Translate

Monday, September 19, 2022

माझ्या गावाकडच्या गोष्टी : भाग ७ - वामन आऊट न झाला....


किरकेटचा नाद नसेल अशी पोरं कुण्या बी गावात सापडणार नाहीती. आमचा गावही त्याला अपवाद नव्हता. लहानापासून ती थोरापातूर सगळेच खालाकडच्या पान मळ्याच्या बाजूला असलेल्या मैदानात सकाळ संध्याकाळ दिसायचीच. अन् मैदानात जमायचं नाही तवा पारावरच्या छोट्या मोकळ्या जागेत किरकेटचा खेळ चालायचा. सहावी सातवीच्या सुट्ट्यात गावाकडे असायचो तेव्हा एक तर शेताला जाणे किंवा क्रिकेट खेळणे हाच माझा उद्योग सुरू असायचा. चांगली बॅट स्टंप असं आमच्याकडे काही नसायचं जंगलीच्या जळणातल्या काट्या स्टंपसाठी अन् त्यातला त्यात एक मोठा दंडुका बॅट म्हणून घेतला की वरलाकडच्या गोठ्याच्या कुंपणात आमचा खेळ सुरू व्हायचा. कधी रबरी बॉल असायचा नाही तर कधी प्लास्टिकचा. पोरांची लंय गर्दी झाली तर एक टिप्पा आऊटचा खेळ चालायचा. 

मी सोलापूरहून नेलेल्या चिंधी बॉलचं तिकडच्या समद्या पोरास्नी लंय अपरुग वाटायचं. त्याच्या पार चिंध्या निघे पातूर त्याचा वापर व्हायचा. आमच्यात संजू भाऊ जरा मोठा होता अन् क्रिकेट बी चांगला खेळायचा गावच्या भिमनगरच्या टीम मध्ये बी व्हता. तो आम्हाला लवकर आउटचं व्हायचा न्हाय. बॉलिंग टाकू टाकू आम्ही दमायचो पण तो काय बॅटिंगला दमायचा न्हाय. पण हा गोठ्यातला क्रिकेटचा डाव आण्णा नसतानाच चालायचा कारण घरातनं गोठा दिसायचा. आमाला जेवढं किरकेट आवडायचं तेवडीच आण्णाला त्याची चीड होती.  त्या नादानं पोरं वाया जातील असं त्यांचं स्पष्ट मत व्हतं. टीव्ही वर मॅच बगायला जरी आम्ही कुटं बसलो असलो अन् आण्णा तिकडं दिसले की आम्ही घरला पाळायचो.

टीम करून किरकेट खेळायचं म्हंटलं की आमच्या घराच्या मागं पाराला लागून असलेल्या सूर्यवंशीच्या वाड्याकडे समद्याची पावलं वळायची कारण तिथं राहणाऱ्या वामन कडेच किरकेटचं समदं सामान व्हतं. घरी टीव्ही बी व्हता त्यामुळे मॅच बघायला बी आम्ही तिकडंच जायाचो. कंपिनीची बॅट, स्टंप सेट, टेनिस बॉल असं समदं वामन कडं व्हतं त्यामुळे त्याचा लंय रुबाब असायचा. आमच्यातले समदे इच्छा नसतानाही त्याची मर्जी सांभाळायचे. वाड्यातली पोरं अन् बाकीचे बी त्याला सावकार म्हणायचे अन् आव जावं बोलायची. वामनची एक विशेष गोष्ट म्हणजे तो बनेल अन् चड्डीवरच असायचा नेहमी. जरा जाड बी होता त्यामुळे पळा पळीने लगेच दमायचा. वामन, चिट्ट्या, संदिप्या, त्यांच्या वाड्यातली अजून दोन तीन पोरं, मी, अमर, राहुल, संजू भाऊ, बूध्या अन् आमच्या कडची अजून दोन चार पोरं जमा व्हायचो. चार पाच जणांच्या दोन टीम करून समदे मिळून दर आइतवारी ( रविवारी) दिसभर फफुटयात खेळायचो. 

शहरातला असल्यामुळे किरकेटची चांगली माहिती असल्यामुळं अन् चांगला खेळत असल्यानं मला समद्यांकडून जरा जास्तच चांगली वागणूक मिळायची. टीम मधून बॅटिंग बॉलिंग पहिला मिळायची. चिट्ट्या चांगलं खेळायचा समदे त्याला दरविड म्हणायचे राहुल द्राविडचा तो मोठा फॅन होता, त्याचं अन् वामनचं चांगलं जमायचं ते नेहमी एकाच टीम मधी रहायचे. पण बॅटिंग वरून त्यांच्यात वाद ठरलेला असायचा कारण वामन एक रन पळायचाच न्हाय जास्तीत जास्त ओव्हर आपल्याला कशा मिळतील यावर त्याचा भर राहायचा. आम्ही नेहमी वामनच्या अपोझिट टीम मधी असायचो. अमर मी अन् राहवल्या एकाच टीम मधी राहायचो. अमरचा खेळ सेहवाग वानी होता थांबून खेळायचं त्याला माहित नव्हतं. राहवल्या सपोर्टिंग प्लेयर सारखा व्हता. फिल्डिंग मधी एकदम चपळ होता.

वामनला आउट करणं म्हंजी लंय जिकरीचं काम असायचं. सगळं सामान त्याचंच असल्यामुळे तो रडीचा डाव खेळायचा. दोन तीनदा जरी आऊट झाला तरी काय ना काय कारण काडून खेळायचाच. समदी पोरं चिरडीला जायची. "हाई आउट झालास गा बायला" म्हणून ओरडायची पण त्याचा वामन वर काय उपेग व्हायचा न्हाय. कधी कधी त्यावरून वाद व्हायचा तवा वामन सगळं सामान घेऊन घरला निघायचा तवा 'वामन आऊट न झाला' असंच म्हणायची आमच्यावर येळ यायची. पुढं वामन अन् त्याच्या घरचे उमरग्याला स्थायिक झाले तसं वामनचं गावाकडं येनं बी कमी झालं. पण आमचं किरकेट खेळणं सुरूच व्हतं 

पुढे जसं मोठे होत गेलो तसं पान मळ्याकडच्या मोठ्या मैदानात आम्ही समदे खेळायचो. सिल्डवर (पैश्यावर) मॅच लावायचो. खाल्ला कडच्या पोरांसोबत लंय मॅचा खेळायचो अन् जिकायचो बी. वरलाकडची टीम भारी का खाल्ला कडच्या पोरांची अशी टशन व्हायाची. गावची तुरणामेंट बी इथंच भरायची. गावची अन् भिमनगरची टीम बी त्यात खेळायची. तवा मैदानावर लंय गर्दी व्हायाची. परमु, संजू भाऊ, चिट्ट्याचा मोठा भाऊ टीम मध्ये व्हते त्यांचा खेळ बगायला आम्ही आवर्जून जायचो. कर्न्या वरणं कामेंट्री चालायची. दुसऱ्या गावच्या टिमा बी यायच्या कधी कधी भांडणं बी व्हायची पर मोठे माणसं मधी पडून भांडण मिटवायची. गावच्या टीम बाहेरच्या तुरणामेंटला ही जायच्या तिकडे जिकून आले की गावात मिरवणूक व्हायची लंय कालवा व्हायचा. नाचून आरडून समदी पोरं थकून आपापल्या घरी जायाची पण किरकेट अन् त्याच्या गप्पा पुढचे पंधरा दिस तर तशाच सुरु राहायाच्या.

Wednesday, September 7, 2022

"मांग महाराच्या दुःखाला वाचा फोडणाऱ्या आद्य लेखिका - मुक्ता साळवे".


१६५ वर्षाआधी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या "मुक्ता साळवे" या चौदा वर्षाच्या मुलीने लिहलेला हा निबंध. मुंबई येथून १५ फेब्रुवारी १८५५ रोजी "ज्ञानोदय" च्या अंकात प्रकाशित झाला होता.

या निबंधाची भाषा आणि विवेकवादी विचार पाहिल्यानंतर त्याकाळात फुले दाम्पत्याच्या शाळेची गुणवत्ता काय होती हे आपसूकच लक्षात येते. धर्माकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याजोगे ज्ञान त्या वयात आत्मसात करणे ही काही सामान्य गोष्ट नव्हती.आणि विशेष बाब म्हणजे धर्माच्या आधारे जी गुलामगिरी लादली गेली होती त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण आहे याचीही अनुभूती त्या वयात या महान आणि क्रांतिकारी विद्यार्थीनीला आली होती. सोबतच आपल्या विरोधात व आपल्या बाजूने असलेल्या एकाच जातीच्या लोकांमधील फरक ही उमजला होता. या निबंधाच्या माध्यमातून जे वास्तव मांडले आहे त्यामुळे स्वराज्यद्रोही आणि मनुस्मृती प्रमाणे चालणाऱ्या पेशवाईची खरी ओळख देशाला झाली. सत्तेचा वापर धर्माचे आणि विशिष्ट वर्गाचे अधिकार जोपासण्यासाठी कशाप्रकारे केला जात होता हे उघड झाले. अन्यायाविरुद्ध आपल्या लेखणीच्या माध्यमातून आसूड ओढणाऱ्या या पहिल्या मागासवर्गीय लेखिकेचा निबंध खालीलप्रमाणे होता.


"ईश्वराने मज दीनदुबळीच्या अंत:करणात आम्हा दुर्दैवी पशुंपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांगमहारांच्या दु:खाविषयी भरविले; तीच जगत्कर्त्याचे मनात चिंतन करून ह्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे. परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता, मांगमहारांस व ब्राम्हणांस उत्पन्नकर्ता जगन्नाथ आहे.

महाराज, आता जर वेदाधारेकरून आमचा द्वेष करणारे लोक ह्यांच्या मताचे खंडण करावे तर हे आमच्यापेक्षा उंच म्हणविणारे, विशेषे करून लाडूखाऊ ब्राम्हण लोक असे म्हणतात की, वेद तर आमचीच मत्ता आहे. आम्हीच ह्यांचे अवलोकन करावे. तर ह्यावरून उघड दिसते की, आम्हास धर्मपुस्तक नाही. जर वेद ब्राम्हणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राम्हणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की नाही बरे? हर हर!

असे वेद की ज्यांचे ब्राम्हणांच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने महापातक घडते, तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडेस किती मूर्खत्व (दोष) येईल बरे? मुसलमान लोक कुराणाच्या आधारेकरून, व इंग्रज लोक बैबलच्या आधारेकरून, आणि ब्राम्हण लोक वेदाधारेकरून चालतात. म्हणूनच ते आपापल्या खर्‍या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते. तर हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ. परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडेस पहावे. तो व त्यासारिखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत; व असा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो.

आम्हा गरीब मांगमहारांस हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले, व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालविला होता. आम्हा मनुष्यास ब्राम्हण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानिले आहे. सांगते ऐका, ज्या वेळी बाजीरावाचे राज्य होते त्या वेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानीत होते की काय? पहा बरे तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे; त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय? परंतु मांगमहारांस मारू नका असे म्हणणारे कोण बरे? त्यासमयी मांग अथवा महार ह्यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते.

अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार? कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महारमांग असून वाचतात, तर ब्राम्हणांनी का त्यास दप्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे की काय? असे बोलून तो त्यास शिक्षा करी.

दुसरे असे की, लिहीण्याची बंदी करून हे लोक थांबले की काय? नाही. बाजीरावसाहेब तर काशीस जाऊन धुळीत रहिवासी होऊन तद्रूप झाले पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने येथील महार तो काय? पण तोहि मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. सोवळे नेसून नाचत फिरणार्‍या लोकांचा एवढाच हेतु की, काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असे मानणे व त्यापासून त्यास सुख वाटते. पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दु:खे पडतात ह्याचा ह्या निर्दयांच्या अंतःकरणात द्रव येतो की काय? ह्याच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीस ठेवीत नाहीत.

जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कोठून मिळणार? बरे, हे उघडच सिद्ध होते की आमचे हाल फार होतात. पंडितहो, तुमचे स्वार्थी आपलपोटे पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते ह्याजकडेस लक्षपूर्वक कान द्या. ज्या वेळेस आमच्या स्त्रिया बाळंत होतात त्या वेळेस त्यांच्या घरावर छपर सुद्धा नसते म्हणून हीव पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दु:ख होत असेल बरे! ह्याचा विचार स्वताच्या अनुभवावरून करा. जर एखाद्या वेळेस त्यास बाळंतरोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसे कोठून मिळणार? असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्याने फुकट औषधे दिली?

मांगमहारांच्या मुलांस ब्राम्हणादिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारात जात नाहीत. ते म्हणतात की आपणास उच्छिष्ट आणावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते. असे म्हणून उगीच राहतात. हाय हाय, काय रे भगवान हे दुःख ? हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येतं. ह्या कारणास्तव भगवंताने आम्हांवर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारला येथे पाठविले. आणि आता ह्या राज्यातून आमची जी दुःखे निवारण झाली ती अनुक्रमे लिहिते -

शूरपणा दाखविणारे व गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले, आपटे, त्रिकमजी, आंधळा पानसरे, काळे, बेहरे हे निरर्थक मांगमहारांवर स्वाऱ्या घालून विहिरी भरीत होते, व गरोदर बायकांसही देहांत शासने करीत होते ती बंद झाली; आणि पुणे प्रांती मांगमहारांवर कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंदाधुंदी होती की ज्याच्या मनात वाटेल त्याने महारमांगांवर नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा जुलूम करीत होते; ती बंद झाली. किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली. आमचा वंशहि वाढत चालला. मांगमाहारांवर ह्यातून कोणी बारीक पांघरूण पांघरले असता ते म्हणत कि, ह्यांनी चोरी करून आणले, हे पांघरून तर ब्राम्हणानेच पांघरावे.

जर मांगमहार पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यांस बांधून मारीत, पण आता इंग्रजाच्या राज्यात ज्यास पैसे मिळेल त्याने घ्यावे. उंच वर्गातील लोकांचा अपराध केला असता मांगाचे किंवा महाराचे डोके मारीत होते ती बंद झाली. जुलमी बिगार बंद केली. अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळीक कोठे कोठे झाली. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली. बाजारात फिरण्याची मोकळीक झाली.

आता निःपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते. ती अशी कि जे ब्राम्हण आम्हांस वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते, तेच आता माझे स्वदेशीय प्रिय मित्र बंधू आम्हांस ह्या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात. परंतु सर्वच ब्राम्हण घेतात असे नाही. त्यातून ज्यांचा विचार सैतानाला नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करतात. आणि जे माझे प्रिय बंधु आम्हांस बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यांस म्हणतात कि तुम्हांस जातीबाहेर टाकू.

आमच्या प्रिय बंधूंनी मांगमहारांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत. व ह्या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करितात. म्हणून मांडलेल्या शाळांना फारच साहाय्य आहे. अहो दरिद्रांनी व दुःखानी पिडलेले मांगमहार लोक हो, सहकतुम्ही रोगी आहात, तर ज्ञानरूपी औषध घ्या. म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही चांगले नीतिवान व्हाल; तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जानवराप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील, तर आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही; परंतु हेही माझ्याने सिद्ध करवत नाही. ह्यास उदाहरण, जे शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेही एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्याजोगे वाईट कर्म करितात, मग तुम्ही तर मांगमहारच आहात."


आत्मग्लानीत निद्रिस्त असणाऱ्या आपल्या समाजासाठी आजही हे विचार तितकेच उपयुक्त आणि प्रेरणादायी असे आहेत. असे व्यक्तिमत्त्व आपले रोल मॉडेल असले पाहिजे पण अजूनही समाजातील सर्व स्तरात यांची ओळख ही पोहचली नाही. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपला इतिहास आपणच जपला पाहिजे आणि तो येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचवला ही पाहिजे.

Friday, September 2, 2022

शिक्षितांच्या अंधश्रद्धा.....





आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात ही आपल्याकडे घरातील एखाद्या  व्यक्तीच्या किंवा लहान मुलाच्या वागण्यात, बोलण्यात आणि तब्येतीमध्ये फरक जाणवल्यास दहा पैकी सात घरात अजूनही बाहेरवासा, भूतबाधा झाल्याचेच मानले जाते आणि त्याप्रमाणे घरगुती इलाज करून मग डॉक्टरकडे नेले जाते. माणसाचे मन ही शरीराप्रमाणे आजारी पडते हे ज्ञान अजून सर्वांपर्यंत पोहचलेले नाही. आजच्या घडीला आपल्या देशातील शिक्षितांचे प्रमाण हे नक्कीच आधीच्या तुलनेत अधिक आहे. असे असले तरी अंधश्रध्दांंचं प्रमाण ज्या प्रमाणात घटायला पाहिजे होतं ते अजूनही घटलेलं नाही. कारण शिक्षितांच्या अंधश्रद्धा या पुर्णतः अज्ञानावर वर आधारित नसून जात, धर्म, वर्ण, परंपरा याशी निगडित आहेत. त्यामुळे ज्ञानाच्या आधारे त्या दूर होतील अशी शक्यता उरत नाही. अंधश्रद्धा एकूणच वाईट पण शिक्षितांच्या अधिक वाईट कारण ते त्या अंधश्रद्धांचं समर्थन करतात.

शिक्षितांच्या अंधश्रद्धेची जी प्रमुख कारणे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी सांगितली आहेत ती खालीलप्रमाणे आहेत. 

वर्ग संघर्ष. धार्मिक आणि जातीय अस्मितेची जपणूक ही वर्ग संघर्षाच्या मुळाशी आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावाने ज्या समाजामध्ये अस्मिता बळकट, टोकदार आणि धारधार करण्याचा कार्यक्रम सुरू असतो तिथे अंधश्रद्धेला खतपाणी मिळतच राहते. धर्माचं बाजारीकरण, सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढवणं, लोकांची धार्मिकता धर्मांधतेकडे वळविण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी अंधश्रद्धा निर्मूलनास बाधक ठरतात. 

अदृष्टाची भीती मृत्यू कधी येणार या अदृष्टाची भीती प्रत्येकाच्या मनात वसत असते आणि त्यापासून मुक्तता करण्यासाठी कोणी म्हणाले की अमुक तमुक गंडा, ताईत घाल, जप कर, नवस उपासतापास कर तेव्हा निर्भय नसलेली मने चटकन तिकडे वळतात. मृत्यु ही इतकी अकल्पित गोष्ट आहे की वाटतं हे करून बघायला काय हरकत आहे.

पुढचे महत्वाचे कारण म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या पदरी येणारी अगतिकता आणि दुसरी समाज जीवनामध्ये अनेक कारणांनी वेढून राहिलेली अस्थिरता. मागच्या वर्षी ज्या खर्चात माझं भागत होतं त्यात आता भागत नाही किंवा मी सरकारी बंगल्यात राहत होतो आता नौकरी संपल्यामुळे तो सोडून स्वतःचे घर बांधावे लागणार जे परवडणारे नसतं ही झाली अगतिकता. आणि अस्थिरता म्हणजे कितीही चांगला खेळाडू असला तरी त्याला माहिती नसतं आपण उद्यापासून शून्यावर बाद होणार आहे का? कितीही चांगला अभिनेता असला तरी त्याला माहिती नसतं येणारे क्रमशः सिनेमे कशामुळे फ्लॉप जातील? कितीही उत्तम उद्योग व्यवसाय असेल त्याला हे समजत नाही की माझ्या गावात स्फोट झाला आणि माझेच दुकान त्यात उध्वस्त झाले तर काय?

अतृप्त कामनांची पूर्ती. प्रत्येकाच्या मनात अनेक इच्छा आकांक्षा असतात ज्या सर्वकाही पूर्ण होत नाहीत. पण त्या पूर्ण होण्यासाठीचा अस्तित्वात नसलेला एखादा मार्ग जर कोणी दाखवत असेल तर माणसं तिकडे धावू लागतात. मी जर एका बाबाकडे गेलो बाबाने जर मला कृपाशीर्वाद दिला आणि लॉटरीचं तिकीट किंवा गुप्तधन मिळण्याची शक्यता निर्माण होत असेल तर माझ्या अतृप्त कामनांची पूर्तता होते.

अपराधी भावना. आपल्या उपजीविकेचे साधन नैतिक मार्गाने नसल्यास म्हणजेच दोन नंबरच्या कामातून पैसे मिळत असल्यास त्यातुन अपराधीपणाची भावना निर्माण होते. ती दूर होण्यासाठी दान धर्म मोठ्या प्रमाणावर केला जातो. धार्मिक स्थळांना देणग्या दिल्या जातात. ज्यामुळे अपराधी भावना कमी होण्यास मदत होते.

यासोबतच महाग होत जाणारी आरोग्य व्यवस्था हे एक बुवा बाबांचं प्रस्थ वाढण्याचं एक महत्वाचे कारण आहे. ज्या वेळेला गरज असते त्या वेळेला योग्य स्वरूपाची आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसेल तर अपरिहार्यपणे अंधश्रद्धांचा आधार घेतला जातो.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा असे शिक्षणक्रमात लिहले आहे. आपल्या संविधानात ही वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार करणं हे नागरिकांचे कर्तव्य आहे असे लिहलेले आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीतच असल्याचे दिसून येते. कारण शिक्षितांची अंधश्रद्धा हा केवळ विज्ञानाच्या प्रसाराचा भाग नाही त्याने ती जाणार नाही. 

शिक्षितांच्या अंधश्रद्धा या अशिक्षितांच्या अंधश्रद्धेपेक्षा समाजासाठी आणि देशासाठी अधिक घातक आहेत त्यामुळे त्यांचे समूळ उच्चाटन करणे अपरिहार्य ठरते. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्भय कृतीशीलता हा एक प्रभावी उपाय आहे. आपल्या देशाच्या तुलनेत प्रगत देशांमध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण नगण्य असण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन फक्त शिक्षणापुरता मर्यादित न राहता ज्या प्रमाणात तो कृतीद्वारे शिक्षितांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनेल त्या प्रमाणात शिक्षितांच्या अंधश्रद्धांचं निर्मूलन होईल. विवेकवादी विचारांनी इथल्या जनसमुदायाची पकड घेतली तर लोकांच्या प्रश्नांचे खरे लढे उभारतील आणि स्वाभाविकच देशातील सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल. ज्यामुळे धार्मिक आणि जातीय अस्मिता मागे पडेल, सांस्कृतिक राष्ट्रवाद कमी होऊन संविधानाला अभिप्रेत असलेली धर्मनिरपेक्षता प्रभावी होईल.



संदर्भ - डॉ. नरेंद्र दाभोळकर व्यख्यान पुणे विद्यापीठ दि. २७/०२/२०१०.