशी आदळली जायची. काही वेळेस पाणी खूपच कमी झालं तर एक एक दगड हिरीच्या भिंतीत बसवून केलेल्या पायऱ्या वरून उतरून पाणी वर आणावं लागायचं. पण हे सगळ्याला जमत नव्हतं ठराविक तरुण मुलं आणि माणसंच ते करायची आम्ही सगळेजण कडठड्यावर बसून हे सर्व कुतूहलाने बघत बसायचो.
एकमेकाला मदत करण्यासोबतच, भांडणं, चिडवाचिडवी, गाणे म्हणणे, गप्पा याने हिरीचा परिसर गजबजून जायचा. कठड्यावर बसून गप्पा मारण्यात रस असणारी, पाणी शेंदताना जोर जोरात शिनमाच्या गाण्यातून संवाद साधण्याचा प्रयत्न करणारी, पोरींना पाणी काढून देण्याची किंवा हंडा, घागर डोक्यावर कमरेवर उचलून देण्याची संधी शोधणारी तरुण पोरं सगळ्याच्या चार पाच खेपा झाल्या तरी तिथून लवकर हलायची नाहीत त्याउलट शेतावर जायची गडबड असणारी माणसं आणि घरातली कामं उरकायच्या गडबडीत असणाऱ्या बायका झपाझप पाण्याच्या फेऱ्या करून जिकडं तिकडं व्हायची. प्रसंगी अवखळ वाटणारी ही तरुण पोरं म्हाताऱ्या माणसांसनी, लेकुरवाळ्या बाईस, आणि लहानग्यांना पाणी काढून देताना त्यांना मदत करताना जबाबदारीने वागताना दिसायची.
हिरीचा पर्याय नसला की पानमळ्यात पाण्यासाठी जावं लागायचं. गावात भरपूर पानमळे होती त्यामुळे पंचक्रोशीत पानांसाठी गावाचं नाव होतं. गावच्या रोजगाराचं एक प्रमुख माध्यम ही होतं. आमच्या वरलाकडल्या घराला लागून जो मोठा खडकी रस्ता गावच्या आतून येतो तोच उलटया बाजूने शिवारात जातो. बैलगाडी, ट्रॅकटर, मोठ्या गाड्या याच रस्त्याने शेताकडे जायच्या. याच रस्त्याच्या कडेला घरं संपली की थोड्या अंतरावर पान मळे लागतात. सतत पाणी द्यावं लागत असल्यामुळे आणि काळी माती असल्यामुळे पान मळ्यात चिखल व्हायचा. शेवग्याच्या उंचच उंच झाडांच्या आधारानं हिरव्यागार पानांच्या येली वरती बांधलेल्या असायच्या. मळ्याला पपईच्या झाडाचं कुंपण होतं. पानांचा वास सगळ्या मळ्यात दरवळत राहायचा. मळ्यात आलं की ऐशी रूम मध्ये आल्यासारखं वाटायचं कधी कधी दुपारचं आम्ही जाऊन बसायचो मळ्यात.
मळ्यातून पाणी बाहेर आनेपर्यंत पाय चिखलाने भरायचे त्यामुळे चपल्या बाहेरच सोडाव्या लागायच्या. हिरीच्या मानाने पान मळ्याचे अंतर जास्त होतं, त्यामुळे तिथून पाणी आणताना दमछाक व्हायची. मी घर येइपर्यंत घागर या खांद्यावरून त्या खांद्यावर करत रहायचो. लांब अंतरामुळे अनेक जण साखळी करून पाणी भरायचे. पाणी भरताना कपडे भिजायची वाऱ्याची झुळूक आली की थोड्या वेळासाठी का हुईना गार गार वाटायचं.
पान मळ्याला आम्ही शक्यतो पाचच्या दरम्यान संध्याकाळी आणि ग्रुपने जायचो. एका वड्यातून घागरी घेऊन जाताना माणसं निघाली की 'येतांव का पाण्याला' हे त्यांच्याकडुन कडून हमखास इचारलं जायचंच त्यामुळे बाकीच्या वाड्यातूनही माणसं पाण्याला निघायची. रस्त्याला सगळी पाणी भरणाऱ्यांचीच आणि त्यांच्या हातातल्या रंगबेरंगी प्लास्टिकच्या घागरींचीच गर्दी दिसायची. आपापल्या घागरी ओळखू याव्या आणि आदलाबदली होऊ नये म्हणून प्रत्येकाने पेंटनी खुणा केलेल्या होत्या. उन्हाळा संपेपर्यंत प्रत्येक घराची हीच वहिवाट ठरलेली होती.