Translate

Tuesday, October 25, 2022

ग्रहण आणि अंधश्रद्धा....


सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण यांसारख्या खगोलीय घटना जेव्हा घडत असतात त्यावेळी आपल्या देशात अजूनही अनेक अंधश्रद्धा पाळल्या जातात. ज्या विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरत नाहीत. ग्रहण हे इतर देशातही होत असते पण त्यामुळे तेथील नागरिकांवर कोणताही परिणाम होत नाही फक्त आपलाच देश त्याला अपवाद आहे तो ही अंधश्रद्धेमुळे.

आजचे ग्रहण हे दिवाळीच्या मध्ये आहे त्यामुळे लोकांमध्ये आणखीनच भ्रम पसरविले जात आहेत. अशाच काही गैरसमजुती आणि अंधश्रद्धेवर आधारित प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

१) ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते का?

उत्तर : नाही, सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येतो त्यामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश चंद्रावर पडतो, चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्याला ग्रहण लागते. मुळात भौतिक शास्त्रात नकारात्मक ऊर्जा अशी काही गोष्टच नाही त्यामुळे ग्रहण काळात कोणतीही नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत नाही. ग्रहण म्हणजे फक्त एक सावली आहे ज्यामुळे ती शुभ किंवा अशुभ असू शकत नाही.

२) ग्रहण काळात बाहेर पडू नये का? (विशेषकरुन गरोदर महिलांनी)

उत्तर : ग्रहण काळात बाहेर पडल्याने किंवा आपले दैनंदिन काम केल्याने कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही. याबरोबरच गरोदर महिलांच्या गर्भातील बाळाला कोणतीही इजा होत नाही. ग्रहणकाळ गरोदर महिलांसाठी अपायकारक असतो ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. त्याला कोणताही वैद्यकीय किंवा वैज्ञानिक पुरावा नाही. अंनिसच्या (अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या) अनेक गरोदर सदस्य स्त्रियांनी ग्रहण काळात बाहेर पडून ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध केले आहे. त्या सर्वांच्या मुलांवर कोणताही परिणाम झाला नाही. 

३) ग्रहणाचा जन्माला येणाऱ्या बाळाचे ओठ आणि टाळू फाटण्याशी काही संबंध आहे का?

उत्तर : काहीही संबंध नाही. ओठ आणि टाळू फाटणे हा जनुकीय आजार आहे. त्याचा ग्रहनाशी काहीही संबंध नाही.

४) ग्रहण काळात अन्नपदार्थ शिजवू नये किंवा जेवण करू नये?

उत्तर : यात ही काही तथ्य नाही. ग्रहण काळात अन्नपदार्थ शिजवल्याने किंवा जेवण केल्याने व्यक्तीवर कोणताही परिणाम होत नाही. आपला देश सोडला तर तर इतर देशांचे दैनंदिन जीवन ग्रहण काळात ही नेहमी प्रमाणे सुरू असते त्यांच्यावर काही परिणाम झाल्याची घटना अजून तर घडलेली नाही.

५)  ग्रहण सुटल्यानंतर अंघोळ करणे गरजेचे आहे का?

उत्तर : नाही.  ग्रहण काळात मानवी शरीरावर कोणताही अपायकारक परिणाम होत नाही त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करणे किंवा इतर काही करण्याची कोणतीच आवश्यकता राहत नाही.


अभ्यासाअंती या गैरसमजुतीचे आणि अंधश्रद्धेचे मूळ हे पुराणकथा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये असल्याचे लक्षात येते. फक्त भारतातच नव्हे तर सुरवातीच्या काळात संपूर्ण जगामध्ये खगोलीय घटनांबद्दल वेगवेगळ्या मान्यता होत्या. पण कालांतराने वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या स्वीकृतीमुळे जगभरातून त्या नष्ट झाल्या, मात्र भारतातून त्या अजूनही समूळ नष्ट झालेल्या नाहीत. विज्ञानाच्या शोधाआधी अज्ञानापोटी हे सर्व केलं जायचं पण वैज्ञानिक जगात अशा गोष्टींना थारा नाही. जागतिक अंतराळ संशोधन संस्था नासाने ही ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नसल्याचे खूप आधीच स्पष्ट केले आहे. वरील गैरसमजुतींचा आणि अंधश्रद्धांचा ज्याप्रमाणे ग्रहणाशी काही संबंध नाही त्याचप्रमाणे दिवाळी किंवा इतर कोणत्या सणाचाही ग्रहणाशी कसलाही संबंध नाही त्यामुळे दिवाळीत आलेल्या या ग्रहणा बाबत शंका घेण्याची किंवा घाबरण्याची काहीच गरज नाही. सूर्यग्रहण थेट पहिल्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या डोळ्यांना धोखा होऊ शकतो त्यामुळे ते थेट डोळ्यांनी पाहू नये ही एक गोष्ट सोडली तर ग्रहणाचा कोणत्याच सजीवावर कसलाही परिणाम होत नाही हेच पूर्ण सत्य आहे. सूर्याला चंद्राला लागलेलं ग्रहण हे ग्रहण थोड्या काळानंतर का होईना सुटते पण मानवी बुद्धीला लागलेलं ग्रहण कधी सुटणार या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.



Monday, September 19, 2022

माझ्या गावाकडच्या गोष्टी : भाग ७ - वामन आऊट न झाला....


किरकेटचा नाद नसेल अशी पोरं कुण्या बी गावात सापडणार नाहीती. आमचा गावही त्याला अपवाद नव्हता. लहानापासून ती थोरापातूर सगळेच खालाकडच्या पान मळ्याच्या बाजूला असलेल्या मैदानात सकाळ संध्याकाळ दिसायचीच. अन् मैदानात जमायचं नाही तवा पारावरच्या छोट्या मोकळ्या जागेत किरकेटचा खेळ चालायचा. सहावी सातवीच्या सुट्ट्यात गावाकडे असायचो तेव्हा एक तर शेताला जाणे किंवा क्रिकेट खेळणे हाच माझा उद्योग सुरू असायचा. चांगली बॅट स्टंप असं आमच्याकडे काही नसायचं जंगलीच्या जळणातल्या काट्या स्टंपसाठी अन् त्यातला त्यात एक मोठा दंडुका बॅट म्हणून घेतला की वरलाकडच्या गोठ्याच्या कुंपणात आमचा खेळ सुरू व्हायचा. कधी रबरी बॉल असायचा नाही तर कधी प्लास्टिकचा. पोरांची लंय गर्दी झाली तर एक टिप्पा आऊटचा खेळ चालायचा. 

मी सोलापूरहून नेलेल्या चिंधी बॉलचं तिकडच्या समद्या पोरास्नी लंय अपरुग वाटायचं. त्याच्या पार चिंध्या निघे पातूर त्याचा वापर व्हायचा. आमच्यात संजू भाऊ जरा मोठा होता अन् क्रिकेट बी चांगला खेळायचा गावच्या भिमनगरच्या टीम मध्ये बी व्हता. तो आम्हाला लवकर आउटचं व्हायचा न्हाय. बॉलिंग टाकू टाकू आम्ही दमायचो पण तो काय बॅटिंगला दमायचा न्हाय. पण हा गोठ्यातला क्रिकेटचा डाव आण्णा नसतानाच चालायचा कारण घरातनं गोठा दिसायचा. आमाला जेवढं किरकेट आवडायचं तेवडीच आण्णाला त्याची चीड होती.  त्या नादानं पोरं वाया जातील असं त्यांचं स्पष्ट मत व्हतं. टीव्ही वर मॅच बगायला जरी आम्ही कुटं बसलो असलो अन् आण्णा तिकडं दिसले की आम्ही घरला पाळायचो.

टीम करून किरकेट खेळायचं म्हंटलं की आमच्या घराच्या मागं पाराला लागून असलेल्या सूर्यवंशीच्या वाड्याकडे समद्याची पावलं वळायची कारण तिथं राहणाऱ्या वामन कडेच किरकेटचं समदं सामान व्हतं. घरी टीव्ही बी व्हता त्यामुळे मॅच बघायला बी आम्ही तिकडंच जायाचो. कंपिनीची बॅट, स्टंप सेट, टेनिस बॉल असं समदं वामन कडं व्हतं त्यामुळे त्याचा लंय रुबाब असायचा. आमच्यातले समदे इच्छा नसतानाही त्याची मर्जी सांभाळायचे. वाड्यातली पोरं अन् बाकीचे बी त्याला सावकार म्हणायचे अन् आव जावं बोलायची. वामनची एक विशेष गोष्ट म्हणजे तो बनेल अन् चड्डीवरच असायचा नेहमी. जरा जाड बी होता त्यामुळे पळा पळीने लगेच दमायचा. वामन, चिट्ट्या, संदिप्या, त्यांच्या वाड्यातली अजून दोन तीन पोरं, मी, अमर, राहुल, संजू भाऊ, बूध्या अन् आमच्या कडची अजून दोन चार पोरं जमा व्हायचो. चार पाच जणांच्या दोन टीम करून समदे मिळून दर आइतवारी ( रविवारी) दिसभर फफुटयात खेळायचो. 

शहरातला असल्यामुळे किरकेटची चांगली माहिती असल्यामुळं अन् चांगला खेळत असल्यानं मला समद्यांकडून जरा जास्तच चांगली वागणूक मिळायची. टीम मधून बॅटिंग बॉलिंग पहिला मिळायची. चिट्ट्या चांगलं खेळायचा समदे त्याला दरविड म्हणायचे राहुल द्राविडचा तो मोठा फॅन होता, त्याचं अन् वामनचं चांगलं जमायचं ते नेहमी एकाच टीम मधी रहायचे. पण बॅटिंग वरून त्यांच्यात वाद ठरलेला असायचा कारण वामन एक रन पळायचाच न्हाय जास्तीत जास्त ओव्हर आपल्याला कशा मिळतील यावर त्याचा भर राहायचा. आम्ही नेहमी वामनच्या अपोझिट टीम मधी असायचो. अमर मी अन् राहवल्या एकाच टीम मधी राहायचो. अमरचा खेळ सेहवाग वानी होता थांबून खेळायचं त्याला माहित नव्हतं. राहवल्या सपोर्टिंग प्लेयर सारखा व्हता. फिल्डिंग मधी एकदम चपळ होता.

वामनला आउट करणं म्हंजी लंय जिकरीचं काम असायचं. सगळं सामान त्याचंच असल्यामुळे तो रडीचा डाव खेळायचा. दोन तीनदा जरी आऊट झाला तरी काय ना काय कारण काडून खेळायचाच. समदी पोरं चिरडीला जायची. "हाई आउट झालास गा बायला" म्हणून ओरडायची पण त्याचा वामन वर काय उपेग व्हायचा न्हाय. कधी कधी त्यावरून वाद व्हायचा तवा वामन सगळं सामान घेऊन घरला निघायचा तवा 'वामन आऊट न झाला' असंच म्हणायची आमच्यावर येळ यायची. पुढं वामन अन् त्याच्या घरचे उमरग्याला स्थायिक झाले तसं वामनचं गावाकडं येनं बी कमी झालं. पण आमचं किरकेट खेळणं सुरूच व्हतं 

पुढे जसं मोठे होत गेलो तसं पान मळ्याकडच्या मोठ्या मैदानात आम्ही समदे खेळायचो. सिल्डवर (पैश्यावर) मॅच लावायचो. खाल्ला कडच्या पोरांसोबत लंय मॅचा खेळायचो अन् जिकायचो बी. वरलाकडची टीम भारी का खाल्ला कडच्या पोरांची अशी टशन व्हायाची. गावची तुरणामेंट बी इथंच भरायची. गावची अन् भिमनगरची टीम बी त्यात खेळायची. तवा मैदानावर लंय गर्दी व्हायाची. परमु, संजू भाऊ, चिट्ट्याचा मोठा भाऊ टीम मध्ये व्हते त्यांचा खेळ बगायला आम्ही आवर्जून जायचो. कर्न्या वरणं कामेंट्री चालायची. दुसऱ्या गावच्या टिमा बी यायच्या कधी कधी भांडणं बी व्हायची पर मोठे माणसं मधी पडून भांडण मिटवायची. गावच्या टीम बाहेरच्या तुरणामेंटला ही जायच्या तिकडे जिकून आले की गावात मिरवणूक व्हायची लंय कालवा व्हायचा. नाचून आरडून समदी पोरं थकून आपापल्या घरी जायाची पण किरकेट अन् त्याच्या गप्पा पुढचे पंधरा दिस तर तशाच सुरु राहायाच्या.

Wednesday, September 7, 2022

"मांग महाराच्या दुःखाला वाचा फोडणाऱ्या आद्य लेखिका - मुक्ता साळवे".


१६५ वर्षाआधी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या "मुक्ता साळवे" या चौदा वर्षाच्या मुलीने लिहलेला हा निबंध. मुंबई येथून १५ फेब्रुवारी १८५५ रोजी "ज्ञानोदय" च्या अंकात प्रकाशित झाला होता.

या निबंधाची भाषा आणि विवेकवादी विचार पाहिल्यानंतर त्याकाळात फुले दाम्पत्याच्या शाळेची गुणवत्ता काय होती हे आपसूकच लक्षात येते. धर्माकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याजोगे ज्ञान त्या वयात आत्मसात करणे ही काही सामान्य गोष्ट नव्हती.आणि विशेष बाब म्हणजे धर्माच्या आधारे जी गुलामगिरी लादली गेली होती त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण आहे याचीही अनुभूती त्या वयात या महान आणि क्रांतिकारी विद्यार्थीनीला आली होती. सोबतच आपल्या विरोधात व आपल्या बाजूने असलेल्या एकाच जातीच्या लोकांमधील फरक ही उमजला होता. या निबंधाच्या माध्यमातून जे वास्तव मांडले आहे त्यामुळे स्वराज्यद्रोही आणि मनुस्मृती प्रमाणे चालणाऱ्या पेशवाईची खरी ओळख देशाला झाली. सत्तेचा वापर धर्माचे आणि विशिष्ट वर्गाचे अधिकार जोपासण्यासाठी कशाप्रकारे केला जात होता हे उघड झाले. अन्यायाविरुद्ध आपल्या लेखणीच्या माध्यमातून आसूड ओढणाऱ्या या पहिल्या मागासवर्गीय लेखिकेचा निबंध खालीलप्रमाणे होता.


"ईश्वराने मज दीनदुबळीच्या अंत:करणात आम्हा दुर्दैवी पशुंपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांगमहारांच्या दु:खाविषयी भरविले; तीच जगत्कर्त्याचे मनात चिंतन करून ह्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे. परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता, मांगमहारांस व ब्राम्हणांस उत्पन्नकर्ता जगन्नाथ आहे.

महाराज, आता जर वेदाधारेकरून आमचा द्वेष करणारे लोक ह्यांच्या मताचे खंडण करावे तर हे आमच्यापेक्षा उंच म्हणविणारे, विशेषे करून लाडूखाऊ ब्राम्हण लोक असे म्हणतात की, वेद तर आमचीच मत्ता आहे. आम्हीच ह्यांचे अवलोकन करावे. तर ह्यावरून उघड दिसते की, आम्हास धर्मपुस्तक नाही. जर वेद ब्राम्हणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राम्हणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की नाही बरे? हर हर!

असे वेद की ज्यांचे ब्राम्हणांच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने महापातक घडते, तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडेस किती मूर्खत्व (दोष) येईल बरे? मुसलमान लोक कुराणाच्या आधारेकरून, व इंग्रज लोक बैबलच्या आधारेकरून, आणि ब्राम्हण लोक वेदाधारेकरून चालतात. म्हणूनच ते आपापल्या खर्‍या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते. तर हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ. परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडेस पहावे. तो व त्यासारिखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत; व असा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो.

आम्हा गरीब मांगमहारांस हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले, व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालविला होता. आम्हा मनुष्यास ब्राम्हण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानिले आहे. सांगते ऐका, ज्या वेळी बाजीरावाचे राज्य होते त्या वेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानीत होते की काय? पहा बरे तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे; त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय? परंतु मांगमहारांस मारू नका असे म्हणणारे कोण बरे? त्यासमयी मांग अथवा महार ह्यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते.

अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार? कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महारमांग असून वाचतात, तर ब्राम्हणांनी का त्यास दप्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे की काय? असे बोलून तो त्यास शिक्षा करी.

दुसरे असे की, लिहीण्याची बंदी करून हे लोक थांबले की काय? नाही. बाजीरावसाहेब तर काशीस जाऊन धुळीत रहिवासी होऊन तद्रूप झाले पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने येथील महार तो काय? पण तोहि मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. सोवळे नेसून नाचत फिरणार्‍या लोकांचा एवढाच हेतु की, काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असे मानणे व त्यापासून त्यास सुख वाटते. पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दु:खे पडतात ह्याचा ह्या निर्दयांच्या अंतःकरणात द्रव येतो की काय? ह्याच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीस ठेवीत नाहीत.

जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कोठून मिळणार? बरे, हे उघडच सिद्ध होते की आमचे हाल फार होतात. पंडितहो, तुमचे स्वार्थी आपलपोटे पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते ह्याजकडेस लक्षपूर्वक कान द्या. ज्या वेळेस आमच्या स्त्रिया बाळंत होतात त्या वेळेस त्यांच्या घरावर छपर सुद्धा नसते म्हणून हीव पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दु:ख होत असेल बरे! ह्याचा विचार स्वताच्या अनुभवावरून करा. जर एखाद्या वेळेस त्यास बाळंतरोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसे कोठून मिळणार? असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्याने फुकट औषधे दिली?

मांगमहारांच्या मुलांस ब्राम्हणादिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारात जात नाहीत. ते म्हणतात की आपणास उच्छिष्ट आणावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते. असे म्हणून उगीच राहतात. हाय हाय, काय रे भगवान हे दुःख ? हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येतं. ह्या कारणास्तव भगवंताने आम्हांवर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारला येथे पाठविले. आणि आता ह्या राज्यातून आमची जी दुःखे निवारण झाली ती अनुक्रमे लिहिते -

शूरपणा दाखविणारे व गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले, आपटे, त्रिकमजी, आंधळा पानसरे, काळे, बेहरे हे निरर्थक मांगमहारांवर स्वाऱ्या घालून विहिरी भरीत होते, व गरोदर बायकांसही देहांत शासने करीत होते ती बंद झाली; आणि पुणे प्रांती मांगमहारांवर कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंदाधुंदी होती की ज्याच्या मनात वाटेल त्याने महारमांगांवर नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा जुलूम करीत होते; ती बंद झाली. किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली. आमचा वंशहि वाढत चालला. मांगमाहारांवर ह्यातून कोणी बारीक पांघरूण पांघरले असता ते म्हणत कि, ह्यांनी चोरी करून आणले, हे पांघरून तर ब्राम्हणानेच पांघरावे.

जर मांगमहार पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यांस बांधून मारीत, पण आता इंग्रजाच्या राज्यात ज्यास पैसे मिळेल त्याने घ्यावे. उंच वर्गातील लोकांचा अपराध केला असता मांगाचे किंवा महाराचे डोके मारीत होते ती बंद झाली. जुलमी बिगार बंद केली. अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळीक कोठे कोठे झाली. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली. बाजारात फिरण्याची मोकळीक झाली.

आता निःपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते. ती अशी कि जे ब्राम्हण आम्हांस वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते, तेच आता माझे स्वदेशीय प्रिय मित्र बंधू आम्हांस ह्या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात. परंतु सर्वच ब्राम्हण घेतात असे नाही. त्यातून ज्यांचा विचार सैतानाला नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करतात. आणि जे माझे प्रिय बंधु आम्हांस बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यांस म्हणतात कि तुम्हांस जातीबाहेर टाकू.

आमच्या प्रिय बंधूंनी मांगमहारांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत. व ह्या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करितात. म्हणून मांडलेल्या शाळांना फारच साहाय्य आहे. अहो दरिद्रांनी व दुःखानी पिडलेले मांगमहार लोक हो, सहकतुम्ही रोगी आहात, तर ज्ञानरूपी औषध घ्या. म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही चांगले नीतिवान व्हाल; तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जानवराप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील, तर आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही; परंतु हेही माझ्याने सिद्ध करवत नाही. ह्यास उदाहरण, जे शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेही एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्याजोगे वाईट कर्म करितात, मग तुम्ही तर मांगमहारच आहात."


आत्मग्लानीत निद्रिस्त असणाऱ्या आपल्या समाजासाठी आजही हे विचार तितकेच उपयुक्त आणि प्रेरणादायी असे आहेत. असे व्यक्तिमत्त्व आपले रोल मॉडेल असले पाहिजे पण अजूनही समाजातील सर्व स्तरात यांची ओळख ही पोहचली नाही. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपला इतिहास आपणच जपला पाहिजे आणि तो येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचवला ही पाहिजे.

Friday, September 2, 2022

शिक्षितांच्या अंधश्रद्धा.....





आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात ही आपल्याकडे घरातील एखाद्या  व्यक्तीच्या किंवा लहान मुलाच्या वागण्यात, बोलण्यात आणि तब्येतीमध्ये फरक जाणवल्यास दहा पैकी सात घरात अजूनही बाहेरवासा, भूतबाधा झाल्याचेच मानले जाते आणि त्याप्रमाणे घरगुती इलाज करून मग डॉक्टरकडे नेले जाते. माणसाचे मन ही शरीराप्रमाणे आजारी पडते हे ज्ञान अजून सर्वांपर्यंत पोहचलेले नाही. आजच्या घडीला आपल्या देशातील शिक्षितांचे प्रमाण हे नक्कीच आधीच्या तुलनेत अधिक आहे. असे असले तरी अंधश्रध्दांंचं प्रमाण ज्या प्रमाणात घटायला पाहिजे होतं ते अजूनही घटलेलं नाही. कारण शिक्षितांच्या अंधश्रद्धा या पुर्णतः अज्ञानावर वर आधारित नसून जात, धर्म, वर्ण, परंपरा याशी निगडित आहेत. त्यामुळे ज्ञानाच्या आधारे त्या दूर होतील अशी शक्यता उरत नाही. अंधश्रद्धा एकूणच वाईट पण शिक्षितांच्या अधिक वाईट कारण ते त्या अंधश्रद्धांचं समर्थन करतात.

शिक्षितांच्या अंधश्रद्धेची जी प्रमुख कारणे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी सांगितली आहेत ती खालीलप्रमाणे आहेत. 

वर्ग संघर्ष. धार्मिक आणि जातीय अस्मितेची जपणूक ही वर्ग संघर्षाच्या मुळाशी आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावाने ज्या समाजामध्ये अस्मिता बळकट, टोकदार आणि धारधार करण्याचा कार्यक्रम सुरू असतो तिथे अंधश्रद्धेला खतपाणी मिळतच राहते. धर्माचं बाजारीकरण, सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढवणं, लोकांची धार्मिकता धर्मांधतेकडे वळविण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी अंधश्रद्धा निर्मूलनास बाधक ठरतात. 

अदृष्टाची भीती मृत्यू कधी येणार या अदृष्टाची भीती प्रत्येकाच्या मनात वसत असते आणि त्यापासून मुक्तता करण्यासाठी कोणी म्हणाले की अमुक तमुक गंडा, ताईत घाल, जप कर, नवस उपासतापास कर तेव्हा निर्भय नसलेली मने चटकन तिकडे वळतात. मृत्यु ही इतकी अकल्पित गोष्ट आहे की वाटतं हे करून बघायला काय हरकत आहे.

पुढचे महत्वाचे कारण म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या पदरी येणारी अगतिकता आणि दुसरी समाज जीवनामध्ये अनेक कारणांनी वेढून राहिलेली अस्थिरता. मागच्या वर्षी ज्या खर्चात माझं भागत होतं त्यात आता भागत नाही किंवा मी सरकारी बंगल्यात राहत होतो आता नौकरी संपल्यामुळे तो सोडून स्वतःचे घर बांधावे लागणार जे परवडणारे नसतं ही झाली अगतिकता. आणि अस्थिरता म्हणजे कितीही चांगला खेळाडू असला तरी त्याला माहिती नसतं आपण उद्यापासून शून्यावर बाद होणार आहे का? कितीही चांगला अभिनेता असला तरी त्याला माहिती नसतं येणारे क्रमशः सिनेमे कशामुळे फ्लॉप जातील? कितीही उत्तम उद्योग व्यवसाय असेल त्याला हे समजत नाही की माझ्या गावात स्फोट झाला आणि माझेच दुकान त्यात उध्वस्त झाले तर काय?

अतृप्त कामनांची पूर्ती. प्रत्येकाच्या मनात अनेक इच्छा आकांक्षा असतात ज्या सर्वकाही पूर्ण होत नाहीत. पण त्या पूर्ण होण्यासाठीचा अस्तित्वात नसलेला एखादा मार्ग जर कोणी दाखवत असेल तर माणसं तिकडे धावू लागतात. मी जर एका बाबाकडे गेलो बाबाने जर मला कृपाशीर्वाद दिला आणि लॉटरीचं तिकीट किंवा गुप्तधन मिळण्याची शक्यता निर्माण होत असेल तर माझ्या अतृप्त कामनांची पूर्तता होते.

अपराधी भावना. आपल्या उपजीविकेचे साधन नैतिक मार्गाने नसल्यास म्हणजेच दोन नंबरच्या कामातून पैसे मिळत असल्यास त्यातुन अपराधीपणाची भावना निर्माण होते. ती दूर होण्यासाठी दान धर्म मोठ्या प्रमाणावर केला जातो. धार्मिक स्थळांना देणग्या दिल्या जातात. ज्यामुळे अपराधी भावना कमी होण्यास मदत होते.

यासोबतच महाग होत जाणारी आरोग्य व्यवस्था हे एक बुवा बाबांचं प्रस्थ वाढण्याचं एक महत्वाचे कारण आहे. ज्या वेळेला गरज असते त्या वेळेला योग्य स्वरूपाची आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसेल तर अपरिहार्यपणे अंधश्रद्धांचा आधार घेतला जातो.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा असे शिक्षणक्रमात लिहले आहे. आपल्या संविधानात ही वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार करणं हे नागरिकांचे कर्तव्य आहे असे लिहलेले आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीतच असल्याचे दिसून येते. कारण शिक्षितांची अंधश्रद्धा हा केवळ विज्ञानाच्या प्रसाराचा भाग नाही त्याने ती जाणार नाही. 

शिक्षितांच्या अंधश्रद्धा या अशिक्षितांच्या अंधश्रद्धेपेक्षा समाजासाठी आणि देशासाठी अधिक घातक आहेत त्यामुळे त्यांचे समूळ उच्चाटन करणे अपरिहार्य ठरते. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्भय कृतीशीलता हा एक प्रभावी उपाय आहे. आपल्या देशाच्या तुलनेत प्रगत देशांमध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण नगण्य असण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन फक्त शिक्षणापुरता मर्यादित न राहता ज्या प्रमाणात तो कृतीद्वारे शिक्षितांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनेल त्या प्रमाणात शिक्षितांच्या अंधश्रद्धांचं निर्मूलन होईल. विवेकवादी विचारांनी इथल्या जनसमुदायाची पकड घेतली तर लोकांच्या प्रश्नांचे खरे लढे उभारतील आणि स्वाभाविकच देशातील सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल. ज्यामुळे धार्मिक आणि जातीय अस्मिता मागे पडेल, सांस्कृतिक राष्ट्रवाद कमी होऊन संविधानाला अभिप्रेत असलेली धर्मनिरपेक्षता प्रभावी होईल.



संदर्भ - डॉ. नरेंद्र दाभोळकर व्यख्यान पुणे विद्यापीठ दि. २७/०२/२०१०.






Tuesday, August 2, 2022

लोकराजा - छत्रपती राजर्षी शाहू महाराज


लोकांच्या सुखात आपले सुख आणि त्यांच्या दुःखात दुःखं मानणारा, प्रजेचा पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ करणारा राजा म्हणजे लोकराजा छत्रपती शाहू महाराज. प्रजेचे सुख व कल्याण हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या "हिंदवी स्वराज्याचे"  अंतिम ध्येय होते आणि तेच ध्येयधोरण शाहू महाराजांनी आपल्या राज्यकारभारात अंगिकारले होते. छत्रपतींकडून मिळालेला प्रजाहितदक्षतेचा वारसा जपणे हे त्यांच्यासाठी सर्वतोपरी होते. शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या राज्याभिषेक शकाने केलेली पहिल्या जाहीरनाम्याची सुरुवात व राज्यारोहनानंतर अवघ्या १२ दिवसांनी काढलेल्या एका सरकारी आदेशावरून त्याचा प्रत्यय येतो. 

महाराज आपल्या या आदेशात म्हणतात, "अनुभवाअंती असे दिसून आले आहे की, श्रीमन्महाराज सरकारची खुद्द स्वारी इलाखे मजकुरी शिकारी करिता होते तेव्हा ज्या पेट्याचे हद्दीत मुकाम पडतो त्या पेट्याचे मामलेदार त्या पेट्याचे फौजदारास सरबराई ठेवण्याबद्दल हुकूम करितात; फौजदार आपले ताब्यांतील पोलिसाकडे हे काम सोपवितात. मग ते पोलिस सभोवारचे खेड्यापाड्यांत जाऊन एके ठिकाणी बकरी, दुसरे ठिकाणी अंडी, कोंबडी वगैरे जेथे जो जिन्नस सापडेल तो घेतात. हुजूरचे स्वारीचा त्या तालुक्यातून कूच होण्याचे वक्ती स्वारीबरोबर जो खासगी खात्यातील कारकून कामगारीवर असतो तो मामलेदार याजकडून हिशोब घेतो आणि पोहोचल्या जिनसांबद्दल पैसा आदा करितो. नंतर तो पैसा मामलेदार फौजदाराकडे, फौजदार आपले शिपायाकडे, शिपाई गावगन्नाचे पाटलांकडे आणि पाटील ज्या इसमाकडून जिन्नस घेतले त्या इसमास आदा करतात, अशी काल्पनिक समज आहे. परंतु ज्या गोरगरीब इसमांकडून जिन्नस घेण्यात येतात, त्या इसमांस तो सर्व किंवा त्यातील काहीतरी पैसा पोहोचतो किंवा कसे याजबद्दल वानवा वाटतो. असे होऊ नये व ज्या गोरगरिबांचा माल घेतला त्यास भरपूर पैसा पोहोचावा व आपल्या स्वारीच्या निमित्ताने कोणास उपसर्ग किंचितही होऊ नये, अशी खुद श्रीमन्महाराज सरकारची इच्छा आहे सबब खाली लिहिल्या प्रमाणे सामग्रीचा पुरवठा करण्याबद्दल नियम करण्यात येत आहेत.

१) ज्वारी, तांदूळ, डाळी धान्ये, पीठ, साखर, मसाला वगैरे सामग्री पर हुजूरचे मुतापाखान्याकडे स्वारीचे लोकांकरिता लागेल ती यथाशक्य सर्व कोल्हापुराहून खासगी खात्याकडून नेण्यात यावी.

२) बकरी, कोंबडी, अंडी हे जिन्नस घेण्याकरिता स्वारी निघण्याचे अगोदर खासगीकडील मुद्दाम एक कामगार पाठविण्यात यावा. त्याने मुक्कामाचे ठिकाणानजीक जो बाजारचा गाव असेल त्या गावी बाजारचे दिवशी जाऊन सर्व जिन्नस मालकास रोख पैसा जेव्हाचे तेव्हा जेथल्या तेथे देऊन घ्यावे. सर्पणाबद्दलही त्याचप्रमाणे अगाऊ तजवीज करावी. सामानाचे पैशाचा बटवडा करणे तो त्या वेळी मुलकी कामगार गावी हजर असल्यास त्याचे समोर पैसा आदाकरून त्याची सही घ्यावी. तसा कोणी नसल्यास गावकामगार पाटील-कुलकर्णी यांचे समक्ष पैसा आदा करून मालकाची पावती घ्यावी व कामगाराची साक्ष घ्यावी......

३) दुधाबद्दल खाजगी थट्टीपैकी म्हशी स्वारीबरोबर नेण्याची तजवीज ठेवावी. कदाचित ही तजवीजन घडेल तर खाजगी खात्याकडील वर नमूद केले कामगाराने किंवा कारकुनाने नजीकचे गावचे इसमाकडून स्वतः दूध घेऊन मालकास गावी भाव असेल त्याप्रमाणे ताबडतोब जेथल्या तेथे सर्व पैसा चुकवून द्यावा. स्वारीचा कूच होईपर्यंत ठेवू नये......

४) गवत सरकारी कुरणे बहुशः सर्व पेयानिहाय आहेत, सवव लोकांकडून हे जिन्नस घेण्याचे कारण नाहीच, कदाचित प्रसंगोपात खरेदी करावा लागल्यास रोख पैसा मालकास जेव्हाचे तेव्हा देऊन घ्यावा......

५) मेहेरबान पोलिटिकल एजंट साहेब बहादूर प्रांत करवीर व कर्नाटक यांची अथवा इतर इलाखे मजकूरचे साहेब लोकांच्या अथवा ब्रिटिश सरकारचे अमलातील साहेब लोकांच्या स्वाऱ्या आल्यास ठिकठिकाणचे संबंध असणारे मामलेदार, शिरस्तेदार वगैरे यांनी रोख पैसा बाजार भावाप्रमाणे जेव्हाचे तेव्हा साहेब लोक किंवा त्यांचेकडील जे इसम माल घेतील त्यांजकडून घेऊन ज्याचा त्यास आदा करण्याची तजवीज बिनचूक ठेवावी. "

छत्रपती शाहू महाराज हे खरेखुरे शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे राजे होते. हे त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या मान्यवरांनी सांगितलेल्या आठवणीतुन  अधिक स्पष्ट होते. अशाच काही निवडक आठवणी खाली दिल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या शिदोरीवर महाराजांचे जेवण

आम्ही ठरल्या ठिकाणी एका ओढ्यावर पोचलो. तेथे त्तीस-चाळीस शेतकरी आधीच येऊन बसले होते. महाराजांचे दुपारचे जेवण कोठे व्हावयाचे हे आगाऊ ठरलेले असावयाचे व त्या ठिकाण आसपासचे शेतकरी आपापल्या शिदोऱ्या बांधून यायचेच असा नित्यक्रम असे. आम्ही उतरल्यावर हातपाय धुतले. महाराज एका दगडावर जाऊन बसले, व यस सांगून माझ्या जेवणाची तयारी केली. महाराज बसले त्या दगडाच्या आसपास शेतकरी जरा दूर उभे होते. • शिकारीतील जेवण पाहण्यासारखे असे. एका स्वतंत्र गाडीत एक पुलाव्याचा हंडा, एक मोठी चपात्यांची भरलेली परात, एक रश्शाचा लहानसा हंडा व एक द्रोणपत्रावळींची गाडी असा थाट असावयाचा. शिकारी नोकर जमलेल्या माणसांस "ह्या पत्रावळी घ्या व बसा" म्हणत.

महाराजांच्या सभोवार शेतकऱ्यांचे मोठे कडे बने, काही माणसांजवळ त्यांच्या भाकऱ्या, डांगर अगर कांदे, ताकाचे मोगे असत. महाराजांनी परेडची पाहणी करावी त्याप्रमाणे "है तू काय आणलेस?" असे विचारीत फिरावे, एखाद्याच्या भाकरीवरील लोणचे उचलावे, दुसऱ्याच्या भाकरीवरील कांदा उचलावा, तिसऱ्याच्या मोग्यांतील ताक ओतून घेण्यास सोवळेकन्यास सांगावे, आणि ती जमलेली शिदोरी घेऊन परत आपल्या दगडावर बसावे महाराजांनी "हे करा सुरुवात म्हटल्यावर सो आपापल्या जागेवर बसत, त्यांना एक सरकारी नोकर भराभर चपात्या वाढी, तर दुसरा पुलावा बाढी, रस्सा वाढी. हे गरीब शेतकरी जेवत असताना महाराजांना समाधान वाटे. आणि स्वतः चे जेवण शेतकऱ्याकडून गोळा केलेल्या शिदोरीवरच होई.

(शाहू महाराजांच्या पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे पाहिले विद्यार्थी डॉ. पी. सी. पाटील यांच्या माझ्या आठवणी या आत्मवृत्तातुन)


'सित्या, काय  कोरड्यास असलं तर आणतोस काय?'

( भाई माधवराव बागल यांच्या आठवणीतुन)

एकदा हरणाच्या शिकारीसाठी महाराज विजापूरच्या परिसरात गेले होते. परतीच्या प्रवासातील ही कथा

गाडी रानावनातून निर्जन वाळवंटातून जात होती. अंधार होत चालला. आजूबाजूस गाव नव्हतं. चोरी- दरोड्याची भीती होतीच. वाटेत काही झोपड्या दिसल्या. एक माणूस टेहळणी करतो असे दिसले. महाराजांनी काळोखात दिसणाऱ्या माणसाला हाक मारली, कोण हायर इकडं ये.' माणूस दचकत दचकत जवळ आला. 'काय पाहिजे ? 'अरं, त्यो सित्या बेरड हाय काय बघ. असला तर त्याला म्हणावं शाहू छत्रपती तुला बोलावतोय "

थोड्या वेळानं दोन माणसे आली. पण ती दचकतच आली. कोणी तरी पोलिस फौजदार पकडायला यायचा ही त्यांना भीती होती. कारण वस्ती होती ती सारी बेरडांचीच..

'हाय काय रे ?' म्हणून पुनः मोठ्याने विचारताच महाराजांचा आवाज सित्यानं ओळखला. लगेच धावून येऊन महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज म्हणतात, सित्या काय कोरड्यास असलं तर आनतोस काय ?' बातमी सर्वांना समजली. प्रत्येकाने आपल्या घाँ मिळेल ती भाकर आणि अन्न आणलं. ते महाराजानी व गाडीतल्या मंडळींनी खाल्लं, त्यांच्या मडक्यातले गार पाणी सर्वांनी ढोसले. जाताना महाराज म्हणतात, 'सित्या लेका, संभाळून अस बरं काय !'

महाराजांनी गरिबांच्या प्रेमाचा नमुनाही आपल्या मंडळींना दाखवला !


गरिबासाठी धोक्यात उडी

( डी बी माळी )

सावंतवाडीच्या महाराजांचे बडोद्याच्या राजकन्येशी जे बडोदा मुक्कामी लग्न झाले. ते लग्न राजर्षी शाहू महाराजांच्या देखरेखीखाली झाले. या लग्न समारंभाचे प्रसंगी महाराजांनी आपल्या आवडीचे निरनिराळ्या प्रकारचे खेळ करविले. या खेळात 'घोडेस्वाराशी हत्तीचा सामना' हा एक खेळ करविला.

या खेळाच्या वेळी हत्तीने घोडेस्वारावर अशी अचूक चाल केली की, त्या चालीने तो स्वार आता चीत होणार असे दिसू लागले. पण महाराजांना स्वतःच्या निव्वळ करमणुकीखातर एका गरीब जीवाची होणार असलेली हत्या पाहवली नाही. हत्ती आता सोंडेने स्वारास खाली ओढणार, असे पाहिल्याबरोबर त्यांनी एकदम त्या स्वाराच्या आणि हत्तीच्या मध्ये उडी घेतली व ते अगदी जोराने ओरडले. त्यासरशी हत्ती बुजून दुसरीकडे पळाला; आणि त्या गरीब स्वाराचे प्राण वाचले !


माझ्या पंगतीला आणुन बसव!

( डी एस जाधव )

ही गोष्ट पडली त्यावेळी शाहू महाराज सोनतळीवर राहात होते. मेनरोडवरून सुटून खाली रस्ता वळण घेई. त्या रस्त्यावर एकदोन फासेपारधी महाराजांच्या भल्या मोठ्या घोड्यांच्या गाडीची वाट पाहात बसले होते. महाराज येताना दिसताच ते गाडीपुढे झाले व म्हणाले,

"ये महाराज, जरा थांब. तुला द्यायला ह्यो ससा आणलाय. एवढा घे.' * महाराजांनी गाडी थांबवून ससा गाडीत घेतला व गाडी हाकली. मुदपाकखान्यात ससा दिला. नेहमीच्या वेळी स्वारी जेवायला बसली. घासाला सशाचे मांस लागताच त्यांनी हात आवरता घेतला. जेवायचं थांबवलं. लगेच हुजऱ्याला बोलावलं आणि म्हणाले,

'अरे, ते फासेपारधी त्या वळणावर आहेत का बघ बरं

आणि तसेच त्यांना घेऊन ये. गाडी घेऊन जा लवकर. त्यांना जेवायला बोलवायचं विसरलोच मी.' थोडक्याच वेळात फासेपारध्यांना घेऊन आल्याची वर्दी हुजऱ्याने आणली व तो महाराजांना विचारू लागला, 'महाराज, त्यांची ताटं कुठे करू ? खाश्यात की खर्च्यात ?" त्यावर महाराज रागावून म्हणाले, "गाढवा, त्याचच अन्न मी खातोय आणि खाश्यात की खर्च्यात म्हणून काय विचारतोस? जा माझ्या पंक्तीला आणून बसव त्यांना ! त्या दिवशी फासेपारध्याना पंक्तीस घेऊन महाराज जेवले.


जनतेबद्दल केवढी कळकळ !

(बॅ. शामराव केळवकर)

मी विलायतेहून बॅरिस्टर होऊन आलो होतो. मुंबईस स्वतंत्र धंद्यात पडलो होतो. महाराजांची माझी गाठ त्यावेळी मी गंधर्वांचे नाटक पाहाण्यासाठी विएटरमध्ये जाऊन बसलो होतो. गर्दी म्हणजे तोबा होती. खुर्च्यामधील वाटेतही लोक दाटणीने बसले होते. मी दोन सीटस् आरक्षित केल्या होत्या. वाटेल तितके पैसे देऊनही आता कोणाला जागा मिळणे शक्य नव्हते. माझ्या मागच्या रागेला बादा खुच्या घुसवून काहींनी आपली कशीबशी सोय करून घेतली होती. मी मागे वळून पाहिले, तो याच गर्दीत आष्टी अवघडून बसलेले खुद्द शाहू महाराजच मला दिसले. मता ते दृश्य पाहावले नाही. आपलाच राजा. मी उठून महाराजांना जागा दिली. महाराजांनी मला प्रेमाने कवटाळून जवळव बसवून घेतले व जाताना 'उद्या माझी भेट घे' म्हणून सांगितले.

मी दुसरे दिवशी गेलो. पण माझी काही दाद लागली नाही. भोरेखान आले. त्यांनी विचारलं, 'तुम्ही का बाहेर ? त्यांना मी सांगितलं, निरोप पाठवला आहे म्हणून. पण तो निरोप हुजऱ्यांनी पोहोचवला नसावा; कारण भोरेखाननी कळवताच मला घ्यायला खुद्द महाराजच माडीवरून खाली चालत आले. बोलता बोलता म्हणाले, 'काय करावं बोवा, सरकार आमची काही दाद घेत नाही. कोल्हापूरला धान्याची तूट आली आहे. लोकांचे हाल व्हायला लागले आहेत आणि हे काही आम्हाला धान्य देईनात.'

तेव्हा मी म्हणालो, 'महाराज, आपण स्वतः या खटपटीत कशाला पडता ? आमच्यासारखी माणसं हे करू शकतील.' महाराज म्हणाले, 'तुम्ही कराल काय सांगा.' हो जरूर करीन. त्याच धंद्यात मी आहे." मंग चला पाहू आताच. मीही येतो तुमच्याबरोबर. छे। आपण येऊ नये. आपण आल्याने काम होणार नाही. त्यांच्या अपेक्षा वाढतील. अहो, तुम्ही माझ नाव सागू नका म्हणजे झालं. मी आपला तुमचा नोकर म्हणून येतो. कोण ओळखणार मला?' 'महाराज, तुम्ही दडून राहू शकणार नाही. बरं मी आत येत नाही. आपला बाहेरच बसतो म्हणजे झालं.

आणि खरोखरच महाराजांना कामाची इतकी आतुरता आणि निकड लागली होती की मी आत जाऊन वाटाघाटी करीपर्यंत महाराज अगदी इतर सर्वसाधारण लोकांत एका साध्या बाकावर दोन तास बसून राहिले होते ! आपल्या लोकांना धान्य मिळावं ही तळमळ महाराजांना स्वस्थ बसू देत नव्हती. खरोखरीच, शाहू महाराज एक थोर विभूती होती.

समान्यातील सामान्य माणसास न्याय

महाराजांच्या काळात समान्यातील सामान्य माणसास कसा न्याय मिळत होता हे समजण्यासाठी त्यांनी दिलेला हा एक हुकूम ही पुरेसा आहे.

भुदरगड पेट्याच्या मामलेदार कचेरीतील शिपायाने खेड्यातील एका बाईची कोंबडी नेली पण पैसे दिले नाहीत. ही तक्रार महाराजांकडे आल्यावर त्यांनी त्या शिपायास तातडीने नोकरीतून कमी करून कोंबडीची किंमत साडेसहा आणे वसूल करून त्या बाईस देण्याचा हुकूम दिला.

(मुलकी खाते ठराव क्र. ५७२)                 ता. २० डिसेंबर १९०८

कामातील तात्पर्य - अव्वल हु || भु - मामलेदार यांस

निकाल हुकूम - 

आपले पेट्यांतील इकडे कामगीरीस असलेला शिपाई अण्णा मोरे याने पढळी येथील राहणारी पार्वतीबाई कोम येसबा प।। (पाटील) हिची कोंबडी तिला पैसे न देता आणिली व आजवर पैसे दिले नाहीत म्हणून सदर बाईने इकडे हजर होऊन दिलेला जबाब सोबत आहे. सरकारी नोकरास असे रितीने वर्तन करणे दुषणास्पद आहे, करिता त्यास हा हु।। (हुकूम) पोचताच नोकरीवरून कमी करून त्याजकडून कॉबडीचे किंमती बद्दल पैसे साडेपाच आणे वसूल करू पा रितीप्रमाणे बाईस देणेची तजवीज करावी व दुसरा हु।। होईपर्यंत त्यास नोकरीवरून हजर करून घेऊ नये व त्याचा दाखला घेऊन हे काम रा. ब. सरसुभे ई।। करवीर याजकडे पाठवावे.


दिनांक २०-१२-१९०८।                                        सही शाहू छत्रपती


याप्रमाणेच गरिबांना झोपड्या बांधण्यासाठी, दुष्काळ काळात जनावरांसाठी छावण्या सुरु करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरक्षित घाण्याची केलेली तरतूद, सावकाराकडून होणाऱ्या रयतेच्या शोषणास लगाम यांसारख्या अनेक जाहीरनाम्यांतून, हुकूमांमधून आणि आज्ञापत्रातून शाहू महाराजांचा गरीब रयतेप्रति असणारा कळवळा व्यक्त होतो.




(या ब्लॉगमधील सर्व माहिती डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. मंजुश्री पवार लिखित "राजर्षी शाहू पचखंडात्मक स्मारक ग्रंथ" यातून घेतली आहे. शाहू महाराजांचे संपुर्ण जीवनचरित्र समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि मौलिक असा हा ग्रंथ आहे)




Thursday, July 28, 2022

भारतीय न्यूज वेबसाइट्सला झालंय काय?



गुगल ओपन केल्यानंतर होम पेजला न्यूज फीड मध्ये एकाखाली एक अमुक अभिनेत्रीचे हे बोल्ड फोटो पाहिलेत का? अमुक वेबसेरीजने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, अमुक अभिनेत्याची किंवा क्रिकेटरची पत्नी हिरोईन पेक्षा आहे सुंदर हे फोटो बघितले का?, अमुक हिरोईन तोकड्या कापड्यांमुळे झाली उप्स मोमेंटची शिकार बघा हा व्हिडीओ अशा आशयाचे इंडिया टुडे, न्यूज एटीन, लोकमत, एबीपी माझा, झी चोवीस तास यांसारख्या आघाडीच्या न्यूज वेबसाइटच्या हेडलाईन बघून तुम्ही ही वैतागला असाल अन् अशा बातम्या का केल्या जातात असा ही प्रश्न तुम्हाला पडत असेल. खरं तर यांना बातम्या म्हणता येत नाही. बातम्यांपेक्षा प्रामुख्याने अश्लील आणि निरूपयोगी गोष्टींचा भडिमारच यामध्ये जास्त असतो. हेडलाईनची रचना ही अशा पद्धतीने केलेली असते की त्यातील सस्पेन्स वाचकांना ती बातमी क्लिक करुन वाचण्यासाठी मजबूर करतो. तथ्यांवर आधारित माहितीपूर्ण बातम्या न देता अशा गोष्टी का केल्या जात या प्रश्नाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

वेबसाईटवर ट्रॅफिक जनरेट करण्यासाठी म्हणजेच लोकांची गर्दी वाढविण्यासाठी हा प्रकार आघाडीच्या सर्व न्यूज वेबसाईटकडून सर्रासपणे केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंटरनेटच्या आधी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमवत होते. वृत्तपत्रांची आणि वृत्तवाहिन्यांची संख्या ही कमी होती त्यामुळे स्पर्धा ही कमी असायची. पण सध्याच्या डिजिटल दुनियेत लोकांचं पेपर वाचण्याचे न्यूज चॅनेल्स बघण्याचे प्रमाण कमी झाले आहे आणि स्पर्धा ही जीवघेणी होत चालली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल जगताचे नियंत्रण जे आहे ते गुगल सारख्या सोशल मीडिया कंपन्यांच्या हातांमध्ये आहे. त्यामुळे आपसूकच जाहिरात महसूल ठरविण्याचा अधिकारही यांनाच प्राप्त झाला आहे.

इंटरनेटवर गुगल हा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथून वेबसाईटसाठीचे ट्रॅफिक उत्पन्न होते. गुगल एक सेवा प्रदान करतो ज्याचं नाव आहे ऍडसेन्स. "गुगल ऍडसेन्स" च्या माध्यमातून न्यूज वेबसाईट पैश्याची कमाई करतात. न्यूज वेबसाईटवरती ज्या बातम्या लेख प्रकाशित केल्या जातात, त्यामध्ये एकापेक्षा अधिक जाहिरातीच्या लिंक जोडल्या जातात. आणि जेव्हा वाचकांकडून या लिंक क्लिक केल्या जातात तेव्हा गुगलच्या 'पे पर क्लिक' या मॉडेल नुसार त्या वेबसाईटला पैसे मिळतात. म्हणजेच आपण जोपर्यंत न्यूज वेबसाईट वरील बातम्या ओपन करून बघत नाही आणि जाहिरातींवर क्लिक करत नाही तोपर्यंत वेबसाईटला पैसे मिळत नाहीत. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांना आपल्या न्यूज वेबसाईटवर  आणण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या तयार करून पोस्ट केल्या जातात.

जेवढ्या जास्त सस्पेन्स आणि बोल्डनेस असलेल्या हेडलाईन तेवढीच न्यूज वेबसाईटवर लोकांची गर्दी आणि जेवढा जास्त वेबसाईटला ट्रॅफिक तेवढी जास्त जाहिरातीतुन मिळणारी कमाई असं हे गणित आहे. जाहिरातींमधून पैसे कमावणे अयोग्य नाही पण ते अशा मार्गाने कमविणे नक्कीच योग्य नाही. यासाठी फक्त न्यूज वेबसाईट जबाबदार आहेत असे नाही तर लोकही तेवढेच जबाबदार आहेत. कारण तथ्यांवर आधारित माहितीपूर्ण बातम्या वाचणारा प्रेक्षक वर्ग संख्येने कमी आहे आणि तेच सेलिब्रिटींशी संबंधित हॉट व मसालेदार पण काहीच तथ्य नसलेल्या न्यूज वाचण्याची आवड असणारा वर्ग हा मोठा आहे. त्यामुळेच अशा न्यूज वेबसाईटच्या बातम्यांना लाखो व्ह्यूवज मिळतात. बातमी आणि जाहिरात यामध्ये आता फरकच उरला नाही. लोकांना बतम्यांमध्ये फक्त अचूक माहिती नव्हे तर मनोरंजन ही हवे आहे. त्यामुळे तशा प्रकारचाच कन्टेन्ट निर्माण केला जात आहे. सोशल मीडियाच्या अतिवापराचेच हे दुष्परिणाम आहेत. गुगल न्यूज फीड बंद करून किंवा त्यामध्ये आवश्यक तसे बदल करून आणि उपयुक्त व योग्य बातम्या सांगणाऱ्या वेबसाईटवर सबस्क्राईब करून वैयक्तिकरित्या आपण स्वतःला यापासून दूर ठेवू शकतो. परंतु जोपर्यंत सर्व स्तरातून विवेकाच्या आधारे इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर होत नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही एवढे मात्र नक्की.


Friday, July 22, 2022

बोधिसत्त्व म्हणजे काय?


               (Image Source - Wiki media Commons)


बोधिसत्व हा शब्द बौद्ध वाङमयात प्रामुख्याने जातककथांमध्ये, लेण्यांमधील शिलालेखात अनेक ठिकाणी आढळतो. तसेच बौद्ध वास्तू शिल्पकलेवरही त्याचा मोठा प्रभाव दिसून येतो.  लेणी, स्तूप यांसारख्या वास्तूंवर प्रतिमा ही कोरलेल्या आहेत. अजिंठा येथील पद्मपाणी बोधिसत्वाचे शिल्प तर जगप्रसिद्ध आहे. बोधिसत्व म्हणजे नक्की काय? हा प्रश्न अनेकांना पडला असणार तसेच याबाबत अधिक माहिती मिळवण्याची  उत्सुकता ही माझ्याप्रमाणे अनेकांमध्ये निर्माण झाली असणार. या प्रश्नाचे उत्तर सविस्तरपणे संदर्भ ग्रंथांच्या आधारे जाणून  घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

'बोधी' म्हणजे मनुष्याच्या उद्धाराचे ज्ञान आणि त्यासाठी प्रयत्न करणारा जो प्राणी (सत्व) तो 'बोधिसत्व' होय. गौतम बुद्धांच्या जन्मापासून बुद्धत्व प्राप्त होईपर्यंत त्यांना बोधिसत्व म्हणण्याची वहिवाट फार प्राचीन आहे. पालि वाङमयात सगळ्यात प्राचीन जो सुत्तनिपात  त्यांत म्हंटले आहे की,

सो बोधिसत्तो रतनवरो अतुल्यो ।

मनुस्सलोके हितसुखताय जातो । 

सक्यानं गामे जनपदे लुम्बिनेय्ये |

श्रेष्ठ रत्नाप्रमाणे अतुलनीय असा तो बोधिसत्त्व लुम्बिनी जनपदांत शाक्यांच्या गावीं मानवांच्या हितसुखासाठी जन्मला. (१)

थेरवादी विचारसरणीनुसार बोधिसत्त्व म्हणजे जो अष्टांगिक मार्गात सांगितल्याप्रमा वागून बुद्धत्व प्राप्तीच्या अगदी जवळ पोहोचला आहे तो. महायानी विचारसरणीत करुणा, मैत्री इत्यादी परमावधीला गेलेल्या सद्गुणांमुळे दुसऱ्यांना दुःखात सोडून, बोधिसत्त्व स्व 'निब्बाण' प्राप्त करू इच्छित नाही. तो सर्व प्राणिमात्रांना निब्बाण प्राप्त होण्यास मदत करतो. ह्याचाच अर्थ जोपर्यंत हलक्यातला हलका प्राणी निब्बाण स्थिती प्राप्त करून घेत नाही. तोपर्यंत बोधिसत्त्व स्वतः बुद्धत्त्व प्राप्त करून घेत नाही. महायानी पंथातील बोधिसत्व असा प्राणिमात्रांवर उपकार करणारा, त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी मदत करणारा सर्वांचे हित चिंतणारा आहे.

थेरवादी बौद्धांप्रमाणे “अर्हतपद" म्हणजे अती उच्च पद आहे. तथागतांच्या धम्माप्रमाणे उत्कृष्ट आचरण ठेवून "निब्बाण" प्राप्तीची पात्रता ज्यांना आली असेल ते अर्हत असे समजले जाते. महायान पंथात बोधिसत्त्वाला अर्हतापेक्षा जास्त महत्त्व दिले आहे. लोकांनी अर्हत बनण्यापेक्षा बोधिसत्त्वाचे अनुकरण करून प्राणिमात्रांना अडीअडचणीच्या वेळी मदत करावी असे महायानी तत्त्वज्ञान आहे. 

इसवीसनानंतर तिसऱ्या शतकात, महाराष्ट्रात बोधिसत्त्वाच्या मूर्ती आणि चित्रे काढण्यास सुरुवात झाली असली पाहिजे. साधारणपणे सातव्या शतकात बोधिसत्व उपसकांचे आवडते दैवत झाले असले पाहिजे. महाराष्ट्रातील कोरीव लेण्यांत ठिकठिकाणी बोधिसत्व अवलोकितेश्वर किंवा बोधिसत्व पद्मपाणीला उद्देशून अग्नीपासून, शत्रूच्या तलवारीपासून, शत्रूंनी केलेल्या कैदेतून, बोट बुडण्यापासून, वन्य प्राण्यांपासून, सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांपासून, रोग आणि मृत्यूपासून आमचे संरक्षण कर अशा प्रार्थना लिहीलेल्या किंवा चित्रीत केलेल्या दिसतात. 

महाराष्ट्रातील बौद्ध लेणी पाहतांना आढळणाऱ्या बोधिसत्त्वाच्या आणि इतर काही मूर्तीविषयी थोडक्यात माहिती अशी आहे. 

अवलोकितेश्वर :- महायानामध्ये अवलोकितेश्वर हा एक फार महत्त्वाचा आणि उपासकांचा आवडता बोधिसत्त्व आहे. त्याच्या डाव्या हातात देठासकट कमळाचे फूल असून उजव्या हातात अमृताचा घट असतो. बऱ्याच वेळा त्याच्या दोन्ही बाजूस दोन स्त्रियांच्या आकृत्या असतात. त्यापैकी एक तारा आणि दुसरी भ्रुकुटी असते. खाली चबुतऱ्यावर शूचिमुख नावाचा प्राणी दयेची भीक मागत आहे असे दाखविलेले असते. अवलोकितेश्वराच्या आणि बहुतेक इतर बोधिसत्त्वाच्या डोक्यावर अत्यंत कलाकुसरीचे काम असलेला रत्नजडीत मुकुट असतो. मुकुटावर वरच्या भागात नेहमीच भगवान बुद्धाची एक लहानशी मूर्ती असते. बोधिसत्त्वाने "जानवे" घातलेले दाखवतात.

पद्मपाणी :- पद्मपाणी हा एक महत्त्वाचा महायानी बोधिसत्त्व आहे. त्याच्या एका हातात देठासकट कमळाचे फूल असून दुसऱ्या हाताने उपासकांना संरक्षण देत आहे किंवा त्यांना उपदेश करत आहे, असे दाखविलेले असते.

मंजुश्री :- मंजुश्री बोधिसत्त्व आसनावर किंवा सिंहासनावर बसलेला दाखवितात. मंजूश्री म्हणजे शहाणपण, वक्तृत्व आणि तल्लख बुद्धिमत्ता. चुकीच्या गोष्टी आणि असत्य यांना कापून टाकण्यासाठी त्याच्या उजव्या हातात तलवार आहे. त्याच्या डाव्या हातातील पुस्तक बुद्ध धम्मातील दहा पारमितांचे प्रतीक आहे. मंजूश्री नावाच्या धम्मोपदेशकाने बुद्धधम्म प्रथम नेपाळात नेला. त्यालाच बोधीसत्त्वाचे स्वरूप दिले असले पाहिजे असे कित्येक पाश्चात्य पंडितांचे मत आहे.

वज्रपाणि :- वज्रपाणि बोधिसत्त्वाच्या उजव्या हातात शंख असून डाव्या हाताने वज्र धरले आहे. त्याच्या शिरस्त्राणात कधीकधी नाग दाखविलेले असतात. कधीकधी वज्रपाणिला तीन शिरे आणि सहा हात दाखविलेले असतात. ह्या सहा हातांत शंख, वज्र, माला, बाण, धनुष्य आणि पाश धरलेले असतात. शक्ती नावाची स्त्री त्यांच्या शेजारी बसलेली असते.

 तारा :- महायानी पंथात तारा ही अवलोकितेश्वर बोधिसत्त्वाची सहचारिणी आहे. ती नेहमीच न चुकता उपासकांचे संरक्षण करते अशी समजूत आहे. तिच्या डाव्या हातात देठासकट  कमळाचे फूल असते आणि उजच्या हाताने ती उपासकांना संरक्षण देत आहे, असे दाखविलेले असते. तारापूर शहर तिच्याच नावावरून पडलेले दिसते.

 प्रज्ञापारमिता :- महायान पंथामध्ये प्रज्ञापारमिता ही विद्येची देवी मानलेली आहे. ती कमळाच्या फुलावर बसलेली असून तिने ग्रंथ आणि कमळाचे फूल हातात धरलेले असते. कधी कधी तिला दहा हात असलेले दाखवतात. त्या हातांत, एक पात्र, दोरीचा पाश, शंख, ग्रंथ, कमळाचे फूल, ध्वज, फळ, माला, तलवार, आणि शेवटचा हात अभय मुद्रेत दाखविलेला असतो.

मारिची :- ही आणखी एक महायान पंथातील देवी आहे. तिला तीन तोंडे असतात त्यापैकी एक सूकराचे असते. तिला सहा हात असून त्या हातांमध्ये सूई, दोरा. अंकुश, बाण, धनुष्य, वज्र आणि अशोक आहे असे दिसते. ती घोड्यांच्या किंवा सूकराच्या रथात बसलेली असते.

जाम्बाल :- जाम्बाल हा महायान बौद्धांचा धनदौलतीचा देव आहे. त्याच्या एका हातात फळ असून दुसऱ्या हातात पैशाची थैली असते. कधी कधी त्याला चार हात आहेत असे दाखविलेले असते. त्या चार हातात पात्र, तलवार, कमळाचे फूल आणि मुंगूस धरले आहेत असेही दाखविलेले असते.

त्रैलोक्य विजय :- हा एक क्वचितच दाखविलेला महायान पंथाचा देव आहे. त्याची मुद्रा रागीट असून तो शिवपार्वतीला तुडवत आहे असे दाखविले आहे. अशी मूर्ती महाराष्ट्रातील लेण्यात पाहावयास मिळाली नाही.

 हरिती :- ही महायान पंथातील देवी असून जाम्बालाची सहचारिणी आहे. कदाचित ती सुपीकतेची देवी असावी.

वसुंधरा :- ही हरिती सारखीच महायान पंथातील देवी आहे. तिच्या डाव्या हातात कमळांचे असतो. फूल, धान्याची कणसे आणि एक पात्र दिसते. उजवा हात वरद मुद्रेत दाखविलेला

मैत्रेय :- मैत्रेय म्हणजे पुढे होणारा बुध्द. त्याची बोधिसत्त्व म्हणून पूजा होते. थेरवादी बौद्धसुद्धा मैत्रेयाला मान्यता देतात. मैत्रेयाच्या बरोबर नेहमीच दुसऱ्या बोधिसत्त्वाची मूर्ती असते. मैत्रेयाला ओळखण्याची खूण म्हणजे त्याच्या शिरस्त्राणातील चैत्य आणि कमरेला डाव्या बाजूस बांधलेला शेला. त्या शेल्याची टोके मैत्रेयाच्या पायापर्यंत खाली लोंबकळत असतात. 

वर वर्णन केलेल्या देवदेवतांशिवाय महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यात सामंतभद्र, रत्नपाणि, विश्वपाणि, ज्ञानकेतु, भद्रपाल, क्षितिगर्भ, घंटापाणि, इत्यादी बोधिसत्त्व; आणि सरस्वती, अपराजिता, वज्रधात्री, लोचना, मामकी, पाण्डुरा, चुन्दा, इत्यादी देवदेवतांच्या मूर्ती दिसतात. त्याचप्रमाणे इन्द्र, यक्ष, किन्नर, गरुड, नाग इत्यादींच्याही मूर्त्या पाहावयास मिळतात.

बौद्ध धम्मा प्रमाणेच ब्राह्मणी धर्मात सुरवातीला मूर्तिपूजा नव्हती. महायानी पंथात मूर्तिपूजा सुरू झाल्यावर कितीतरी काळा नंतर हिंदू धर्मात मूर्तिपूजा सुरू झाली.(२)


संदर्भ : 

१) "भगवान बुद्ध पूर्वार्ध" - धर्मानन्द कोसंबी, नवभारत ग्रंथमाला.

 २) "महाराष्ट्रातील बुद्ध धर्माचा इतिहास" -  मा. शं. मोरे.

Wednesday, July 20, 2022

पावसाळ्यात ट्रेकला जाताय? या पाच गोष्टी लक्षात ठेवा.


(नाणेघाट धबधबा येथील पावसाळी भटकंती दरम्यान घेतलेले छायाचित्र)


निसर्गाचं सर्वात मनमोहक रूप हे पावसाळ्यातच पहायला मिळते त्यामुळे अनेकांची पावले पावसाळ्यात डोंगरांकडे वळतात. या काळात धबधबे, गडकोट इ. ठिकाणी जाऊन पाऊस अनुभवणाऱ्यांची संख्या मोठी असते. ओसंडुन वाहणारे निसर्गाचे सौंदर्य आणि धोकादायक असे रौद्ररूप या दोन्ही पावसाळ्याच्याच महत्वपूर्ण बाजू आहेत. पण पहिलीच बाजू डोक्यात ठेवून पावसाळी ट्रेकचे नियोजन केले जाते आणि अपघातांना निमंत्रण दिले जाते. मागच्या काही दिवसात कळसुबाई आणि  धबधब्यांच्या ठिकाणी घडलेले जीवघेणे अपघात हे त्याचेच उदाहरण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ट्रेक करताना विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरते. पावसाळी भटकंती आनंददायी व सुरक्षित होण्यासाठी  खलील गोष्टींची काळजी घ्या.

१) ठिकाण आणि हवामान :  सर्वात आधी ट्रेकचे ठिकाण निश्चित करा.
तिथे पोहचण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती गोळा करा. ते ठिकाण किंवा तिकडे जाणारे रस्ते सुरू आहेत की नाही याची खात्री करून घ्या.
 डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा वेग अधिक असतो त्यामुळे पावसाळ्यात जिथे अवघड किंवा उभी चढाई आहे ते ठिकाण टाळा. पावसामुळे पाण्याच्या पातळीत अचानक बदल होतात त्यामुळे ओढे, नाले किंवा पाण्याचे प्रवाह पार करून जावं लागेल असे ठिकाण निवडू नका. दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक असलेले ठिकाण टाळा. यासोबतच त्यावेळचे हवामानाचे अंदाज काय वर्तविले आहेत त्याची माहिती घ्या. रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट असताना ट्रेकचे नियोजन करू नका. शक्यतो ट्रेक लवकर सुरू करा कारण सकाळपेक्षा दुपारनंतर पावसाचा जोर जास्त असतो. पावसाळ्यात अतिउंचीचे, जास्त कालावधीचे आणि मुक्कामाचे ट्रेक हे खूपच धोकादायक असतात त्यामुळे त्यांची निवड कटाक्षाने टाळा.

२) वॉटरप्रूफ बॅगपॅक : कमी क्षमतेची वॉटरप्रूफ बॅग सोबत घ्या किंवा बॅगला रेनकव्हर घाला. बॅगेतील वस्तू कोरडया राहिल्या तरच त्यांचा उपयोग होईल. गरजेच्या आणि वजनाने हलक्या असलेल्या वस्तू सोबत घ्या. त्यामध्ये एक जास्तीचा कपड्याचा जोड आणि पुरेसे पाणी हे सर्वात महत्वाचे. खास पावसाळी ट्रेकसाठी वापरले जाणारे पोंचो जे पाठीवरील बॅगसोबतच डोक्यापासून ते पायापर्यंत आपला पूर्णपणे बचाव करतात ते वापरणे सर्वात उत्तम. (पावसाचा व वाऱ्याचा जोर अधिक असल्याने तसेच दोन्ही हात मोकळे असणे गरजेचे असल्यामुळे छत्रीचा उपयोग करणे टाळावे).  

३) शूज : चांगली पकड (ग्रीप) आणि अँकल सपोर्ट असलेले ट्रेक शूज हे पावसाळी भटकंती साठी सर्वात महत्वाचे आहेत. फ्लॅट ग्रीप असलेले शूज, सॅंडल, चप्पल घालून ट्रेक करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण ठरते. 

४) वाटाड्या : ज्या भागात आपण भटकंती साठी जातोय त्या परिसराची आणि हवामानाची योग्य व अधिक माहिती तेथील गावकऱ्यांना असते.  पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे पायवाटा, रस्ते  सहजासहजी लक्षात येत नाहीत तसेच अचानक उद्धभवणाऱ्या धोक्यांची कल्पना आपल्याला नसते. त्यामुळे पायथ्याशी असलेल्या गावातून वाटाड्या सोबत घेणे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते.  एकट्याने पावसाळी भटकंती करणे टाळा. नोंदणीकृत आणि प्रशिक्षित व अनुभवी ट्रेकर्स असलेल्या ग्रुप सोबत भटकंतीला जाणे कधीही उत्तम. 

५) उपयोगी वस्तू : पावसात मोबाईल वापरणं शक्य होत नाही तसेच नेटवर्क उपलब्ध नसते त्यामुळे सोबत कंपास ठेवल्यास रस्ता चुकल्यावर किंवा हरवल्यावर योग्य ठिकाणी पोहचण्यास मदत होईल. पावसाळ्यात जळवांचा धोखा अधिक असतो त्यामुळे सोबत हळद आणि तंबाखूचे पाणी ठेवणे उपयुक्त ठरते. ट्रेक पोल किंवा सरळ असणारी चार पाच फुटाची काठी सोबत ठेवल्यास निसरड्या वाटेवरून चालताना, पाण्याचा दलदलीचा अंदाज घेण्यासाठी आणि वन्यजीवांपासून सुरक्षा करण्यासाठी तिचा उपयोग होऊ शकतो. पावसाचा जोर खूप जास्त असेल आणि दिवसाही अंधार पडला असेल तर एक दोन फुटांवरचं ही दिसत नाही त्यामुळे सोबत बॅटरी ठेवणे गरजेचे आहे. अशा वातावरणात  उपयोगाला येतील अशी औषधं व कोरडे खाद्यपदार्थ सोबत ठेवावे.


वरील सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतल्यास तुमच्या पावसाळी ट्रेकचा अनुभव हमखास आनंददायी आठवणींच्या स्वरुपात कायमचा  जपला जाणार हे नक्की.






Sunday, July 17, 2022

रॉकेट्री - देश प्रेमाची अस्लल परिभाषा सांगणारा चित्रपट.




रॉकेट्री हा चित्रपट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे क्रायोजिनिक रॉकेट इंजिन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. सॅटेलाइटला अंतराळात पाठविण्यासाठी ज्या शक्तिशाली रॉकेटची गरज असते ती रॉकेट प्रणाली नंबी नारायणन यांनी यशस्वीरीत्या विकसित करून भारताला अंतराळ क्षेत्रात अमेरिका, रशिया आणि फ्रान्स या देशांच्या बरोबरीने नेऊन उभे केले होते. त्याआधी त्यांनी नासाची शिष्यवृत्ती मिळवून प्रिंस्टन युनिव्हर्सिटी मधून प्रोफेसर क्रोको यांच्या मार्गदर्शनाखाली 'लिक्विड रॉकेट प्रोप्लशन प्रणाली' या विषयावर आपला थेसीसी पूर्ण केला. जो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधीत लागतो तो नंबी नारायणन यांनी फक्त दहा महिन्यात पूर्ण केला. आणि विशेष म्हणजे तेव्हा आपल्या देशात सॉलिड रॉकेट प्रोप्लशन प्रणाली सुद्धा पूर्णपणे विकसित झाली नव्हती. देशासाठी नासाची करोडो रूपयांची नौकरी आणि ऐश्वर्यसंपन्न जीवन नाकारून पुन्हा इस्रोमध्ये रुजू होऊन प्रतिकूल परिस्थितीत "विकास इंजिन" तयार करण्याचा हा त्यांचा संपूर्ण प्रवास चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे चित्रित केला गेला आहे. 

'कोणताही देश तोपर्यंत महान नाही राहू शकत जोपर्यंत त्याला महान बनवणाऱ्या लोकांची कदर केली जात नाही.' हा नंबी नारायणन यांचा संवाद थेट आपल्या काळजाला भिडतो. त्यांच्या आयुष्यात ज्या पद्धतीने देशद्रोहाचे वादळ उठवले गेले. ज्यामुळे त्यांच्या जीवनाला, कुटुंबाला जो तडाखा बसला त्यातून सारवण्याचा प्रयत्न करतानाचे दृश्य पाहताना  आपल्या मनात चीड निर्माण होते. ज्यांनी देशाला महान बनविण्यासाठी सर्वोच्च त्याग केला, कुटुंब वैयक्तिक आयुष्य याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. त्याचा असा मोबदला त्यांना का मिळावा या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात आपण हरवून जातो. 

'मुसळधार पाऊस सोबत मानसिक व शारीरिकरीत्या खचलेली आजारी पत्नी. अशा पावसात दवाखान्यात जाण्यासाठी रिक्षा मिळवण्यासाठी धडपडणारा वृद्ध नायक. तेवढ्यात एक रिक्षा थांबते दोघे त्यात बसतात थोडेच अंतर पुढे जातात तेवढ्यात ते कोण आहेत हे लक्षात येताच त्यांना रिक्षातून बाहेर रोडवर फेकले जाते. आपली लुंगी सांभाळत आपल्या पत्नीला आधार देत पुन्हा वाहन मिळवण्याची धडपड सुरू होते. आणि कॅमेरा या दोघांच्या मागे रोडला लागून असलेल्या तिरंग्यावर थांबतो.' संवादाविना कॅमेऱ्याच्या माध्यमातून या सीनममध्ये जे काही मांडलंय ते थेट आपल्या काळजाला भिडतं आणि आपोआप डोळ्यात अश्रू अनावर होतात.

आर माधवन यांनी उभा केलेला महत्वकांक्षी शास्त्रज्ञ, वेळेत मिशन पूर्ण करण्यासाठी प्रसंगी आपल्या  माणसांना दुखवुन वाईटपणा घेणारा प्रोजेक्ट लीडर, कठीण परिस्थितीत कुटुंबासाठी ढाल बनून लढणारा कुटुंबप्रमुख आणि हार न मानता अन्यायाच्या विरोधात उभे राहून आपली बाजू  मांडणारा लढवय्या हा आपल्या मनात घर करून जातो. हे पात्र साकारण्यासाठी अभिनेता म्हणून आर माधवणने घेतलेली मेहनत पडद्यावर प्रकर्षांने जाणवते. संपूर्ण चित्रपटात माधवन आपल्याला कुठेही दिसत नाही इतका तो नंबी नारायणन या भूमिकेशी एकरूप झाला आहे. सोबतच दिग्दर्शनाची जबाबदारी ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे पार पाडली आहे. एकूणच संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत कौतुकास्पद ठरते.

प्रत्येकाने पहिला पाहिजे असा हा चित्रपट आहे. विशेषतः शालेय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तर हा चित्रपट आवर्जून पहिला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत देशाला सर्वोच्च शिखरावर पोहचविण्याची प्रेरणा त्यांना नक्कीच यातून मिळेल.

नंबी सरांना सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्त केले. पद्मभूषण या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. पण खरे दोषी कोण आहेत? हे षडयंत्र का रचण्यात आले? या प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरीतच आहेत. करोडो लोकं देशात जन्मतात आणि मरतात परंतु असे काहीच लोक असतात ज्यांच्यामुळे देश अधिक महान बनतो त्यामुळे अशा लोकांच्या पाठीशी देशाने आणि जनतेने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आधुनिक भारताचे जे खरे हिरो आहेत त्यांना व्हिलन का ठरवलं गेलं आणि याच्या मुळाशी कोण आहे याचा शोध आपल्या देशाने घेणे गरजेचे आहे.



Sunday, July 10, 2022

धर्मांधतेमूळे हिंदुस्तानाचे खूप मोठे नुकसान झाले - भगत सिंग


                           Image source - amazon.in

'विविधतेत एकता' ही जी आपल्या देशाची प्राचीन काळापासूनची ओळख आहे ती सांप्रदायिक दंगलींमुळे कलंकित होत आहे. धार्मिक द्वेश राष्ट्रीय एकात्मतेस बाधा ठरत आहे. धार्मिक, राजकीय आणि आर्थिक स्वार्थासाठी लोकांना धर्माच्या नावाने एकमेकांच्या विरोधात उभे केले जात आहे. राजकारण्यांकडून सांप्रदायिक दंगलींचा उपयोग सत्ता काबीज करण्यासाठी केला जाणे ही बाब आपल्या देशासाठी नवी नाही, स्वातंत्र्याच्या आधीपासून तसे प्रयत्न सुरू असल्याचे इतिहासात आपल्याला दिसून येते. सत्ता मिळविण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी सध्या राजकीय पक्ष व  नेत्यांकडून ज्या पद्धतीने धर्माचा वापर केला जात आहे आणि ज्या प्रकारे या कामी पत्रकारितेचा ही उपयोग करून घेतला जात आहे. ते पाहता शहिद भगत सिंग यांचे याबाबतचे विचार आजही आपल्यासाठी किती उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत हे समजून घेणे गरजेचे ठरते. 

जून १९२८ मध्ये 'किरती' या हिंदी वृत्तपत्रात भगत सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांचा "सांप्रदायिक दंगे और उनका इलाज" हा लेख प्रकाशित झाला होता. त्यात त्यांनी याबाबतचे आपले क्रांतिकारी विचार मांडले आहेत. 

सांप्रदायिक दंगलींचा देशावर कसा परिणाम होतो हे सांगताना ते म्हणतात, सांप्रदायिक दंगलींमुळे भारत देशाची सध्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. एका धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माचे कट्टर शत्रू बनले आहेत. एका धर्माचं असणं म्हणजे दुसऱ्या धर्माचा शत्रू असण्यासारखे आहे यावर विश्वास बसत नसेल तर आताच लाहोर येथे झालेल्या हिंदू मुस्लिम दंगली पहा. यामध्ये केलेल्या कत्तली समोरची व्यक्ती दोषी आहे म्हणून नाही तर ती फक्त दुसऱ्या धर्माची आहे म्हणून  करण्यात आल्या. कोणाचा जीव घेण्यासाठी तो आपल्या पेक्षा वेगळ्या धर्माचा असणं हे कारण पुरेसं होतं. अशा परिस्थितीत हिंदुस्थानाचं भवितव्य अंधारमय दिसून येते. या धर्मांमूळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे आणि अजून माहीत नाही या सांप्रदायिक दंगली देशाचा पिच्छा कधी सोडणार ते. या दंग्यांमुळे संपूर्ण जगात भारताची बदनामी होत आहे. या धर्माच्या अंधविश्वासात सगळेच वाहत जात आहेत. एखादाच आपलं डोकं शांत ठेवून यापासून वेगळा राहतो. बाकी सगळे धर्माच्या नावाने हातात लाठ्या काठ्या हत्यारं घेऊन आपसात लढून मरतात. 

सांप्रदायिक दंगलींसाठी कोण जबाबदार आहेत हे सांगताना ते म्हणतात,
या दंगलींसाठी सांप्रदायिक नेते आणि वृत्तपत्रे जबाबदार आहेत. ज्या नेत्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली होती आणि जे 'समान राष्ट्रीयता' व 'स्वराज्य - स्वराज्य' च्या गोष्टी करत होते ते सर्व आता लपून बसले आहेत नाही तर धर्मांधतेच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. जे नेते सगळ्यांचा भलं व्हावं असा विचार करतात ते खूपच कमी आहेत. आणि सांप्रदायिकतेचा एवढा भीषण पुर आलाय की त्याला रोखण्यास हे ही असमर्थ ठरत आहेत. भारताच्या नेतृत्वाला कोणी वालीचं उरला नाही असं वाटतंय. पत्रकारितेचा व्यवसाय एकेकाळी उच्च दर्जाचा समजला जात होता. जो आज गलिच्छ बनला आहे. हे लोक एकमेकांच्या विरोधात मोठया मोठ्या अक्षरातले शीर्षक देऊन लोकांच्या भावना भडकवतात. एक दोन ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी स्थानिक वृत्तपत्रांच्या उत्तेजनापूर्ण लेखांमुळेच दंगली उसळल्या. असे पत्रकार खूप कमी आहेत जे अशा परिस्थितीत आपलं डोकं आणि मन शांत ठेवून काम करतात. वृत्तपत्रांचं खरं कर्तव्य हे शिक्षा देणे, सांप्रदायिक भावना दूर करणे, बंधुभाव वाढवणे आणि भारताची राष्ट्रीयता वाढवणे असे असताना त्यांनी प्रामुख्याने अगदी याच्या उलट काम करणे हेच आपले कर्तव्य मानले आहे. हेच कारण आहे की भारताच्या वर्तमान स्थितीचा विचार करून डोळ्यातुन रक्ताचे अश्रू  येतात आणि मनात प्रश्न निर्माण होतो, भारताचं काय होणार?

संप्रदायिक दंगलींचे मुळ जर शोधलं तर लक्षात येतं की, आर्थिक परिस्थितीच यासाठी जबाबदार आहे. विश्वात जे काही काम चालतं त्याच्या मुळाशी पोटाचा प्रश्न हा असतोच, कार्ल मार्क्सच्या मुख्य तीन सिद्धांतांपैकी हा एक महत्वाचा सिद्धांत आहे. आर्थिक दुर्बलतेमुळेच आपली अशी दुर्दशा झाली आहे. 

सांप्रदायिक दंगलींच्या उपायांवर बोलताना ते म्हणतात, यावर जर काही उपाय असेल तर तो भारताच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणे हाच एक उपाय आहे. असे असले तरी भूख आणि दुःख यासमोर माणसाला सगळ्या सिद्धांताचा विसर पडतो. त्यामुळे सद्यस्थितीत भारताची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे अवघड आहे. कारण सरकार विदेशी आहे जे लोकांची आर्थिक सुधारणा होऊ देत नाही. यासाठी लोकांनी हाथ धुवून यामागे लागले पाहिजे आणि जोपर्यंत विदेशी सरकार बदलत नाही तोपर्यंत स्वस्थ नाही बसलं पाहिजे. लोकांना एकमेकांसोबत लढण्यापासून थांबविण्यासाठी 'वर्ग-चेतनेची' (class consciousness) गरज आहे. गरीब, कामगार आणि शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की त्यांचे खरे शत्रू हे भांडवलदार आहेत. त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. जगातील सर्व गरिबांचे अधिकार एकच आहेत मग ते कोणत्याही जातीचे, धर्माचे, रंगाचे, राष्ट्राचे अथवा पंथाचे असो. सगळे भेदभाव विसरून एकत्रित येऊन सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणे यातच तुमचे हित आहे. असे करण्याने तुमचे नुकसान तर काही नाही होणार पण एक दिवस तुमच्या गुलामीच्या बेड्या तुटून आर्थिक स्वातंत्र्य जरूर मिळेल. 

ज्यांना रुसचा इतिहास माहिती आहे त्यांना त्यावेळेसची जार (त्यावेळेसचा सम्राट) असतानाची  स्थिती ही अशाच प्रकारची होती हे ठाऊक असेल. पण जेव्हापासून तेथे श्रमिक वर्गाचे शासन प्रस्थापित झाले तेव्हापासून तिथले संपूर्ण चित्रच बदलून गेले. तिथे आता कधीही दंगली होत नाहीत. तिथे आता सगळ्यांना माणुसकीची वागणूक दिली जाते. जारच्यावेळेस लोकांची आर्थिक स्थिती अतिशय खराब होती. त्यामुळे तिथे दंगली होत होत्या. त्यांच्यात वर्ग-चेतनेची निर्मिती झाल्यामुळे हा बदल घडला. आता तिथे दंगली झाल्याचे ऐकायला मिळत नाही. कलकत्ता येथे झालेल्या दंगलीत तेथील ट्रेड युनियनचे कामगार  सहभागी झाले नाहीत कारण त्यांच्यामध्ये वर्ग-चेतना निर्माण झाली आहे. त्यांना त्यांच्या वर्गाचे हित कशात आहे हे समजले आहे. वर्ग-चेतनेच्या या सुंदर मार्गानेच संप्रदायिक दंगली थांबू शकतात. 

१९१४-१५ मधील शाहिदांनी धर्माला राजनीति पासून वेगळे ठेवले होते. धर्म ही माणसाची वैयक्तिक बाब आहे असे ते मानत होते. त्यामुळेच गदर पार्टी सारख्या संघटना एकजूट आणि एकजीव राहिल्या, ज्यामध्ये शीख हिंदू आणि मुस्लिम बरोबरीने फासावर चढले. सध्या काही भारतीय नेते आहेत ज्यांना धर्माला राजनीती पासून वेगळे ठेवायची इच्छा आहे.  भांडण मिटविण्याचा हा सुद्धा एक चांगला मार्ग आहे ज्याचे आम्ही समर्थन करतो. जर धर्माला वेगळं केलं तर राजनीतिसाठी आपण सर्वजण एकत्र येऊ शकतो आणि धर्माच्या बाबतीत आपण वेगवेगळे  राहू शकतो. भारताबद्दल ज्यांना खरी सहानुभूती आहे ते नक्कीच आम्ही सांगितलेल्या 
उपायांबाबत विचार करतील आणि सध्या जो आत्मघात होत आहे त्यापासून सगळ्यांना वाचवतील. 

हा लेख जरी त्यावेळेसच्या परिस्थिती वर लिहलेला असला तरी त्यातील विचार हे आजही जसेच्या तसे लागू पडतात. अजूनही भारतातील कष्टकऱ्यांची आर्थिक स्थिती फारशी बदललेली नाही. सरकार जरी विदेशी नसले तरी ते भांडवलंडदारांसाठीच काम करत आहे. त्यांचेच हितसंबंध जोपासत आहे. कामगारांचे अधिकार कमी करणारे कायदे करून त्यांचे खच्चीकरण करीत आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे न राहता व्यपाऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेत आहे. त्यामुळे श्रमिक वर्ग अजून गरीब आणि व्यापारी वर्ग अजून श्रीमंत होत चालला आहे. महत्वाचे म्हणजे संवैधानिक दृष्टीने जरी भारत धर्मनिरपेक्ष झाला असला तरी धर्मांधतेची कीड समूळ नष्ट झालेली नाही.

आता पर्यंत सत्तेत आलेल्या सर्व सत्ताधाऱ्यांनी शाहिद भगत सिंग यांचे नाव व फोटो सत्ता मिळविण्यासाठी व ती टिकविण्यासाठी सातत्याने वापरले. पण सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांच्या विचारांप्रमाणे वागताना अजूनपर्यंत दिसले नाहीत. भगत सिंग यांना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य अजून आपल्या देशाला मिळालेले नाही. ते मिळविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन त्यांचे विचार कृतीत उतरविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना भाग पाडणे अंत्यत गरजेचे ठरते.



स्रोत - मूळ हिंदी लेखाची लिंक : 
https://www.marxists.org/hindi/bhagat-singh/1928/sampradayik-dangen.htm

 





Sunday, July 3, 2022

तथागतांच्या धम्माची शिकवण - पालि भाषेतुन




तथागत गौतम बुद्धांनी भिक्खू संघाला आणि जनसामान्यांना जो धम्मोपदेश केला तो पाली भाषेत कारण त्याकाळातील सर्वसामान्यांची भाषा ही पालीच होती. पालि भाषेत भगवान बुद्धांच्या धम्माचे वर्णन, “स्वाक्खातो भगवता धम्मो  सन्दिट्ठिको अकालिको एहि पस्सिको ओपनाय्यिको पच्चतं वेदितब्बो विञ्ञूहीति" असे केलेले आहे.

"स्वाखातो" म्हणजे उत्तम प्रकारे शिकविला गेलेला किंवा उत्तम प्रकारे विदित केलेला असा होतो. भगवान बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना जी शिकवण दिली ती त्रिपिटक या ग्रंथात संग्रहित केली गेली आहे. त्रिपिटकाचे जवळजवळ ४५ खंड आहेत. त्यात नाना प्रकारच्या लोकांना नाना तऱ्हेने दिलेली शिकवण आढळून येते. भगवान बुद्धांनी नीतिमत्तेची, मानसिकतेची, आध्यात्मिक जीवनाबद्दलची तसेच राजकीय जीवनाबद्दलची सुध्दा शिकवण दिलेली आहे. भगवान बुद्ध एखाद्या गोष्टीचा खुलासा सर्वसाधारणपणे सारांशरूपाने करीत असत, तरी कधी कधी गोष्टींच्या रूपाने झाडांची, फुलांची, प्राण्यांची आणि सर्वसाधारण मनुष्याच्या जीवनातील प्रसंगांची सुंदर उदाहरणे देऊन करीत असत. बुद्धधम्मासाठी कुठलीही एखादी विशिष्ट भाषा पवित्र मानली गेली नाही. त्यांचा संदेश प्रत्येक मनुष्यापर्यंत जाऊन पोहोचावा अशीच तथागतांची उत्कट इच्छा असायची. याच कारणास्तव भगवान बुद्धांच्या धम्माला “स्वाक्खातो" असे म्हटले आहे.

भगवान बुद्धाचा धम्म “सन्दिट्ठिको” आहे. याचा अर्थ असा की, भगवान बुद्धाच्या धम्माचे आचरण केले तर त्याचे परिणाम सुध्दा स्वत:च्या डोळ्याने ह्याच जन्मात पाहावयास मिळतात.

पुढचा शब्द आहे “अकालिको,” याचा अर्थ कालाचे बंधन नसलेला असा आहे. 

“एहि पस्सिको” म्हणजे या आणि पहा. येथे अंधश्रध्देला मुळीच वाव नाही.

भगवान बुद्ध म्हणत की "मी एक मनुष्यमात्र आहे. मला एक विशिष्ट प्रकारचा अनुभव प्राप्त झाला आहे. म्हणून मी जे म्हणतो ते ऐकून घ्या. त्याकडे अगदी डोळसपणे आणि बारकाईने लक्ष द्या. एवढेच नव्हे तर ते बरोबर आहे की नाही याची सुध्दा प्रत्यक्ष खात्री करून घ्या" भगवान बुद्धांनी सांगितले आहे की, “जसा सोनार, सोन्याची परीक्षा सोने अम्नीत टाकून करतो, त्याचप्रमाणे माझा प्रत्येक शब्द तावून सुलाखून घ्या. "धम्म हा "ओपनायिको आहे. म्हणजे तो प्रगतिशील आहे.

शेवटची ओळ आहे "पच्चतं वेदितब्बो विञ्ञूहीति" याचा अर्थ असा की, भगवान बुद्धांच्या शिकवणीचा अनुभव प्रत्येक प्रज्ञावान माणसाने स्वतःच घ्यायला हवा. भगवान बुद्ध हे केवळ एक मार्गदाते आहेत. मोक्षदाते नाहीत. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने चालण्याचे काम प्रत्येकाने स्वतःच केले पाहिजे." 

असा हा सर्वसामान्य जनतेला समजेल अशा भाषेत समजावून सांगितलेला, ह्याच जन्मात फल देणारा, कालाचे बंधन नसलेला, शास्त्रीयदृष्ट्या तपासणी करून घेता येण्याजोगा प्रगतिशील आणि स्वत:चा मार्ग स्वतःच चालण्यास सांगणारा धम्म.

भगवान बुद्धांनी प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री या सद्गुणांवर आपल्या धम्मोपदेशा विशेष भर दिला. भगवान बुद्धांच्या उपदेशाचे सार खालील एका श्लोकांत सापडते.

सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा। सचित्त परियोदपनं एतं बुद्धांन सासनं ।।

(सर्व पापांपासून विरत होणे, सर्व कुशलांचा संचय करणे आणि स्वचित्ताचे संशोधन करणे हे बुद्धांचे अनुशासन होय.)


संदर्भ : १) "बुद्धयान" - महास्थविर संघरक्षित (ऑगस्ट ८१)

           २) "महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास" - मा. शं. मोरे

Friday, July 1, 2022

विठ्ठल मंदिर - प्राचीन बौद्ध विहार




प्रत्यक्ष बुद्धांचे नाव न घेता महाराष्ट्रातील साधुसंतांनी बुद्धांचीच शिकवण प्रामुख्याने आपल्या काव्यातून, अभंगांतून, ओव्यातून आणि भारुडांतून दिली आहे. ह्या साधुसंतात सोनार, कुंभार, महार, शिंपी, माळी, ब्राह्मण, वाणी इत्यादी सर्व थरांतील लोक होते.

पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे बुद्धच आहे, असे अनेक विद्वांनानी पुराव्यासहित सिध्द केले आहे. महाराष्ट्रातून बुद्धधम्माचा लोप झाल्यावर अनेक बौद्ध विहार लेणी, बौद्ध धार्मिक स्थळे इत्यादींचे हिन्दूकरण करण्यात आले. हल्लीचे पंढरपुरचे विठ्ठलाचे मंदिर हे एक त्यातील प्रमुख उदाहरण आहे. संत एकनाथ बुद्धालाच विठ्ठल मानताना म्हणतात -

लोक देखोनि उन्मत्त दारांनी आसक्ता

न बोले बौद्ध रूप ठेवीले जघनी हात ॥ १॥ 

संत तया दारी। तिष्ठताती   निरंतरी । 

पुंडलिकासाठी उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ।।

 बौद्ध अवतार  घेऊन ।विटे समचरण ठेऊन ॥ २॥


पुढे एकनाथ म्हणतात-

धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी । 

या लागे बौद्ध रुपे पंढरी नांदसी ॥


संत तुकाराम महाराजसुध्दा विठ्ठलाला बुद्धच समजतात. ते म्हणतात-

बौद्ध अवतार माझिया अदृष्टा ।

मौन्य मुखें निष्ठा धरियेली ॥

हे संतश्रेष्ठच जर विठ्ठलाला बुद्ध म्हणतात तर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बौद्धांचाच विहार होता हे सिध्द करण्यास आणखी पुराव्याची गरज काय? सुप्रसिध्द पाश्चात्य पंडित जॉन विल्सन आपल्या "मेमॉयर ऑन दि केव्ह टेपल" ह्या ग्रंथात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बौद्ध असल्याची साक्ष देतो. मंदिराच्या सभामंडपात दगडी खांबावर ध्यानस्थ बुध्दाच्या कोरीव मूर्ती आढळतात. जेंव्हा कोणताही मनुष्य वारकरी संप्रदायात प्रवेश करतो तेंव्हा त्याला (१) मी प्राण्यांची हिंसा करणार नाही. (२) मी चोरी करणार नाही. (३) मी व्यभिचार किंवा परस्त्रीगमन करणार नाही. (४) मी खोटे बोलणार नाही. (५) मी दारु पिणार नाही; अशी शपथ घ्यावी लागते. ही शपथच तर बौद्धांचे पंचशील किंवा सदाचरणाचे पाच नियम आहेत. बुद्धधम्मात प्रवेश करताना हीच शपथ सर्वप्रथम घ्यावी लागते. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील लोक निदान पंढरपुरापुरते तरी जातीचे बंधन म्हणजे उच्चनीच भाव व स्पृश्यास्पृश्य भेद मानीत नाहीत. जातिभेद नष्ट करणे हा तथागतांच्या शिकवणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पंढरपूरची यात्रा आषाढी पौर्णिमेला भरते. बुद्धधम्मात आषाढी पौर्णिमेला जास्त महत्त्व दिले जाते, कारण त्या दिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खूंना आपले पहिले प्रवचन देऊन धर्मचक्रप्रवर्तन केले. विठ्ठल पीतांबरधारी आहे म्हणजे पिवळे वस्त्र धारण करणारा आहे. बौद्ध भिक्खूंसाठी आणि स्वतःसाठी पिवळे वस्त्र धारण करण्याचा नियम तथागतांनी केला होता. 

श्री. वासुदेव गोविंद आपटे आपल्या ग्रंथात म्हणतात, "विठोबाची मूर्ती व खडकावर कोरलेल्या बौद्धमूर्ती, यांच्या स्वरूपातील सादृश्य व विठोबा-रखुमाई यांची पृथक पृथक मंदिरे आणि गोपालकाल्याच्यावेळी जातिभेदाला मिळणारा फाटा या गोष्टी ब्राह्मणधर्मी सांप्रदायिक पध्दतीला सोडून आहेत. यावरून तेही क्षेत्र मूळचे बौद्धांचे असावे व बौद्ध धर्माचा -हास झाल्यावर ब्राह्मणधर्माने त्या मूळच्या बौद्ध पद्धतीचा आपल्या धर्मात समावेश करून घेतला असावा असे दिसते.

२५ डिसेंबर १९५४ रोजी देहू रोड येथील बुद्ध मंदिरात भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बाबासाहेबांच्या हस्ते करण्यात आली. त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, तुम्ही पंढरपूरला जाता, पांडुरंगाचे अभंग म्हणता. पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल कोण होता यावर हुज्जत चालू आहे. पण माझा त्यांना खडा सवाल आहे की, विठ्ठलाची भानगड सोडून देऊन पंढरीचा पांडूरंग कोण ? याचे पहिल्यादा उत्तर द्या. तो होता कुठे ? त्याला पळविलं कोणी ? कोणी डुबविलं ? पांडूरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी त्यांना सिद्ध करून देईन. पुंडलीक या शब्दापासून पांडूरंग हा शब्द झाला. पुंडलीक याचा अर्थ कमळ. बौद्ध धर्मात मूर्तीपूजा नव्हती. अज्ञानी लोकांना तत्त्वज्ञान काय कळे! कमळाला पाली भाषेत पांडूरंग असे म्हणतात. तुम्हाला भुलविण्यासाठी ब्राह्मणांनी बुद्धाच्या नावाचा लोप केला. मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी ही पांडव लेणी असल्याचे सांगतात. इकडे पांडव कशाला आले होते ? पांडव दिल्लीच्या बाहेर ८० मैलाच्या पलिकडे गेले नाहीत. त्यांनी अलवार स्टेटमध्ये पंधराशे लेणी खोदली कशी ? त्यांच्याजवळ टिकास नव्हती की पावडं नव्हतं. भगवान बुद्धाने सांगितले की ' ये आणि पाहा ! मी सांगतो म्हणून तुम्ही हा धर्म घ्यावा असे नाही. तुझी अविद्या नाहिशी झाली तरच तू या धर्माचा स्वीकार कर.



संदर्भ : 

१) " मराठी साहित्यावर बौद्ध धम्माचा प्रभाव" - डॉ. भाऊ लोखंडे.

२) "धर्मपद" - अनंत रामचंद्र कुलकर्णी.

३) "बौद्धपर्व" - वा. गो. आपटे.

४) "डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३"


(अतिक्रमित प्राचीन बौध्द स्थळाची माहिती  करून देणे हा या ब्लॉगचा उद्देश आहे. या वास्तू प्राचीन काळात बौद्धांच्या होत्या त्यांनी निर्माण केल्या होत्या म्हणून त्यावर आता फक्त त्यांचाच अधिकार असावा असे मात्र नाही त्या संपूर्ण देशाच्या आहेत. त्याचे मूळ स्वरूप जपले गेले पाहिजे. ज्या वास्तू ज्या स्वरूपात होत्या त्या त्याच स्वरूपात स्वीकारणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. फक्त धर्मग्रंथांच्या आधारे किंवा कथांच्या माध्यमातून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींवर निर्भर न राहता पुरातत्वीय पुरावे, शिलालेख, वास्तुकला, शिल्पकला, त्याकाळातील राज्यकर्त्यांची उपलब्ध साधने या सर्वांच्या आधारे अशा प्राचीन वास्तूंचे मूळ स्वरुप तपासून आपण स्वीकारले पाहिले पाहिजे)

Tuesday, June 28, 2022

माझ्या गावाकडच्या गोष्टी : भाग ६ - बाजाराचा दिवस

[मागच्या महिन्यात मी माझ्या काकांच्या गावी (मुरूड) गेलो होतो तेथील बाजाराचे हे फोटो आहेत]


बुधवार म्हटलं की दिस उजाडल्यापासूनच आठवडी बाजाराची लगबग सुरू व्हायाची. नीळ टाकून धुतलेली पांढरी कापडं घालुन अन् काखेत नायलनच्या पिशव्या मारून निघालेली गडी माणसं सकाळच्या पारीच पाटीच्या (एसटी स्टँड) वाटेला लागलेली दिसायची. दिवसभर माणसं अन् बायका पोरांच्या गर्दीनं पाटी गजबजून जायची. रोज तालुक्याला म्हणजे उमरग्याला जायच्या गाडीला गर्दी रहायची पण बाजाराच्या दिवशी शिरशीला जायच्या गाडीत पाय ठिवायला बी जागा मिळायची नाही.  वीस पंचवीस मिनिटांच्या प्रवासासाठी माणसं तासन् तास गाडीसाठी पाटीवर ताटकाळत उभी असायची. गाडीला अन् बाजारात पण लंय गर्दी असल्यामुळे सहसा बारक्या पोरासनी कोण सोबत घेऊन जायचे न्हाय. चांगलं चुंगलं खायाला भेटणार म्हणून सगळी बारकी लेकरं बाजाराला गेलेल्या माणसाची आतुरतेने वाट बघायची. थोडी जाणती असलेली तर पाटीच्या वाटेला हेलपाटे मारायची.

वरलाकडल्या घरन् आण्णा आणि खाल्लाकडच्या घरन् माय नाहीतर मामा बाजार करायचे. आमच्यापैकी मी सोडून बाकीचे सगळे शिरशीला गेले होते. मी मायच्या खूप मागं लागायचो पण ती गर्दीला घाबरून मला न्यायची न्हाय. 'गर्दीत कुठं चुकला बिकला अन् काय झालं गेलं तर तुज्या बापाला काय सांगावं आम्ही' असं म्हणायची. सहावीच्या उन्हाळा सुट्टीत गावाकडे गेल्यावर पानमळ्यात माती टाकायच्या कामामुळे मला बाजाराला जायची संधी मिळाली. माय शेतामध्ये रोजंदारीवर जी शेतीची कामं चालायची ती करायची. (पिकांची लावणी करणे, ऊस तोडणी, खुरपणी, ज्वारी बाजरी तूर भुईमूग काढणे इ.) शेताला जाण्याची आवड असल्याने मी ही मायसोबत जायचो. 

वरलाकडच्या गोठ्याच्या मागे जी जंगली होती त्या जंगलीच्या पल्याड एका शेतकऱ्याच्या इथे या पानमळ्याचे काम सुरू होते. तिकडे जाण्याची वाट जंगलीच्या मधूनच होती. दिवसाही या वाटेवरून एकट्याला जायला भ्या वाटायचं. राती तर आम्ही इकडे फिरकायचोही नाही. जंगलीच्या बांधावर चहुबाजूंनी कोरफड आणि त्यासारखी झुडपं वाढलेली होती. दहा बारा दिवस मी माय अन् गावातले काही लोक याच वाटेने पानमळ्याच्या कामाला जात होतो. ज्यांच्या शेतात हे काम चालू होतं ते शेतकरी कुटुंब शेतातच रहात होते. त्यांचं एकच घर त्या भागात होते. मला वाटायचं रातच्याला कसं राहत असतील की हे एकटेच भुतावानी. सकाळी आठ नऊच्या दरम्यान आम्ही काम सुरू करायचो मळ्यात वाफे केलेले होते त्यात टोपल्याने माती नेऊन टाकायची असं हे काम होतं. सोबतच पानमळा उभारणीची इतरही कामे सुरू असायची. छोट्या टोपल्यानं खांद्यावरून मी माती टाकायचो आमच्या सोबत वाड्यातनं जी लोकं येत होती त्यामध्ये माझ्याच वयाचा एक मुलगा होता त्याच्यात आणि माझ्यात कामाची चढाओढ लागायची. त्या घरात एक आजी होती जी झाडाखाली बाज टाकून आमच्या कामावर लक्ष द्यायची. मला काम करताना बगून म्हणायची, " माय शिटीत राहून बी लेकरू पळू पळू वज्याची कामं करलालंय आज्जीसंगं". या कामाचे मला जे थोडेसे पैसे मिळणार होते त्यातून आम्हा सर्व बारक्यांसाठी बाजरातनं कायतरी घ्यायचा हट्ट मी मायकडे धरला होता. हा नाय करत शेवटी मला घेऊन जायला माय तयार झाली. जायच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मला बाजाराच्या ओढीनं लवकर झोपच आली नाही.

तासभर पाटीवर थांबून पाय ठेवायला जागा नसलेल्या एसटीत दाटीवाटीनं उभारून आम्ही शिरशीला पोहचलो. स्टँडपासून जवळच बाजार भरत असल्याने बाजाराची लगबग स्टँड वरूनच दिसायला सुरू झाली होती. बाजाराचा रस्ता कोणी सांगायची गरज पडत नव्हती.  आवाजाचा गोंगाट अन् लोकांची येताना जाताना दिसणारी गर्दी ही बरोबर बाजाराची वाट दाखवत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुला बसून जिन्नस विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही बाजारात पोहचलो. भल्या मोठ्या मोकळ्या जागेत सगळा बाजार भरला भरला होता. सगळ्यात पहिला उघड्यावरच मोठ्यालट कढईत जिलबी लाडू खारा (फरसाण) भजी बनविणाऱ्या दुकानाच्या वासानं माझं लक्ष वेधून घेतलं. सगळ्या बाजारात त्याचा खमंग वास सुटला होता. माझी नजर सतत भिरभिरत होती अन् पायाकडे लक्ष नव्हते त्यामुळे मी जागोजागी ठेचकाळत होतो मायणं माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. ओळखीची माणसं दिसली की ती एकमेकांना लांबूनच आवाज द्यायची, "आड्डे भिगीनं (लवकर) उरकलावं की" किंवा "येळ केलाव लंय" "चला चा घिऊ" अशा वाक्यानं त्याचं बोलणं सुरू व्हायचं, बरेच जण लांबनच रामराम करून पुढं जात व्हती.    




मीठ मिरची मसाल्या पासून ते धान्य व इतर सर्व वस्तू विकण्यासाठीची दुकानं इथं थाटलेली होती. खाण्यापिण्याच्या वस्तूंसोबतच शेतीच्या व दैनंदिन कामात लागणाऱ्या साहित्याची विक्री ही एक बाजाराची विशेषता होती. त्यावेळेस बाजरावरून येणारा माणूस ओळखायची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काळी पॉलिथीन पिशवी. मटणाची पिशवी. बाजाराच्या दिवशी हमखास सगळ्याच्या घरांनी मटणाचा बेत राहायचाच. इतर समानासोबत पिशवीत ठेवलं तर वास लागील म्हणून ती काळी पिशवी सेपरेट हातात धरली जायची. आम्ही ही मटण घेतले जे मेन बाजारापासून थोडं दूर मिळत होते. मी लांबच थांबलो कारण ते कापताना बघितलं की खाताना आठवायचं अन् खाल्लं जायचं नाही म्हणून. माय एक एक सामान घेत होती मी कधी तिच्या मागे मागे तर कधी सोबत चालत होतो. बाजारात जास्त तर शेतकरीच आपापला माल आणून विकायचे त्यामुळे वजनकाटा वगैरे एखाद्याकडेच दिसायचा. अंदाजे वजन म्हणून ठेवलेल्या दगडावर किंवा ढिगाऱ्या प्रमाणेच जास्त तर काम चालायचं. मायचं समदं घेऊन झाल्यावर शेवटी माझी खरेदी झाली. मला मिळालेल्या पैशातून खारीक, गूळ खोबरं आणि टोस्ट मी सगळ्यांसाठी घेतले आणि ती पिशवी हातात घेऊन कधी एकदा सगळ्यांना दाखवतो या उत्साहात परतीच्या वाटेला लागलो....




Saturday, June 18, 2022

साम जातक कथा - श्रावण बाळ मूळ कथा


                      Image Source - Wikipedia
          (मध्यप्रदेशातील सांची येथील स्तूपाच्या पश्चिम प्रवेशद्वारा वरील साम जातकाचे शिल्प )


तथागत गौतम बुद्ध जेव्हा उपदेश करीत, धम्माची शिकवण देत. तेव्हा ते गोष्टींच्या, अनुभवाच्या आणि निसर्गातील व दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देत.

बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धांची वचने विनयपिटकामध्ये आणि त्यांची प्रवचने सुत्त पिटकामध्ये संकलित केले गेले. सुत्त पिटकात निकाय नावाचे पाच भाग आहेत, त्यातील खुद्दक निकाय मध्ये १५ लहान ग्रंथ आहेत. त्यापैकी एक ग्रंथ आहे 'जातककथा'. नैतिकतेची शिकवण देणाऱ्या जवळपास एकूण ५४७ जातककथा या ग्रंथात आहेत. जातक म्हणजे जन्माच्या कथा. पुढील काळात या जातककथांची लेण्यांमधील शिल्प, चित्र यातुन मांडणी केली गेली. 

भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी उपदेशपर सांगितलेल्या या  जातककथा विश्वातील सर्वात प्राचीन आणि सर्वात जास्त भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या कथा म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळेच इतर साहित्यावर त्याचा प्रभाव दिसून येतो. बुद्धांच्या नंतर भिक्खूंनी या कथांचा उपयोग धम्म प्रसारासाठी केला. या कथा काव्य स्वरूपात गायल्या जायच्या बौद्ध साहित्याच्या निर्मिती आधी या मौखिक स्वरूपातच जतन केल्या गेल्या. पुराणकथा, पंचतंत्राच्या गोष्टी इत्यादींचे मूळ हे जातककथां मध्येच असल्याचे आढळून येते.

आठव्या शतकानंतर ज्या 'रामायण' ग्रंथाची निर्मिती झाली. त्या रामायणात श्रावण कुमाराची जी कथा सांगितली आहे, त्याचे मुळ ही जातककथेतच मिळते. पण तिचे स्वरुप काही प्रमाणात बदलण्यात आले आहे. श्रावण कुमारची गोष्ट सर्वांना माहीत असल्यामुळे त्याची माहिती न देता मूळ 'साम जातक' कथेची माहिती इथे देत आहे.

सुत्तपिटकातील खुद्दक निकाय मध्ये 'साम जातक कथा' आहे. थायलंड सारख्या देशामध्ये ती सुवणं साम जातक कथा म्हणून प्रसिद्ध आहे.
ही जातक कथा बौद्ध साहित्य, शिल्प, चित्र यांमध्ये उपलब्ध आहे.
मध्यप्रदेशातील सांची येथील स्तुपावर या संपूर्ण जातक कथचे वर्णन शिल्पाच्या माध्यमातून साकारले आहे. थायलंड येथील पेंटिंगस मध्ये आणि चीन येथील डाझु प्रातांतील लेण्यांमध्ये या जातक कथचे अस्तित्व दिसून येते.

Image source - shutterstock.com
(चीन येथील डाझु प्रांतातील लेण्यामधील शिल्प)

भिक्खूने संघात राहून अडचणीत असलेल्या आपल्या वृद्ध मात्या पित्यांची सेवा करणे योग्य की अयोग्य या द्विधा मनस्थितीत असताना जेव्हा एक शिष्य तथागतांना संघ सोडण्याची परवानगी मागण्यासाठी आला तेव्हा माता पिता यांची सेवा करणे हे कुशल कर्म आहे. संघात राहून धम्माची उपासना आणि मात्या पित्यांची सेवा हे दोन्ही तू करू शकतो हा उपदेश त्या शिष्याला करताना तथागतांनी ही जातककथा सांगितली होती. जी थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे, वाराणसी येथील मृगु नदीच्या काठी राहणाऱ्या पिता दुकुलक आणि माता पारिका यांच्या पोटी साम पुत्राचा जन्म झाला. साम सोळा वर्षाचा असताना एक घटना घडली, माता पिता अन्नाच्या शोधात वनात गेले असताना मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे ते एका झाडाखाली थांबतात. त्यांच्या जवळच एक वारूळ होते ज्यामध्ये विषारी साप होता. यांच्या उपस्थितीमुळे तो साप अस्वस्थ होतो आणि विषारी फुत्कार सोडतो, ज्यामुळे या दोघांची दृष्टी जाते. संध्याकाळी उशीरा पर्यंत घरी न आल्यामुळे साम यांच्या शोधात वनात जातो. अंध अवस्थेत भटकत असताना ते सामला दिसतात. तो त्यांना घरी घेऊन येतो आणि पूर्णवेळ त्यांची सेवा शुश्रूषा करू लागतो. 

नदीवरून पाणी आणणे, वनातून फळे आणणे आणि माता पित्यांची सेवा करणे हा त्याचा दिनक्रम असायचा. यादरम्यान मैत्रीपूर्ण स्वभावामुळे
जंगलातील सर्व प्राण्या सोबत त्याची मैत्री होते. सर्व प्राणी साम सोबत सुरक्षित वाटून त्याच्या आसपास रहायचे. एके दिवशी वाराणसीचा राजा पिलीयक्ख शिकारी साठी साम आणि त्याचे आई वडील रहात होते त्या ठिकाणी आला. साम नदीवर पाणी आणायला गेला असताना झाडांमध्ये लपून बसलेला राजा आवाजाच्या दिशेने बाण मारतो. ज्यामुळे साम जखमी होऊन खाली पडतो आणि ओरडतो. त्या आवाजाने राजा सामजवळ पोहचतो. त्यावेळेस साम त्याला म्हणतो माझं मांस खण्यायोग्य नाही, मी कुणाला त्रास ही दिला नाही तरी मला बाणाने कुणी का  मारले? तेव्हा राजा सांगतो माझ्याच बाणाने तू जखमी झाला आहेस तशा अवस्थेत ही साम राजाबद्दल वाईट शब्द बोलत नाही. माझे माता पिता माझी वाट बघत असतील ते अंध आहेत, जवळच एका झोपडीत राहतात. त्यांना या घटनेबाबत सांगा आणि त्यांची काळजी घ्या असे म्हणून साम बेशुद्ध होतो.

                       Image source - scroll.in
राजाने सामला बाण मारून जखमी केल्याचे थायलंड येथील साहित्यातील रंगीत चित्र

साम मृत पावला असे समजून राजा त्याच्या माता पित्याकडे जातो आणि घटनेची माहिती देतो. हे सर्व एकूण सामचे माता पिता दुःखी आणि व्यथित होतात पण राजाला याबद्दल अपशब्द बोलत नाहीत. ज्यामुळे राजा आणखीनच कष्टी होतो. मी तुमची जन्मभर मुलाप्रमाणे सेवा करतो असे तो त्यांना म्हणतो, पण तू राजा आहेस तू प्रजेचा सांभाळ कर आम्ही आमची काळजी घेऊ तू फक्त आम्हाला आमच्या मृत मुलाजवळ घेऊन चल असे ते म्हणतात. त्याप्रमाणे राजा त्यांना सामजवळ घेऊन जातो तेव्हा त्यांच्या लक्षात येते की तो अजून जिवंत आहे. कालांतराने साम ठीक होतो आणि माता पिता यांची दृष्टी पण परत येते. (इंद्र देव किंवा जंगलाच्या देवीने साम व त्याच्या माता पिता यांना ठीक केल्याचे काही कथेत सांगितले आहे) शिलाचे पालन करणे, हत्या न करणे, माता पिता व नातेवाईकांची सेवा करणे हा मथितार्थ या कथेतून भगवान बुद्धांनी दिला होता.

साम जातक प्रमाणेच 'दशरथ जातक', 'कन्ह जातक' (कृष्ण जातक कथा), 'कश्यप जातक' यांसारख्या अनेक कथा आहेत ज्या ब्राह्मणी साहित्यात स्थळ, काळ, पात्र यांच्या फरकाने आढळून येतात.

[पूर्वोक्त भारतीय संस्कृतिकोशाने म्हटले आहे, "एवढे मात्र खरे, की वाल्मीकीच्या पूर्वी रामाविषयी काही गाथा प्रचलित होत्या. याचे प्रमाण बौद्ध त्रिपिटिकावरूनही मिळू शकते. या रामविषयक गाथा हाच रामकथेचा मूलस्रोत असे म्हणता येईल. हरिवंशात तशा अर्थाचा एक श्लोकच आहे -

गाथा अप्यत्र गायन्ति ये पुराणविदो जनाः ।

रामे निबद्धतत्त्वार्थमाहात्म्यं तस्य धीमतः ॥ (ह.वं. ४१.१४९)

अर्थ- पुराणवेत्ते जन, ज्यांमध्ये रामविषयक तत्त्वार्थ निबद्ध आहे आणि त्या धीमान पुरुषाचे ज्यांत माहात्म्य आहे, अशा गाथाही या ठिकाणी गातात.

या सर्व गाथा वाल्मीकीच्या पूर्वकालीन आहेत, हे उघड आहे.
- " सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध" डॉ. आ.ह. साळुंखे]



( बौद्ध साहित्यातील ऐतिहासिक तथ्यांची माहिती देणे हा या लेखाचा एकमेव उद्देश आहे. यात जे सांगितले आहे तेच अंतिम सत्य आहे असा कोणताही दावा येथे केलेला नाही. पुराव्यानिशी ही माहिती चुकीची आहे असे निष्पन्न झाल्यास त्याचा स्वीकार करून यात नक्कीच बदल केला जाईल)