चौथी पर्यंत गृहपाठ किंवा घरचा अभ्यास जो दिला जायचा तो आई शाळेतून आल्यावर करून घ्यायची. आईचे शिक्षण गावाकडच्या शाळेत चौथी पर्यंत झालेले होते. गरजे पुरती आकडेमोड आणि लिहता वाचता तिला व्यवस्थित जमायचं त्यामुळे इथपर्यंत अभ्यास घेण्यात तिला जास्त अडचणी आल्या नाहीत. पाचवी नंतर अभ्यास अवघड असतो जास्त लक्ष द्यावं लागतं असं शाळेच्या मॅडम आईला आम्हाला घ्यायला आल्यावर सांगायच्या. तेव्हापासूनच आईच्या डोक्यात आता यांच्या अभ्यासाचं कसं हा प्रश्न ठाणमांडून बसलेला.
चौथी पर्यंत सकाळी वडील शाळेला सोडायचे घ्यायला आई यायची. आमच्या वर्गातील इतर मुलांनाही त्यांच्या आई घ्यायला यायच्या. त्यामुळे या सगळ्यांची बर्या पैकी ओळख झालेली. आमची शाळा सुटायची वाट पहात यांच्या गप्पा सुरू असायच्या. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात ही मुलांचा अभ्यास, ट्यूशन असेच विषय सुरू असल्याचे आईच्या बोलण्यावरून नंतर समजायचे.
शाळा सुटल्यावर पट्कन घरचा रस्ता धरायचा या घाईत आम्ही सगळे मित्र असायचो पण शाळेच्या पायऱ्या चढून बाहेर जाताना, फळ्यांजवळ डायर्या घेऊन घरचा अभ्यास लिहणाऱ्या पालकांची गर्दी दिसली की आपल्याला ही आजचा घरचा अभ्यास लिहायचा आहे हे ध्यानात यायचं आणि आपोआप आपल्या वर्गाच्या फळ्याजवळ जावून पाय थांबायचे. आई ही तिथेच थांबलेली दिसायची. आतासारखे त्यावेळी whatsapp ग्रुप नव्हते ज्यावर वर्गशिक्षक अभ्यास टाकतात आणि त्याप्रमाणे पालक तो करून घेऊन त्याचे फोटो त्याच ग्रुप मध्ये पोस्ट करतात. आमच्या शाळेत प्रत्येकाला गुलाबी डायरि दिली जायची, ज्यामध्ये शाळेचे नाव, विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, तुकडी आणि तारीख वार छापील स्वरुपात असायचे. रोजचा घरचा अभ्यास लिहण्यासाठी, शिक्षकांना पालकांसाठी सूचना लिहण्यासाठी आणि गैरहजर राहिल्यास पालकांच्या हस्ते कारण लिहून आणण्यासाठी ही डायरि होती. उन्हात उभारून लिहताना घामाघूम व्हायचो. कधी कधी अभ्यास जास्त असला की तिथेच मातीत मांडी घालून बसुन लिहावं लागायचं. लिहून झालं रे झालं की डायरि दफ्तर आईच्या हातात देऊन मी आणि अजय पुढे धूम ठोकायचो.
अजय माझा वर्गमित्र पण होता आणि रहायला ही आम्ही एकाच गल्लीत होतो. आमच्या घराच्या रांगेतच दोन घर सोडून त्यांचं घर होतं. त्यामुळे बेस्ट फ्रेंड वगैरे जे म्हणतात ते आम्ही कधी झालो ते कळलंच नाही. शाळा सुटल्या की लेमन गोळ्या, पेपरमिंटच्या गोळ्या आणि कधी तरी एखादा पेरू यापैकी काही मिळालं तर नाचत आम्ही पाच सहा किलोमीटर चालण्यास सज्ज असायचो पण ज्या दिवशी यापैकी काही नसायचं त्यादिवशी धुपाधुपी आणि रडारडी ठरलेली असायची. माझी आई आणि अजयची आई आमचं सामान घेऊन गप्पा मारत मागे असायचे आम्ही पुढे पळत रहायचो. पळू नका गाड्या बघा सावकाश चला हे सांगून सांगून त्यांची दमछाक व्हायची. रस्त्याने पडलेली एखादी काटी घेऊन खेळत उनाडक्या करत आमचं पळणं सुरूच राहायचं. चालताना आमचे काही ठराविक टप्पे होते जिथे आम्ही थांबून आई यायची वाट बघायचो. पहिला टप्पा होता विकास नगर मधील मत्स्यालय.
रंगीबेरंगी मासे काचेच्या पेटीत इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत रहायचे. त्यांचा पाठ शिवणीचा खेळ लय भारी वाटायचा. मधून मधून पाण्याचे बुडबुडे त्या पेटीत यायचे आणि गायब व्हायचे. पेटीच्या तळाशी असलेली हिरवी सोनेरी छोटी छोटी झाडे आणि वाळूत मिळायच्या तशा रंगबिरंगी गारगोट्या यामुळे ती पेटी जादूचीच भासायची. पुढे पळणारे आम्ही इथे मात्र जास्त वेळ थांबून आईच्या मागे जाणे पसंत करायचो. सिग्नलचा रस्ता आईचा हात धरून पार केला की पुन्हा आम्ही पुढं पळायचो दुसर्या टप्प्याकडे. ते म्हणजे उंच आणि मोठे बदामाचे झाड. झाडाला लाल लाल बदाम तर भरपूर रहायचे पण आमचे दगड काय त्यांच्या पर्यत पोहोचायचे नाहीत कधी तरी खाली पडलेल्या बदाम मिळायचे त्यादिवशी आम्ही एकदम खुश व्हायचो. मिळालेले बदाम दगडावर ठेवून मधोमध फोडून पांढरी शेंग काढण्यात आम्ही तरबेज झालो होतो. बदामातली शेंग खात खात आम्ही तिसर्या टप्पा जवळ करायचो. गुरूनानक चौक येथे जमिनीत लोखंडी पाण्याचा पाईप होता ज्याची वरची बाजू थोडी जमिनीपासून वरती आणि उघडी होती. बोरच्या पाण्याचा होता का नळाच्या व्हॉल्व्ह साठीचा होता हे आता नक्की आठवत नाही. त्यातून पाण्याचे बुडबुडे यायचे यात दगड टाकायचे आणि पाण्याचा टपक टपक असा आवाज ऐकायचा. ज्यादिवशी पाणी नसायचे त्यादिवशी दगड टाकायला तितकीशी मजा नाही यायची. यानंतर शेवटच्या टप्प्यावर जाऊन आराम करायचो तो म्हणजे बांधकाम भवन या इमारतीचा कट्टा. गेटच्या सुरवातीलाच दोन्ही बाजूला लांबलचक लंबगोलाकार कट्टे होते. याला लागूनच झाडे होती. त्यामुळे मस्त सावलीत आराम करायला एकदम मस्त वाटायचं. अशाप्रकारे धावत पळत मजा मस्ती करत आम्ही घर गाठायचो.
हा शाळेचा पायी प्रवास सांगण्याचे कारण म्हणजे टीचरची ट्यूशन बाबतीत सूचना आणि आईच्या शाळेतून आम्हाला आणण्याच्या प्रवासा दरम्यान आमच्या भागातील मुलांच्या आईसोबत ट्यूशन बाबतीत झालेली चर्चा. यामुळे शाळेसोबतच ट्यूशनला ही पायी जाण्याचा नवा प्रवास माझ्या सोबत जोडला गेला.
घाटे काकू. माझ्या शैक्षणिक जीवनाला शिकवणीच्या माध्यमातून अत्यंत आपुलकीने आणि काळजीपूर्वक आकार देणार्या हातांचे नाव. आईने जी शोध मोहीम सुरू केली होती त्यातूनच घाटे काकू यांची माहिती मिळालेली. आमचे शेजारी कांबळे काका काकू. ज्यांच्या घराची भिंत आणि आमची घराची भिंत ही एकच होती. त्यांचे दोन्ही मुलं मॉडर्न शाळेत होती. त्यांचा मोठा मुलगा कपिल याच्या वर्गात त्याचा मित्र राघवेंद्र, जो घाटे काकूंचा मुलगा होता. सुरुवातीला कपिल ही घाटे काकूंकडेच ट्यूशनला होता. आमच्या पेक्षा दोन वर्षाने मोठा होता. जन्मतःच त्याची हाताची आणि पायाची बोटे जुळलेली होती. तरी सगळ्याच बाबतीत तो आमच्या पेक्षा सरस होता. गोट्या खेळताना सर्वात अचूक नेम त्याचा असायचा, लेफ्टी असल्याने आणि क्रिकेट मध्ये बॅटिंग बॉलिंग उत्तमरीत्या करीत असल्यामुळे क्रिकेट मध्ये ही तोच चांगला खेळाडू ठरायचा. फुटबॉल, विटीदांडू, भोवरा यामध्ये ही तोच सरस ठरायचा. फक्त खेळाच्या बाबतीतच नव्हे तर अभ्यासात ही तो अव्वल क्रमांक मिळवायचा. त्याचे अक्षर ही रेखीव होते. ट्यूशन मध्ये ही तो घाटे काकूंचा आवडता विद्यार्थी होता. कपिलचे सगळ्याच बाबतीत आघाडीवर असण्याचे कारण होते त्याचे आईवडील. त्यांनी त्याला कधीच तू बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे किंवा तुझ्यात काहीतरी कमी आहे ही जाणीव कधी होऊच दिली नाही. आज तो मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करून मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे.
कपिल बाबत हे सगळे सांगण्याचं कारण म्हणजे ट्यूशनच्या प्रवासातला तो माझा पहिला सोबती होता. आमच्या घरापासून साधारणपणे एक किलोमीटरवर घाटे काकू यांची ट्यूशन होती. हा एक किलोमीटरचा रोजचा प्रवास म्हणजे आमच्या धमाल मस्तीचा मार्ग बनला होता. ज्या रस्त्याने आम्ही जायचो तिथे वीटभट्टी होती. त्यामुळे काळ्या मातीचे छोटे छोटे डोंगर रस्त्यात असायचे. त्यावर चढायचं, वरुन खाली उड्या मारायच्या असा खेळ आमचा रोजच चालायचा. कधी कधी विटा कच्च्या असायच्या कोण नाही हे बघून आम्ही त्यावर पाय देऊन पळून जायचो पायाचे ठसे त्यावर उमटवायला मजा यायची. विटा भट्टीत टाकण्या आधी वाळण्यासाठी एकावर एक दोन दोन या पद्धतीने उभ्या आडव्या ठेवून रचल्या जायच्या ज्याचे दोन तीन फुट उंच उभे खांब तयार व्हायचे जे आम्ही लाथा मारून पडायचो. यात आम्हाला खूप मजा वाटायची. जेव्हा लोकं तिथे काम करत असायची तेव्हा आणि जेव्हा घरचे कोणीतरी सोडायला आणायला सोबत असायचे तेव्हा आम्ही गुपचूप शांतपणे जायचो. त्यावेळी आपण दुसर्याचे नुकसान करतोय हे कळत नव्हतं. पण पुढे जाऊन एकदा तिथल्या मालकाने आम्हाला हे सगळं करताना पकडलं आणि पकडून ठेवलं. घरच्यांना सांगितलं त्यानंतर आमच्या या गोष्टी कमी झाल्या पण पूर्ण बंद काही झाल्या नाहीत. तिथल्या मालक आणि कामगारांशी आमचा लपाछपीचा खेळ सुरूच राहिला. पुढे कपिल ही ट्यूशन संपवून दुसर्या ट्यूशनला गेला. त्यानंतर नव्या मित्रांसोबत सातवी पर्यत माझा हा प्रवास सुरूच होता.
घाटे काकू घरीच ट्यूशन घ्यायचे. त्यांचा दोन मजली बंगला होता. त्यातल्या प्रशस्त अशा हॉल मध्ये आमची ट्यूशन भरायची. कपिलच्या घराजवळ राहणारा त्याचा मित्र अशीच ओळख सुरुवातीला माझी ट्यूशन मध्ये होती. सर्वजण मॉडर्न शाळेतले होते आणि एकमेकांच्या ओळखीचे होते. पहिले काही दिवस मला त्यांच्यात अवघडल्यासारखं व्हायचं पण नंतर सगळे ओळखीचे झाले. मी ही त्यांच्यातलाच एक झालो.
नेहमी तजेलदार आणि हसरा चेहर्याने आमच्या ट्युशन्सच्या वेळे आधी घाटे काकू तयार असायच्या. त्यांची मेमरी खूप शार्प होती. त्या शिस्तप्रिय होत्या पण प्रेमळ ही तितक्याच होत्या. एकाच वेळी विविध वर्गातील विद्यार्थ्यांनकडे लक्ष देत प्रत्येकाच्या अभ्यासाच्या सर्व गोष्टी अचूक लक्षात ठेवून त्याप्रमाणे शिकविणे ही त्यांची खासियत होती. सुरुवातीला माझी वेगवेगळ्या विषयातली गती उजळणी घेऊन त्यांनी तपासून बघितली आणि त्याप्रमाणे माझा अभ्यास घ्यायला सुरु केला. इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे विषय त्या शिकवायच्या. एकेकाला नावाने जवळ बोलवून त्यादिवशी घेत असलेल्या विषयाच्या संकल्पना समजावुन सांगून त्या सबंधित काम देऊन पुढच्या विद्यार्थ्यांकडे वळायचे आणि मधून मधून आधी ज्यांना जो अभ्यास दिला आहे तो कुठपर्यंत झाला आहे हे तपासत राहायचं अशी त्यांची ट्यूशन घेण्याची पद्धत होती. त्यांच्या शिकवण्या सोबतच अजून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्यांची चहाची आवड, ट्यूशनच्या मध्ये किंवा सुरुवातीला ते चहा घ्यायचेच आणि म्हणायचे 'गाडीत पेट्रोल नसल्यावर गाडी कशी चालणार?' चहा त्यांच्या साठी एनर्जी ड्रिंक होता.
रोजच्या वापरतील उदाहरणे देऊन क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण अशी होती. गोष्टी समजून घेऊन लक्षात ठेवण्याची माझी क्षमता यादरम्यानच विकसित झाली. या घडीला मी इंजिनीयरिंगकडे जाणार याची पुसटशी ही कल्पना मला काय कुणालाच नव्हती पण त्यासाठीचा पाया घाटे काकूंमुळेच पक्का झाला. इथे होणार्या अभ्यासामुळे वर्गात उत्तरे सांगण्यात माझा हात सर्वात आधी वरती जायचा. अभ्यासा सोबतच वागणुकीचे आणि शिस्तीचे धडे ही मला इथेच मिळाले. मी आधी बेशिस्त होतो असं नाही पण अधिक शिस्तप्रिय होण्यास मदत झाली. जसे की भाषेचे उच्चार, शब्दांचा वापर अधिक व्यवस्थित करणे, वेळेत ट्यूशनला येणे, वेळेत दिलेल्या गोष्टी पूर्ण करणे, नेहमी टापटीप राहणे, सर्वांशी आदरयुक्त व्यवहार करणे ईत्यादी.
चौथी ते सातवी या तीन वर्षातील माझा शैक्षणिक प्रवास उल्लेखनीय असा होण्यामध्ये आणि तो आजही लक्षात राहण्यामागे घाटे काकूंचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण होते. पुढे आठवी ते दहावी पर्यंतची ट्यूशन ही त्यांनीच ओळखीने स्वतः माझ्या अभ्यासातील प्रगती बाबत सांगून आर्थिक सवलतीत लावली होती. इंजिनियरिंग फील्ड निवडण्या बाबत त्यांनीच पहिल्यांदा सांगितले होते. जेव्हा इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करून कॉलेजला शिक्षक म्हणुन जॉईन केल्याचे त्यांना सांगितले तेव्हा त्या खुपच खुश झाल्या होत्या. त्यांना माझ्याकडून जशी अपेक्षा होती तसेच घडल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसत होता. आई वडिलांची भेट झाली की आजही आवर्जून त्या माझी चौकशी करतात, मी ही त्यांच्या घराकडे गेलो की भेट घेऊन आशिर्वाद घेत असतो. फक्त एक शिक्षक म्हणुन नाही तर एक माणुसकीने ओसंडून भरलेलं व्यक्तिमत्त्व म्हणुन घाटे काकूंचे माझ्या जीवनातील स्थान कायमच महत्त्वपूर्ण असे रहाणार.