आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात ही आपल्याकडे घरातील एखाद्या व्यक्तीच्या किंवा लहान मुलाच्या वागण्यात, बोलण्यात आणि तब्येतीमध्ये फरक जाणवल्यास दहा पैकी सात घरात अजूनही बाहेरवासा, भूतबाधा झाल्याचेच मानले जाते आणि त्याप्रमाणे घरगुती इलाज करून मग डॉक्टरकडे नेले जाते. माणसाचे मन ही शरीराप्रमाणे आजारी पडते हे ज्ञान अजून सर्वांपर्यंत पोहचलेले नाही. आजच्या घडीला आपल्या देशातील शिक्षितांचे प्रमाण हे नक्कीच आधीच्या तुलनेत अधिक आहे. असे असले तरी अंधश्रध्दांंचं प्रमाण ज्या प्रमाणात घटायला पाहिजे होतं ते अजूनही घटलेलं नाही. कारण शिक्षितांच्या अंधश्रद्धा या पुर्णतः अज्ञानावर वर आधारित नसून जात, धर्म, वर्ण, परंपरा याशी निगडित आहेत. त्यामुळे ज्ञानाच्या आधारे त्या दूर होतील अशी शक्यता उरत नाही. अंधश्रद्धा एकूणच वाईट पण शिक्षितांच्या अधिक वाईट कारण ते त्या अंधश्रद्धांचं समर्थन करतात.
शिक्षितांच्या अंधश्रद्धेची जी प्रमुख कारणे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी सांगितली आहेत ती खालीलप्रमाणे आहेत.
वर्ग संघर्ष. धार्मिक आणि जातीय अस्मितेची जपणूक ही वर्ग संघर्षाच्या मुळाशी आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावाने ज्या समाजामध्ये अस्मिता बळकट, टोकदार आणि धारधार करण्याचा कार्यक्रम सुरू असतो तिथे अंधश्रद्धेला खतपाणी मिळतच राहते. धर्माचं बाजारीकरण, सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढवणं, लोकांची धार्मिकता धर्मांधतेकडे वळविण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी अंधश्रद्धा निर्मूलनास बाधक ठरतात.
अदृष्टाची भीती मृत्यू कधी येणार या अदृष्टाची भीती प्रत्येकाच्या मनात वसत असते आणि त्यापासून मुक्तता करण्यासाठी कोणी म्हणाले की अमुक तमुक गंडा, ताईत घाल, जप कर, नवस उपासतापास कर तेव्हा निर्भय नसलेली मने चटकन तिकडे वळतात. मृत्यु ही इतकी अकल्पित गोष्ट आहे की वाटतं हे करून बघायला काय हरकत आहे.
पुढचे महत्वाचे कारण म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या पदरी येणारी अगतिकता आणि दुसरी समाज जीवनामध्ये अनेक कारणांनी वेढून राहिलेली अस्थिरता. मागच्या वर्षी ज्या खर्चात माझं भागत होतं त्यात आता भागत नाही किंवा मी सरकारी बंगल्यात राहत होतो आता नौकरी संपल्यामुळे तो सोडून स्वतःचे घर बांधावे लागणार जे परवडणारे नसतं ही झाली अगतिकता. आणि अस्थिरता म्हणजे कितीही चांगला खेळाडू असला तरी त्याला माहिती नसतं आपण उद्यापासून शून्यावर बाद होणार आहे का? कितीही चांगला अभिनेता असला तरी त्याला माहिती नसतं येणारे क्रमशः सिनेमे कशामुळे फ्लॉप जातील? कितीही उत्तम उद्योग व्यवसाय असेल त्याला हे समजत नाही की माझ्या गावात स्फोट झाला आणि माझेच दुकान त्यात उध्वस्त झाले तर काय?
अतृप्त कामनांची पूर्ती. प्रत्येकाच्या मनात अनेक इच्छा आकांक्षा असतात ज्या सर्वकाही पूर्ण होत नाहीत. पण त्या पूर्ण होण्यासाठीचा अस्तित्वात नसलेला एखादा मार्ग जर कोणी दाखवत असेल तर माणसं तिकडे धावू लागतात. मी जर एका बाबाकडे गेलो बाबाने जर मला कृपाशीर्वाद दिला आणि लॉटरीचं तिकीट किंवा गुप्तधन मिळण्याची शक्यता निर्माण होत असेल तर माझ्या अतृप्त कामनांची पूर्तता होते.
अपराधी भावना. आपल्या उपजीविकेचे साधन नैतिक मार्गाने नसल्यास म्हणजेच दोन नंबरच्या कामातून पैसे मिळत असल्यास त्यातुन अपराधीपणाची भावना निर्माण होते. ती दूर होण्यासाठी दान धर्म मोठ्या प्रमाणावर केला जातो. धार्मिक स्थळांना देणग्या दिल्या जातात. ज्यामुळे अपराधी भावना कमी होण्यास मदत होते.
यासोबतच महाग होत जाणारी आरोग्य व्यवस्था हे एक बुवा बाबांचं प्रस्थ वाढण्याचं एक महत्वाचे कारण आहे. ज्या वेळेला गरज असते त्या वेळेला योग्य स्वरूपाची आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसेल तर अपरिहार्यपणे अंधश्रद्धांचा आधार घेतला जातो.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा असे शिक्षणक्रमात लिहले आहे. आपल्या संविधानात ही वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार करणं हे नागरिकांचे कर्तव्य आहे असे लिहलेले आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीतच असल्याचे दिसून येते. कारण शिक्षितांची अंधश्रद्धा हा केवळ विज्ञानाच्या प्रसाराचा भाग नाही त्याने ती जाणार नाही.
शिक्षितांच्या अंधश्रद्धा या अशिक्षितांच्या अंधश्रद्धेपेक्षा समाजासाठी आणि देशासाठी अधिक घातक आहेत त्यामुळे त्यांचे समूळ उच्चाटन करणे अपरिहार्य ठरते. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्भय कृतीशीलता हा एक प्रभावी उपाय आहे. आपल्या देशाच्या तुलनेत प्रगत देशांमध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण नगण्य असण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन फक्त शिक्षणापुरता मर्यादित न राहता ज्या प्रमाणात तो कृतीद्वारे शिक्षितांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनेल त्या प्रमाणात शिक्षितांच्या अंधश्रद्धांचं निर्मूलन होईल. विवेकवादी विचारांनी इथल्या जनसमुदायाची पकड घेतली तर लोकांच्या प्रश्नांचे खरे लढे उभारतील आणि स्वाभाविकच देशातील सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल. ज्यामुळे धार्मिक आणि जातीय अस्मिता मागे पडेल, सांस्कृतिक राष्ट्रवाद कमी होऊन संविधानाला अभिप्रेत असलेली धर्मनिरपेक्षता प्रभावी होईल.
संदर्भ - डॉ. नरेंद्र दाभोळकर व्यख्यान पुणे विद्यापीठ दि. २७/०२/२०१०.
No comments:
Post a Comment