Translate

Saturday, April 15, 2023

माझ्या गावाकडच्या गोष्टी : भाग ८ - भिमजयंती




एप्रिल महिन्याच्या आधीपासूनच गावांकडे भीमजयंतीची लगबग सुरू होते. पारावर अन् समाजमंदिरात जयंतीच्या मिटिंगचा सपाटा लावला जातो. यावेळेस काय येगळं करता येईल या इचारानं जाणते अन् तरुण पोरं झपाटून गेलेले असतात. समाजमंदिराकडे सहसा न दिसणारी मंडळी ही वाट चुकवून एखादी तरी फेरी मारताना दिसायची. पट्टी (वर्गणी) गोळा करायला सुरुवात व्हायची तसा मंडळाच्या कार्यकर्त्यांना हुरूप यायचा. महिला मंडळाच्या बी मीटिंग व्हायच्या लेकी सुनाला निरोप धाडले जायचे. कामा धंदयासाठी शहरात स्थायिक झालेली माणसं जयंतीच्या तारखे प्रमाणं समदं आटपून गावात हजर होताना दिसायची. समाजमंदिर आणि आजूबाजूचा परिसर झाडून धुवून चकाचक केला जायचा. मोठी पोरं एकदम झाक असा रंग मारायचे. पारभरून पताक्याचे तोरण बांधले जायचे. रंगरंगोटी नी घरं जवा नटू लागायची तवा पारावरचा पिंपळ बी या दिवसात जोर जोराचा सळसळून या उत्सवात सहभागी व्हायचा. 

नवी कापडं खायला चांगलं चुंगलं मिळणार समद्या भावंडांच्या मित्रांच्या भेटी होणार म्हणून आम्ही सगळे बच्चेकंपनी एकदम खुशीत असायचो. मी दरवर्षी सोलापुरची मिरवणूक करून गावाकडे जाणार त्यामुळे माझ्यासाठी तर डबल मजा असायची. गावाकडे गेलो की सोलापूरच्या मिरवणुकीतील देखावे, डीजे, स्पीकर, लेझीम ताफे, गर्दी याबाबत तासंतास गप्पा रंगायच्या. समद्या पोरवाला वाटायचं 'मायला एकदा सोलापूरच्या जयंतीला जायाय पाहिजे'. 

जयंतीच्या टायमाला समजमंदिर आणि पारावर मुक्काम करायला पोरांची गर्दी व्हायची. घराघरानं एखादा पिवळा बल्ब अन् तर धूर ओकणार मिणमिणत्या चिमण्याचाप्रकाश रहायचा जो त्या घराला बी पुरायचा न्हाय त्यामुळे सगळा महारवडा अंधारातच हरवलेला राहायचा पण जयंतीच्या काळात समाजमंदिरावर लावलेल्या हॅलोजनच्या  लायटीमुळं रातीच्या अंधारात समजमंदिर उठून दिसायचा.

आमची बी लंय इच्छा व्हायाची पण 'लहान हाव अजून ' म्हणून जाऊ देत नव्हते. गावा गावानं या काळात भजनं ठेवली जायाची. गायन पार्ट्याची माणसं अन् पोरं पायात भिंगरी बांधल्यावानी फिरताना दिसायची. या गायन पार्ट्या बाबासाहेबांचे इचार अन् बुद्धांची शिकवण गाण्यांच्या माध्यमातून बेमालूमपणे लोकांमधी पेरायची. ती गाणे ऐकताना हुरूप यायाचा समदं वातावरण भारावून जायचं. संजू भाऊ, बापू म्हणजे बुध्याचा मोठा भाऊ आणि त्यांचे मित्र असे चार पाच जण गावच्या गायन पार्टीसोबत जायाचे अन् आल्यावर ज्या काही गोष्टी सांगायचे त्यात आम्ही समदे हरखून जायचो. त्यांना मिळालेली दाद, इतरांसोबत झालेली जुगलबंदी, लोकांनी त्यांचा केलेला सन्मान, मिळालेले पैसे याबाबतच्या गोष्टी ऐकताना त्या कधी संपूच ने असं वाटायचं. 

तेरा एप्रिलच्या राती दिस असल्यावानी सारा महारवडा जागा रहायचा, समद्याची दुसऱ्या दिवसाची तयारी सुरू असायची परतेकाच्या घरात बाबासाहेबाच्या फोटोला हार घालून वंदना व्हायाची. समजमंदिरात तर भारीच लगबग सुरू रहायची. समजमंदिर लगीन असल्यागत सजवलं जायचं. रातीच्या अंधारातच कधी सकाळची लगबग सुरू व्हायची हे समजायचं नाही. भल्या पहाटे समदे उठून सगळी आवराआवर करून पारावर झेंडावंदनला जमायची. पहाटेपासूनच (कर्ना) स्पीकरवर भीमगीते वाजायला लागायची. समाजमंदिरातील बाबासाहेबांच्या फोटोला हार घालून  त्रिसरण पंचशील घेऊन निळा झेंडा फडकवला जायचा. त्यानंतर पुढाऱ्यांची अन् जाणत्यांची भाषणं व्हायाची. 

गावाकडच्या मिरवणुकीच्या तारखा ठरलेल्या असायच्या ज्या १४ एप्रिल पासून सुरू व्हायच्या. तालुक्याची म्हणजे उमरग्याची जयंती १४ ला व्हायची अन् आमच्या गावची २३ ला. याकाळात गावात जत्रेवानी गर्दी दिसायची. किती बी येळ मिळाला तरी तो जयंतीच्या तयारीला अपुराच वाटायचा. मिरवणुकीच्या दिसाला बी पहाटे पासूनच लगबग सुरू व्हायाची. वाजंत्री पथकाच्या वाटेला समद्याची डोळे लागलेले असायचे. एकदा का वाजंत्री मंडळी गावात पोहचले की साऱ्याच गोष्टी वेग पकडू लागायच्या. सलामीच्या दणक्याने साऱ्या गावाला पथकाची वळख व्हायची. 

खिल्लारी बैलजोडी मिरवणुकीच्या बैलगाडी साठी निवडली जायची. बैलपोळयावानी ही जोडी सजवली जायची. केळीचे खुंट, नारळाच्या फांद्या, पताके, झिरमिळ्या यांनी बैलगाडी सजवली जायची.  बाबासाहेबांचा फोटो ठेवण्यासाठी आकर्षक कमान केली जायची.  पारावरून मिरवणुकीची सुरवात व्हायची. समदा महारवाडा नटून थटून पारावर जमा व्हायचा. बाबासाहेबांच्या जयघोषानं सारं वातावरण दणाणून जायचं. 

समाज मंदिरापासून मिरवणुकीला सुरवात व्हायची, मोठ्या सडकेनं ती थाटात भीम नगर मधून गावाच्या दिशेने निघायची. समद्यात पुढं वाजंत्री लेझीम संघ, नाचणारी अन् जल्लोषात घोषणा देणारी तरुण पोरं त्यांच्या मागं सजवलेली बैलगाडी आजूबाजूला सगळी मोठी मंडळी अन् त्यामागं ओव्या, गाणे यातून बाबासाहेब सांगणाऱ्या महिला अन् या सर्वांच्या आधी मधी घोळणारी लेकरं अशा थाटात आणि जल्लोषात मिरवणूक मार्गस्थ व्हायची. आनंद, उत्साह अन् निळ्या रंगात समदेच रंगून जायाचे, सकाळची संध्याकाळ झाली तरी कुणाला येळेचं भान रहायचं नाही.  सांच्याला पिवळ्या लायटीच्या प्रकाशात सारी मिरवणूक उजळून निघायची. गावातल्या ठरलेल्या ठिकाणाहून मिरवणूक परत फिरायची. मिरवणुकीत कसला बी गोंधळ अन् गडबड होऊ नये म्हणून मोठी माणसं बारीक लक्ष ठिवून रहायची. आठ नऊच्या दरम्यान मिरवणूक समाजमंदिराकडे परतायची. हा दिस संपायलाच नाय पाहिजे असंच समद्यास्नी वाटायचं.



No comments:

Post a Comment