अभ्यासाबद्दल काही लिहायचं म्हणजे सुरुवातीलाच अभ्यास केल्यानंतर आपण कुठपर्यंत मजल मारू शकलो हे सांगणं गरजेचं आहे. जेणेकरून वाचणार्यांना एकूण लिखाणाचा आवाका लक्षात यावा म्हणुन थोडेसे स्वतः बाबत, तर माझे सर्वोच्च शिक्षण म्हणजे मास्टर्स इन सिग्नल अँड सिस्टम. डिग्री इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन मध्ये आणि डिप्लोमा इलेक्ट्रिकल विभागात. डिप्लोमा कॉलेजचा दहा वर्षे शिकवणचा आणि दोन वर्षे विभागप्रमुख म्हणून अनुभव. यादरम्यान तीनवेळा बेस्ट टीचर पुरस्कार मिळाला, विविध इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट मध्ये काम केलं, अवघड विषयांचा शंभर टक्के निकाल लावला वैगेरे वैगेरे. यासोबतच एक लेखक, सर्टिफाईड गिर्यारोहक, पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या नोंदणीकृत संस्थेचा अध्यक्ष आणि सध्या स्टॉक मार्केट मध्ये यशस्वीपणे ट्रेडिंग करणारा ट्रेडर अशी माझी ओळख आहे. मला वाटतं माझ्या गोष्टीं सोबत वाचकांना जोडण्यासाठी इतकी माहिती पुरेशी आहे. पुढे प्रसंगानुसार आणखीन खुलासेवार गोष्टी येतीलच. शाळा, डिप्लोमा कॉलेज, डिग्री आणि पुढचे शिक्षण असा अभ्यासाचा प्रवास यामध्ये मांडणार आहे. हे लिहिण्याचे कारण असं काहीसं विशेष नाही पण आपण तेव्हा जगलेला काळ पुन्हा एकदा नव्याने अनुभवावा हाच मुख्य हेतू. एखाद दुसर्याला यातून थोडीशी शिकण्याची प्रेरणा वैगरे मिळाली तर उत्तमच.
बाबासाहेबांच्या विचारांचा मोठा प्रभाव असल्याने आपलं शिक्षण जरी जेमतेम झालं असलं तरी आपल्या पोरांनी खूप शिकलं पाहिजे. त्यासाठी जे काही करावं लागेल ते करायचं अशी पक्की खुणगाठ माझ्या आई वडिलांनी मनाशी बांधली होती. त्यामुळेच लहानपणापासूनच माझ्या, लहान बहीण व भावाच्या अभ्यासाच्या बाबतीत ते खूप दक्ष होते. शाळेला नियमित आणि वेळेवर पाठवणे, शिक्षकांच्या संपर्कात राहून वेळोवेळी अभ्यासातील प्रगतीची माहिती घेणे, घरी अभ्यास करून घेणे ईत्यादी गोष्टींना त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. दोन दशके अहोरात्र परिश्रम करून आम्हाला उच्चशिक्षित केले. त्यावेळेस अल्प शिक्षित असून सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी जे शहाणपण दाखवले त्यामुळेच आज आम्ही घडलो. आमच्या घरातून पहिला इंजिनियर मी झालो. यामागे आजी आजोबा पासून ते सर्वच नातेवाईकांचे अतिशय मोलाचे योगदान मला लाभले. त्याचीही माहिती प्रसंगानुरूप पुढील लिखाणात येणारच आहे.
चला तर मग सुरवातीपासून सुरू करतो. आताच्या अतिफास्ट लहान मुलांप्रमाणे नर्सरी किंवा छोट्या गटा पासूनच ऐ फॉर ॲपल आणि बी फॉर बॉलचा लक्षात रहाण्याजोगा अभ्यास तेव्हा नसायचा त्यामुळे तेव्हाचं जास्त काही ध्यानात येत नाही. पण बालवाडी पासूनच घरच्यांनी शाळेला जायची गोडी निर्माण केली होती. शाळेला जाण्यासाठी नाही म्हंटलेलं किंवा रडून दंगा केलेलं मला नाही आठवत. त्याबाबतीत शिक्षकांची ही कधी ही तक्रार नव्हती. माझी मुलगी ही तशीच आहे. एखाद्या दिवशी काही कारणामुळे शाळा नको म्हंटलं तर रडायला सुरुवात करते तेव्हा माझी आई म्हणते, बापासारखाच उल्हास आहे पोरीला बी शाळेत जायचा. बालवाडी ते तिसरी पर्यंतच्या ओझरत्या आठवणी आहेत. या ओझरत्या आठवणीत ही एक व्यक्ति जी ठळकपणे डोळ्यासमोर उभी राहते त्या म्हणजे वाघदरीकर मॅडम. त्या खूप प्रेमळ होत्या. हसत खेळत शिक्षण हीच त्यांची शिकण्याची पद्धत होती त्यामुळे त्या सगळ्यांच्याच आवडत्या होत्या. माझ्याच नाही तर माझ्या सर्व वर्गमित्रांच्या ही या मॅडम अजून लक्षात आहेत. चौथी पर्यंत माझी अभ्यासाची प्रगती चांगली होती. शिक्षकांच्या आवडत्या विद्यार्थ्यांमध्ये नाव असायचं. आणि वर्गात पहिल्या दहा मध्ये माझा नंबर यायचा. पुढे शाळा संपेपर्यंत हा क्रम काही चुकला नाही. अभ्यासाची सुरवात खर्या अर्थाने लक्षात येते ती म्हणजे चौथी पासूनच्या. कारण तेव्हापासूनच माझा पहाटेच्या अभ्यासाची सुरवात झाली होती. चतुराबाई श्राविका विद्यालय हे शाळेचं नाव, वर्ग, तुकडी आणि वेगवेगळ्या विषयांची नावे वह्यांवर स्वतः स्वतः लिहायची सुरवात ही याच वर्षापासुन झालेली.
पहाटेचा अभ्यास चांगला लक्षात राहतो या वाक्याला या घडीला तितकसं महत्त्व उरलेलं नाही पण त्यावेळी ते एक प्रमाण मानलं जाणारं वाक्य होतं. माझ्या आई वडिलांवर ही या वाक्याचा चांगलाच प्रभाव होता. आणि हा प्रभाव असण्याचं महत्त्वाचे कारण म्हणजे माझा मिलिट्री मध्ये असलेला मामा. विजू मामा. मिलिट्रीत असल्याने ते कडक शिस्तीचे होते. त्यामुळे आम्हा मुलांवर त्यांचा दरारा होता. ते घरी आले की घराला ही छावणीचे स्वरूप यायचे. सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध पद्धतीने व्हायच्या. जम्मू काश्मीर, आसाम अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंगला असताना ते गावाकडे जाण्याआधी सोलापूरला यायचेच मग गावाकडे जायचे. आणि घरी आले की माझ्या अभ्यासाची आवर्जून चौकशी करायचे. विशेषकरून इंग्रजीच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. इंग्रजी शब्दांचा अर्थ विचारणे, त्यांच्या कडे असलेल्या कार्ड किंवा कागदांवरील इंग्रजी वाक्ये मला वाचायला लावायचे. आणि मला ते जमतंय हे बघून एकदम खुश व्हायचे अन शाबासकी द्यायचे. उजल (आईचे नाव उज्ज्वला मामा उजल म्हणायचे) आणि भाऊजी पुढं याला काय मोठं बनवायचं असेल तर आतापासूनच मेहनत घ्यावी लागेल. रोज सकाळी पहाटे उठून अभ्यास करायची सवय लावली पाहिजे असे ठणकावून सांगत. आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या जातात का नाही याचा फॉलोअप पण घेत त्यामुळे आई वडिलांनी ही मनावर घेऊन ही गोष्ट माझ्या अंगवळणी पडावी म्हणून विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली होती.
आमचा आजी आजोबांनी बांधलेला पाच खोल्यांचा वाडा होता. वाडा म्हणजे गावाकडे पारंपरिक पद्धतीने बांधला जातो तसा नव्हे तर पत्र्याचे छत आणि मातीत बांधलेल्या दहा पंधरा फुटाच्या पाच खोल्या होत्या. आयताकृती जागेत समोरासमोर एकीकडे तीन आणि एकीकडे दोन असं या खोल्यांचं विभाजन होतं. मध्ये मोकळं आंगण होतं आणि दोन्ही बाजूला मोठे दरवाजे होते. अशा प्रकारे जुन्या वाड्यांशी मेळ खाणारी रचना असल्यामुळे सगळे याला बनसोडेचा वाडा म्हणायचे. यामध्ये आजी आजोबा, काका काकू, आणि आम्ही पाच एकत्रित रहायचो. पुढे आजोबांनी एक भाडेकरू ही ठेवले. हे सांगायचे कारण म्हणजे यातल्याच एका खोलीत ज्यामध्ये आई वडील छोटे बहीण-भाऊ आणि मी रहायचो तिथेच लोखंडी खाटावर बांधलेल्या मच्छरदाणीत माझ्या पहाटेच्या अभ्यासाची सुरवात झाली.
तेव्हा अलार्मचे घड्याळ वैगरे आमच्याकडे नव्हते. मोठे क्वार्टझ कंपनीचे भिंतीवरील घड्याळ होते. त्यात बरोबर पाच वाजले की आई मला उठवायची. रात्री झोपायला उशीर झाल्याने, आजारी असल्याने किंवा इतर कोणत्या कारणामुळे त्यात आई कडून कधी खंड पडल्याचे मला आठवत नाही. अगदी अचूक वेळेवर तीला कशी जाग येते असा प्रश्न मला तेव्हा पडायचा. ज्याचे उत्तर नंतर मला कळाले, की मला उठविण्यासाठी ती पाच वाजण्याच्या आधीपासूनच जागी रहायची. मला दोन तीन हाका मारून झाल्यावर मी डोळे चोळत उठायचो. रात्रीच उशाला ठेवलेले पुस्तक डोळे मिटून चाचपडत घ्यायचो. सुरवातीचे काही दिवस ज्यांच्या ज्यांच्या सांगण्यामुळे मला पहाटे उठून अभ्यास करावा लागत होता त्यांना मनातल्या मनात शिव्या घालायचो. त्यानंतर मच्छर आत येऊ नये म्हणून सर्व बाजूने गादीच्या खाली खोवलेली मच्छरदाणी लाईटच्या बटनाच्या बाजूने उचकटून अलगदपणे बाहेर फक्त डोके आणि एक हात काढून टय़ूब लाईट लावायचो. स्वयंपाक खोली आणि टीव्हीची म्हणजेच जिथे आम्ही झोपायचो त्या दोन खोल्यात मिळून एकच टय़ूबलाईट होती. (दोन खोल्यांना जोडणारी जी मधली भिंत होती त्यामध्ये मधोमध वरती पत्र्याच्या जवळ यू आकाराची बांधकाम करताना जाणीवपूर्वक एक सांध केली होती. ज्यामध्ये टय़ूब लाईट अर्धी इकडे आणि अर्धी तिकडे अशी बरोब्बर फिट केली होती) टय़ूब लाईट खाटाच्या उलट्या दिशेला असल्याने आणि मच्छर दाणीत बसुन वाचत असल्याने अंधुक अंधुक दिसायचं. याचा एक फायदा व्हायचा, डोळ्यांवर ताण देऊन वाचावं लागत असल्यामुळे संपूर्ण लक्ष केंद्रित व्हायचं आणि झोप डोळ्यातून गायब व्हायची. पण जेव्हा जेव्हा मी पुस्तक न उघडताच फक्त बसून रहायचो तेव्हा डुलक्या खायचो तेव्हा लगेच खालच्या मच्छरदाणी मधून आईचा आवाज यायचा, वाचायला का नाही म्हणुन लगेच ताडकन डोळे उघडत रागाने वाचायलो की असं जोरात ओरडायचो. कधी एकदाचा एक तास संपतोय आणि मला परत झोपायला मिळतंय असं व्हायचं. सवय लागेपर्यंत याचा मला त्रास झाला पण नंतर खूप फायदा झाला. सुरुवातीला माझ्यामागे हा त्रास लावला म्हणुन मी ज्यांचा राग करायचो नंतर त्यांचेच मी मनोमन आभार मानू लागलो.
सकाळच्या शांत वातावरणात रोजच्या रोज शाळेत शिकवलेलं वाचायची सवय लागल्यामुळे अभ्यास अतिशय उत्तमरित्या व्हायला लागला. सोबतच सकाळच्या प्रसन्न वातावरणात मन ही प्रसन्न व्हायचे. पक्ष्यांचा किलबिलाट सवयीचा होत गेला. आमच्या घराला लागूनच कडुलिंबाचे झाड होते त्यावर सकाळी भरपूर पक्षी यायचे. विशेषकरून लिंबोळ्या असताना त्या खाण्यासाठी पोपटाची गर्दी व्हायची. परीक्षा सुरू झाल्यावर तर मी स्वतः एका हाकेमध्ये उठायचो आणि अंगणात बसून अभ्यास करायचो. त्याचवेळेला स्पीकर वरुन अजाणचा पुकारा सुरू व्हायचा. पुढे पुढे अजाणच्या आवाजाने माझ्यासाठी अलार्मचे काम केले. एकूणच यावेळी माझे संपूर्ण लक्ष जे वाचतोय किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यावर केंद्रित व्हायचे. त्यामुळे जबरदस्तीने सुरू झालेला अभ्यासाचा प्रवास हळू हळू माझ्या आवडणार्या गोष्टीत रूपांतरित झाला. सहावी सातवीतच इंग्रजी हा विषय माझ्या आवडीचा होण्यामागे या पहाटेच्या अभ्यासाचा वाटा खूप मोठा होता. माझ्या बालमनावर अभ्यासाचा संस्कार याच दरम्यान होत गेला आणि कालानुरूप दृढ होत गेला.
पुढे महिनाभरातच पहाटेचा अभ्यास माझ्या आवडीचा विषय बनला. यासाठी अजून एक महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे जास्तीच्या खाऊचा वाटा. वडील रोज रात्री रिक्षावरून घरी येताना आमच्यासाठी काहीना काही खायला घेऊन यायचे. बेकरीचे पदार्थ मस्का पाव, क्रीम रोल, बिस्किट, टोस्ट किंवा त्या त्या हंगामातील फळे असं काहीना काही आणायचेच. खाटाला लागूनच एका मोठ्या लाकडी पेटीवर आमच्या टीव्हीची जागा होती. पेटी मोठी असल्याने टीव्ही ठेवूनही जागा रिकामी असायची. तिथे वडिलांनी वाचलेले पेपर आणि रोज आणलेले खायचे पदार्थ ठेवले जायचे. सकाळी अभ्यासासाठी उठल्यानंतर टय़ूब लाईट लावताना मी सर्वात आधी आज काय खायला आणलंय हे बघायचो. वडील रात्री उशिरा म्हणजेच आम्ही झोपल्यावर यायचे त्यामुळे रात्री काय आणलेलं असायचं ते कळायचं नाही. पॅकिंग मध्ये नसलेले म्हणजेच जे पेपरबॅग मध्ये (आधी खारी किंवा टोस्ट वर्तमान पत्राच्या पेपर बॅग मध्ये द्यायचे) किंवा कॅरिबॅग मध्ये असायचं आणि जे उघडून खाल्यानंतर कमी झाल्याचे कुणाच्या लक्षात येणार नाही, असे पदार्थ मी अलगदपणे मच्छर दानीच्या आत घेऊन, पिशवी उघडून खाताना कसलाही आवाज होणार नाही याची काळजी घेत फस्त करायचो. आणि परत सगळं होतं तसं पॅक करून अभ्यासाला लागायचो. सकाळी छोटे बहीण-भाऊ यांच्या जोडीला बसून चहा सोबत खायच्या गोष्टी वाटून घेताना आपल्याला जास्तीचा वाटा मिळाला आणि यांना त्याची खबर ही नाही हे विचार करून मनातल्या मनात खुश व्हायचो. ज्यादिवशी काढून खाण्यायोग्य पदार्थ नसायचा त्यादिवशी मात्र माझा हिरमोड व्हायचा. अशाप्रकारे दहावीपर्यंत पहाटेच्या अभ्यासाचा आणि जास्तीच्या खाऊचा माझा क्रम चालूच राहिला. गमतीचा भाग सोडला तर दहावीपर्यंत वर्गात पाहिल्या दहा नंबर मध्येच टिकून राहण्यात आणि शाळेत हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविण्यात या पहाटेच्या अभ्यासाचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असे होते.
-क्रमशः
![]() |
शिशु वर्गाचे ओळखपत्र |