सकाळपासून कर्ण्यांवर(जर्मनचा भोंगा) वाजणाऱ्या गाण्यांच्या आवाजानं गावात लगीन असल्याची खबर समद्यान पातूर पोचवली व्हती. शेवटी उटल्यामुळं म्हाळवदावर डोळे चोळीत हाथरूनाच्या घड्या घालताना, गावात जायच्या रस्त्याला लागून असलेल्या पिठाच्या गिरणी जवळ मारलेला रंगीत मांडव नजरेस पडला. मांडवावरन् तर मोठ्या घरचं लगीन वाटत व्हतं. या रस्त्याला खेटून एक आडवा रस्ता व्हता जो एका बाजूनं पाटीकडं (एसटी थांबा) अन् दुसऱ्या बाजूनं सरळ खाल्लाकडं जातं व्हता. हा आडवा रस्ता म्हंजी गावाला अन् म्हारवाडा, मांगवाडा यासनी शेपरेट करणारी बार्डर व्हती.
वऱ्हाड कुटचं हाय, वाजंत्री कुटली हाय, कुणा कुणासनी सांगावा हाय, जेवायला काय काय केलंय याचीच चर्चा म्हाताऱ्या व मोठ्या माणसांत सुरू व्हती. म्हारवाड्यात तर लगीन असलं की रातीपासूनचं पारावरचा समाजमंदिर गजबजून जायचा. गर्दिनं समाजमंदीरा पुढचं भलंमोठं पटांगण बी लहानसं वाटू लागायचं. मांडवाचं अन् जेवणाच्या कामांची लबगब रातीपासूनच सुरू व्हायाची. घरचं लगीन असल्या प्रमाणंच समदी कामं करायची. मग त्यात लहानथोर असा भेद दिसायचा न्हाय. भीमनगर तरुण मंडळातील पोरं तर दिसभर पायात भिंगरी बांधल्यापरी फिरताना कामं करताना दिसायची. कर्ण्यांवर वाजणाऱ्या भीमगीतांनी वातावरण अजूनच उत्साहानं भरून जायाचं. भन्तेंनी (भिक्खू) एकदा साधू साधू म्हंटलं की पंगतीची वर्दळ सुरू व्हायची. पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या (ताट) द्रोण (वाट्या) भाजी वाढायच्या बादल्या, चपाती आणि नुकत्या साठीचे टोपले याची मांडामांड हुईपातूर पाठीला पाठ लावून चार पाच पंगती तयार असायच्या. बरोबरीनचं आयेराचा कार्यक्रम बी चालू व्हायचा. मुलीचा मामा...मुलीचा मामा जिथं आशील तिथुन माईकशी संपर्क साधावा हे वाक्य तर हमखास कानावर पडायचंच. वऱ्हाडींनी आणि बाहेरगावच्या सोयऱ्यांनी आदी जेवून घ्यावे ही विनंती पुन्हा पुन्हा केली जायची. नवरदेवास आत्याकडून एक स्टीलची पाण्याची टाकी अन् पितळची घागर, नवरीमुलीस स्टीलचा हंडा, अमुक कडून एकशे एक रोख रुपये आहेर, तमुक कडून आकरा रुपये रोख आहेर असा पुकारा (अनॉसमेंट) लंय वाडुळ पातूर सुरू राहायचा. ओ मामा नुक्त्या (बुंदी) वाढा की..., ओ पाव्हणं इकडं जरा भात भाजी वाढ की, तिकडं पत्रावळ्या दिल्या न्हायती बघा अजून, येगळं येगळं कशाला बसुलालावं एकाच पत्रावळीत खावा की, समदं समपायचं काय उरवायचं न्हाय (असं लहान लहान पोरास्नी भरला जाणारा दम) अशा आरोराळ्यांनी साऱ्या मांडवात एकच गलका उडालेला असायचा. सांच्याला परत कोण राहिलंय का याची विचारपूस केली जायाची आणि जे थकलेले म्हातारे कोतारे असायचे त्यांना जेवणाची पत्रावळी घरपोच दिली जायची.
बैलांना पाणी वैरण करून आम्ही गोठयाकडे गप्पा मारत बसलो होतो. गोठ्या मागच्या रस्त्याकडून गावात जाणारी वर्दळ वाढत होती. मधूनच फटफटीचा आवाज आला तसा ती बघायला पोरांचा घोळका धावला पण उडणाऱ्या फफुटया शिवाय त्यांना काही दिसलं नाही. माईकवरची लगबग वाढायला लागली तसं अक्षताचा टाईम झल्याचं समजत व्हतं. पण गावातलं लगीन आसल्यामुळे मोजकीच मोठी माणसं इकडून अक्षताला जायाची कारण सगळ्यांना पत्रिका नसायची. मात्र आण्णाला खास आवतान असायचं अन् पत्रिका बी दिली जायाची. आण्णा लग्नाला जायचे रोख आहेर करायचे मात्र घरी येऊनच जेवायचे. अण्णांचा वाड्यात अन् म्हारड्यात जसा दरारा होता तसाच गावातल्या माणसांत ही मान होता. गावातल्या प्रतिष्ठित लोकांत आण्णाचं उटणं बसणं होतं. शेताला घरासमोरून जाताना 'का करलालेत पंच', 'पंच हायती का घरात' असा आवाज द्यायची आणि आण्णांची भेट घेऊन पुढे जायची.
गावातल्या पंगती उठू लागल्या तशा बाकीच्यांना बोलावलं जाऊ लागलं. तसं म्हारवाड्यातली मांगवाड्यातली लोकं ताम्हण (ताट), गिलास अन् वाटी घेऊन जाताना दिसु लागली. तेव्हा मी त्या वेळेस पाचवी सहावीत असेन. सगळेजण ताटं का घेऊन चाललेत असा प्रश्न माझ्या मनात घोळू लागला, मी विचारलंही पण आपल्यालाच न्यावं लागतंय एवढंच उत्तर मला मिळालं. शहरातल्या लग्नांमध्ये असा कधी अनुभव आला नसल्याने मला ते काहीतरी वेगळं वाटत होतं. आमचा लहान पोरांचा ग्रुप निघाल्यावर लग्नातल्या जेवणाच्या ओढीने मी ही गेलो त्यांच्या संगतीने ताट घेऊन. मळक्या पट्टीवर दाटीवाटीनं आमची पंगत बसली. वाढायला सुरुवात झाली. एक एक जिन्नस संपत चालला होता.भात भाजी चपाती सगळ्याच्या ताटात वाढली पण सगळ्यांची नजर नुक्त्या वाढणाऱ्याकडेच, बराच वेळ तो दुसऱ्याच पंगतीला वाढायलेलं बघून आमच्यातल्या एकानं आवाज दिला. 'ओ नुक्त्या वाढा की इकडं...' तसा तो वाढणारा खेकसला 'दम काढ गा जरा, युवलालावं'. पंगतीत वाढणाऱ्याला आवाज देणं आणि त्यांच खेकसनं सुरूच होतं. आम्ही नंतर लाजून आवाज देत नव्हतो वाढणारा आसपास आला की इथं बी थोडं द्या म्हणायचो. दुसऱ्या पंगतीपेक्षा आम्हाला वेगळी वावणूक दिली जात होती हे आमच्या लक्षात आलं. हात धुवून अंगावरच्या कपड्याला हात पुशीत आम्ही घरचा रस्ता धरला. परत गावातल्या लग्नात जेवायला आम्ही कधी गेलो नाही कारण पारावरच्या समाजमंदिरातल्या लग्नात हक्काने ताव मारण्यात जो आनंद होता तो तिथे मिळायचा नाही.
(म्हारवाड्याचा आज भीमनगर झालाय अन् शिक्षणामुळे गावात सगळ्यांना मानसन्मान मिळतोय इतकंच नाही तर गावचा पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच भीमनगरमधून होतोय बाबासाहेब हे फक्त तुमच्यामुळेच.....)