किरकेटचा नाद नसेल अशी पोरं कुण्या बी गावात सापडणार नाहीती. आमचा गावही त्याला अपवाद नव्हता. लहानापासून ती थोरापातूर सगळेच खालाकडच्या पान मळ्याच्या बाजूला असलेल्या मैदानात सकाळ संध्याकाळ दिसायचीच. अन् मैदानात जमायचं नाही तवा पारावरच्या छोट्या मोकळ्या जागेत किरकेटचा खेळ चालायचा. सहावी सातवीच्या सुट्ट्यात गावाकडे असायचो तेव्हा एक तर शेताला जाणे किंवा क्रिकेट खेळणे हाच माझा उद्योग सुरू असायचा. चांगली बॅट स्टंप असं आमच्याकडे काही नसायचं जंगलीच्या जळणातल्या काट्या स्टंपसाठी अन् त्यातला त्यात एक मोठा दंडुका बॅट म्हणून घेतला की वरलाकडच्या गोठ्याच्या कुंपणात आमचा खेळ सुरू व्हायचा. कधी रबरी बॉल असायचा नाही तर कधी प्लास्टिकचा. पोरांची लंय गर्दी झाली तर एक टिप्पा आऊटचा खेळ चालायचा.
मी सोलापूरहून नेलेल्या चिंधी बॉलचं तिकडच्या समद्या पोरास्नी लंय अपरुग वाटायचं. त्याच्या पार चिंध्या निघे पातूर त्याचा वापर व्हायचा. आमच्यात संजू भाऊ जरा मोठा होता अन् क्रिकेट बी चांगला खेळायचा गावच्या भिमनगरच्या टीम मध्ये बी व्हता. तो आम्हाला लवकर आउटचं व्हायचा न्हाय. बॉलिंग टाकू टाकू आम्ही दमायचो पण तो काय बॅटिंगला दमायचा न्हाय. पण हा गोठ्यातला क्रिकेटचा डाव आण्णा नसतानाच चालायचा कारण घरातनं गोठा दिसायचा. आमाला जेवढं किरकेट आवडायचं तेवडीच आण्णाला त्याची चीड होती. त्या नादानं पोरं वाया जातील असं त्यांचं स्पष्ट मत व्हतं. टीव्ही वर मॅच बगायला जरी आम्ही कुटं बसलो असलो अन् आण्णा तिकडं दिसले की आम्ही घरला पाळायचो.
टीम करून किरकेट खेळायचं म्हंटलं की आमच्या घराच्या मागं पाराला लागून असलेल्या सूर्यवंशीच्या वाड्याकडे समद्याची पावलं वळायची कारण तिथं राहणाऱ्या वामन कडेच किरकेटचं समदं सामान व्हतं. घरी टीव्ही बी व्हता त्यामुळे मॅच बघायला बी आम्ही तिकडंच जायाचो. कंपिनीची बॅट, स्टंप सेट, टेनिस बॉल असं समदं वामन कडं व्हतं त्यामुळे त्याचा लंय रुबाब असायचा. आमच्यातले समदे इच्छा नसतानाही त्याची मर्जी सांभाळायचे. वाड्यातली पोरं अन् बाकीचे बी त्याला सावकार म्हणायचे अन् आव जावं बोलायची. वामनची एक विशेष गोष्ट म्हणजे तो बनेल अन् चड्डीवरच असायचा नेहमी. जरा जाड बी होता त्यामुळे पळा पळीने लगेच दमायचा. वामन, चिट्ट्या, संदिप्या, त्यांच्या वाड्यातली अजून दोन तीन पोरं, मी, अमर, राहुल, संजू भाऊ, बूध्या अन् आमच्या कडची अजून दोन चार पोरं जमा व्हायचो. चार पाच जणांच्या दोन टीम करून समदे मिळून दर आइतवारी ( रविवारी) दिसभर फफुटयात खेळायचो.
शहरातला असल्यामुळे किरकेटची चांगली माहिती असल्यामुळं अन् चांगला खेळत असल्यानं मला समद्यांकडून जरा जास्तच चांगली वागणूक मिळायची. टीम मधून बॅटिंग बॉलिंग पहिला मिळायची. चिट्ट्या चांगलं खेळायचा समदे त्याला दरविड म्हणायचे राहुल द्राविडचा तो मोठा फॅन होता, त्याचं अन् वामनचं चांगलं जमायचं ते नेहमी एकाच टीम मधी रहायचे. पण बॅटिंग वरून त्यांच्यात वाद ठरलेला असायचा कारण वामन एक रन पळायचाच न्हाय जास्तीत जास्त ओव्हर आपल्याला कशा मिळतील यावर त्याचा भर राहायचा. आम्ही नेहमी वामनच्या अपोझिट टीम मधी असायचो. अमर मी अन् राहवल्या एकाच टीम मधी राहायचो. अमरचा खेळ सेहवाग वानी होता थांबून खेळायचं त्याला माहित नव्हतं. राहवल्या सपोर्टिंग प्लेयर सारखा व्हता. फिल्डिंग मधी एकदम चपळ होता.
वामनला आउट करणं म्हंजी लंय जिकरीचं काम असायचं. सगळं सामान त्याचंच असल्यामुळे तो रडीचा डाव खेळायचा. दोन तीनदा जरी आऊट झाला तरी काय ना काय कारण काडून खेळायचाच. समदी पोरं चिरडीला जायची. "हाई आउट झालास गा बायला" म्हणून ओरडायची पण त्याचा वामन वर काय उपेग व्हायचा न्हाय. कधी कधी त्यावरून वाद व्हायचा तवा वामन सगळं सामान घेऊन घरला निघायचा तवा 'वामन आऊट न झाला' असंच म्हणायची आमच्यावर येळ यायची. पुढं वामन अन् त्याच्या घरचे उमरग्याला स्थायिक झाले तसं वामनचं गावाकडं येनं बी कमी झालं. पण आमचं किरकेट खेळणं सुरूच व्हतं
पुढे जसं मोठे होत गेलो तसं पान मळ्याकडच्या मोठ्या मैदानात आम्ही समदे खेळायचो. सिल्डवर (पैश्यावर) मॅच लावायचो. खाल्ला कडच्या पोरांसोबत लंय मॅचा खेळायचो अन् जिकायचो बी. वरलाकडची टीम भारी का खाल्ला कडच्या पोरांची अशी टशन व्हायाची. गावची तुरणामेंट बी इथंच भरायची. गावची अन् भिमनगरची टीम बी त्यात खेळायची. तवा मैदानावर लंय गर्दी व्हायाची. परमु, संजू भाऊ, चिट्ट्याचा मोठा भाऊ टीम मध्ये व्हते त्यांचा खेळ बगायला आम्ही आवर्जून जायचो. कर्न्या वरणं कामेंट्री चालायची. दुसऱ्या गावच्या टिमा बी यायच्या कधी कधी भांडणं बी व्हायची पर मोठे माणसं मधी पडून भांडण मिटवायची. गावच्या टीम बाहेरच्या तुरणामेंटला ही जायच्या तिकडे जिकून आले की गावात मिरवणूक व्हायची लंय कालवा व्हायचा. नाचून आरडून समदी पोरं थकून आपापल्या घरी जायाची पण किरकेट अन् त्याच्या गप्पा पुढचे पंधरा दिस तर तशाच सुरु राहायाच्या.
No comments:
Post a Comment