Translate

Thursday, July 28, 2022

भारतीय न्यूज वेबसाइट्सला झालंय काय?



गुगल ओपन केल्यानंतर होम पेजला न्यूज फीड मध्ये एकाखाली एक अमुक अभिनेत्रीचे हे बोल्ड फोटो पाहिलेत का? अमुक वेबसेरीजने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, अमुक अभिनेत्याची किंवा क्रिकेटरची पत्नी हिरोईन पेक्षा आहे सुंदर हे फोटो बघितले का?, अमुक हिरोईन तोकड्या कापड्यांमुळे झाली उप्स मोमेंटची शिकार बघा हा व्हिडीओ अशा आशयाचे इंडिया टुडे, न्यूज एटीन, लोकमत, एबीपी माझा, झी चोवीस तास यांसारख्या आघाडीच्या न्यूज वेबसाइटच्या हेडलाईन बघून तुम्ही ही वैतागला असाल अन् अशा बातम्या का केल्या जातात असा ही प्रश्न तुम्हाला पडत असेल. खरं तर यांना बातम्या म्हणता येत नाही. बातम्यांपेक्षा प्रामुख्याने अश्लील आणि निरूपयोगी गोष्टींचा भडिमारच यामध्ये जास्त असतो. हेडलाईनची रचना ही अशा पद्धतीने केलेली असते की त्यातील सस्पेन्स वाचकांना ती बातमी क्लिक करुन वाचण्यासाठी मजबूर करतो. तथ्यांवर आधारित माहितीपूर्ण बातम्या न देता अशा गोष्टी का केल्या जात या प्रश्नाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

वेबसाईटवर ट्रॅफिक जनरेट करण्यासाठी म्हणजेच लोकांची गर्दी वाढविण्यासाठी हा प्रकार आघाडीच्या सर्व न्यूज वेबसाईटकडून सर्रासपणे केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंटरनेटच्या आधी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमवत होते. वृत्तपत्रांची आणि वृत्तवाहिन्यांची संख्या ही कमी होती त्यामुळे स्पर्धा ही कमी असायची. पण सध्याच्या डिजिटल दुनियेत लोकांचं पेपर वाचण्याचे न्यूज चॅनेल्स बघण्याचे प्रमाण कमी झाले आहे आणि स्पर्धा ही जीवघेणी होत चालली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल जगताचे नियंत्रण जे आहे ते गुगल सारख्या सोशल मीडिया कंपन्यांच्या हातांमध्ये आहे. त्यामुळे आपसूकच जाहिरात महसूल ठरविण्याचा अधिकारही यांनाच प्राप्त झाला आहे.

इंटरनेटवर गुगल हा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथून वेबसाईटसाठीचे ट्रॅफिक उत्पन्न होते. गुगल एक सेवा प्रदान करतो ज्याचं नाव आहे ऍडसेन्स. "गुगल ऍडसेन्स" च्या माध्यमातून न्यूज वेबसाईट पैश्याची कमाई करतात. न्यूज वेबसाईटवरती ज्या बातम्या लेख प्रकाशित केल्या जातात, त्यामध्ये एकापेक्षा अधिक जाहिरातीच्या लिंक जोडल्या जातात. आणि जेव्हा वाचकांकडून या लिंक क्लिक केल्या जातात तेव्हा गुगलच्या 'पे पर क्लिक' या मॉडेल नुसार त्या वेबसाईटला पैसे मिळतात. म्हणजेच आपण जोपर्यंत न्यूज वेबसाईट वरील बातम्या ओपन करून बघत नाही आणि जाहिरातींवर क्लिक करत नाही तोपर्यंत वेबसाईटला पैसे मिळत नाहीत. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांना आपल्या न्यूज वेबसाईटवर  आणण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या तयार करून पोस्ट केल्या जातात.

जेवढ्या जास्त सस्पेन्स आणि बोल्डनेस असलेल्या हेडलाईन तेवढीच न्यूज वेबसाईटवर लोकांची गर्दी आणि जेवढा जास्त वेबसाईटला ट्रॅफिक तेवढी जास्त जाहिरातीतुन मिळणारी कमाई असं हे गणित आहे. जाहिरातींमधून पैसे कमावणे अयोग्य नाही पण ते अशा मार्गाने कमविणे नक्कीच योग्य नाही. यासाठी फक्त न्यूज वेबसाईट जबाबदार आहेत असे नाही तर लोकही तेवढेच जबाबदार आहेत. कारण तथ्यांवर आधारित माहितीपूर्ण बातम्या वाचणारा प्रेक्षक वर्ग संख्येने कमी आहे आणि तेच सेलिब्रिटींशी संबंधित हॉट व मसालेदार पण काहीच तथ्य नसलेल्या न्यूज वाचण्याची आवड असणारा वर्ग हा मोठा आहे. त्यामुळेच अशा न्यूज वेबसाईटच्या बातम्यांना लाखो व्ह्यूवज मिळतात. बातमी आणि जाहिरात यामध्ये आता फरकच उरला नाही. लोकांना बतम्यांमध्ये फक्त अचूक माहिती नव्हे तर मनोरंजन ही हवे आहे. त्यामुळे तशा प्रकारचाच कन्टेन्ट निर्माण केला जात आहे. सोशल मीडियाच्या अतिवापराचेच हे दुष्परिणाम आहेत. गुगल न्यूज फीड बंद करून किंवा त्यामध्ये आवश्यक तसे बदल करून आणि उपयुक्त व योग्य बातम्या सांगणाऱ्या वेबसाईटवर सबस्क्राईब करून वैयक्तिकरित्या आपण स्वतःला यापासून दूर ठेवू शकतो. परंतु जोपर्यंत सर्व स्तरातून विवेकाच्या आधारे इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर होत नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही एवढे मात्र नक्की.


Friday, July 22, 2022

बोधिसत्त्व म्हणजे काय?


               (Image Source - Wiki media Commons)


बोधिसत्व हा शब्द बौद्ध वाङमयात प्रामुख्याने जातककथांमध्ये, लेण्यांमधील शिलालेखात अनेक ठिकाणी आढळतो. तसेच बौद्ध वास्तू शिल्पकलेवरही त्याचा मोठा प्रभाव दिसून येतो.  लेणी, स्तूप यांसारख्या वास्तूंवर प्रतिमा ही कोरलेल्या आहेत. अजिंठा येथील पद्मपाणी बोधिसत्वाचे शिल्प तर जगप्रसिद्ध आहे. बोधिसत्व म्हणजे नक्की काय? हा प्रश्न अनेकांना पडला असणार तसेच याबाबत अधिक माहिती मिळवण्याची  उत्सुकता ही माझ्याप्रमाणे अनेकांमध्ये निर्माण झाली असणार. या प्रश्नाचे उत्तर सविस्तरपणे संदर्भ ग्रंथांच्या आधारे जाणून  घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

'बोधी' म्हणजे मनुष्याच्या उद्धाराचे ज्ञान आणि त्यासाठी प्रयत्न करणारा जो प्राणी (सत्व) तो 'बोधिसत्व' होय. गौतम बुद्धांच्या जन्मापासून बुद्धत्व प्राप्त होईपर्यंत त्यांना बोधिसत्व म्हणण्याची वहिवाट फार प्राचीन आहे. पालि वाङमयात सगळ्यात प्राचीन जो सुत्तनिपात  त्यांत म्हंटले आहे की,

सो बोधिसत्तो रतनवरो अतुल्यो ।

मनुस्सलोके हितसुखताय जातो । 

सक्यानं गामे जनपदे लुम्बिनेय्ये |

श्रेष्ठ रत्नाप्रमाणे अतुलनीय असा तो बोधिसत्त्व लुम्बिनी जनपदांत शाक्यांच्या गावीं मानवांच्या हितसुखासाठी जन्मला. (१)

थेरवादी विचारसरणीनुसार बोधिसत्त्व म्हणजे जो अष्टांगिक मार्गात सांगितल्याप्रमा वागून बुद्धत्व प्राप्तीच्या अगदी जवळ पोहोचला आहे तो. महायानी विचारसरणीत करुणा, मैत्री इत्यादी परमावधीला गेलेल्या सद्गुणांमुळे दुसऱ्यांना दुःखात सोडून, बोधिसत्त्व स्व 'निब्बाण' प्राप्त करू इच्छित नाही. तो सर्व प्राणिमात्रांना निब्बाण प्राप्त होण्यास मदत करतो. ह्याचाच अर्थ जोपर्यंत हलक्यातला हलका प्राणी निब्बाण स्थिती प्राप्त करून घेत नाही. तोपर्यंत बोधिसत्त्व स्वतः बुद्धत्त्व प्राप्त करून घेत नाही. महायानी पंथातील बोधिसत्व असा प्राणिमात्रांवर उपकार करणारा, त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी मदत करणारा सर्वांचे हित चिंतणारा आहे.

थेरवादी बौद्धांप्रमाणे “अर्हतपद" म्हणजे अती उच्च पद आहे. तथागतांच्या धम्माप्रमाणे उत्कृष्ट आचरण ठेवून "निब्बाण" प्राप्तीची पात्रता ज्यांना आली असेल ते अर्हत असे समजले जाते. महायान पंथात बोधिसत्त्वाला अर्हतापेक्षा जास्त महत्त्व दिले आहे. लोकांनी अर्हत बनण्यापेक्षा बोधिसत्त्वाचे अनुकरण करून प्राणिमात्रांना अडीअडचणीच्या वेळी मदत करावी असे महायानी तत्त्वज्ञान आहे. 

इसवीसनानंतर तिसऱ्या शतकात, महाराष्ट्रात बोधिसत्त्वाच्या मूर्ती आणि चित्रे काढण्यास सुरुवात झाली असली पाहिजे. साधारणपणे सातव्या शतकात बोधिसत्व उपसकांचे आवडते दैवत झाले असले पाहिजे. महाराष्ट्रातील कोरीव लेण्यांत ठिकठिकाणी बोधिसत्व अवलोकितेश्वर किंवा बोधिसत्व पद्मपाणीला उद्देशून अग्नीपासून, शत्रूच्या तलवारीपासून, शत्रूंनी केलेल्या कैदेतून, बोट बुडण्यापासून, वन्य प्राण्यांपासून, सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांपासून, रोग आणि मृत्यूपासून आमचे संरक्षण कर अशा प्रार्थना लिहीलेल्या किंवा चित्रीत केलेल्या दिसतात. 

महाराष्ट्रातील बौद्ध लेणी पाहतांना आढळणाऱ्या बोधिसत्त्वाच्या आणि इतर काही मूर्तीविषयी थोडक्यात माहिती अशी आहे. 

अवलोकितेश्वर :- महायानामध्ये अवलोकितेश्वर हा एक फार महत्त्वाचा आणि उपासकांचा आवडता बोधिसत्त्व आहे. त्याच्या डाव्या हातात देठासकट कमळाचे फूल असून उजव्या हातात अमृताचा घट असतो. बऱ्याच वेळा त्याच्या दोन्ही बाजूस दोन स्त्रियांच्या आकृत्या असतात. त्यापैकी एक तारा आणि दुसरी भ्रुकुटी असते. खाली चबुतऱ्यावर शूचिमुख नावाचा प्राणी दयेची भीक मागत आहे असे दाखविलेले असते. अवलोकितेश्वराच्या आणि बहुतेक इतर बोधिसत्त्वाच्या डोक्यावर अत्यंत कलाकुसरीचे काम असलेला रत्नजडीत मुकुट असतो. मुकुटावर वरच्या भागात नेहमीच भगवान बुद्धाची एक लहानशी मूर्ती असते. बोधिसत्त्वाने "जानवे" घातलेले दाखवतात.

पद्मपाणी :- पद्मपाणी हा एक महत्त्वाचा महायानी बोधिसत्त्व आहे. त्याच्या एका हातात देठासकट कमळाचे फूल असून दुसऱ्या हाताने उपासकांना संरक्षण देत आहे किंवा त्यांना उपदेश करत आहे, असे दाखविलेले असते.

मंजुश्री :- मंजुश्री बोधिसत्त्व आसनावर किंवा सिंहासनावर बसलेला दाखवितात. मंजूश्री म्हणजे शहाणपण, वक्तृत्व आणि तल्लख बुद्धिमत्ता. चुकीच्या गोष्टी आणि असत्य यांना कापून टाकण्यासाठी त्याच्या उजव्या हातात तलवार आहे. त्याच्या डाव्या हातातील पुस्तक बुद्ध धम्मातील दहा पारमितांचे प्रतीक आहे. मंजूश्री नावाच्या धम्मोपदेशकाने बुद्धधम्म प्रथम नेपाळात नेला. त्यालाच बोधीसत्त्वाचे स्वरूप दिले असले पाहिजे असे कित्येक पाश्चात्य पंडितांचे मत आहे.

वज्रपाणि :- वज्रपाणि बोधिसत्त्वाच्या उजव्या हातात शंख असून डाव्या हाताने वज्र धरले आहे. त्याच्या शिरस्त्राणात कधीकधी नाग दाखविलेले असतात. कधीकधी वज्रपाणिला तीन शिरे आणि सहा हात दाखविलेले असतात. ह्या सहा हातांत शंख, वज्र, माला, बाण, धनुष्य आणि पाश धरलेले असतात. शक्ती नावाची स्त्री त्यांच्या शेजारी बसलेली असते.

 तारा :- महायानी पंथात तारा ही अवलोकितेश्वर बोधिसत्त्वाची सहचारिणी आहे. ती नेहमीच न चुकता उपासकांचे संरक्षण करते अशी समजूत आहे. तिच्या डाव्या हातात देठासकट  कमळाचे फूल असते आणि उजच्या हाताने ती उपासकांना संरक्षण देत आहे, असे दाखविलेले असते. तारापूर शहर तिच्याच नावावरून पडलेले दिसते.

 प्रज्ञापारमिता :- महायान पंथामध्ये प्रज्ञापारमिता ही विद्येची देवी मानलेली आहे. ती कमळाच्या फुलावर बसलेली असून तिने ग्रंथ आणि कमळाचे फूल हातात धरलेले असते. कधी कधी तिला दहा हात असलेले दाखवतात. त्या हातांत, एक पात्र, दोरीचा पाश, शंख, ग्रंथ, कमळाचे फूल, ध्वज, फळ, माला, तलवार, आणि शेवटचा हात अभय मुद्रेत दाखविलेला असतो.

मारिची :- ही आणखी एक महायान पंथातील देवी आहे. तिला तीन तोंडे असतात त्यापैकी एक सूकराचे असते. तिला सहा हात असून त्या हातांमध्ये सूई, दोरा. अंकुश, बाण, धनुष्य, वज्र आणि अशोक आहे असे दिसते. ती घोड्यांच्या किंवा सूकराच्या रथात बसलेली असते.

जाम्बाल :- जाम्बाल हा महायान बौद्धांचा धनदौलतीचा देव आहे. त्याच्या एका हातात फळ असून दुसऱ्या हातात पैशाची थैली असते. कधी कधी त्याला चार हात आहेत असे दाखविलेले असते. त्या चार हातात पात्र, तलवार, कमळाचे फूल आणि मुंगूस धरले आहेत असेही दाखविलेले असते.

त्रैलोक्य विजय :- हा एक क्वचितच दाखविलेला महायान पंथाचा देव आहे. त्याची मुद्रा रागीट असून तो शिवपार्वतीला तुडवत आहे असे दाखविले आहे. अशी मूर्ती महाराष्ट्रातील लेण्यात पाहावयास मिळाली नाही.

 हरिती :- ही महायान पंथातील देवी असून जाम्बालाची सहचारिणी आहे. कदाचित ती सुपीकतेची देवी असावी.

वसुंधरा :- ही हरिती सारखीच महायान पंथातील देवी आहे. तिच्या डाव्या हातात कमळांचे असतो. फूल, धान्याची कणसे आणि एक पात्र दिसते. उजवा हात वरद मुद्रेत दाखविलेला

मैत्रेय :- मैत्रेय म्हणजे पुढे होणारा बुध्द. त्याची बोधिसत्त्व म्हणून पूजा होते. थेरवादी बौद्धसुद्धा मैत्रेयाला मान्यता देतात. मैत्रेयाच्या बरोबर नेहमीच दुसऱ्या बोधिसत्त्वाची मूर्ती असते. मैत्रेयाला ओळखण्याची खूण म्हणजे त्याच्या शिरस्त्राणातील चैत्य आणि कमरेला डाव्या बाजूस बांधलेला शेला. त्या शेल्याची टोके मैत्रेयाच्या पायापर्यंत खाली लोंबकळत असतात. 

वर वर्णन केलेल्या देवदेवतांशिवाय महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यात सामंतभद्र, रत्नपाणि, विश्वपाणि, ज्ञानकेतु, भद्रपाल, क्षितिगर्भ, घंटापाणि, इत्यादी बोधिसत्त्व; आणि सरस्वती, अपराजिता, वज्रधात्री, लोचना, मामकी, पाण्डुरा, चुन्दा, इत्यादी देवदेवतांच्या मूर्ती दिसतात. त्याचप्रमाणे इन्द्र, यक्ष, किन्नर, गरुड, नाग इत्यादींच्याही मूर्त्या पाहावयास मिळतात.

बौद्ध धम्मा प्रमाणेच ब्राह्मणी धर्मात सुरवातीला मूर्तिपूजा नव्हती. महायानी पंथात मूर्तिपूजा सुरू झाल्यावर कितीतरी काळा नंतर हिंदू धर्मात मूर्तिपूजा सुरू झाली.(२)


संदर्भ : 

१) "भगवान बुद्ध पूर्वार्ध" - धर्मानन्द कोसंबी, नवभारत ग्रंथमाला.

 २) "महाराष्ट्रातील बुद्ध धर्माचा इतिहास" -  मा. शं. मोरे.

Wednesday, July 20, 2022

पावसाळ्यात ट्रेकला जाताय? या पाच गोष्टी लक्षात ठेवा.


(नाणेघाट धबधबा येथील पावसाळी भटकंती दरम्यान घेतलेले छायाचित्र)


निसर्गाचं सर्वात मनमोहक रूप हे पावसाळ्यातच पहायला मिळते त्यामुळे अनेकांची पावले पावसाळ्यात डोंगरांकडे वळतात. या काळात धबधबे, गडकोट इ. ठिकाणी जाऊन पाऊस अनुभवणाऱ्यांची संख्या मोठी असते. ओसंडुन वाहणारे निसर्गाचे सौंदर्य आणि धोकादायक असे रौद्ररूप या दोन्ही पावसाळ्याच्याच महत्वपूर्ण बाजू आहेत. पण पहिलीच बाजू डोक्यात ठेवून पावसाळी ट्रेकचे नियोजन केले जाते आणि अपघातांना निमंत्रण दिले जाते. मागच्या काही दिवसात कळसुबाई आणि  धबधब्यांच्या ठिकाणी घडलेले जीवघेणे अपघात हे त्याचेच उदाहरण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ट्रेक करताना विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरते. पावसाळी भटकंती आनंददायी व सुरक्षित होण्यासाठी  खलील गोष्टींची काळजी घ्या.

१) ठिकाण आणि हवामान :  सर्वात आधी ट्रेकचे ठिकाण निश्चित करा.
तिथे पोहचण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती गोळा करा. ते ठिकाण किंवा तिकडे जाणारे रस्ते सुरू आहेत की नाही याची खात्री करून घ्या.
 डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा वेग अधिक असतो त्यामुळे पावसाळ्यात जिथे अवघड किंवा उभी चढाई आहे ते ठिकाण टाळा. पावसामुळे पाण्याच्या पातळीत अचानक बदल होतात त्यामुळे ओढे, नाले किंवा पाण्याचे प्रवाह पार करून जावं लागेल असे ठिकाण निवडू नका. दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक असलेले ठिकाण टाळा. यासोबतच त्यावेळचे हवामानाचे अंदाज काय वर्तविले आहेत त्याची माहिती घ्या. रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट असताना ट्रेकचे नियोजन करू नका. शक्यतो ट्रेक लवकर सुरू करा कारण सकाळपेक्षा दुपारनंतर पावसाचा जोर जास्त असतो. पावसाळ्यात अतिउंचीचे, जास्त कालावधीचे आणि मुक्कामाचे ट्रेक हे खूपच धोकादायक असतात त्यामुळे त्यांची निवड कटाक्षाने टाळा.

२) वॉटरप्रूफ बॅगपॅक : कमी क्षमतेची वॉटरप्रूफ बॅग सोबत घ्या किंवा बॅगला रेनकव्हर घाला. बॅगेतील वस्तू कोरडया राहिल्या तरच त्यांचा उपयोग होईल. गरजेच्या आणि वजनाने हलक्या असलेल्या वस्तू सोबत घ्या. त्यामध्ये एक जास्तीचा कपड्याचा जोड आणि पुरेसे पाणी हे सर्वात महत्वाचे. खास पावसाळी ट्रेकसाठी वापरले जाणारे पोंचो जे पाठीवरील बॅगसोबतच डोक्यापासून ते पायापर्यंत आपला पूर्णपणे बचाव करतात ते वापरणे सर्वात उत्तम. (पावसाचा व वाऱ्याचा जोर अधिक असल्याने तसेच दोन्ही हात मोकळे असणे गरजेचे असल्यामुळे छत्रीचा उपयोग करणे टाळावे).  

३) शूज : चांगली पकड (ग्रीप) आणि अँकल सपोर्ट असलेले ट्रेक शूज हे पावसाळी भटकंती साठी सर्वात महत्वाचे आहेत. फ्लॅट ग्रीप असलेले शूज, सॅंडल, चप्पल घालून ट्रेक करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण ठरते. 

४) वाटाड्या : ज्या भागात आपण भटकंती साठी जातोय त्या परिसराची आणि हवामानाची योग्य व अधिक माहिती तेथील गावकऱ्यांना असते.  पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे पायवाटा, रस्ते  सहजासहजी लक्षात येत नाहीत तसेच अचानक उद्धभवणाऱ्या धोक्यांची कल्पना आपल्याला नसते. त्यामुळे पायथ्याशी असलेल्या गावातून वाटाड्या सोबत घेणे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते.  एकट्याने पावसाळी भटकंती करणे टाळा. नोंदणीकृत आणि प्रशिक्षित व अनुभवी ट्रेकर्स असलेल्या ग्रुप सोबत भटकंतीला जाणे कधीही उत्तम. 

५) उपयोगी वस्तू : पावसात मोबाईल वापरणं शक्य होत नाही तसेच नेटवर्क उपलब्ध नसते त्यामुळे सोबत कंपास ठेवल्यास रस्ता चुकल्यावर किंवा हरवल्यावर योग्य ठिकाणी पोहचण्यास मदत होईल. पावसाळ्यात जळवांचा धोखा अधिक असतो त्यामुळे सोबत हळद आणि तंबाखूचे पाणी ठेवणे उपयुक्त ठरते. ट्रेक पोल किंवा सरळ असणारी चार पाच फुटाची काठी सोबत ठेवल्यास निसरड्या वाटेवरून चालताना, पाण्याचा दलदलीचा अंदाज घेण्यासाठी आणि वन्यजीवांपासून सुरक्षा करण्यासाठी तिचा उपयोग होऊ शकतो. पावसाचा जोर खूप जास्त असेल आणि दिवसाही अंधार पडला असेल तर एक दोन फुटांवरचं ही दिसत नाही त्यामुळे सोबत बॅटरी ठेवणे गरजेचे आहे. अशा वातावरणात  उपयोगाला येतील अशी औषधं व कोरडे खाद्यपदार्थ सोबत ठेवावे.


वरील सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतल्यास तुमच्या पावसाळी ट्रेकचा अनुभव हमखास आनंददायी आठवणींच्या स्वरुपात कायमचा  जपला जाणार हे नक्की.






Sunday, July 17, 2022

रॉकेट्री - देश प्रेमाची अस्लल परिभाषा सांगणारा चित्रपट.




रॉकेट्री हा चित्रपट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे क्रायोजिनिक रॉकेट इंजिन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. सॅटेलाइटला अंतराळात पाठविण्यासाठी ज्या शक्तिशाली रॉकेटची गरज असते ती रॉकेट प्रणाली नंबी नारायणन यांनी यशस्वीरीत्या विकसित करून भारताला अंतराळ क्षेत्रात अमेरिका, रशिया आणि फ्रान्स या देशांच्या बरोबरीने नेऊन उभे केले होते. त्याआधी त्यांनी नासाची शिष्यवृत्ती मिळवून प्रिंस्टन युनिव्हर्सिटी मधून प्रोफेसर क्रोको यांच्या मार्गदर्शनाखाली 'लिक्विड रॉकेट प्रोप्लशन प्रणाली' या विषयावर आपला थेसीसी पूर्ण केला. जो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधीत लागतो तो नंबी नारायणन यांनी फक्त दहा महिन्यात पूर्ण केला. आणि विशेष म्हणजे तेव्हा आपल्या देशात सॉलिड रॉकेट प्रोप्लशन प्रणाली सुद्धा पूर्णपणे विकसित झाली नव्हती. देशासाठी नासाची करोडो रूपयांची नौकरी आणि ऐश्वर्यसंपन्न जीवन नाकारून पुन्हा इस्रोमध्ये रुजू होऊन प्रतिकूल परिस्थितीत "विकास इंजिन" तयार करण्याचा हा त्यांचा संपूर्ण प्रवास चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे चित्रित केला गेला आहे. 

'कोणताही देश तोपर्यंत महान नाही राहू शकत जोपर्यंत त्याला महान बनवणाऱ्या लोकांची कदर केली जात नाही.' हा नंबी नारायणन यांचा संवाद थेट आपल्या काळजाला भिडतो. त्यांच्या आयुष्यात ज्या पद्धतीने देशद्रोहाचे वादळ उठवले गेले. ज्यामुळे त्यांच्या जीवनाला, कुटुंबाला जो तडाखा बसला त्यातून सारवण्याचा प्रयत्न करतानाचे दृश्य पाहताना  आपल्या मनात चीड निर्माण होते. ज्यांनी देशाला महान बनविण्यासाठी सर्वोच्च त्याग केला, कुटुंब वैयक्तिक आयुष्य याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. त्याचा असा मोबदला त्यांना का मिळावा या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात आपण हरवून जातो. 

'मुसळधार पाऊस सोबत मानसिक व शारीरिकरीत्या खचलेली आजारी पत्नी. अशा पावसात दवाखान्यात जाण्यासाठी रिक्षा मिळवण्यासाठी धडपडणारा वृद्ध नायक. तेवढ्यात एक रिक्षा थांबते दोघे त्यात बसतात थोडेच अंतर पुढे जातात तेवढ्यात ते कोण आहेत हे लक्षात येताच त्यांना रिक्षातून बाहेर रोडवर फेकले जाते. आपली लुंगी सांभाळत आपल्या पत्नीला आधार देत पुन्हा वाहन मिळवण्याची धडपड सुरू होते. आणि कॅमेरा या दोघांच्या मागे रोडला लागून असलेल्या तिरंग्यावर थांबतो.' संवादाविना कॅमेऱ्याच्या माध्यमातून या सीनममध्ये जे काही मांडलंय ते थेट आपल्या काळजाला भिडतं आणि आपोआप डोळ्यात अश्रू अनावर होतात.

आर माधवन यांनी उभा केलेला महत्वकांक्षी शास्त्रज्ञ, वेळेत मिशन पूर्ण करण्यासाठी प्रसंगी आपल्या  माणसांना दुखवुन वाईटपणा घेणारा प्रोजेक्ट लीडर, कठीण परिस्थितीत कुटुंबासाठी ढाल बनून लढणारा कुटुंबप्रमुख आणि हार न मानता अन्यायाच्या विरोधात उभे राहून आपली बाजू  मांडणारा लढवय्या हा आपल्या मनात घर करून जातो. हे पात्र साकारण्यासाठी अभिनेता म्हणून आर माधवणने घेतलेली मेहनत पडद्यावर प्रकर्षांने जाणवते. संपूर्ण चित्रपटात माधवन आपल्याला कुठेही दिसत नाही इतका तो नंबी नारायणन या भूमिकेशी एकरूप झाला आहे. सोबतच दिग्दर्शनाची जबाबदारी ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे पार पाडली आहे. एकूणच संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत कौतुकास्पद ठरते.

प्रत्येकाने पहिला पाहिजे असा हा चित्रपट आहे. विशेषतः शालेय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तर हा चित्रपट आवर्जून पहिला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत देशाला सर्वोच्च शिखरावर पोहचविण्याची प्रेरणा त्यांना नक्कीच यातून मिळेल.

नंबी सरांना सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्त केले. पद्मभूषण या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. पण खरे दोषी कोण आहेत? हे षडयंत्र का रचण्यात आले? या प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरीतच आहेत. करोडो लोकं देशात जन्मतात आणि मरतात परंतु असे काहीच लोक असतात ज्यांच्यामुळे देश अधिक महान बनतो त्यामुळे अशा लोकांच्या पाठीशी देशाने आणि जनतेने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आधुनिक भारताचे जे खरे हिरो आहेत त्यांना व्हिलन का ठरवलं गेलं आणि याच्या मुळाशी कोण आहे याचा शोध आपल्या देशाने घेणे गरजेचे आहे.



Sunday, July 10, 2022

धर्मांधतेमूळे हिंदुस्तानाचे खूप मोठे नुकसान झाले - भगत सिंग


                           Image source - amazon.in

'विविधतेत एकता' ही जी आपल्या देशाची प्राचीन काळापासूनची ओळख आहे ती सांप्रदायिक दंगलींमुळे कलंकित होत आहे. धार्मिक द्वेश राष्ट्रीय एकात्मतेस बाधा ठरत आहे. धार्मिक, राजकीय आणि आर्थिक स्वार्थासाठी लोकांना धर्माच्या नावाने एकमेकांच्या विरोधात उभे केले जात आहे. राजकारण्यांकडून सांप्रदायिक दंगलींचा उपयोग सत्ता काबीज करण्यासाठी केला जाणे ही बाब आपल्या देशासाठी नवी नाही, स्वातंत्र्याच्या आधीपासून तसे प्रयत्न सुरू असल्याचे इतिहासात आपल्याला दिसून येते. सत्ता मिळविण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी सध्या राजकीय पक्ष व  नेत्यांकडून ज्या पद्धतीने धर्माचा वापर केला जात आहे आणि ज्या प्रकारे या कामी पत्रकारितेचा ही उपयोग करून घेतला जात आहे. ते पाहता शहिद भगत सिंग यांचे याबाबतचे विचार आजही आपल्यासाठी किती उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत हे समजून घेणे गरजेचे ठरते. 

जून १९२८ मध्ये 'किरती' या हिंदी वृत्तपत्रात भगत सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांचा "सांप्रदायिक दंगे और उनका इलाज" हा लेख प्रकाशित झाला होता. त्यात त्यांनी याबाबतचे आपले क्रांतिकारी विचार मांडले आहेत. 

सांप्रदायिक दंगलींचा देशावर कसा परिणाम होतो हे सांगताना ते म्हणतात, सांप्रदायिक दंगलींमुळे भारत देशाची सध्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. एका धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माचे कट्टर शत्रू बनले आहेत. एका धर्माचं असणं म्हणजे दुसऱ्या धर्माचा शत्रू असण्यासारखे आहे यावर विश्वास बसत नसेल तर आताच लाहोर येथे झालेल्या हिंदू मुस्लिम दंगली पहा. यामध्ये केलेल्या कत्तली समोरची व्यक्ती दोषी आहे म्हणून नाही तर ती फक्त दुसऱ्या धर्माची आहे म्हणून  करण्यात आल्या. कोणाचा जीव घेण्यासाठी तो आपल्या पेक्षा वेगळ्या धर्माचा असणं हे कारण पुरेसं होतं. अशा परिस्थितीत हिंदुस्थानाचं भवितव्य अंधारमय दिसून येते. या धर्मांमूळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे आणि अजून माहीत नाही या सांप्रदायिक दंगली देशाचा पिच्छा कधी सोडणार ते. या दंग्यांमुळे संपूर्ण जगात भारताची बदनामी होत आहे. या धर्माच्या अंधविश्वासात सगळेच वाहत जात आहेत. एखादाच आपलं डोकं शांत ठेवून यापासून वेगळा राहतो. बाकी सगळे धर्माच्या नावाने हातात लाठ्या काठ्या हत्यारं घेऊन आपसात लढून मरतात. 

सांप्रदायिक दंगलींसाठी कोण जबाबदार आहेत हे सांगताना ते म्हणतात,
या दंगलींसाठी सांप्रदायिक नेते आणि वृत्तपत्रे जबाबदार आहेत. ज्या नेत्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली होती आणि जे 'समान राष्ट्रीयता' व 'स्वराज्य - स्वराज्य' च्या गोष्टी करत होते ते सर्व आता लपून बसले आहेत नाही तर धर्मांधतेच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. जे नेते सगळ्यांचा भलं व्हावं असा विचार करतात ते खूपच कमी आहेत. आणि सांप्रदायिकतेचा एवढा भीषण पुर आलाय की त्याला रोखण्यास हे ही असमर्थ ठरत आहेत. भारताच्या नेतृत्वाला कोणी वालीचं उरला नाही असं वाटतंय. पत्रकारितेचा व्यवसाय एकेकाळी उच्च दर्जाचा समजला जात होता. जो आज गलिच्छ बनला आहे. हे लोक एकमेकांच्या विरोधात मोठया मोठ्या अक्षरातले शीर्षक देऊन लोकांच्या भावना भडकवतात. एक दोन ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी स्थानिक वृत्तपत्रांच्या उत्तेजनापूर्ण लेखांमुळेच दंगली उसळल्या. असे पत्रकार खूप कमी आहेत जे अशा परिस्थितीत आपलं डोकं आणि मन शांत ठेवून काम करतात. वृत्तपत्रांचं खरं कर्तव्य हे शिक्षा देणे, सांप्रदायिक भावना दूर करणे, बंधुभाव वाढवणे आणि भारताची राष्ट्रीयता वाढवणे असे असताना त्यांनी प्रामुख्याने अगदी याच्या उलट काम करणे हेच आपले कर्तव्य मानले आहे. हेच कारण आहे की भारताच्या वर्तमान स्थितीचा विचार करून डोळ्यातुन रक्ताचे अश्रू  येतात आणि मनात प्रश्न निर्माण होतो, भारताचं काय होणार?

संप्रदायिक दंगलींचे मुळ जर शोधलं तर लक्षात येतं की, आर्थिक परिस्थितीच यासाठी जबाबदार आहे. विश्वात जे काही काम चालतं त्याच्या मुळाशी पोटाचा प्रश्न हा असतोच, कार्ल मार्क्सच्या मुख्य तीन सिद्धांतांपैकी हा एक महत्वाचा सिद्धांत आहे. आर्थिक दुर्बलतेमुळेच आपली अशी दुर्दशा झाली आहे. 

सांप्रदायिक दंगलींच्या उपायांवर बोलताना ते म्हणतात, यावर जर काही उपाय असेल तर तो भारताच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणे हाच एक उपाय आहे. असे असले तरी भूख आणि दुःख यासमोर माणसाला सगळ्या सिद्धांताचा विसर पडतो. त्यामुळे सद्यस्थितीत भारताची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे अवघड आहे. कारण सरकार विदेशी आहे जे लोकांची आर्थिक सुधारणा होऊ देत नाही. यासाठी लोकांनी हाथ धुवून यामागे लागले पाहिजे आणि जोपर्यंत विदेशी सरकार बदलत नाही तोपर्यंत स्वस्थ नाही बसलं पाहिजे. लोकांना एकमेकांसोबत लढण्यापासून थांबविण्यासाठी 'वर्ग-चेतनेची' (class consciousness) गरज आहे. गरीब, कामगार आणि शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की त्यांचे खरे शत्रू हे भांडवलदार आहेत. त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. जगातील सर्व गरिबांचे अधिकार एकच आहेत मग ते कोणत्याही जातीचे, धर्माचे, रंगाचे, राष्ट्राचे अथवा पंथाचे असो. सगळे भेदभाव विसरून एकत्रित येऊन सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणे यातच तुमचे हित आहे. असे करण्याने तुमचे नुकसान तर काही नाही होणार पण एक दिवस तुमच्या गुलामीच्या बेड्या तुटून आर्थिक स्वातंत्र्य जरूर मिळेल. 

ज्यांना रुसचा इतिहास माहिती आहे त्यांना त्यावेळेसची जार (त्यावेळेसचा सम्राट) असतानाची  स्थिती ही अशाच प्रकारची होती हे ठाऊक असेल. पण जेव्हापासून तेथे श्रमिक वर्गाचे शासन प्रस्थापित झाले तेव्हापासून तिथले संपूर्ण चित्रच बदलून गेले. तिथे आता कधीही दंगली होत नाहीत. तिथे आता सगळ्यांना माणुसकीची वागणूक दिली जाते. जारच्यावेळेस लोकांची आर्थिक स्थिती अतिशय खराब होती. त्यामुळे तिथे दंगली होत होत्या. त्यांच्यात वर्ग-चेतनेची निर्मिती झाल्यामुळे हा बदल घडला. आता तिथे दंगली झाल्याचे ऐकायला मिळत नाही. कलकत्ता येथे झालेल्या दंगलीत तेथील ट्रेड युनियनचे कामगार  सहभागी झाले नाहीत कारण त्यांच्यामध्ये वर्ग-चेतना निर्माण झाली आहे. त्यांना त्यांच्या वर्गाचे हित कशात आहे हे समजले आहे. वर्ग-चेतनेच्या या सुंदर मार्गानेच संप्रदायिक दंगली थांबू शकतात. 

१९१४-१५ मधील शाहिदांनी धर्माला राजनीति पासून वेगळे ठेवले होते. धर्म ही माणसाची वैयक्तिक बाब आहे असे ते मानत होते. त्यामुळेच गदर पार्टी सारख्या संघटना एकजूट आणि एकजीव राहिल्या, ज्यामध्ये शीख हिंदू आणि मुस्लिम बरोबरीने फासावर चढले. सध्या काही भारतीय नेते आहेत ज्यांना धर्माला राजनीती पासून वेगळे ठेवायची इच्छा आहे.  भांडण मिटविण्याचा हा सुद्धा एक चांगला मार्ग आहे ज्याचे आम्ही समर्थन करतो. जर धर्माला वेगळं केलं तर राजनीतिसाठी आपण सर्वजण एकत्र येऊ शकतो आणि धर्माच्या बाबतीत आपण वेगवेगळे  राहू शकतो. भारताबद्दल ज्यांना खरी सहानुभूती आहे ते नक्कीच आम्ही सांगितलेल्या 
उपायांबाबत विचार करतील आणि सध्या जो आत्मघात होत आहे त्यापासून सगळ्यांना वाचवतील. 

हा लेख जरी त्यावेळेसच्या परिस्थिती वर लिहलेला असला तरी त्यातील विचार हे आजही जसेच्या तसे लागू पडतात. अजूनही भारतातील कष्टकऱ्यांची आर्थिक स्थिती फारशी बदललेली नाही. सरकार जरी विदेशी नसले तरी ते भांडवलंडदारांसाठीच काम करत आहे. त्यांचेच हितसंबंध जोपासत आहे. कामगारांचे अधिकार कमी करणारे कायदे करून त्यांचे खच्चीकरण करीत आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे न राहता व्यपाऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेत आहे. त्यामुळे श्रमिक वर्ग अजून गरीब आणि व्यापारी वर्ग अजून श्रीमंत होत चालला आहे. महत्वाचे म्हणजे संवैधानिक दृष्टीने जरी भारत धर्मनिरपेक्ष झाला असला तरी धर्मांधतेची कीड समूळ नष्ट झालेली नाही.

आता पर्यंत सत्तेत आलेल्या सर्व सत्ताधाऱ्यांनी शाहिद भगत सिंग यांचे नाव व फोटो सत्ता मिळविण्यासाठी व ती टिकविण्यासाठी सातत्याने वापरले. पण सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांच्या विचारांप्रमाणे वागताना अजूनपर्यंत दिसले नाहीत. भगत सिंग यांना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य अजून आपल्या देशाला मिळालेले नाही. ते मिळविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन त्यांचे विचार कृतीत उतरविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना भाग पाडणे अंत्यत गरजेचे ठरते.



स्रोत - मूळ हिंदी लेखाची लिंक : 
https://www.marxists.org/hindi/bhagat-singh/1928/sampradayik-dangen.htm

 





Sunday, July 3, 2022

तथागतांच्या धम्माची शिकवण - पालि भाषेतुन




तथागत गौतम बुद्धांनी भिक्खू संघाला आणि जनसामान्यांना जो धम्मोपदेश केला तो पाली भाषेत कारण त्याकाळातील सर्वसामान्यांची भाषा ही पालीच होती. पालि भाषेत भगवान बुद्धांच्या धम्माचे वर्णन, “स्वाक्खातो भगवता धम्मो  सन्दिट्ठिको अकालिको एहि पस्सिको ओपनाय्यिको पच्चतं वेदितब्बो विञ्ञूहीति" असे केलेले आहे.

"स्वाखातो" म्हणजे उत्तम प्रकारे शिकविला गेलेला किंवा उत्तम प्रकारे विदित केलेला असा होतो. भगवान बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना जी शिकवण दिली ती त्रिपिटक या ग्रंथात संग्रहित केली गेली आहे. त्रिपिटकाचे जवळजवळ ४५ खंड आहेत. त्यात नाना प्रकारच्या लोकांना नाना तऱ्हेने दिलेली शिकवण आढळून येते. भगवान बुद्धांनी नीतिमत्तेची, मानसिकतेची, आध्यात्मिक जीवनाबद्दलची तसेच राजकीय जीवनाबद्दलची सुध्दा शिकवण दिलेली आहे. भगवान बुद्ध एखाद्या गोष्टीचा खुलासा सर्वसाधारणपणे सारांशरूपाने करीत असत, तरी कधी कधी गोष्टींच्या रूपाने झाडांची, फुलांची, प्राण्यांची आणि सर्वसाधारण मनुष्याच्या जीवनातील प्रसंगांची सुंदर उदाहरणे देऊन करीत असत. बुद्धधम्मासाठी कुठलीही एखादी विशिष्ट भाषा पवित्र मानली गेली नाही. त्यांचा संदेश प्रत्येक मनुष्यापर्यंत जाऊन पोहोचावा अशीच तथागतांची उत्कट इच्छा असायची. याच कारणास्तव भगवान बुद्धांच्या धम्माला “स्वाक्खातो" असे म्हटले आहे.

भगवान बुद्धाचा धम्म “सन्दिट्ठिको” आहे. याचा अर्थ असा की, भगवान बुद्धाच्या धम्माचे आचरण केले तर त्याचे परिणाम सुध्दा स्वत:च्या डोळ्याने ह्याच जन्मात पाहावयास मिळतात.

पुढचा शब्द आहे “अकालिको,” याचा अर्थ कालाचे बंधन नसलेला असा आहे. 

“एहि पस्सिको” म्हणजे या आणि पहा. येथे अंधश्रध्देला मुळीच वाव नाही.

भगवान बुद्ध म्हणत की "मी एक मनुष्यमात्र आहे. मला एक विशिष्ट प्रकारचा अनुभव प्राप्त झाला आहे. म्हणून मी जे म्हणतो ते ऐकून घ्या. त्याकडे अगदी डोळसपणे आणि बारकाईने लक्ष द्या. एवढेच नव्हे तर ते बरोबर आहे की नाही याची सुध्दा प्रत्यक्ष खात्री करून घ्या" भगवान बुद्धांनी सांगितले आहे की, “जसा सोनार, सोन्याची परीक्षा सोने अम्नीत टाकून करतो, त्याचप्रमाणे माझा प्रत्येक शब्द तावून सुलाखून घ्या. "धम्म हा "ओपनायिको आहे. म्हणजे तो प्रगतिशील आहे.

शेवटची ओळ आहे "पच्चतं वेदितब्बो विञ्ञूहीति" याचा अर्थ असा की, भगवान बुद्धांच्या शिकवणीचा अनुभव प्रत्येक प्रज्ञावान माणसाने स्वतःच घ्यायला हवा. भगवान बुद्ध हे केवळ एक मार्गदाते आहेत. मोक्षदाते नाहीत. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने चालण्याचे काम प्रत्येकाने स्वतःच केले पाहिजे." 

असा हा सर्वसामान्य जनतेला समजेल अशा भाषेत समजावून सांगितलेला, ह्याच जन्मात फल देणारा, कालाचे बंधन नसलेला, शास्त्रीयदृष्ट्या तपासणी करून घेता येण्याजोगा प्रगतिशील आणि स्वत:चा मार्ग स्वतःच चालण्यास सांगणारा धम्म.

भगवान बुद्धांनी प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री या सद्गुणांवर आपल्या धम्मोपदेशा विशेष भर दिला. भगवान बुद्धांच्या उपदेशाचे सार खालील एका श्लोकांत सापडते.

सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा। सचित्त परियोदपनं एतं बुद्धांन सासनं ।।

(सर्व पापांपासून विरत होणे, सर्व कुशलांचा संचय करणे आणि स्वचित्ताचे संशोधन करणे हे बुद्धांचे अनुशासन होय.)


संदर्भ : १) "बुद्धयान" - महास्थविर संघरक्षित (ऑगस्ट ८१)

           २) "महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास" - मा. शं. मोरे

Friday, July 1, 2022

विठ्ठल मंदिर - प्राचीन बौद्ध विहार




प्रत्यक्ष बुद्धांचे नाव न घेता महाराष्ट्रातील साधुसंतांनी बुद्धांचीच शिकवण प्रामुख्याने आपल्या काव्यातून, अभंगांतून, ओव्यातून आणि भारुडांतून दिली आहे. ह्या साधुसंतात सोनार, कुंभार, महार, शिंपी, माळी, ब्राह्मण, वाणी इत्यादी सर्व थरांतील लोक होते.

पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे बुद्धच आहे, असे अनेक विद्वांनानी पुराव्यासहित सिध्द केले आहे. महाराष्ट्रातून बुद्धधम्माचा लोप झाल्यावर अनेक बौद्ध विहार लेणी, बौद्ध धार्मिक स्थळे इत्यादींचे हिन्दूकरण करण्यात आले. हल्लीचे पंढरपुरचे विठ्ठलाचे मंदिर हे एक त्यातील प्रमुख उदाहरण आहे. संत एकनाथ बुद्धालाच विठ्ठल मानताना म्हणतात -

लोक देखोनि उन्मत्त दारांनी आसक्ता

न बोले बौद्ध रूप ठेवीले जघनी हात ॥ १॥ 

संत तया दारी। तिष्ठताती   निरंतरी । 

पुंडलिकासाठी उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ।।

 बौद्ध अवतार  घेऊन ।विटे समचरण ठेऊन ॥ २॥


पुढे एकनाथ म्हणतात-

धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी । 

या लागे बौद्ध रुपे पंढरी नांदसी ॥


संत तुकाराम महाराजसुध्दा विठ्ठलाला बुद्धच समजतात. ते म्हणतात-

बौद्ध अवतार माझिया अदृष्टा ।

मौन्य मुखें निष्ठा धरियेली ॥

हे संतश्रेष्ठच जर विठ्ठलाला बुद्ध म्हणतात तर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बौद्धांचाच विहार होता हे सिध्द करण्यास आणखी पुराव्याची गरज काय? सुप्रसिध्द पाश्चात्य पंडित जॉन विल्सन आपल्या "मेमॉयर ऑन दि केव्ह टेपल" ह्या ग्रंथात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बौद्ध असल्याची साक्ष देतो. मंदिराच्या सभामंडपात दगडी खांबावर ध्यानस्थ बुध्दाच्या कोरीव मूर्ती आढळतात. जेंव्हा कोणताही मनुष्य वारकरी संप्रदायात प्रवेश करतो तेंव्हा त्याला (१) मी प्राण्यांची हिंसा करणार नाही. (२) मी चोरी करणार नाही. (३) मी व्यभिचार किंवा परस्त्रीगमन करणार नाही. (४) मी खोटे बोलणार नाही. (५) मी दारु पिणार नाही; अशी शपथ घ्यावी लागते. ही शपथच तर बौद्धांचे पंचशील किंवा सदाचरणाचे पाच नियम आहेत. बुद्धधम्मात प्रवेश करताना हीच शपथ सर्वप्रथम घ्यावी लागते. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील लोक निदान पंढरपुरापुरते तरी जातीचे बंधन म्हणजे उच्चनीच भाव व स्पृश्यास्पृश्य भेद मानीत नाहीत. जातिभेद नष्ट करणे हा तथागतांच्या शिकवणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पंढरपूरची यात्रा आषाढी पौर्णिमेला भरते. बुद्धधम्मात आषाढी पौर्णिमेला जास्त महत्त्व दिले जाते, कारण त्या दिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खूंना आपले पहिले प्रवचन देऊन धर्मचक्रप्रवर्तन केले. विठ्ठल पीतांबरधारी आहे म्हणजे पिवळे वस्त्र धारण करणारा आहे. बौद्ध भिक्खूंसाठी आणि स्वतःसाठी पिवळे वस्त्र धारण करण्याचा नियम तथागतांनी केला होता. 

श्री. वासुदेव गोविंद आपटे आपल्या ग्रंथात म्हणतात, "विठोबाची मूर्ती व खडकावर कोरलेल्या बौद्धमूर्ती, यांच्या स्वरूपातील सादृश्य व विठोबा-रखुमाई यांची पृथक पृथक मंदिरे आणि गोपालकाल्याच्यावेळी जातिभेदाला मिळणारा फाटा या गोष्टी ब्राह्मणधर्मी सांप्रदायिक पध्दतीला सोडून आहेत. यावरून तेही क्षेत्र मूळचे बौद्धांचे असावे व बौद्ध धर्माचा -हास झाल्यावर ब्राह्मणधर्माने त्या मूळच्या बौद्ध पद्धतीचा आपल्या धर्मात समावेश करून घेतला असावा असे दिसते.

२५ डिसेंबर १९५४ रोजी देहू रोड येथील बुद्ध मंदिरात भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बाबासाहेबांच्या हस्ते करण्यात आली. त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, तुम्ही पंढरपूरला जाता, पांडुरंगाचे अभंग म्हणता. पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल कोण होता यावर हुज्जत चालू आहे. पण माझा त्यांना खडा सवाल आहे की, विठ्ठलाची भानगड सोडून देऊन पंढरीचा पांडूरंग कोण ? याचे पहिल्यादा उत्तर द्या. तो होता कुठे ? त्याला पळविलं कोणी ? कोणी डुबविलं ? पांडूरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी त्यांना सिद्ध करून देईन. पुंडलीक या शब्दापासून पांडूरंग हा शब्द झाला. पुंडलीक याचा अर्थ कमळ. बौद्ध धर्मात मूर्तीपूजा नव्हती. अज्ञानी लोकांना तत्त्वज्ञान काय कळे! कमळाला पाली भाषेत पांडूरंग असे म्हणतात. तुम्हाला भुलविण्यासाठी ब्राह्मणांनी बुद्धाच्या नावाचा लोप केला. मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी ही पांडव लेणी असल्याचे सांगतात. इकडे पांडव कशाला आले होते ? पांडव दिल्लीच्या बाहेर ८० मैलाच्या पलिकडे गेले नाहीत. त्यांनी अलवार स्टेटमध्ये पंधराशे लेणी खोदली कशी ? त्यांच्याजवळ टिकास नव्हती की पावडं नव्हतं. भगवान बुद्धाने सांगितले की ' ये आणि पाहा ! मी सांगतो म्हणून तुम्ही हा धर्म घ्यावा असे नाही. तुझी अविद्या नाहिशी झाली तरच तू या धर्माचा स्वीकार कर.



संदर्भ : 

१) " मराठी साहित्यावर बौद्ध धम्माचा प्रभाव" - डॉ. भाऊ लोखंडे.

२) "धर्मपद" - अनंत रामचंद्र कुलकर्णी.

३) "बौद्धपर्व" - वा. गो. आपटे.

४) "डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३"


(अतिक्रमित प्राचीन बौध्द स्थळाची माहिती  करून देणे हा या ब्लॉगचा उद्देश आहे. या वास्तू प्राचीन काळात बौद्धांच्या होत्या त्यांनी निर्माण केल्या होत्या म्हणून त्यावर आता फक्त त्यांचाच अधिकार असावा असे मात्र नाही त्या संपूर्ण देशाच्या आहेत. त्याचे मूळ स्वरूप जपले गेले पाहिजे. ज्या वास्तू ज्या स्वरूपात होत्या त्या त्याच स्वरूपात स्वीकारणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. फक्त धर्मग्रंथांच्या आधारे किंवा कथांच्या माध्यमातून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींवर निर्भर न राहता पुरातत्वीय पुरावे, शिलालेख, वास्तुकला, शिल्पकला, त्याकाळातील राज्यकर्त्यांची उपलब्ध साधने या सर्वांच्या आधारे अशा प्राचीन वास्तूंचे मूळ स्वरुप तपासून आपण स्वीकारले पाहिले पाहिजे)