आपल्या भविष्याप्रति आणि ध्येयाप्रति लढणं ज्या व्यक्तिला परिस्थितीनेच शिकवलं असेल ती व्यक्ति त्याच्या प्राप्तीसाठी काय काय करू शकतो याची ही गोष्ट आहे. त्यामुळे शैक्षणिक विषयावर जरी आधारित असला तरी हा चित्रपट जरासा ही रटाळ वाटत नाही. समाजात इमानदार- बेईमान, गरीब-श्रीमंत, प्रबळ-दुर्बळ, हिंदी मीडियम-इंग्लिश मीडियम, सर्व सुविधा असलेला अन काहीच सुविधा नसलेला अशा भागांमध्ये विभागल्या गेलेल्या तरुण विद्यार्थ्यांचा संघर्ष या चित्रपटाने अतिशय अचूकपणे मांडला आहे. त्यामुळे हा फक्त त्या नायकाचा जीवनप्रवास राहत नाही तर तो त्या प्रत्येकाचा जीवनप्रवास बनतो जो समाजाकडून कोणत्या ना कोणत्या प्रकारे विभागला गेला आहे. म्हणुनच शेवटी दाखविण्यात आलेला नायकाचा विजय हा आपला विजय वाटतो. परिस्थितीच्या विपरीत जाऊन तिच्याशी दोन हात करण्याची प्रेरणा देण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो त्यामुळे हिट सुपरहीट याच्या तो पुढे गेला आहे.
चित्रपटाची कथा जेवढी दमदार आहे तेवढीच तिची स्टार कास्ट ही तगडी आहे. चित्रपट क्षेत्रातील परिचयाचे चेहरे जरी नसले तरी त्यांच्या अभिनयाची छाप पाडण्यात प्रत्येकजण यशस्वी झाले आहेत. मनोज कुमार शर्मा यांचे मुख्य पात्र साकारणारा अभिनेता विक्रम मेसी याने तर कमालच केली आहे. कोणतरी पडद्यावर अॅक्टींग करत आहे हेच तो आपल्याला विसरायला भाग पाडतो. इतका वास्तवदर्शी अभिनय त्याने केला आहे. आयटम साँग, इंटिमेट सीन याशिवाय ही चित्रपटातील अभिनेत्री फक्त अभिनयाच्या जोरावर किती प्रभावी दिसू शकते हे या चित्रपटाने उत्तमरीत्या अधोरेखित केले आहे. चित्रपट पाहिल्या नंतर अभिनेत्रीचे नाव गुगल वर सर्च होणार हे नक्की. मुख्य पात्रांप्रमाणे सहकलाकार ही आपल्या लक्षात राहतात प्रत्येकाच्या आयुष्यात असेच तर कॅरेक्टर असतात असेच आपल्याला वाटते. युपीएसी कोचिंग क्षेत्रातील बापमाणूस विकास दिव्यकीर्ती सरांचा गेस्ट रोल मनाला सुखावणारा वाटतो चित्रपटाच्या लेखनात ही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुःख आनंद, राग, हसू आणि आसू या सर्व भावना हा चित्रपट पाहताना आपण अनुभवतो. एकूणच थ्री इडियट्स, मुन्नाभाई सारखीच कमाल याही चित्रपटात करण्यात विधु विनोद चोप्रा आणि त्यांच्या टीमने यश मिळविले आहे.
निखळ मनोरंजनाच्या दृष्टीने जरी पाहिले तरी प्रत्येकाने पहावा असाच हा चित्रपट आहे. विशेष करून विद्यार्थी आणि तरुण वर्गाने तर नक्कीच हा चित्रपट पहावा करण नेहमी नेहमी असे इन्स्पिरेशनल सिनेमे बनत नाहीत. हार नहीं मानूंगा आणि रिस्टार्ट या दोन गोष्टी हा चित्रपट आपल्याला नव्याने शिकवून जातो. मला व्यक्तिशः हा चित्रपट खूप आवडला म्हणुनच स्वतःला याबाबत लिहण्या पासून रोखू शकलो नाही.
No comments:
Post a Comment