Translate

Monday, December 2, 2024

माझ्या अभ्यासाच्या गोष्टी भाग 2 - "ट्युशन्स क्लासेस"


चौथी पर्यंत गृहपाठ किंवा घरचा अभ्यास जो दिला जायचा तो आई शाळेतून आल्यावर करून घ्यायची. आईचे शिक्षण गावाकडच्या शाळेत चौथी पर्यंत झालेले होते. गरजे पुरती आकडेमोड आणि लिहता वाचता तिला व्यवस्थित जमायचं त्यामुळे इथपर्यंत अभ्यास घेण्यात तिला जास्त अडचणी आल्या नाहीत. पाचवी नंतर अभ्यास अवघड असतो जास्त लक्ष द्यावं लागतं असं शाळेच्या मॅडम आईला आम्हाला घ्यायला आल्यावर सांगायच्या. तेव्हापासूनच आईच्या डोक्यात आता यांच्या अभ्यासाचं कसं हा प्रश्न ठाणमांडून बसलेला. 

चौथी पर्यंत सकाळी वडील शाळेला सोडायचे घ्यायला आई यायची. आमच्या वर्गातील इतर मुलांनाही त्यांच्या आई घ्यायला यायच्या. त्यामुळे या सगळ्यांची बर्‍या पैकी ओळख झालेली. आमची शाळा सुटायची वाट पहात यांच्या गप्पा सुरू असायच्या. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात ही मुलांचा अभ्यास,  ट्यूशन असेच विषय सुरू असल्याचे आईच्या बोलण्यावरून नंतर समजायचे.

शाळा सुटल्यावर पट्कन घरचा रस्ता धरायचा या घाईत आम्ही सगळे मित्र असायचो पण शाळेच्या पायऱ्या चढून बाहेर जाताना, फळ्यांजवळ  डायर्‍या घेऊन घरचा अभ्यास लिहणाऱ्या पालकांची गर्दी दिसली की आपल्याला ही आजचा घरचा अभ्यास लिहायचा आहे हे ध्यानात यायचं आणि आपोआप आपल्या वर्गाच्या फळ्याजवळ जावून पाय थांबायचे. आई ही तिथेच थांबलेली दिसायची. आतासारखे त्यावेळी whatsapp ग्रुप नव्हते ज्यावर वर्गशिक्षक अभ्यास टाकतात आणि त्याप्रमाणे पालक तो करून घेऊन त्याचे फोटो त्याच ग्रुप मध्ये पोस्ट करतात. आमच्या शाळेत प्रत्येकाला गुलाबी डायरि दिली जायची, ज्यामध्ये शाळेचे नाव, विद्यार्थ्यांचे नाव,  इयत्ता, तुकडी आणि तारीख वार छापील स्वरुपात असायचे. रोजचा घरचा अभ्यास लिहण्यासाठी, शिक्षकांना पालकांसाठी सूचना लिहण्यासाठी आणि गैरहजर राहिल्यास पालकांच्या हस्ते कारण लिहून आणण्यासाठी ही डायरि होती. उन्हात उभारून लिहताना घामाघूम व्हायचो. कधी कधी अभ्यास जास्त असला की तिथेच मातीत मांडी घालून बसुन लिहावं लागायचं. लिहून झालं रे झालं की डायरि दफ्तर आईच्या हातात देऊन मी आणि अजय पुढे धूम ठोकायचो. 

अजय माझा वर्गमित्र पण होता आणि रहायला ही आम्ही एकाच गल्लीत होतो. आमच्या घराच्या रांगेतच दोन घर सोडून त्यांचं घर होतं. त्यामुळे बेस्ट फ्रेंड वगैरे जे म्हणतात ते आम्ही कधी झालो ते कळलंच नाही. शाळा सुटल्या की लेमन गोळ्या, पेपरमिंटच्या गोळ्या आणि कधी तरी एखादा पेरू यापैकी काही मिळालं तर नाचत आम्ही पाच सहा किलोमीटर चालण्यास सज्ज असायचो पण ज्या दिवशी यापैकी काही नसायचं त्यादिवशी धुपाधुपी आणि रडारडी ठरलेली असायची. माझी आई आणि अजयची आई आमचं सामान घेऊन गप्पा मारत मागे असायचे आम्ही पुढे पळत रहायचो. पळू नका गाड्या बघा सावकाश चला हे सांगून सांगून त्यांची दमछाक व्हायची. रस्त्याने पडलेली एखादी काटी घेऊन खेळत उनाडक्या करत आमचं पळणं सुरूच राहायचं. चालताना आमचे काही ठराविक टप्पे होते जिथे आम्ही थांबून आई यायची वाट बघायचो. पहिला टप्पा होता विकास नगर मधील मत्स्यालय. 

रंगीबेरंगी मासे काचेच्या पेटीत इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत रहायचे. त्यांचा पाठ शिवणीचा खेळ लय भारी वाटायचा. मधून मधून पाण्याचे बुडबुडे त्या पेटीत यायचे आणि गायब व्हायचे. पेटीच्या तळाशी असलेली हिरवी सोनेरी छोटी छोटी झाडे आणि वाळूत मिळायच्या तशा रंगबिरंगी गारगोट्या यामुळे ती पेटी जादूचीच भासायची. पुढे पळणारे आम्ही इथे मात्र जास्त वेळ थांबून आईच्या मागे जाणे पसंत करायचो. सिग्नलचा रस्ता आईचा हात धरून पार केला की पुन्हा आम्ही पुढं पळायचो दुसर्‍या टप्प्याकडे. ते म्हणजे उंच आणि मोठे बदामाचे झाड. झाडाला लाल लाल बदाम तर भरपूर रहायचे पण आमचे दगड काय त्यांच्या पर्यत पोहोचायचे नाहीत कधी तरी खाली पडलेल्या बदाम मिळायचे त्यादिवशी आम्ही एकदम खुश व्हायचो. मिळालेले बदाम दगडावर ठेवून मधोमध फोडून पांढरी शेंग काढण्यात आम्ही तरबेज झालो होतो. बदामातली शेंग खात खात आम्ही तिसर्‍या टप्पा जवळ करायचो. गुरूनानक चौक येथे जमिनीत लोखंडी पाण्याचा पाईप होता ज्याची वरची बाजू थोडी जमिनीपासून वरती आणि उघडी होती. बोरच्या पाण्याचा होता का नळाच्या व्हॉल्व्ह साठीचा होता हे आता नक्की आठवत नाही. त्यातून पाण्याचे बुडबुडे यायचे यात दगड टाकायचे आणि पाण्याचा टपक टपक असा आवाज ऐकायचा. ज्यादिवशी पाणी नसायचे त्यादिवशी दगड टाकायला तितकीशी मजा नाही यायची. यानंतर शेवटच्या टप्प्यावर जाऊन आराम करायचो तो म्हणजे बांधकाम भवन या इमारतीचा कट्टा. गेटच्या सुरवातीलाच दोन्ही बाजूला लांबलचक लंबगोलाकार कट्टे होते. याला लागूनच झाडे होती. त्यामुळे मस्त सावलीत आराम करायला एकदम मस्त वाटायचं. अशाप्रकारे धावत पळत मजा मस्ती करत आम्ही घर गाठायचो. 

हा शाळेचा पायी प्रवास सांगण्याचे कारण म्हणजे टीचरची ट्यूशन बाबतीत सूचना आणि आईच्या शाळेतून आम्हाला आणण्याच्या प्रवासा दरम्यान आमच्या भागातील मुलांच्या आईसोबत ट्यूशन बाबतीत झालेली चर्चा. यामुळे शाळेसोबतच ट्यूशनला ही पायी जाण्याचा नवा प्रवास माझ्या सोबत जोडला गेला.

घाटे काकू. माझ्या शैक्षणिक जीवनाला शिकवणीच्या माध्यमातून अत्यंत आपुलकीने आणि काळजीपूर्वक आकार देणार्‍या हातांचे नाव. आईने जी शोध मोहीम सुरू केली होती त्यातूनच घाटे काकू यांची माहिती मिळालेली. आमचे शेजारी कांबळे काका काकू. ज्यांच्या घराची भिंत आणि आमची घराची भिंत ही एकच होती. त्यांचे दोन्ही मुलं मॉडर्न शाळेत होती. त्यांचा मोठा मुलगा कपिल याच्या वर्गात त्याचा मित्र राघवेंद्र, जो घाटे काकूंचा मुलगा होता. सुरुवातीला कपिल ही घाटे काकूंकडेच ट्यूशनला होता. आमच्या पेक्षा दोन वर्षाने मोठा होता. जन्मतःच त्याची हाताची आणि पायाची बोटे जुळलेली होती. तरी सगळ्याच बाबतीत तो आमच्या पेक्षा सरस होता. गोट्या खेळताना सर्वात अचूक नेम त्याचा असायचा, लेफ्टी असल्याने आणि क्रिकेट मध्ये बॅटिंग बॉलिंग उत्तमरीत्या करीत असल्यामुळे क्रिकेट मध्ये ही तोच चांगला खेळाडू ठरायचा. फुटबॉल,  विटीदांडू, भोवरा यामध्ये ही तोच सरस ठरायचा. फक्त खेळाच्या बाबतीतच नव्हे तर अभ्यासात ही तो अव्वल क्रमांक मिळवायचा. त्याचे अक्षर ही रेखीव होते. ट्यूशन मध्ये ही तो घाटे काकूंचा आवडता विद्यार्थी होता. कपिलचे सगळ्याच बाबतीत  आघाडीवर असण्याचे कारण होते त्याचे आईवडील. त्यांनी त्याला कधीच तू बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे किंवा तुझ्यात काहीतरी कमी आहे ही जाणीव कधी होऊच दिली नाही. आज तो मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करून मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे.

कपिल बाबत हे सगळे सांगण्याचं कारण म्हणजे ट्यूशनच्या प्रवासातला तो माझा पहिला सोबती होता. आमच्या घरापासून साधारणपणे एक किलोमीटरवर घाटे काकू यांची ट्यूशन होती. हा एक किलोमीटरचा रोजचा प्रवास म्हणजे आमच्या धमाल मस्तीचा मार्ग बनला होता. ज्या रस्त्याने आम्ही जायचो तिथे वीटभट्टी होती. त्यामुळे काळ्या मातीचे छोटे  छोटे डोंगर रस्त्यात असायचे. त्यावर चढायचं, वरुन खाली उड्या मारायच्या असा खेळ आमचा रोजच चालायचा. कधी कधी विटा कच्च्या असायच्या कोण नाही हे बघून आम्ही त्यावर पाय देऊन पळून जायचो पायाचे ठसे त्यावर उमटवायला मजा यायची. विटा भट्टीत टाकण्या आधी वाळण्यासाठी एकावर एक दोन दोन या पद्धतीने उभ्या आडव्या ठेवून रचल्या जायच्या ज्याचे दोन तीन फुट उंच उभे खांब तयार व्हायचे जे आम्ही लाथा मारून पडायचो. यात आम्हाला खूप मजा वाटायची. जेव्हा लोकं तिथे काम करत असायची तेव्हा आणि जेव्हा घरचे कोणीतरी सोडायला आणायला सोबत असायचे तेव्हा आम्ही गुपचूप शांतपणे जायचो. त्यावेळी आपण दुसर्‍याचे नुकसान करतोय हे कळत नव्हतं. पण पुढे जाऊन एकदा तिथल्या मालकाने आम्हाला हे सगळं करताना पकडलं आणि पकडून ठेवलं. घरच्यांना सांगितलं त्यानंतर आमच्या या गोष्टी कमी झाल्या पण पूर्ण बंद काही झाल्या नाहीत. तिथल्या मालक आणि कामगारांशी आमचा लपाछपीचा खेळ सुरूच राहिला. पुढे कपिल ही ट्यूशन संपवून दुसर्‍या ट्यूशनला गेला. त्यानंतर नव्या मित्रांसोबत सातवी पर्यत माझा हा प्रवास सुरूच होता.

(वीटभट्टी)


घाटे काकू घरीच ट्यूशन घ्यायचे. त्यांचा दोन मजली बंगला होता. त्यातल्या प्रशस्त अशा हॉल मध्ये आमची ट्यूशन भरायची. कपिलच्या घराजवळ राहणारा त्याचा मित्र अशीच ओळख सुरुवातीला माझी ट्यूशन मध्ये होती. सर्वजण मॉडर्न शाळेतले होते आणि एकमेकांच्या ओळखीचे होते. पहिले काही दिवस मला त्यांच्यात अवघडल्यासारखं व्हायचं पण नंतर सगळे ओळखीचे झाले. मी ही त्यांच्यातलाच एक झालो. 

नेहमी तजेलदार आणि हसरा चेहर्‍याने आमच्या ट्युशन्सच्या वेळे आधी घाटे काकू तयार असायच्या. त्यांची मेमरी खूप शार्प होती. त्या शिस्तप्रिय होत्या पण प्रेमळ ही तितक्याच होत्या. एकाच वेळी विविध वर्गातील विद्यार्थ्यांनकडे लक्ष देत प्रत्येकाच्या अभ्यासाच्या सर्व गोष्टी अचूक लक्षात ठेवून त्याप्रमाणे शिकविणे ही त्यांची खासियत होती. सुरुवातीला माझी वेगवेगळ्या विषयातली गती उजळणी घेऊन त्यांनी तपासून बघितली आणि त्याप्रमाणे माझा अभ्यास घ्यायला सुरु केला. इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे विषय त्या शिकवायच्या. एकेकाला नावाने जवळ बोलवून त्यादिवशी घेत असलेल्या विषयाच्या संकल्पना समजावुन सांगून त्या सबंधित काम  देऊन पुढच्या विद्यार्थ्यांकडे वळायचे आणि मधून मधून आधी ज्यांना जो अभ्यास दिला आहे तो कुठपर्यंत झाला आहे हे तपासत राहायचं अशी त्यांची ट्यूशन घेण्याची पद्धत होती. त्यांच्या शिकवण्या सोबतच अजून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्यांची चहाची आवड, ट्यूशनच्या मध्ये किंवा सुरुवातीला ते चहा घ्यायचेच आणि म्हणायचे 'गाडीत पेट्रोल नसल्यावर गाडी कशी चालणार?' चहा त्यांच्या साठी एनर्जी ड्रिंक होता. 

रोजच्या वापरतील उदाहरणे देऊन क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण अशी होती. गोष्टी समजून घेऊन लक्षात ठेवण्याची माझी क्षमता यादरम्यानच विकसित झाली. या घडीला मी इंजिनीयरिंगकडे जाणार याची पुसटशी ही कल्पना मला काय कुणालाच नव्हती पण त्यासाठीचा पाया घाटे काकूंमुळेच पक्का झाला. इथे होणार्‍या अभ्यासामुळे वर्गात उत्तरे सांगण्यात माझा हात सर्वात आधी वरती जायचा. अभ्यासा सोबतच वागणुकीचे आणि शिस्तीचे धडे ही मला इथेच मिळाले. मी आधी बेशिस्त होतो असं नाही पण अधिक शिस्तप्रिय होण्यास मदत झाली. जसे की भाषेचे उच्चार,  शब्दांचा वापर अधिक व्यवस्थित करणे, वेळेत ट्यूशनला येणे, वेळेत दिलेल्या गोष्टी पूर्ण करणे, नेहमी टापटीप राहणे, सर्वांशी आदरयुक्त व्यवहार करणे ईत्यादी. 

चौथी ते सातवी या तीन वर्षातील माझा शैक्षणिक प्रवास उल्लेखनीय असा होण्यामध्ये आणि तो आजही लक्षात राहण्यामागे घाटे काकूंचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण होते. पुढे आठवी ते दहावी पर्यंतची ट्यूशन ही त्यांनीच ओळखीने स्वतः माझ्या अभ्यासातील प्रगती बाबत सांगून आर्थिक सवलतीत लावली होती. इंजिनियरिंग फील्ड निवडण्या बाबत त्यांनीच पहिल्यांदा सांगितले होते. जेव्हा इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करून कॉलेजला शिक्षक म्हणुन जॉईन केल्याचे त्यांना सांगितले तेव्हा त्या खुपच खुश झाल्या होत्या. त्यांना माझ्याकडून जशी अपेक्षा होती तसेच घडल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. आई वडिलांची भेट झाली की आजही आवर्जून त्या माझी चौकशी करतात, मी ही त्यांच्या घराकडे गेलो की भेट घेऊन आशिर्वाद घेत असतो. फक्त एक शिक्षक म्हणुन नाही तर एक माणुसकीने ओसंडून भरलेलं व्यक्तिमत्त्व म्हणुन घाटे काकूंचे माझ्या जीवनातील स्थान कायमच महत्त्वपूर्ण असे रहाणार.



Sunday, October 20, 2024

माझ्या अभ्यासाच्या गोष्टी...भाग 1 - "पहाटेचा अभ्यास"



अभ्यासाबद्दल काही लिहायचं म्हणजे सुरुवातीलाच अभ्यास केल्यानंतर आपण कुठपर्यंत मजल मारू शकलो हे सांगणं गरजेचं आहे. जेणेकरून  वाचणार्‍यांना एकूण लिखाणाचा आवाका लक्षात यावा म्हणुन थोडेसे स्वतः बाबत, तर माझे सर्वोच्च शिक्षण म्हणजे मास्टर्स इन सिग्नल अँड सिस्टम. डिग्री इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन मध्ये आणि डिप्लोमा इलेक्ट्रिकल विभागात. डिप्लोमा कॉलेजचा दहा वर्षे शिकवणचा आणि दोन वर्षे विभागप्रमुख म्हणून अनुभव. यादरम्यान तीनवेळा बेस्ट टीचर पुरस्कार मिळाला, विविध इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट मध्ये काम केलं, अवघड विषयांचा शंभर टक्के निकाल लावला वैगेरे वैगेरे. यासोबतच एक लेखक, सर्टिफाईड गिर्यारोहक, पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या नोंदणीकृत संस्थेचा अध्यक्ष आणि सध्या स्टॉक मार्केट मध्ये यशस्वीपणे ट्रेडिंग करणारा ट्रेडर अशी माझी ओळख आहे. मला वाटतं माझ्या गोष्टीं सोबत वाचकांना जोडण्यासाठी इतकी माहिती पुरेशी आहे. पुढे प्रसंगानुसार आणखीन खुलासेवार गोष्टी येतीलच. शाळा, डिप्लोमा कॉलेज, डिग्री आणि पुढचे शिक्षण असा अभ्यासाचा प्रवास यामध्ये मांडणार आहे. हे लिहिण्याचे कारण असं काहीसं विशेष नाही पण आपण तेव्हा जगलेला काळ पुन्हा एकदा नव्याने अनुभवावा हाच मुख्य हेतू. एखाद दुसर्‍याला यातून थोडीशी शिकण्याची प्रेरणा वैगरे मिळाली तर उत्तमच.

 बाबासाहेबांच्या विचारांचा मोठा प्रभाव असल्याने आपलं शिक्षण जरी जेमतेम झालं असलं तरी आपल्या पोरांनी खूप शिकलं पाहिजे. त्यासाठी जे काही करावं लागेल ते करायचं अशी पक्की खुणगाठ माझ्या आई वडिलांनी मनाशी बांधली होती. त्यामुळेच लहानपणापासूनच माझ्या, लहान बहीण व भावाच्या अभ्यासाच्या बाबतीत ते खूप दक्ष होते. शाळेला नियमित आणि वेळेवर पाठवणे, शिक्षकांच्या संपर्कात राहून वेळोवेळी अभ्यासातील प्रगतीची माहिती घेणे, घरी अभ्यास करून घेणे ईत्यादी गोष्टींना त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. दोन दशके अहोरात्र परिश्रम करून आम्हाला उच्चशिक्षित केले. त्यावेळेस अल्प शिक्षित असून सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी जे शहाणपण दाखवले त्यामुळेच आज आम्ही घडलो. आमच्या घरातून पहिला इंजिनियर मी झालो. यामागे आजी आजोबा पासून ते सर्वच नातेवाईकांचे अतिशय मोलाचे योगदान मला लाभले. त्याचीही माहिती प्रसंगानुरूप पुढील लिखाणात येणारच आहे.

चला तर मग सुरवातीपासून सुरू करतो. आताच्या अतिफास्ट लहान मुलांप्रमाणे नर्सरी किंवा छोट्या गटा पासूनच ऐ फॉर ॲपल आणि बी फॉर बॉलचा लक्षात रहाण्याजोगा अभ्यास तेव्हा नसायचा त्यामुळे तेव्हाचं जास्त काही ध्यानात येत नाही. पण बालवाडी पासूनच घरच्यांनी शाळेला जायची गोडी निर्माण केली होती. शाळेला जाण्यासाठी नाही म्हंटलेलं किंवा रडून दंगा केलेलं मला नाही आठवत. त्याबाबतीत शिक्षकांची ही कधी ही तक्रार नव्हती. माझी मुलगी ही तशीच आहे. एखाद्या दिवशी काही कारणामुळे शाळा नको म्हंटलं तर रडायला सुरुवात करते तेव्हा माझी आई म्हणते, बापासारखाच उल्हास आहे पोरीला बी शाळेत जायचा. बालवाडी ते तिसरी पर्यंतच्या ओझरत्या आठवणी आहेत. या ओझरत्या आठवणीत ही एक व्यक्ति जी ठळकपणे डोळ्यासमोर उभी राहते त्या म्हणजे वाघदरीकर मॅडम. त्या खूप प्रेमळ होत्या. हसत खेळत शिक्षण हीच त्यांची शिकण्याची पद्धत होती त्यामुळे त्या सगळ्यांच्याच आवडत्या होत्या. माझ्याच नाही तर माझ्या सर्व वर्गमित्रांच्या ही या मॅडम अजून लक्षात आहेत. चौथी पर्यंत माझी अभ्यासाची प्रगती चांगली होती. शिक्षकांच्या आवडत्या विद्यार्थ्यांमध्ये नाव असायचं. आणि वर्गात पहिल्या दहा मध्ये माझा नंबर यायचा. पुढे शाळा संपेपर्यंत हा क्रम काही चुकला नाही. अभ्यासाची सुरवात खर्या अर्थाने लक्षात येते ती म्हणजे चौथी पासूनच्या. कारण तेव्हापासूनच माझा पहाटेच्या अभ्यासाची सुरवात झाली होती. चतुराबाई श्राविका विद्यालय हे शाळेचं नाव, वर्ग, तुकडी आणि वेगवेगळ्या विषयांची नावे वह्यांवर स्वतः स्वतः लिहायची सुरवात ही याच वर्षापासुन झालेली. 

पहाटेचा अभ्यास चांगला लक्षात राहतो या वाक्याला या घडीला तितकसं महत्त्व उरलेलं नाही पण त्यावेळी ते एक प्रमाण मानलं जाणारं वाक्य होतं. माझ्या आई वडिलांवर ही या वाक्याचा चांगलाच प्रभाव होता. आणि हा प्रभाव असण्याचं महत्त्वाचे कारण म्हणजे माझा मिलिट्री मध्ये असलेला मामा. विजू मामा. मिलिट्रीत असल्याने ते कडक शिस्तीचे होते. त्यामुळे आम्हा मुलांवर त्यांचा दरारा होता. ते घरी आले की घराला ही छावणीचे स्वरूप यायचे. सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध पद्धतीने व्हायच्या. जम्मू काश्मीर, आसाम अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंगला असताना ते गावाकडे जाण्याआधी सोलापूरला यायचेच मग गावाकडे जायचे. आणि घरी आले की माझ्या अभ्यासाची आवर्जून चौकशी करायचे. विशेषकरून इंग्रजीच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. इंग्रजी शब्दांचा अर्थ विचारणे, त्यांच्या कडे असलेल्या कार्ड किंवा कागदांवरील इंग्रजी वाक्ये मला वाचायला लावायचे. आणि मला ते जमतंय हे बघून एकदम खुश व्हायचे अन शाबासकी द्यायचे. उजल (आईचे नाव उज्ज्वला मामा उजल म्हणायचे) आणि भाऊजी पुढं याला काय मोठं बनवायचं असेल तर आतापासूनच मेहनत घ्यावी लागेल. रोज सकाळी पहाटे उठून अभ्यास करायची सवय लावली पाहिजे असे ठणकावून सांगत. आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या जातात का नाही याचा फॉलोअप पण घेत त्यामुळे आई वडिलांनी ही मनावर घेऊन ही गोष्ट माझ्या अंगवळणी पडावी म्हणून विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली होती.

आमचा आजी आजोबांनी बांधलेला पाच खोल्यांचा वाडा होता. वाडा म्हणजे गावाकडे पारंपरिक पद्धतीने बांधला जातो तसा नव्हे तर पत्र्याचे छत आणि मातीत बांधलेल्या दहा पंधरा फुटाच्या पाच खोल्या होत्या. आयताकृती जागेत समोरासमोर एकीकडे तीन आणि एकीकडे दोन असं या खोल्यांचं विभाजन होतं. मध्ये मोकळं आंगण होतं आणि दोन्ही बाजूला मोठे दरवाजे होते. अशा प्रकारे जुन्या वाड्यांशी मेळ खाणारी रचना असल्यामुळे सगळे याला बनसोडेचा वाडा म्हणायचे. यामध्ये आजी आजोबा, काका काकू, आणि आम्ही पाच एकत्रित रहायचो. पुढे आजोबांनी एक भाडेकरू ही ठेवले. हे सांगायचे कारण म्हणजे यातल्याच एका खोलीत ज्यामध्ये आई वडील छोटे बहीण-भाऊ आणि मी रहायचो तिथेच लोखंडी खाटावर बांधलेल्या मच्छरदाणीत माझ्या पहाटेच्या अभ्यासाची सुरवात झाली.

तेव्हा अलार्मचे घड्याळ वैगरे आमच्याकडे नव्हते. मोठे क्वार्टझ कंपनीचे भिंतीवरील घड्याळ होते. त्यात बरोबर पाच वाजले की आई मला उठवायची. रात्री झोपायला उशीर झाल्याने, आजारी असल्याने किंवा इतर कोणत्या कारणामुळे त्यात आई कडून कधी खंड पडल्याचे मला आठवत नाही. अगदी अचूक वेळेवर तीला कशी जाग येते असा प्रश्न मला तेव्हा पडायचा. ज्याचे उत्तर नंतर मला कळाले, की मला उठविण्यासाठी ती पाच वाजण्याच्या आधीपासूनच जागी रहायची. मला दोन तीन हाका मारून झाल्यावर मी डोळे चोळत उठायचो. रात्रीच उशाला ठेवलेले पुस्तक डोळे मिटून चाचपडत घ्यायचो. सुरवातीचे काही दिवस ज्यांच्या ज्यांच्या सांगण्यामुळे मला पहाटे उठून अभ्यास करावा लागत होता त्यांना मनातल्या मनात शिव्या घालायचो. त्यानंतर मच्छर आत येऊ नये म्हणून सर्व बाजूने गादीच्या खाली खोवलेली मच्छरदाणी लाईटच्या बटनाच्या बाजूने उचकटून अलगदपणे बाहेर फक्त डोके आणि एक हात काढून टय़ूब लाईट लावायचो.  स्वयंपाक खोली आणि टीव्हीची म्हणजेच जिथे आम्ही झोपायचो त्या दोन खोल्यात मिळून एकच टय़ूबलाईट होती. (दोन खोल्यांना जोडणारी जी मधली भिंत होती त्यामध्ये मधोमध वरती पत्र्याच्या जवळ यू आकाराची बांधकाम करताना जाणीवपूर्वक एक सांध केली होती. ज्यामध्ये टय़ूब लाईट अर्धी इकडे आणि अर्धी तिकडे अशी बरोब्बर फिट केली होती) टय़ूब लाईट खाटाच्या उलट्या दिशेला असल्याने आणि मच्छर दाणीत बसुन वाचत असल्याने अंधुक अंधुक दिसायचं. याचा एक फायदा व्हायचा, डोळ्यांवर ताण देऊन वाचावं लागत असल्यामुळे संपूर्ण लक्ष केंद्रित व्हायचं आणि झोप डोळ्यातून गायब व्हायची. पण जेव्हा जेव्हा मी पुस्तक न उघडताच फक्त बसून रहायचो तेव्हा डुलक्या खायचो तेव्हा लगेच खालच्या मच्छरदाणी मधून आईचा आवाज यायचा, वाचायला का नाही म्हणुन लगेच ताडकन डोळे उघडत रागाने वाचायलो की असं जोरात ओरडायचो. कधी एकदाचा एक तास संपतोय आणि मला परत झोपायला मिळतंय असं व्हायचं.  सवय लागेपर्यंत याचा मला त्रास झाला पण नंतर खूप फायदा झाला. सुरुवातीला माझ्यामागे हा त्रास लावला म्हणुन मी ज्यांचा राग करायचो नंतर त्यांचेच मी मनोमन आभार मानू लागलो. 

सकाळच्या शांत वातावरणात रोजच्या रोज शाळेत शिकवलेलं वाचायची सवय लागल्यामुळे अभ्यास अतिशय उत्तमरित्या व्हायला लागला. सोबतच सकाळच्या प्रसन्न वातावरणात मन ही प्रसन्न व्हायचे. पक्ष्यांचा किलबिलाट सवयीचा होत गेला. आमच्या घराला लागूनच कडुलिंबाचे झाड होते त्यावर सकाळी भरपूर पक्षी यायचे. विशेषकरून लिंबोळ्या असताना त्या खाण्यासाठी पोपटाची गर्दी व्हायची. परीक्षा सुरू झाल्यावर तर मी स्वतः एका हाकेमध्ये उठायचो आणि अंगणात बसून अभ्यास करायचो. त्याचवेळेला स्पीकर वरुन अजाणचा पुकारा सुरू व्हायचा. पुढे पुढे अजाणच्या आवाजाने माझ्यासाठी अलार्मचे काम केले. एकूणच यावेळी माझे संपूर्ण लक्ष जे वाचतोय किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यावर केंद्रित व्हायचे. त्यामुळे जबरदस्तीने सुरू झालेला अभ्यासाचा प्रवास हळू हळू माझ्या आवडणार्‍या गोष्टीत रूपांतरित झाला. सहावी सातवीतच इंग्रजी हा विषय माझ्या आवडीचा होण्यामागे या पहाटेच्या अभ्यासाचा वाटा खूप मोठा होता. माझ्या बालमनावर अभ्यासाचा संस्कार याच दरम्यान होत गेला आणि कालानुरूप दृढ होत गेला. 

पुढे महिनाभरातच पहाटेचा अभ्यास माझ्या आवडीचा विषय बनला. यासाठी अजून एक महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे जास्तीच्या खाऊचा वाटा. वडील रोज रात्री रिक्षावरून घरी येताना आमच्यासाठी काहीना काही खायला घेऊन यायचे. बेकरीचे पदार्थ मस्का पाव,  क्रीम रोल,  बिस्किट, टोस्ट किंवा त्या त्या हंगामातील फळे असं काहीना काही आणायचेच. खाटाला लागूनच एका मोठ्या लाकडी पेटीवर आमच्या टीव्हीची जागा होती. पेटी मोठी असल्याने टीव्ही ठेवूनही जागा रिकामी असायची. तिथे वडिलांनी वाचलेले पेपर आणि रोज आणलेले खायचे पदार्थ ठेवले जायचे. सकाळी अभ्यासासाठी उठल्यानंतर टय़ूब लाईट लावताना मी सर्वात आधी आज काय खायला आणलंय हे बघायचो. वडील रात्री उशिरा म्हणजेच आम्ही झोपल्यावर यायचे त्यामुळे रात्री काय आणलेलं असायचं ते कळायचं नाही. पॅकिंग मध्ये नसलेले म्हणजेच जे पेपरबॅग मध्ये (आधी खारी किंवा टोस्ट वर्तमान पत्राच्या पेपर बॅग मध्ये द्यायचे) किंवा कॅरिबॅग मध्ये असायचं आणि जे उघडून खाल्यानंतर कमी झाल्याचे कुणाच्या लक्षात येणार नाही, असे पदार्थ मी अलगदपणे मच्छर दानीच्या आत घेऊन, पिशवी उघडून खाताना कसलाही आवाज होणार नाही याची काळजी घेत फस्त करायचो. आणि परत सगळं होतं तसं पॅक करून अभ्यासाला लागायचो. सकाळी छोटे बहीण-भाऊ यांच्या जोडीला बसून चहा सोबत खायच्या गोष्टी वाटून घेताना आपल्याला जास्तीचा वाटा मिळाला आणि यांना त्याची खबर ही नाही हे विचार करून मनातल्या मनात खुश व्हायचो. ज्यादिवशी काढून खाण्यायोग्य पदार्थ नसायचा त्यादिवशी मात्र माझा हिरमोड व्हायचा. अशाप्रकारे दहावीपर्यंत पहाटेच्या अभ्यासाचा आणि जास्तीच्या खाऊचा माझा क्रम चालूच राहिला. गमतीचा भाग सोडला तर दहावीपर्यंत वर्गात पाहिल्या दहा नंबर मध्येच टिकून राहण्यात आणि शाळेत हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविण्यात या पहाटेच्या अभ्यासाचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असे होते. 

-क्रमशः

शिशु वर्गाचे ओळखपत्र 




Sunday, December 31, 2023

12th फेल - मुव्ही.




मागच्या वर्षात बॉलिवुड मध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आले आर्थिक विचार करता नवनवीन रेकॉर्ड ही झाले. पण बडे बडे स्टार, खतरनाक अ‍ॅक्शन आणि महागडे व्हीएफएक्स यापैकी काहीही नसताना, प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारा आणि प्रत्येकाला कथेशी जोडण्यात यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे "12th फेल". अनुराग ठाकूर लिखित 12th फेल या बेस्ट सेलर पुस्तकावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. ज्यामध्ये आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांचा विद्यार्थी दक्षेतील संघर्षमय जीवन प्रवास जीवनावर मोठ्या पडद्यावर साकारण्यात आला आहे.


आपल्या भविष्याप्रति आणि ध्येयाप्रति लढणं ज्या व्यक्तिला परिस्थितीनेच शिकवलं असेल ती व्यक्ति त्याच्या प्राप्तीसाठी काय काय करू शकतो याची ही गोष्ट आहे. त्यामुळे शैक्षणिक विषयावर जरी आधारित असला तरी हा चित्रपट जरासा ही रटाळ वाटत नाही. समाजात इमानदार- बेईमान, गरीब-श्रीमंत, प्रबळ-दुर्बळ, हिंदी मीडियम-इंग्लिश मीडियम, सर्व सुविधा असलेला अन काहीच सुविधा नसलेला अशा भागांमध्ये विभागल्या गेलेल्या तरुण विद्यार्थ्यांचा संघर्ष या चित्रपटाने अतिशय अचूकपणे मांडला आहे.  त्यामुळे हा फक्त त्या नायकाचा जीवनप्रवास राहत नाही तर तो त्या प्रत्येकाचा जीवनप्रवास बनतो जो समाजाकडून कोणत्या ना कोणत्या प्रकारे विभागला गेला आहे. म्हणुनच शेवटी दाखविण्यात आलेला  नायकाचा विजय हा आपला विजय वाटतो.  परिस्थितीच्या विपरीत जाऊन तिच्याशी दोन हात करण्याची प्रेरणा देण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो त्यामुळे हिट सुपरहीट याच्या तो पुढे गेला आहे. 

चित्रपटाची कथा जेवढी दमदार आहे तेवढीच तिची स्टार कास्ट ही तगडी आहे. चित्रपट क्षेत्रातील परिचयाचे चेहरे जरी नसले तरी त्यांच्या अभिनयाची छाप पाडण्यात प्रत्येकजण यशस्वी झाले आहेत. मनोज कुमार शर्मा यांचे मुख्य पात्र साकारणारा अभिनेता विक्रम मेसी याने तर कमालच केली आहे. कोणतरी पडद्यावर अ‍ॅक्टींग करत आहे हेच तो आपल्याला विसरायला भाग पाडतो. इतका वास्तवदर्शी अभिनय त्याने केला आहे. आयटम साँग, इंटिमेट सीन याशिवाय ही चित्रपटातील अभिनेत्री फक्त अभिनयाच्या जोरावर किती प्रभावी दिसू शकते हे या चित्रपटाने उत्तमरीत्या अधोरेखित केले आहे. चित्रपट पाहिल्या नंतर अभिनेत्रीचे नाव गुगल वर सर्च होणार हे नक्की. मुख्य पात्रांप्रमाणे सहकलाकार ही आपल्या लक्षात राहतात प्रत्येकाच्या आयुष्यात असेच तर कॅरेक्टर असतात असेच आपल्याला वाटते. युपीएसी कोचिंग क्षेत्रातील बापमाणूस विकास दिव्यकीर्ती सरांचा गेस्ट रोल मनाला सुखावणारा वाटतो चित्रपटाच्या लेखनात ही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुःख आनंद, राग, हसू आणि आसू या सर्व भावना हा चित्रपट पाहताना आपण अनुभवतो. एकूणच थ्री इडियट्स, मुन्नाभाई सारखीच कमाल याही चित्रपटात करण्यात विधु विनोद चोप्रा आणि त्यांच्या टीमने यश मिळविले आहे. 

निखळ मनोरंजनाच्या दृष्टीने जरी पाहिले तरी प्रत्येकाने पहावा असाच हा चित्रपट आहे. विशेष करून विद्यार्थी आणि तरुण वर्गाने तर नक्कीच हा चित्रपट पहावा करण नेहमी नेहमी असे इन्स्पिरेशनल सिनेमे बनत नाहीत. हार नहीं मानूंगा आणि  रिस्टार्ट या दोन गोष्टी हा चित्रपट आपल्याला नव्याने शिकवून जातो. मला व्यक्तिशः हा चित्रपट खूप आवडला म्हणुनच स्वतःला याबाबत लिहण्या पासून रोखू शकलो नाही.

Saturday, April 15, 2023

माझ्या गावाकडच्या गोष्टी : भाग ८ - भिमजयंती




एप्रिल महिन्याच्या आधीपासूनच गावांकडे भीमजयंतीची लगबग सुरू होते. पारावर अन् समाजमंदिरात जयंतीच्या मिटिंगचा सपाटा लावला जातो. यावेळेस काय येगळं करता येईल या इचारानं जाणते अन् तरुण पोरं झपाटून गेलेले असतात. समाजमंदिराकडे सहसा न दिसणारी मंडळी ही वाट चुकवून एखादी तरी फेरी मारताना दिसायची. पट्टी (वर्गणी) गोळा करायला सुरुवात व्हायची तसा मंडळाच्या कार्यकर्त्यांना हुरूप यायचा. महिला मंडळाच्या बी मीटिंग व्हायच्या लेकी सुनाला निरोप धाडले जायचे. कामा धंदयासाठी शहरात स्थायिक झालेली माणसं जयंतीच्या तारखे प्रमाणं समदं आटपून गावात हजर होताना दिसायची. समाजमंदिर आणि आजूबाजूचा परिसर झाडून धुवून चकाचक केला जायचा. मोठी पोरं एकदम झाक असा रंग मारायचे. पारभरून पताक्याचे तोरण बांधले जायचे. रंगरंगोटी नी घरं जवा नटू लागायची तवा पारावरचा पिंपळ बी या दिवसात जोर जोराचा सळसळून या उत्सवात सहभागी व्हायचा. 

नवी कापडं खायला चांगलं चुंगलं मिळणार समद्या भावंडांच्या मित्रांच्या भेटी होणार म्हणून आम्ही सगळे बच्चेकंपनी एकदम खुशीत असायचो. मी दरवर्षी सोलापुरची मिरवणूक करून गावाकडे जाणार त्यामुळे माझ्यासाठी तर डबल मजा असायची. गावाकडे गेलो की सोलापूरच्या मिरवणुकीतील देखावे, डीजे, स्पीकर, लेझीम ताफे, गर्दी याबाबत तासंतास गप्पा रंगायच्या. समद्या पोरवाला वाटायचं 'मायला एकदा सोलापूरच्या जयंतीला जायाय पाहिजे'. 

जयंतीच्या टायमाला समजमंदिर आणि पारावर मुक्काम करायला पोरांची गर्दी व्हायची. घराघरानं एखादा पिवळा बल्ब अन् तर धूर ओकणार मिणमिणत्या चिमण्याचाप्रकाश रहायचा जो त्या घराला बी पुरायचा न्हाय त्यामुळे सगळा महारवडा अंधारातच हरवलेला राहायचा पण जयंतीच्या काळात समाजमंदिरावर लावलेल्या हॅलोजनच्या  लायटीमुळं रातीच्या अंधारात समजमंदिर उठून दिसायचा.

आमची बी लंय इच्छा व्हायाची पण 'लहान हाव अजून ' म्हणून जाऊ देत नव्हते. गावा गावानं या काळात भजनं ठेवली जायाची. गायन पार्ट्याची माणसं अन् पोरं पायात भिंगरी बांधल्यावानी फिरताना दिसायची. या गायन पार्ट्या बाबासाहेबांचे इचार अन् बुद्धांची शिकवण गाण्यांच्या माध्यमातून बेमालूमपणे लोकांमधी पेरायची. ती गाणे ऐकताना हुरूप यायाचा समदं वातावरण भारावून जायचं. संजू भाऊ, बापू म्हणजे बुध्याचा मोठा भाऊ आणि त्यांचे मित्र असे चार पाच जण गावच्या गायन पार्टीसोबत जायाचे अन् आल्यावर ज्या काही गोष्टी सांगायचे त्यात आम्ही समदे हरखून जायचो. त्यांना मिळालेली दाद, इतरांसोबत झालेली जुगलबंदी, लोकांनी त्यांचा केलेला सन्मान, मिळालेले पैसे याबाबतच्या गोष्टी ऐकताना त्या कधी संपूच ने असं वाटायचं. 

तेरा एप्रिलच्या राती दिस असल्यावानी सारा महारवडा जागा रहायचा, समद्याची दुसऱ्या दिवसाची तयारी सुरू असायची परतेकाच्या घरात बाबासाहेबाच्या फोटोला हार घालून वंदना व्हायाची. समजमंदिरात तर भारीच लगबग सुरू रहायची. समजमंदिर लगीन असल्यागत सजवलं जायचं. रातीच्या अंधारातच कधी सकाळची लगबग सुरू व्हायची हे समजायचं नाही. भल्या पहाटे समदे उठून सगळी आवराआवर करून पारावर झेंडावंदनला जमायची. पहाटेपासूनच (कर्ना) स्पीकरवर भीमगीते वाजायला लागायची. समाजमंदिरातील बाबासाहेबांच्या फोटोला हार घालून  त्रिसरण पंचशील घेऊन निळा झेंडा फडकवला जायचा. त्यानंतर पुढाऱ्यांची अन् जाणत्यांची भाषणं व्हायाची. 

गावाकडच्या मिरवणुकीच्या तारखा ठरलेल्या असायच्या ज्या १४ एप्रिल पासून सुरू व्हायच्या. तालुक्याची म्हणजे उमरग्याची जयंती १४ ला व्हायची अन् आमच्या गावची २३ ला. याकाळात गावात जत्रेवानी गर्दी दिसायची. किती बी येळ मिळाला तरी तो जयंतीच्या तयारीला अपुराच वाटायचा. मिरवणुकीच्या दिसाला बी पहाटे पासूनच लगबग सुरू व्हायाची. वाजंत्री पथकाच्या वाटेला समद्याची डोळे लागलेले असायचे. एकदा का वाजंत्री मंडळी गावात पोहचले की साऱ्याच गोष्टी वेग पकडू लागायच्या. सलामीच्या दणक्याने साऱ्या गावाला पथकाची वळख व्हायची. 

खिल्लारी बैलजोडी मिरवणुकीच्या बैलगाडी साठी निवडली जायची. बैलपोळयावानी ही जोडी सजवली जायची. केळीचे खुंट, नारळाच्या फांद्या, पताके, झिरमिळ्या यांनी बैलगाडी सजवली जायची.  बाबासाहेबांचा फोटो ठेवण्यासाठी आकर्षक कमान केली जायची.  पारावरून मिरवणुकीची सुरवात व्हायची. समदा महारवाडा नटून थटून पारावर जमा व्हायचा. बाबासाहेबांच्या जयघोषानं सारं वातावरण दणाणून जायचं. 

समाज मंदिरापासून मिरवणुकीला सुरवात व्हायची, मोठ्या सडकेनं ती थाटात भीम नगर मधून गावाच्या दिशेने निघायची. समद्यात पुढं वाजंत्री लेझीम संघ, नाचणारी अन् जल्लोषात घोषणा देणारी तरुण पोरं त्यांच्या मागं सजवलेली बैलगाडी आजूबाजूला सगळी मोठी मंडळी अन् त्यामागं ओव्या, गाणे यातून बाबासाहेब सांगणाऱ्या महिला अन् या सर्वांच्या आधी मधी घोळणारी लेकरं अशा थाटात आणि जल्लोषात मिरवणूक मार्गस्थ व्हायची. आनंद, उत्साह अन् निळ्या रंगात समदेच रंगून जायाचे, सकाळची संध्याकाळ झाली तरी कुणाला येळेचं भान रहायचं नाही.  सांच्याला पिवळ्या लायटीच्या प्रकाशात सारी मिरवणूक उजळून निघायची. गावातल्या ठरलेल्या ठिकाणाहून मिरवणूक परत फिरायची. मिरवणुकीत कसला बी गोंधळ अन् गडबड होऊ नये म्हणून मोठी माणसं बारीक लक्ष ठिवून रहायची. आठ नऊच्या दरम्यान मिरवणूक समाजमंदिराकडे परतायची. हा दिस संपायलाच नाय पाहिजे असंच समद्यास्नी वाटायचं.



Thursday, April 6, 2023

आरक्षण - सामाजिक न्यायाची प्रक्रिया.

पात्रांची ओळख :

ओम - उच्च वर्गातील व्यक्तीमत्व, शिक्षणास पोषक कौटुंबिक वातावरण, आर्थिक बाबतीत सधन, शिक्षणात हुशार, रुढी परंपरा धर्म यांचा अभिमान असणारा.


महेंद्र - अस्पृश्य वर्गातील कुटुंब, मध्यमवर्गीय, शिक्षणाचं महत्व महापुरुषांची शिकवण याची जाण असणारा, पुरोगामी पार्श्वभूमी, शिक्षणाची आवड,


तानाजी - गावाकडचं व्यक्तिमत्त्व, तरूण व्यक्तीमत्व, शेती करणारं कुटुंब. घरच्यांना शेतीत मदत करणारा, एकदम सधन नाही पण शेतीतून सर्व गरजा भागवणारं कुटुंब, 


विजय सर - शिक्षणाचं महत्व ज्ञात असलेले, सर्वसमावेशक भूमिका असणारे, सर्व विदयार्थ्यांना समान वागवणारे, आदर्श शिक्षक.


पहिल्या भागाचे संवाद : 

Scene 1

(परीक्षेच्या आधीचा कॉलेजचा शेवटचा दिवस, दुपारी कॉलेज संपल्यानंतर तिघे मित्र गप्पा मारत कॉलेजच्या पार्कींग जवळ थांबतात, अभ्यासाची चौकशी, नोट्स देवाण घेवाण करून आपापल्या घरी जातात)

-तिघे बोलत वर्गातून बाहेर पडतात, पार्कींग जवळ येऊन थांबतात.

ओम - परीक्षेचं वेळापत्रक आलं आहे खूपच कमी वेळ मिळणार आपल्याला अभ्यासाला.( बाकी दोघांकडे बघत बोलतो)

तानाजी - मग नाही तर काय? खूप मेहनत करावी लागल गड्या 

महेंद्र - ते सगळं ठीक हाय पण सर्व विषयाच्या नोट्स आधी रेडी कराव्या लागतील, दोन विषयांच्या नोट्स पूर्ण कुठं दिलेत सरांनी.

तानाजी - या ओमकडं  हायती की त्याच्या ट्युशनच्या त्याच आपण झेरॉक्स मारून घिऊ.

महेंद्र - हा हे ठीक होईल ( ओम ही होकारार्थी मान हलवतो)

ओम - मी देतो तुम्हाला पण मला झेरॉक्स करून लगेच होत्या तशा परत कराव्या लागतील.

तानाजी आणि महेंद्र - करणार की भावा ( हसत हसत)

ओम - चला मी निगतो, 5 ला शाखेत जायचं आहे.

तानाजी - मी बी निघतो नंतर एसटी न्हाय परत संध्याकाळ पातूर.

महेंद्र - ठीक आहे तुम्ही निघा मी लाब्ररी तुन पुस्तके घेतो आणि मग जातो.

(तिघे एककमेकांना चला परत भेटू बाय म्हणून निघतात)

Scene 2

(तानाजी शेतातून संध्याकाळच्या वेळी महेंद्र ला फोन लावतो अभ्यासाची चौकशी करतो)

तानाजी - हॅलो, मह्या कसा हायस लेका. अभ्यासामधी एवढा गुतला की दोस्तला बी इसरालास. 

महेंद्र - तसं काय नाही ताना, मी करणार होतोच मोबाईल रिचार्ज केला की, (तानाजी बर बर म्हणतो ) कसं चालुय तुझा अभ्यास 

तानाजी - सुरू हाय आपलं, रानात बी लक्ष द्यावं लागतंय त्यामुळं जरा लंय पळापळी होत्याय. तरी समद्या नोट्स असल्या मुळं काय टेन्शन न्हाय. परीक्षेच्या आधीची नाईट मधी व्हतंय कव्हर (हसत हसत)

महेंद्र - ओमचा काय पत्ता, 

तानाजी - त्याचं काय गड्या त्यो हुशारच हाय, त्याच्या घरी फोन केला की बा कडं फोन आस्तुया, लंय प्रश्न ईचारतुय त्याचा बा, त्यामुळं त्याचा फोन आल्यावरच बोलतुया म्या.

महेंद्र - खरंय, पेपरला भेटू तवा निवांत बोलू.

तानाजी - बरं चालतंय की, भेटू मग कर अभ्यास.

Scene 3

(पहिला पेपर होतो झाल्यावर तिघांची भेट होते, तिघे खुश असतात)

ओम - तुम्हाला बघून तर वाटत आहे पेपर सोपा गेलाय तुम्हाला.

तानाजी आणि महेंद्र - आनंदाने होकारार्थी मान हलवतात.

महेंद्र - आम्हाला चांगला गेला पण तू तर पुरवण्या वर पुरवण्या घेत होता एवढ काय लिहतो रे तू.

तानाजी -  व्हय की, माझी हाय ती उत्तरपत्रिकाच भरत न्हाय लवकर. (तिघे हसतात)

महेंद्र - सुरवात तर चांगली झाली पण पुढचे पेपर चांगले जाण्यासाठी ते राहिलेले नोट्स गरजेचे आहेत, ओम ते कधी देतो?

ओम - एक काम करा पुढच्या पेपरला तीन दिवस सुट्टी आहे. आताच माझ्या सोबत चला झेरॉक्स मारून लगे परत करा नोट्स.

(महेंद्र आणि तानाजी एकमेकांकडे बघत इशाऱ्याने विचारतात आणि जाण्यासाठी तयार होतात)

(ओमचं घर कॉलेजपासून जवळच शहराच्या मध्यवर्ती भागात असतं, बसने दहा मिनिटात ते पोहचतात,ते दोघे बाहेरच थांबतात,  संध्याकाळची वेळ असते घरातून संस्कृत मंत्रोच्चाराचा आवाज येत असतो, ओम जाऊन नोट्स आणून देतो आणि लवकर झेरॉक्स घेऊन यायला सांगतो)

ओम आणि तानाजी धावत जाऊन झेरॉक्स घेऊन येतात, ओमला आवाज देतात ओम बाहेर येतो. नोट्स परत देतात धावत गेल्याने दोघांना तहान लागलेली असते तानाजी ओमला पाणी मागतो.

ओम पाणी घेऊन येत असतो तेवढ्यात घरातून वडिलांचा आवाज येतो कुणाला रे पाणी? बाबा कॉलेजचे मित्र आहेत माझे? 

कोणते मित्र? तानाजी आणि महेंद्र आहेत.(बाबा तिरकसपणे  बरं बरं म्हणत तो तांब्या आणि पेला विसळून घे असे सांगून त्यांच्या कामात मग्न होतात)

तानाजी आणि महेंद्र पटकन पाणी पितात आणि परत कॉलेजात भेटूया म्हणून निघतात. बोलत बोलत बसस्टॉपच्या दिशेने चालू लागतात.

तानाजी - आयला ओमचा बा लंय कडक वाटतुया गड्या.

महेंद्र - मोठ्या ऑफिसात कामाला हायेत ते, त्यांच्या भागात त्यांना लय मानतेत, त्यांच्या समाजातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत ते.

तानाजी - मग बरोबर हाय, ओमच्या अभ्यासाकडे बी लंय लक्ष असतंय त्यांचं, कॉलेजच्या शिक्षकाला बी भेटत असतेती न्हाय तर माझा बा दहावी नंतर अडमिशनला बी आला नव्हता सोबत. रास चालू व्हती ना तवा शेतात.

बस स्टॉप वरून महेंद्र आपल्या घरी आणि तानाजी कॉलेजच्या होस्टल ला जातो. (परीक्षेपुरतं तो आपल्या गाववाल्या मित्राच्या रूमवर राहत असतो)

Scene 4

(सर्व पेपर संपतात, तिघांनाही पेपर चांगले जातात, शेवटच्या पेपरला तिघे भेटतात. पेपर संपल्यामुळे तिघेही आनंदात असतात)

तानाजी - गडयांनो, संपले एकदाचे पेपर. अभ्यास करून करून जीव दमला व्हता. आता फुल राडा फुल मजा. माझं तर समदं ठरलंय. रोज सकाळी क्रिकेट, दुपारचं दमोस्तर  हिरीत पवायचं अन् रोज रातीला एक शिनमा बघायचा.

महेंद्र - एकच नंबर नियोजन हाय की दोस्ता तुझं, मी पण गावाकडं जाणार मामा आणि आजीकडे, लंय मजा येती मला तिकडं. भीमजयंती तर जोरदार असते, संपूर्ण गाव गायन पार्टीसोबत रात्रभर जागा राहतो. नुसता विचार करूनच भारी वाटायलंय मला.

ओम - अरे थांबा जरा तुम्ही, अजून सीईटीचे पेपर बाकी आहेत आपले

तानाजी - व्हय की गड्या, ती इसरोलच आम्ही या नादात.

महेंद्र - अरे जसं आपण पेपर च्यावेळी अभ्यास केला तसाच सीईटीचा पण करू. अजून महिना आहे आपल्याकडे  (तिघेही हसत एकमेकांकडे बघत मान हलवतात).

महेंद्र आणि तानाजी - ओम तुजा काय प्लान आहे सुट्ट्याचा

ओम -  अजून काय नक्की नाही बाबा शाखेच्या उन्हाळी शिबिरात पाठवायचं बोलत होते. किंवा आम्ही सगळे उत्तर भारतात फिरायला जाणार.

महेंद्र आणि तानाजी - चांगलय की. चला आता मस्तपैकी थंडगार मस्तानी पिऊ.

तिघेही चला (एकदम खुश होत)

(तिघे चालत चालत कॉलेज जवळच्या मस्तानीच्या गाड्याकडे जातात)

दरम्यानच्या काळात सीईटीचे पेपर होतात, तिघांना पेपर ठीक जातात सुट्ट्यांमध्ये ते फोनवर संपर्कात असतात) 


दुसरा भाग : 

Scene 5

(निकालाच्या दिवशी तिघेही सकाळी कॉलेजमध्ये येतात, त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे कॉलेज पार्कींग जवळच्या कट्टयावर त्यांची भेट होते)P

ओम आणि महेंद्र - (तानाजीची वाट बघत थांबलेले असतात, तेवढ्यात तानाजी येतो) किती वेळ ताना, कधीपासून वाट बघतोय आम्ही.

तानाजी - आरं आज बाजाराचा दिस लंय गर्दी त्यामुळं गाडीत चढता आलं नाही दोन तीन गाड्या गेल्यावर कुठं गाडीत घुसता आलं.

महेंद्र - (तानाजी ला थांबवत) ते राहू दे चला 12 वाजत आले कॉम्पुटर लॅब मध्ये सर निकाल बगून सांगायला सुरू करतील

(तिघेही तिकडे जातात)

(तिघे एकदम आनंदात उत्साहाने तिकडून परत कट्ट्यावर येतात, तिघेही पास होतात अपेक्षेप्रमाणे मार्क मिळतात, एकमेकांची गळा भेट घेत अभिनंदन करतात )

ओम -चला ही आनंदाची बातमी आधी घरी सांगूयात.

तानाजी आणि महेंद्र - हो चला.

(तिघेही आनंदाने एकमेकांना भेटून घरी निघतात)

ओम - ८६℅  महेंद्र - ८१%  तानाजी - ७४%

Scene 6

(ऍडमिशनची लगबग सुरू होते, तिघेही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार असतात)

येवढ्या दिवस फक्त अभ्यास करणे आणि चांगले मार्क मिळवणे या पुढचा प्रवास सुरू होतो. शिक्षक, नातेवाईक, मित्र, इतर मंडळींकडून ऍडमिशन प्रोसेस, ऑप्शन फॉर्म, विविध डिपार्टमेंट, त्या कॉलेजातील एकूण जागा,आरक्षित जागा याबाबत माहिती त्यांना मिळत जाते. 

इंजिनिअरिंग फर्स्ट राऊंड साठी फॉर्म सुरू होतात, ऑनलाइन प्रोसेस असल्यामुळे तानाजी आणि महेंद्र कॉलेजमधील विजय सरांची मदत घेऊन फॉर्म भरतात. त्यांच्या घरातुन  इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेणारे ते पहिलेच त्यामुळे  त्यांना याबाबत जास्त काही माहिती नसते. ओमचा चुलत भाऊ मंदार गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला असल्यामुळे ओमच्या ऍडमिशनचं सगळं तो बघतो. तिघे मिळून कॉलेजमधून फॉर्म भरणार असतात पण ओमचे वडील त्याला मंदारसोबत फॉर्म भरायला लावतात.

फॉर्म भरल्यानंतर तिघांची कॉलेजमध्ये भेट होते. 

(ओम आणि तानाजी एकमेकांसोबत बोलत उभे असतात)

तानाजी - आरं ती फॉर्म भरायचं लंयच अवघड काम होतं लगा, ही कागद ती दाखला. मला आणि महेंद्रला काय कळणा झालतं, विजय सरांमुळ आमचा निभाव लागला न्हाय तर काय खरं नव्हतं. सुरवातच अशी व्हायलीय त्यामुळं पुढं कसं व्हणार याचं भ्या वाटतंया.

ओम - कुठं जास्त डॉक्युमेंट लागतात मार्कशीट, एल सी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट इतकंच तर लागतं. आणि काही नाही होत, होतंय सगळं व्यवस्थित.

तानाजी - आरं नाही जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर असं काय काय व्हतं की.

ओम - तुम्हाला असणार ते मला काही नाही लागलं. महेंद्र कुठे राहिलाय आला नाही अजून

तानाजी - त्यांच्या इकडे बुद्धविहारात कोणा तरी मोठ्या प्राध्यापकाचं व्याख्यान हाय ते झालं की येतो म्हंटलाय त्यो.

ओम - बर बर. मागच्या वर्षीची कट ऑफ लिस्ट बघितली तर मार्क थोडे कमीच मिळाले असे बाबा म्हणत होते. पाहिजे त्या कॉलेजला ऍडमिशन मिळते की नाही काय माहिती?

तानाजी - तुझे टक्के तर एकच नंबर हायेत की मर्दा, तू असं म्हंटलं तर मग आमचं कसं व्हणार.

ओम - तुमचं रिझर्व्हेशन मधून होऊन जाईल ऍडमिशन असं मंदार दादा सांगत होता. त्यांच्यात आणि आपल्यात फरक असतो असं तो म्हणत होता.

तानाजी - फरक? कसला फरक लगा (चेहऱ्याचे भाव प्रश्नार्थक बनवत)

ओम - मी ही विचारलं पण तो म्हणाला कळेल तुला पुढे, (इतक्यात महेंद्र तिथे येतो)

महेंद्र - सॉरी दोस्तांनो मला जरा उशीर झाला. व्याख्यान लांबलं जरा

ओम - कसलं व्याख्यान होत?

महेंद्र - आमचे पप्पा ज्या सामाजिक संस्थेचे मेम्बर आहेत त्या संस्थेनं 'बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास' या विषयावर आ. ह. साळुंखे यांचे व्याख्यान ठेवले होते. सोबतच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ८० ℅ पेक्षा जास्त असल्याने माझा पण सत्कार केला त्यामुळं वेळ झाला.

तानाजी - तुझा बी सत्कार झाला. भारीच की लेका.

ओम - हा ना छानच की. बाबांनी तर माझं अभिनंदन ही केलं नाही. जाऊदेत, चला पहिली लिस्ट लागली का बघुयात (तिघे कॉम्प्युटर लॅब कडे जातात)

तांत्रिक अडचणीमुळे लिस्ट उद्या लागणार आहे असं नोटिफिकेशन त्यांना समजतं. तिघेही उद्या भेटुयात म्हणून कॉलेजमधून निघतात.


भाग तिसरा : 

आरक्षण आणि मतभेद

Scene7

तिघेही ११.०० ला कॉलेजमध्ये येतात. तिघांची भेट होते. 

ओम - (तानाजी आणि महेंद्र कडे बघत) आज पण लिस्ट लागणार का अजून काही प्रॉब्लेम येणार काय माहिती?

महेंद्र - हा ना एडमिशन कुठं मिळणार, कुठं जावं लागणार काय समजीना झालंय.

तानाजी - आपल्या तिघाचा नंबर एकाच कॉलेजात लागला तर एकदम झाक काम होईल.

ओम - अवघड आहे बाबा, खूप कंपिटीशन आहे. पाहिजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणे म्हणजे एक दिव्यच आहे.

महेंद्र - होईल हीच आशा करूयात आपण (चेहऱ्यावर काळजीचे भाव आणत)

ओम - चला टाइम झाला आहे लिस्ट लागण्याचा कॉम्पुटर लॅब कडे जाऊयात. (तिघे लॅब कडे जातात)

Scene 8

गव्हर्नमेंट कॉलेजला महेंद्रचा नंबर लागतो, पण ओम आणि तानाजी चा नंबर लागत नाही. तिघेही नाराजीने कट्ट्याकडे येतात.

महेंद्र - भावांनो टेन्शन घेऊ नका, दुसऱ्या राउंडला होईल तुमचं ऍडमिशन. कट ऑफ च्या जवळच आहात तुमि दोघे पण.

ओम - (महेंद्र ला थांबवत) तुला काय जातं आता बोलायला तुला तर मिळालं ना ऍडमिशन. 

महेंद्र - असं का बोलतोय, माझ्या कॅटेगरीचा कट ऑफ थोडा कमी होता म्हणून मला मिळालं नाही तर झालं नसतं पहिल्या राउंडला माझं पण

ओम - कमी मार्क असून तुझं होतं आणि जास्त मार्क असून पण माझं होत नाही काय समजेना मला.

तानाजी - अरं लगा एस्सी कॅटेगरी मधून झालंय त्याचं. आपलं बी होईल दुसऱ्या राउंडला.

ओम - ताना असं होऊन पण तू त्याच्या बाजूनं कसं बोलू शकतो. या आरक्षणामुळे आपण मागे पडत आहोत दिसत नाही का तुला.

तानाजी - तसं नाही ओम (तानाजी ला थांबवत महेंद्र बोलतो)

महेंद्र - ओम यात माझी काय चुकी, तुम्ही दोघे सोबत पाहिजे असंच मलाही वाटतंय.

ओम - (रागाने)मंदार दादा बरोबर सांगत होता आरक्षण म्हणजे आपल्यासाठी अडथळा आहे. तुमच्या सारख्या लोकांमुळे आम्हाला अडचणी येतात.

तानाजी - ओम काय बोलायलास दोस्त हाय तो आपला

ओम - तू ही त्याचीच बाजू घेणार तू पण त्यातलाच आहे ओबीसी कॅटेगरी मधून तुझं पण होणार ऍडमिशन हे माहिती आहे तुला. हे आरक्षण नसायलाच पाहिजे.

महेंद्र - ओम आमच्या सारखे अनेक आरक्षणामुळेच शिक्षण घेत आहेत, नाहीतर इंजिनिअरिंगचा खर्च झेपला असता का आम्हाला, त्यामुळे काय बोलतोय ते विचार करून बोल. आमच्या सारख्यानी शिकू नये असं म्हणायचंय का तुला.

ओम - शिकावं पण आपल्या हिमतीवर मेहनतीने, मेरिटने (योग्यतेने) असं आरक्षणाच्या कुबड्या घेऊन नव्हे.

महेंद्र - म्हणजे आम्ही मेहनत केली नव्हती असं म्हणाचाय का तुला का आमच्यात योग्यता नसते असं म्हणायचाय तुला. सगळं माहीत असून पण असं कसं बोलू शकतो तू?

(इतक्यात विजय सर तिथून जात असताना यांचं बोलणं ऐकून थांबतात पण यांचं लक्ष नसतं)

ओम - ते तुम्ही तुम्ही बघा, तुमच्या सारखे मित्र मी का केला असं मला वाटतंय.

महेंद्र - ओम तू रागात काहीही बोलतोय तोंड सांभाळून बोल (त्यांच्यात भांडण सुरू होणार इतक्यात विजय सर मध्ये येतात)

Scene 9 

विजय सर - ओम, महेंद्र आणि तानाजी चला माझ्या केबिनला थोडं बोलायचं आहे ( सर अचानक आल्याने तिघेही चपापतात आणि आणि स्वतःला सावरत केबिनकडे निघतात)

विजय सर - या बसा (तिघेही बसतात) तुमचं बोलणं मी ऐकलं आहे. त्यामुळे इकडे बोलावलं. आपण इथे त्या विषयावर बोलूयात. पण संयमाने आणि शांतपणे. 

अजून एक महत्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या समाजाचे आहात, तुमच्या घरच्यांचे किंवा इतर व्यक्तींचे याबाबत काय विचार आहेत ते सर्व विसरून तटस्थपणे या विषयावर आपण बोलूयात ठीक आहे

(तिघेही सरांचा खूप आदर करत असतात त्यामुळे होकारार्थी मान हलवतात)

विजय सर - बोल ओम काय म्हणणं आहे तुझं आरक्षणाबाबत.

ओम - सर आरक्षणाच्या माध्यमातून जनरल, एस्सी, एसटी ओबीसी यासारख्या कॅटेगरी मध्ये विभागणी करणे अन्यायकारक आहे? काय गरज आहे असं करण्याची?

विजय सर - ही विभागणी जी आहे ती जातिव्यवस्थेमुळे आहे. भारतीय समाजाचे विभाजन जातींमुळे सर्वात जास्त प्रमाणात झाले आहे. आजही देशात ४६३५ मुख्य जाती आहेत. पोटजाती आणि त्या पुढचे विभाजन गृहीत धरल्यास हा आकडा अनेक पटीने वाढतो.

जातीच्या आधारे हजारो वर्षांपासून समाजातील एका वर्गाकडून विशिष्ट वर्गासोबत भेदभाव केला जात होता. शिक्षण, संपत्ती, धार्मिक कार्य याबरोबरच मूलभूत मानवी  अधिकारापासून ही त्यांना वंचित ठेवण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास, पाणी पिण्यास ही त्यांना मनाई होती. त्यामुळे तो वर्ग मुख्य प्रवाहापासून तुटला आणि मागे पडला. 

संविधान लागू होइपर्यंत त्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल घडला नव्हता. जातीय भेदभाव नष्ट करून संविधानाने त्यांची या शोषणातून मुक्तता केली. सर्वांसोबत समान अधिकार दिले सोबतच आरक्षणाच्या माध्यमातून काही विशेष अधिकार ही दिले जेणेकरून हा मागे राहिलेला वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडला जावा. 

म्हणून हे आरक्षण आहे आणि कॅटेगरी आहेत.

ओम - पण सर आता कुठे जातीच्या आधारे भेदभाव केला जातो? त्यामुळे आजही आरक्षण का दिले जाते?

विजय सर बोलण्या आधी महेंद्र सर मी बोलू का असे विचारतो? विजय सर बोलण्याची परवानगी देतात.

महेंद्र - सर मी मागच्या वर्षी मामाच्या गावाला गेलो होतो, तेव्हा एक अशीच घटना घडली होती. आमच्या एका नातेवाईकाने मुलाच्या लग्नाची घोड्यावरून वरात काढली होती त्यामुळे गावातील वरच्या जातीतील लोकांनी वरातीवर दगडफेक केली आणि त्या कुटुंबाला वाळीत टाकलं.

विजय सर - होय फक्त आपल्या इथेच नाही तर सम्पूर्ण भारतात अशा अनेक घटना घडत असल्याचे आपल्याला न्यूज पेपर आणि चॅनेलच्या माध्यमातून दिसते. खैरलांजी सारख्या काहीच घटना आपल्या पर्यंत पोहचतात पण मागासवर्गीयांवरील अत्याचाराच्या अशा कितीतरी घटना घडत असतात ज्या सर्वांपर्यंत पोहचत ही नाहीत. कायद्याने जरी हा भेदभाव संपवला असला तरी उच्च वर्णीयांची मानसिकता पूर्णपणे बदलेली नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे कोल्हापूर गादीचे वंशज संभाजी महाराज यांच्या पत्नी संयोगीताराजे प्रकरण. जातीच्या आधारे छत्रपतींच्या वंशजांसोबत भेदभाव होत असेल तर सामान्यांची काय स्थिती असेल हे यावरून लक्षात येते.

आणि आजही आरक्षण दिले जाते कारण, जातीयता अजूनही संपलेली नाही. मी आधी म्हंटल्या प्रमाणे समाजातील मुख्य प्रवाहाच्या बरोबरीने या वंचित वर्गाची प्रगती अजूनही झालेली नाही त्यामुळे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आरक्षण गरजेचे ठरते.

ओम - पण सर जेव्हा एका वर्गाला विशेष अधिकार दिले जातात तेव्हा संविधानात जी समानता सांगितली जाते, हे तर त्याच्या विरोधातच झालं ना?

विजय सर - तसं नाही आहे मी तुला उदाहरण देऊन समजावतो, गर्दी असलेल्या बसमध्ये जेव्हा आपल्या कुटुंबातील स्त्री किंवा वयाने जेष्ठ व्यक्ती जर प्रवास करत असेल तर आपल्या मनात काय विचार येतो?

ओम - त्यांना बसायला जागा मिळावी आणि ते सुरक्षितरित्या इच्छित स्थळी पोहचावे.

विजय सर - अगदी बरोबर, असे वाटणे स्वाभाविक आहे मग ती स्त्री किंवा ज्येष्ठ व्यक्ती कोणत्याही वर्गाची असो. लेडीज सीट्स आणि सिनिअर सिटीझन सीट्स या माध्यमातून त्यांना त्या बसमध्ये जागा दिली गेली तर ते योग्य आहे का अयोग्य?

ओम  - योग्यच आहे सर (महेंद्र आणि तानाजी ही होकारार्थी मान हलवतात)

विजय सर - स्त्रियांना किंवा सिनिअर सिटीझन किंवा विकलांग व्यक्ती यांना ही जी विशेष सुविधा दिली जाते त्याला म्हणतात "प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमीनेशम म्हणजेच संरक्षणात्मक भेदभाव" 

या विशेष अधिकारामुळे बाकीच्यांचे शोषण करण्याचा अधिकार त्यांना मिळतो किंवा तसे ते करू शकतात का?

ओम - नाही. पण...

विजय सर - (ओमला थांबवत) मला पूर्ण करू दे. जातीच्या आधारे जे विशेष अधिकार दिले जातात ते ही प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमीनेशनच आहे. जेव्हा संविधानाने विषमता नष्ट करून समान दर्जा लागू केली तेव्हा प्राथमिक स्तरातील समानता साध्य झाली. पण त्यामुळे ज्यांनी शोषण केले आहे आणि ज्यांचं शोषण झालं आहे त्यांच्यातले अंतर कमी झाले का? ते समान पातळीवर आले का? तर त्याचं उत्तर नकारार्थीच आहे.

त्यांच्यावर जो सामाजिक अन्याय झाला तो दूर करून सामाजिक न्याय करण्यासाठी त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून विशेष अधिकार देण्यात आले. 

पण हे अधिकार जो वर्ग पुढे आहे त्याला थांबविण्यासाठी किंवा त्यांचे काढून घेऊन दुसऱ्यांना दिलेत असं नाही तर जो वर्ग मागे राहिला आहे त्याला बरोबरीने आणण्यासाठी दिले आहे. 

संरक्षणात्मक भेदभाव हा समानतेच्या उद्देशाने केला जातो, त्यामुळे आरक्षण समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे असे म्हणणे साफ चुकीचे ठरते.

Scene 10

सर थांबल्यानंतर ओम अजून काही तरी विचारणार इतक्यात तानाजी एक प्रश्न विचारण्याची परवानगी मागतो. सर परवानगी देतात.

तानाजी - सर चार दिसा आधी शाळेत दाखला घ्यायला गेलतो तवा आमच्या शाळेचं गुरजी आणि क्लार्क बोलताना मी ऐकलं ते म्हणत होते बाबासाहेबांनी आरक्षण फक्त दहा वर्षासाठी दिलं व्हतं? तर ते खरं आहे का?

विजय सर - संविधानानुसार आरक्षण तीन प्रकारचे आहे. शैक्षणिक आरक्षण, सरकारी नौकरीतले आरक्षण आणि राजकीय आरक्षण. संविधानाच्या कलम ३३४ नुसार यातील राजकीय आरक्षणाला फक्त दहा वर्षाची मुदत घातलेली आहे. परंतु शिक्षण आणि नौकरीतल्या  आरक्षणाला कोणतीही मर्यादा ठरवून दिलेली नाही. 

असे असले तरी आरक्षण कायमस्वरूपी असावे अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते. कारण आरक्षण हे विशिष्ट हेतूने दिले गेले आहे आणि तो हेतू म्हणजे समाजातील सर्व वर्ग एका समान पातळीवर यावेत. हा हेतू ज्या दिवशी साध्य होईल त्यादिवशी आरक्षण बंद झालं पाहिजे.

महेंद्र - सर आरक्षणामुळे मिळणाऱ्या संधीमुळे मागे राहिलेल्या वर्गाने कितपत बरोबरी साधली आहे?

विजय सर - हे नक्की सांगता येणं अवघड आहे. पण या वर्गाची जी स्थिती आरक्षणाआधी होती त्यात आमूलाग्र बदल झाला आहे हे नक्की. शिक्षण व सरकारी नौकरीत संधी मिळाल्याने त्यांच्या सामाजिक व आर्थिक जीवनाचा स्तर उंचावला आहे. या वर्गाच्या प्रगतीसोबतच त्यांचे देशाच्या प्रगतीतही योगदान वाढत आहे जे संविधान लागू होण्याआधी नगण्य असे होते. 

अशा स्वरूपाची सर्व माहिती सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार आणि विविध केंद्रीय व राज्य आयोग यांच्याकडे मिळू शकते.

असे असले तरी त्यांचे उच्च श्रेणीतील नौकऱ्यांमधले प्रमाण अजूनही नगण्यच आहे. धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या संस्थांच्या सर्वोच्च पदी अजूनही उच्च वर्णीयांचीच मक्तेतदारी पाहायला मिळते. 

जसे सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, प्राइम मिनिस्टर ऑफिस, चीफ मिनिस्टर ऑफिस, परराष्ट्र मंत्रालय, रिझर्व्ह बँक इत्यादी.


ओम - सर जास्त मार्क असूनही कमी मार्क असलेल्यांना संधी मिळत राहिली तर मेरिटला काही किंमत नाही का?

विजय सर - मेरिट तर गरजेचे आहेच पण त्याआधी त्याबाबतच्या काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

मेरिट म्हणजे काय?

ओम - योग्यता, पात्रता.

विजय सर - तुज्याकडे योग्यता कुठून आली?

ओम - आमच्या रक्तातच आहे सर आमच्या आधीच्या पिढ्याही ज्ञानी आणि कर्तबगार होत्या त्यामुळे माझ्यात ही ते सर्व गुण आहेत.

विजय सर - ठीक आहे. पुन्हा एकदा उदाहरण घेऊन समजावतो. त्याआधी महेंद्र आणि तानाजी मला सांगा तुमच्या आधीच्या पिढ्या काय करायच्या याबाबत तुम्हाला काय माहिती आहे का?

महेंद्र - सर जास्त काही माहीत नाही पण वडीलांना चौथी पर्यंत शिकता आलं त्यांना अजून शिकायचं होतं पण घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे सगळ्यांना कामाला जावं लागायचं असं माझी आजी सांगत असते. पुर्वजांबद्दल विचारल्यावर माझा आजा सांगतो त्यांच्या आधीचे लोक लंय शूरवीर होते शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या सैन्यात आपली माणसं व्हती.

 (सर तानाजी कडे पाहत बोलायला सांगतात)

तानाजी - सर आमची समदी लोकं आधीपासून शेती आणि शेती संबंधित छोटी मोठी कामं करायची एवढंच माहिती हाय. कधी असलं ईचारलं न्हाय घरी.

विजय सर - ओम तुज्या घराजवळ शहरातलं जे सुप्रसिद्ध मंदिर आहे तिथे पूजा कोण करतात ?

ओम - पुजारी काका करतात जे आमचेच नातेवाईक आहेत. त्याआधी कोण पूजा करत होते ?

ओम - आजोबा, सर पिढ्यानपिढ्या पासून त्या मंदिराच्या पूजेची जबाबदारी आमच्याच कुटुंबाकडे आहे. 

विजय सर - कशाच्या आधारावर ही जबाबदारी तुम्हाला दिली आहे, तुमची योग्यता तपासून पाहिली आहे का? किंवा तशी तपासण्याची काही पद्धत आहे का?

ओम - योग्यता तपासण्याची गरज काय? ब्राम्हण हे सर्वश्रेष्ठ आहेत त्यामुळे तो अधिकार जन्मानेच मिळतो.

विजय सर - असे कुणी सांगितले

ओम - सर या गोष्टी तर सर्वांनाच माहिती आहेत तरी असे का विचारताय? धर्मग्रंथात तसे लिहले आहे.

विजय सर - जन्माने किंवा धर्मग्रंथ सांगतात म्हणून कोणी योग्य अयोग्य ठरत नाही. उच्च जातीतील व्यक्तींना सुरवातीपासूनच शिक्षणाचा अधिकार मिळाला असल्यामुळे त्यांच्यात योग्यतेचं प्रमाण अधिक आहे.

असा विचार कर, एक श्रीमंत व्यक्ती आहे, त्याचे पूर्वज ही ज्ञानी, श्रीमंत आणि उच्चवर्णीय होते. त्याला एक मुलगा होतो, त्याला शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळते, उत्तम ज्ञान देणारे शिक्षक मिळतात, उत्तमप्रतिचं शैक्षणिक साहित्य आणि संस्था मिळते. चांगले शिक्षण घेऊन तो सक्षम बनतो. उत्तम नौकरी किंवा व्यवसाय करतो आणखीन श्रीमंत होतो.

दुसऱ्या बाजूला एक गरीब व्यक्ती आहे, त्याचे पूर्वजही गरीब, अज्ञानी आणि मागासलेले होते, त्याला एक मुलगा होतो, योग्य शिक्षण मिळत नाही त्यामुळे त्यांची अंगी विविध गुण तयार होत नाही, त्यामुळे मोलमजुरी करतो, अजून गरीब होतो. 

या दोन्ही केसमध्ये बारकाईने पाहिले तर लक्षात येते की योग्यता ही त्या व्यक्तीच्या सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असते. गरीब व्यक्तीलाही योग्य सुविधा आणि संधी मिळाली तर त्याच्यामध्ये ही योग्यता निर्माण होऊ शकते. जीन्स मधून जी योग्यता मिळते ती आपल्याला बाय चान्स मिळते पण योग्यतेचं बहुतांश प्रमाण हे व्यक्तीच्या सभोवतालच्या वातावरणावर आणि परिस्थितीवर अवलंबून असते.

हा वर्ग मागासलेला का राहिला तर योग्यता नसल्यामुळे नव्हे तर संधी न मिळाल्यामुळे. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांची जगात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक अशी ओळख आहे.

ओम - सर मेरिटसाठी (योग्यतेसाठी) गरिबी ही महत्त्वाची अडचण असेल तर मग आर्थिक निकषावर आरक्षण का दिले जात नाही?

विजय सर - ओम तुझी अजूनही गल्लत होती आहे. मेरिटसाठी फक्त गरिबी ही एकच अडचण नाही तर त्या व्यक्तीची सामाजिक परिस्थिती, त्याच्या आजूबाजूचे वातावरण मुख्यतः जबाबदार असते. 

जात आणि गरिबीचा काही संबंध नाही. प्रत्यके जातीमध्ये गरीब ही आहेत आणि श्रीमंतही. पुन्हा एकदा एक उदाहरण घेऊन समजविण्याचा प्रयत्न करतो बघ लक्षात येत का?

समज एक ब्राम्हण जातीतला गरीब व्यक्ती आहे, तो गरीब आहे म्हणून त्याला मंदिरात प्रवेश नाकारला जाईल का? शिक्षणाचा अधिकार नाकारला जाईल का? किंवा सार्वजनिक ठिकाणी त्या व्यक्तीसोबत सामाजिक भेदभाव केला जाईल का?  

ओम - नाही. तसे काही होणार नाही.

विजय सर - म्हणजेच त्या व्यक्तीचे गरिबीच्या आधारे सामाजिक शोषण होणार नाही आणि त्यामुळेच ती व्यक्ती अरक्षणास पात्र ठरत नाही.

मी आधी सांगितल्या प्रमाणे आरक्षण ही सामाजिक न्यायाची प्रक्रिया आहे, तो गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे आर्थिक निकषावरून व्यक्तीचे किंवा समूहाचे सामाजिक मागासलेपण ठरविता येत नाही आणि त्यामुळेच आर्थिक निकषावर आरक्षण दिले जात नाही?

असे असले तरी प्रत्येक गरीब व्यक्तीला शिक्षण मिळणे गरजेचे आहे. तशी तरतूद संविधानाने शिक्षणाच्या अधिकाराद्वारे केली आहे. प्रत्येक भारतीयाला मग तो कोणत्याही वर्गाचा असो त्याला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत घेण्याचा अधिकार आहे. यासोबतच गरीब विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षणामध्ये इबीसी ( इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास)  कॅटेगरीच्या माध्यमातून फी मध्ये सवलत दिली जाते. एस्सी, एसटी आणि ओबीसी या व्यतिरिक्त महाराष्ट्रात एसबीसी (स्पेशली बॅकवर्ड क्लास) कॅटेगरी मध्ये येणाऱ्या वर्गाला शिक्षणात २% सवलत दिली गेली आहे. 

ओम - सर आरक्षण फक्त भारतातच दिले जाते का?

विजय सर - नाही. जिथे जिथे कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवली जाते तिथे तिथे वंचित घटकाला विशेष सुविधा दिल्या जातात. जवळपास जगातील सर्वच लोकतांत्रिक देशामध्ये आरक्षण किंवा तशी व्यवस्था आहे. कॅनडा, अमेरिका, युके, स्वीडेन, फिनलँड, चीन, जपान, न्यूझीलंड, पाकिस्तान ही काही ठळक उदाहरणे आहेत.

कल्याणकारी राज्य राबविण्यासाठी आरक्षण ही आवश्यक आणि उपयुक्त अशी तरतूद ठरत असल्याचे सर्व जगाने मान्य केले आहे. असे असले तरी आरक्षणाची उपयुक्तता ही पूर्णपणे त्याच्या योग्य अंमलबजावणीवर आधारित आहे हे लक्षात घेणे महत्वाचे ठरते. ही विशेष सुविधा प्रत्येक गरजू वर्गापर्यंत पोचविण्यासाठी व त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी त्यामध्ये वेळोवळी आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. 

थोडावेळ सर्वजण शांत राहतात, त्या तिघांकडे नजर टाकत विजय सर विचारतात, अजून कुणाच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर विचारा. आणि महत्वाचं म्हणजे मी जे सांगतोय ते तुम्ही जसंच्या तसं आंधळेपणाने स्वीकारलं पाहिजे असे नाही. तुम्ही यावरती विचार करा, तपासून बघा आणि मग पटलं तर स्वीकारा.

महेंद्र  - नाही सर उलट अरक्षणा संबंधी अनेक गोष्टी आम्हाला समजल्या ज्या माहिती नव्हत्या, काय तानाजी?

तानाजी - व्हय व्हय, आता समदं टकुऱ्यात फिट बसलंय.

विजय सर ओमकडे बघतात, ओम तुझं अजून समाधान झालेलं दिसत नाही.

ओम - तसं नाही सर, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे हे पटतंय मला आता. खुली स्पर्धा तेव्हाच शक्य होईल जेव्हा सगळे समान पातळीवर येतील. पण माझे हे बदलेले विचार घरी आणि माझ्या आजूबाजूच्या  व्यक्तींना पटतील असे मला वाटत नाही.

विजय सर - जाती व्यवस्थेची पकड जेवढी मजबूत तेवढा परिवर्तनास विरोध जास्त. सर्व गोष्टी बदलणं आपल्या हातात नाही. मतपरिवर्तन होण्यास काहींना जास्त वेळ लागेल काहींना कमी पण ते स्वतः किती बदलास अनुकूल आहेत यावर ते आधारित आहे. त्यामुळे आपण आपल्याला जे शक्य होईल ते करत राहायचं.

आरक्षणाचे बाजूने असो वा विरोधात पण त्या आधारे एकमेकांचा द्वेष करणं हे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. जाती जेव्हा संपतील तेव्हा संपतील पण तोपर्यंत जातींमुळे आपल्यात होणारा वाद आपण बंद केला पाहिजे.

(घड्याळ बघत) चला खूप वेळ झाला तुम्हालाही घरी जायचे असेल, आशा आहे की आपल्या या चर्चेमुळे तुमच्यातले मतभेद काही प्रमाणात का होईना कमी झाले असतील. 

ओम, महेंद्र आणि तानाजी - हो सर नक्कीच (तिघे हसत हसत एकत्र केबिनच्या बाहेर पडतात)

समोर सर्व महापुरुषांचे फोटो आणि बॅक स्टेज मधून खालील ऑडिओ आणि शेवट.

(जागतिक पातळीवर गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर मेरिट आणि सामाजिक न्याय यांचा समन्वय जरुरी आहे. लोकशाही आदर्श रुपात राबविण्यासाठी ती सर्वसमावेशक असणं आवश्यक आहे. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक वर्गाला योग्य हिस्सेदारी देत भरतीयत्वाची भावना वाढवुन सर्वांना राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेणे अत्यावश्यक आहे.)


















 












Monday, March 20, 2023

चॅट जीपीटी म्हणजे काय?


चॅट जीपीटी (जेनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर) हे भाषा मॉडेल आहे. जे ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्सने विकसित केले आहे. गहन संवेदनशीलता आणि वाक्‍यांचा वापर करून टेक्स्टच्या रुपात मानवांच्या प्रतिसादांची उत्पादने निर्माण करते. या मॉडेलचा वापर विविध प्रयोजनांसाठी केला जातो, जसे की ग्राहक सेवा, चॅटबॉट, वार्तालापी एजेंट आणि भाषा अनुवाद.

सोप्या भाषेत सांगायचे तर, चॅटजीपीटी हा एक कॉम्पुटर प्रोग्राम आहे जो  मानवी भाषा समजून टेक्स्टच्या रुपात प्रतिसाद म्हणजेच प्रश्नांची उत्तरे देतो. याचा वापर टेक्नोलॉजी आणि ऑनलाइन संवादांमध्ये आपली मदत करण्यासाठी केला जातो. चॅटजीपीटी हा मशीन लर्निंग आणि एनॉटेशन वापरून तयार केलेला आहे. जो यंत्रातील फीड केलेला डेटा वापरून प्रत्येक प्रश्नाचे हव्या त्या स्वरूपात (फॉरमॅट मध्ये) सुसंगत आणि अचूक उत्तर देतो ते ही काही सेकंदात. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी जसे वेगळ्या भाषांची भाषांतर करण्यासाठी वापरले जाते.

चॅटजीपीटीचा वापर ऑनलाइन संवादांमध्ये माणसांची मदत करण्यासाठी केला जातो. जर तुम्हाला काही शंका असेल अथवा समस्या असेल तर तुम्ही इंटरनेटवर शोधत असताना, तुम्ही चॅटजीपीटीच्या मदतीने ते समस्या निवारू शकता. यामध्ये, चॅटजीपीटी भाषांतर करण्याच्या क्षमतेसह उत्तर देऊ शकते, पुनरावृत्तीकृत विचारांना समजवून देऊ शकते, इंटरनेटवर शोध करण्यात मदत करू शकते आणि अधिक माहिती देऊ शकते. चॅटजीपीटी वापरकर्त्यांना सहकार्य देण्यासाठी, कंपन्यां त्याचा वापर करून सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सॅम ऑल्टमन आणि एलन मस्क यांनी २०१५ मध्ये याची सुरुवात केली होती.

चॅट जीपीटी काम कसे करते?

चॅट जीपीटी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून वापरकर्त्याच्या प्रश्नाला मजकूर स्वरूपात उत्तर कसे देते हे खलील प्रक्रियेतून स्पष्ट होते.

१) इनपुट टेक्स्ट - वापरकर्त्याकडून चॅटबॉट किंवा वार्तालापी एजंटमध्ये टेक्स्ट संदेश किंवा क्वेरी इनपुट म्हणून दिली जाते.

२) भाषांतर प्रक्रिया - यामध्ये इनपुट टेक्स्टला नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग वापरून प्रोसेस केले जाते, ज्यामुळे इनपुट टेक्स्टचा अर्थ आणि संदेश निर्धारित होतो.

३) रिस्पॉन्स जनरेशन ( प्रतिसाद निर्मिती) - पूर्व प्रशिक्षित चॅट जीपीटी मॉडेल शिकलेल्या पॅटर्न आणि संदर्भाच्या आधारे इनपुट टेक्स्ट साठी रिस्पॉन्स जनरेट करते.

४) आउटपुट टेक्स्ट - वरील प्रक्रियेतून निर्माण झालेला प्रतिसाद वापरकर्त्याला आउटपुट टेक्स्ट म्हणून दिला जातो.

जेवढ्या मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध करून दिला जाईल तेवढं हे तंत्रज्ञान अचूक होत जाईल. सध्या २०२१ पर्यंतचा डेटा दिलेला असल्यामुळे सर्च ही तिथपर्यंतचं मर्यादित आहे. एकदम लेटेस्ट गोष्टींबद्दल प्रश्न विचारल्यास उत्तरे दिली जात नाहीत. यासोबतच स्फोटके किंवा घातक गोष्टींचा समावेश यामध्ये नाही त्यामुळे "स्फोटके कशी बनविले जातात" अशा प्रकारच्या प्रश्नाची उत्तरे हे तंत्रज्ञान देत नाही. या तंत्रज्ञानाचे ३.५ हे लेटेस्ट व्हर्जन सध्या उपलब्ध आहे. 

चॅट जीपीटीची काही उदाहरणे :

१) रेपलिका (Replika) - वापरकर्त्याना इमोशनल सपोर्ट देण्यासाठी रेपलिका हे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले चॅटबॉट डिजाईन सध्या अस्तित्वात आहे.  अशा प्रकारचं माणसांसारखा संवाद साधण्यासाठी रेपलिका नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करते.

२) अदा (ada) - बिजनेस संबंधित कस्टमर सर्व्हिस आणि सपोर्ट देण्यासाठी अदा हे चॅटबॉट डिजाईन केले गेले आहे. विविध इंडस्ट्रीच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार आणि २४×७ अदा काम करू शकते.

३) वोबॉट (woebot) - वोबॉट हे मेंटल हेल्थ संबंधी सर्व्हिस देणारे चॅटबॉट आहे. जे कॉग्नीटिव्ह बीहेव्हीअरल थेरपी टेक्निक्सचा वापर करून वापरकर्त्याना मदत करते.

४) आस्क दिशा (Ask disha) - आयआरसीटीसी वरून रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्यासाठी या चॅट बॉटचा उपयोग केला जातो.

सध्या चॅट जीपीटी या तंत्रज्ञानाबाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहेत जसे की यामुळे लोकांच्या नौकऱ्या जाणार,  हे तंत्रज्ञान मानवासाठी घातक ठरू शकते इ. पण या चर्चा काही नवीन नाहीत जेव्हा जेव्हा कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित नवीन तंत्रज्ञान निर्माण केले जाते तेव्हा तेव्हा अशा चर्चा होतातच. कोणत्याही तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे लक्षात घेऊन मानवी जीवन अधिक प्रगतिशील करण्याच्या शुद्ध हेतूने जोपर्यंत ते वापरले जाईल तोपर्यंत त्यापासून कसलाही धोखा निर्माण होणार नाही एवढे मात्र नक्की.








Tuesday, October 25, 2022

ग्रहण आणि अंधश्रद्धा....


सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण यांसारख्या खगोलीय घटना जेव्हा घडत असतात त्यावेळी आपल्या देशात अजूनही अनेक अंधश्रद्धा पाळल्या जातात. ज्या विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरत नाहीत. ग्रहण हे इतर देशातही होत असते पण त्यामुळे तेथील नागरिकांवर कोणताही परिणाम होत नाही फक्त आपलाच देश त्याला अपवाद आहे तो ही अंधश्रद्धेमुळे.

आजचे ग्रहण हे दिवाळीच्या मध्ये आहे त्यामुळे लोकांमध्ये आणखीनच भ्रम पसरविले जात आहेत. अशाच काही गैरसमजुती आणि अंधश्रद्धेवर आधारित प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

१) ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते का?

उत्तर : नाही, सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येतो त्यामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश चंद्रावर पडतो, चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्याला ग्रहण लागते. मुळात भौतिक शास्त्रात नकारात्मक ऊर्जा अशी काही गोष्टच नाही त्यामुळे ग्रहण काळात कोणतीही नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत नाही. ग्रहण म्हणजे फक्त एक सावली आहे ज्यामुळे ती शुभ किंवा अशुभ असू शकत नाही.

२) ग्रहण काळात बाहेर पडू नये का? (विशेषकरुन गरोदर महिलांनी)

उत्तर : ग्रहण काळात बाहेर पडल्याने किंवा आपले दैनंदिन काम केल्याने कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही. याबरोबरच गरोदर महिलांच्या गर्भातील बाळाला कोणतीही इजा होत नाही. ग्रहणकाळ गरोदर महिलांसाठी अपायकारक असतो ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. त्याला कोणताही वैद्यकीय किंवा वैज्ञानिक पुरावा नाही. अंनिसच्या (अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या) अनेक गरोदर सदस्य स्त्रियांनी ग्रहण काळात बाहेर पडून ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध केले आहे. त्या सर्वांच्या मुलांवर कोणताही परिणाम झाला नाही. 

३) ग्रहणाचा जन्माला येणाऱ्या बाळाचे ओठ आणि टाळू फाटण्याशी काही संबंध आहे का?

उत्तर : काहीही संबंध नाही. ओठ आणि टाळू फाटणे हा जनुकीय आजार आहे. त्याचा ग्रहनाशी काहीही संबंध नाही.

४) ग्रहण काळात अन्नपदार्थ शिजवू नये किंवा जेवण करू नये?

उत्तर : यात ही काही तथ्य नाही. ग्रहण काळात अन्नपदार्थ शिजवल्याने किंवा जेवण केल्याने व्यक्तीवर कोणताही परिणाम होत नाही. आपला देश सोडला तर तर इतर देशांचे दैनंदिन जीवन ग्रहण काळात ही नेहमी प्रमाणे सुरू असते त्यांच्यावर काही परिणाम झाल्याची घटना अजून तर घडलेली नाही.

५)  ग्रहण सुटल्यानंतर अंघोळ करणे गरजेचे आहे का?

उत्तर : नाही.  ग्रहण काळात मानवी शरीरावर कोणताही अपायकारक परिणाम होत नाही त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करणे किंवा इतर काही करण्याची कोणतीच आवश्यकता राहत नाही.


अभ्यासाअंती या गैरसमजुतीचे आणि अंधश्रद्धेचे मूळ हे पुराणकथा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये असल्याचे लक्षात येते. फक्त भारतातच नव्हे तर सुरवातीच्या काळात संपूर्ण जगामध्ये खगोलीय घटनांबद्दल वेगवेगळ्या मान्यता होत्या. पण कालांतराने वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या स्वीकृतीमुळे जगभरातून त्या नष्ट झाल्या, मात्र भारतातून त्या अजूनही समूळ नष्ट झालेल्या नाहीत. विज्ञानाच्या शोधाआधी अज्ञानापोटी हे सर्व केलं जायचं पण वैज्ञानिक जगात अशा गोष्टींना थारा नाही. जागतिक अंतराळ संशोधन संस्था नासाने ही ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नसल्याचे खूप आधीच स्पष्ट केले आहे. वरील गैरसमजुतींचा आणि अंधश्रद्धांचा ज्याप्रमाणे ग्रहणाशी काही संबंध नाही त्याचप्रमाणे दिवाळी किंवा इतर कोणत्या सणाचाही ग्रहणाशी कसलाही संबंध नाही त्यामुळे दिवाळीत आलेल्या या ग्रहणा बाबत शंका घेण्याची किंवा घाबरण्याची काहीच गरज नाही. सूर्यग्रहण थेट पहिल्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या डोळ्यांना धोखा होऊ शकतो त्यामुळे ते थेट डोळ्यांनी पाहू नये ही एक गोष्ट सोडली तर ग्रहणाचा कोणत्याच सजीवावर कसलाही परिणाम होत नाही हेच पूर्ण सत्य आहे. सूर्याला चंद्राला लागलेलं ग्रहण हे ग्रहण थोड्या काळानंतर का होईना सुटते पण मानवी बुद्धीला लागलेलं ग्रहण कधी सुटणार या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.



Monday, September 19, 2022

माझ्या गावाकडच्या गोष्टी : भाग ७ - वामन आऊट न झाला....


किरकेटचा नाद नसेल अशी पोरं कुण्या बी गावात सापडणार नाहीती. आमचा गावही त्याला अपवाद नव्हता. लहानापासून ती थोरापातूर सगळेच खालाकडच्या पान मळ्याच्या बाजूला असलेल्या मैदानात सकाळ संध्याकाळ दिसायचीच. अन् मैदानात जमायचं नाही तवा पारावरच्या छोट्या मोकळ्या जागेत किरकेटचा खेळ चालायचा. सहावी सातवीच्या सुट्ट्यात गावाकडे असायचो तेव्हा एक तर शेताला जाणे किंवा क्रिकेट खेळणे हाच माझा उद्योग सुरू असायचा. चांगली बॅट स्टंप असं आमच्याकडे काही नसायचं जंगलीच्या जळणातल्या काट्या स्टंपसाठी अन् त्यातला त्यात एक मोठा दंडुका बॅट म्हणून घेतला की वरलाकडच्या गोठ्याच्या कुंपणात आमचा खेळ सुरू व्हायचा. कधी रबरी बॉल असायचा नाही तर कधी प्लास्टिकचा. पोरांची लंय गर्दी झाली तर एक टिप्पा आऊटचा खेळ चालायचा. 

मी सोलापूरहून नेलेल्या चिंधी बॉलचं तिकडच्या समद्या पोरास्नी लंय अपरुग वाटायचं. त्याच्या पार चिंध्या निघे पातूर त्याचा वापर व्हायचा. आमच्यात संजू भाऊ जरा मोठा होता अन् क्रिकेट बी चांगला खेळायचा गावच्या भिमनगरच्या टीम मध्ये बी व्हता. तो आम्हाला लवकर आउटचं व्हायचा न्हाय. बॉलिंग टाकू टाकू आम्ही दमायचो पण तो काय बॅटिंगला दमायचा न्हाय. पण हा गोठ्यातला क्रिकेटचा डाव आण्णा नसतानाच चालायचा कारण घरातनं गोठा दिसायचा. आमाला जेवढं किरकेट आवडायचं तेवडीच आण्णाला त्याची चीड होती.  त्या नादानं पोरं वाया जातील असं त्यांचं स्पष्ट मत व्हतं. टीव्ही वर मॅच बगायला जरी आम्ही कुटं बसलो असलो अन् आण्णा तिकडं दिसले की आम्ही घरला पाळायचो.

टीम करून किरकेट खेळायचं म्हंटलं की आमच्या घराच्या मागं पाराला लागून असलेल्या सूर्यवंशीच्या वाड्याकडे समद्याची पावलं वळायची कारण तिथं राहणाऱ्या वामन कडेच किरकेटचं समदं सामान व्हतं. घरी टीव्ही बी व्हता त्यामुळे मॅच बघायला बी आम्ही तिकडंच जायाचो. कंपिनीची बॅट, स्टंप सेट, टेनिस बॉल असं समदं वामन कडं व्हतं त्यामुळे त्याचा लंय रुबाब असायचा. आमच्यातले समदे इच्छा नसतानाही त्याची मर्जी सांभाळायचे. वाड्यातली पोरं अन् बाकीचे बी त्याला सावकार म्हणायचे अन् आव जावं बोलायची. वामनची एक विशेष गोष्ट म्हणजे तो बनेल अन् चड्डीवरच असायचा नेहमी. जरा जाड बी होता त्यामुळे पळा पळीने लगेच दमायचा. वामन, चिट्ट्या, संदिप्या, त्यांच्या वाड्यातली अजून दोन तीन पोरं, मी, अमर, राहुल, संजू भाऊ, बूध्या अन् आमच्या कडची अजून दोन चार पोरं जमा व्हायचो. चार पाच जणांच्या दोन टीम करून समदे मिळून दर आइतवारी ( रविवारी) दिसभर फफुटयात खेळायचो. 

शहरातला असल्यामुळे किरकेटची चांगली माहिती असल्यामुळं अन् चांगला खेळत असल्यानं मला समद्यांकडून जरा जास्तच चांगली वागणूक मिळायची. टीम मधून बॅटिंग बॉलिंग पहिला मिळायची. चिट्ट्या चांगलं खेळायचा समदे त्याला दरविड म्हणायचे राहुल द्राविडचा तो मोठा फॅन होता, त्याचं अन् वामनचं चांगलं जमायचं ते नेहमी एकाच टीम मधी रहायचे. पण बॅटिंग वरून त्यांच्यात वाद ठरलेला असायचा कारण वामन एक रन पळायचाच न्हाय जास्तीत जास्त ओव्हर आपल्याला कशा मिळतील यावर त्याचा भर राहायचा. आम्ही नेहमी वामनच्या अपोझिट टीम मधी असायचो. अमर मी अन् राहवल्या एकाच टीम मधी राहायचो. अमरचा खेळ सेहवाग वानी होता थांबून खेळायचं त्याला माहित नव्हतं. राहवल्या सपोर्टिंग प्लेयर सारखा व्हता. फिल्डिंग मधी एकदम चपळ होता.

वामनला आउट करणं म्हंजी लंय जिकरीचं काम असायचं. सगळं सामान त्याचंच असल्यामुळे तो रडीचा डाव खेळायचा. दोन तीनदा जरी आऊट झाला तरी काय ना काय कारण काडून खेळायचाच. समदी पोरं चिरडीला जायची. "हाई आउट झालास गा बायला" म्हणून ओरडायची पण त्याचा वामन वर काय उपेग व्हायचा न्हाय. कधी कधी त्यावरून वाद व्हायचा तवा वामन सगळं सामान घेऊन घरला निघायचा तवा 'वामन आऊट न झाला' असंच म्हणायची आमच्यावर येळ यायची. पुढं वामन अन् त्याच्या घरचे उमरग्याला स्थायिक झाले तसं वामनचं गावाकडं येनं बी कमी झालं. पण आमचं किरकेट खेळणं सुरूच व्हतं 

पुढे जसं मोठे होत गेलो तसं पान मळ्याकडच्या मोठ्या मैदानात आम्ही समदे खेळायचो. सिल्डवर (पैश्यावर) मॅच लावायचो. खाल्ला कडच्या पोरांसोबत लंय मॅचा खेळायचो अन् जिकायचो बी. वरलाकडची टीम भारी का खाल्ला कडच्या पोरांची अशी टशन व्हायाची. गावची तुरणामेंट बी इथंच भरायची. गावची अन् भिमनगरची टीम बी त्यात खेळायची. तवा मैदानावर लंय गर्दी व्हायाची. परमु, संजू भाऊ, चिट्ट्याचा मोठा भाऊ टीम मध्ये व्हते त्यांचा खेळ बगायला आम्ही आवर्जून जायचो. कर्न्या वरणं कामेंट्री चालायची. दुसऱ्या गावच्या टिमा बी यायच्या कधी कधी भांडणं बी व्हायची पर मोठे माणसं मधी पडून भांडण मिटवायची. गावच्या टीम बाहेरच्या तुरणामेंटला ही जायच्या तिकडे जिकून आले की गावात मिरवणूक व्हायची लंय कालवा व्हायचा. नाचून आरडून समदी पोरं थकून आपापल्या घरी जायाची पण किरकेट अन् त्याच्या गप्पा पुढचे पंधरा दिस तर तशाच सुरु राहायाच्या.

Wednesday, September 7, 2022

"मांग महाराच्या दुःखाला वाचा फोडणाऱ्या आद्य लेखिका - मुक्ता साळवे".


१६५ वर्षाआधी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या "मुक्ता साळवे" या चौदा वर्षाच्या मुलीने लिहलेला हा निबंध. मुंबई येथून १५ फेब्रुवारी १८५५ रोजी "ज्ञानोदय" च्या अंकात प्रकाशित झाला होता.

या निबंधाची भाषा आणि विवेकवादी विचार पाहिल्यानंतर त्याकाळात फुले दाम्पत्याच्या शाळेची गुणवत्ता काय होती हे आपसूकच लक्षात येते. धर्माकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याजोगे ज्ञान त्या वयात आत्मसात करणे ही काही सामान्य गोष्ट नव्हती.आणि विशेष बाब म्हणजे धर्माच्या आधारे जी गुलामगिरी लादली गेली होती त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण आहे याचीही अनुभूती त्या वयात या महान आणि क्रांतिकारी विद्यार्थीनीला आली होती. सोबतच आपल्या विरोधात व आपल्या बाजूने असलेल्या एकाच जातीच्या लोकांमधील फरक ही उमजला होता. या निबंधाच्या माध्यमातून जे वास्तव मांडले आहे त्यामुळे स्वराज्यद्रोही आणि मनुस्मृती प्रमाणे चालणाऱ्या पेशवाईची खरी ओळख देशाला झाली. सत्तेचा वापर धर्माचे आणि विशिष्ट वर्गाचे अधिकार जोपासण्यासाठी कशाप्रकारे केला जात होता हे उघड झाले. अन्यायाविरुद्ध आपल्या लेखणीच्या माध्यमातून आसूड ओढणाऱ्या या पहिल्या मागासवर्गीय लेखिकेचा निबंध खालीलप्रमाणे होता.


"ईश्वराने मज दीनदुबळीच्या अंत:करणात आम्हा दुर्दैवी पशुंपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांगमहारांच्या दु:खाविषयी भरविले; तीच जगत्कर्त्याचे मनात चिंतन करून ह्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे. परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता, मांगमहारांस व ब्राम्हणांस उत्पन्नकर्ता जगन्नाथ आहे.

महाराज, आता जर वेदाधारेकरून आमचा द्वेष करणारे लोक ह्यांच्या मताचे खंडण करावे तर हे आमच्यापेक्षा उंच म्हणविणारे, विशेषे करून लाडूखाऊ ब्राम्हण लोक असे म्हणतात की, वेद तर आमचीच मत्ता आहे. आम्हीच ह्यांचे अवलोकन करावे. तर ह्यावरून उघड दिसते की, आम्हास धर्मपुस्तक नाही. जर वेद ब्राम्हणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राम्हणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की नाही बरे? हर हर!

असे वेद की ज्यांचे ब्राम्हणांच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने महापातक घडते, तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडेस किती मूर्खत्व (दोष) येईल बरे? मुसलमान लोक कुराणाच्या आधारेकरून, व इंग्रज लोक बैबलच्या आधारेकरून, आणि ब्राम्हण लोक वेदाधारेकरून चालतात. म्हणूनच ते आपापल्या खर्‍या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते. तर हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ. परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडेस पहावे. तो व त्यासारिखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत; व असा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो.

आम्हा गरीब मांगमहारांस हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले, व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालविला होता. आम्हा मनुष्यास ब्राम्हण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानिले आहे. सांगते ऐका, ज्या वेळी बाजीरावाचे राज्य होते त्या वेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानीत होते की काय? पहा बरे तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे; त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय? परंतु मांगमहारांस मारू नका असे म्हणणारे कोण बरे? त्यासमयी मांग अथवा महार ह्यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते.

अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार? कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महारमांग असून वाचतात, तर ब्राम्हणांनी का त्यास दप्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे की काय? असे बोलून तो त्यास शिक्षा करी.

दुसरे असे की, लिहीण्याची बंदी करून हे लोक थांबले की काय? नाही. बाजीरावसाहेब तर काशीस जाऊन धुळीत रहिवासी होऊन तद्रूप झाले पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने येथील महार तो काय? पण तोहि मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. सोवळे नेसून नाचत फिरणार्‍या लोकांचा एवढाच हेतु की, काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असे मानणे व त्यापासून त्यास सुख वाटते. पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दु:खे पडतात ह्याचा ह्या निर्दयांच्या अंतःकरणात द्रव येतो की काय? ह्याच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीस ठेवीत नाहीत.

जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कोठून मिळणार? बरे, हे उघडच सिद्ध होते की आमचे हाल फार होतात. पंडितहो, तुमचे स्वार्थी आपलपोटे पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते ह्याजकडेस लक्षपूर्वक कान द्या. ज्या वेळेस आमच्या स्त्रिया बाळंत होतात त्या वेळेस त्यांच्या घरावर छपर सुद्धा नसते म्हणून हीव पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दु:ख होत असेल बरे! ह्याचा विचार स्वताच्या अनुभवावरून करा. जर एखाद्या वेळेस त्यास बाळंतरोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसे कोठून मिळणार? असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्याने फुकट औषधे दिली?

मांगमहारांच्या मुलांस ब्राम्हणादिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारात जात नाहीत. ते म्हणतात की आपणास उच्छिष्ट आणावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते. असे म्हणून उगीच राहतात. हाय हाय, काय रे भगवान हे दुःख ? हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येतं. ह्या कारणास्तव भगवंताने आम्हांवर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारला येथे पाठविले. आणि आता ह्या राज्यातून आमची जी दुःखे निवारण झाली ती अनुक्रमे लिहिते -

शूरपणा दाखविणारे व गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले, आपटे, त्रिकमजी, आंधळा पानसरे, काळे, बेहरे हे निरर्थक मांगमहारांवर स्वाऱ्या घालून विहिरी भरीत होते, व गरोदर बायकांसही देहांत शासने करीत होते ती बंद झाली; आणि पुणे प्रांती मांगमहारांवर कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंदाधुंदी होती की ज्याच्या मनात वाटेल त्याने महारमांगांवर नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा जुलूम करीत होते; ती बंद झाली. किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली. आमचा वंशहि वाढत चालला. मांगमाहारांवर ह्यातून कोणी बारीक पांघरूण पांघरले असता ते म्हणत कि, ह्यांनी चोरी करून आणले, हे पांघरून तर ब्राम्हणानेच पांघरावे.

जर मांगमहार पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यांस बांधून मारीत, पण आता इंग्रजाच्या राज्यात ज्यास पैसे मिळेल त्याने घ्यावे. उंच वर्गातील लोकांचा अपराध केला असता मांगाचे किंवा महाराचे डोके मारीत होते ती बंद झाली. जुलमी बिगार बंद केली. अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळीक कोठे कोठे झाली. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली. बाजारात फिरण्याची मोकळीक झाली.

आता निःपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते. ती अशी कि जे ब्राम्हण आम्हांस वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते, तेच आता माझे स्वदेशीय प्रिय मित्र बंधू आम्हांस ह्या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात. परंतु सर्वच ब्राम्हण घेतात असे नाही. त्यातून ज्यांचा विचार सैतानाला नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करतात. आणि जे माझे प्रिय बंधु आम्हांस बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यांस म्हणतात कि तुम्हांस जातीबाहेर टाकू.

आमच्या प्रिय बंधूंनी मांगमहारांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत. व ह्या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करितात. म्हणून मांडलेल्या शाळांना फारच साहाय्य आहे. अहो दरिद्रांनी व दुःखानी पिडलेले मांगमहार लोक हो, सहकतुम्ही रोगी आहात, तर ज्ञानरूपी औषध घ्या. म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही चांगले नीतिवान व्हाल; तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जानवराप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील, तर आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही; परंतु हेही माझ्याने सिद्ध करवत नाही. ह्यास उदाहरण, जे शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेही एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्याजोगे वाईट कर्म करितात, मग तुम्ही तर मांगमहारच आहात."


आत्मग्लानीत निद्रिस्त असणाऱ्या आपल्या समाजासाठी आजही हे विचार तितकेच उपयुक्त आणि प्रेरणादायी असे आहेत. असे व्यक्तिमत्त्व आपले रोल मॉडेल असले पाहिजे पण अजूनही समाजातील सर्व स्तरात यांची ओळख ही पोहचली नाही. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपला इतिहास आपणच जपला पाहिजे आणि तो येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचवला ही पाहिजे.

Friday, September 2, 2022

शिक्षितांच्या अंधश्रद्धा.....





आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात ही आपल्याकडे घरातील एखाद्या  व्यक्तीच्या किंवा लहान मुलाच्या वागण्यात, बोलण्यात आणि तब्येतीमध्ये फरक जाणवल्यास दहा पैकी सात घरात अजूनही बाहेरवासा, भूतबाधा झाल्याचेच मानले जाते आणि त्याप्रमाणे घरगुती इलाज करून मग डॉक्टरकडे नेले जाते. माणसाचे मन ही शरीराप्रमाणे आजारी पडते हे ज्ञान अजून सर्वांपर्यंत पोहचलेले नाही. आजच्या घडीला आपल्या देशातील शिक्षितांचे प्रमाण हे नक्कीच आधीच्या तुलनेत अधिक आहे. असे असले तरी अंधश्रध्दांंचं प्रमाण ज्या प्रमाणात घटायला पाहिजे होतं ते अजूनही घटलेलं नाही. कारण शिक्षितांच्या अंधश्रद्धा या पुर्णतः अज्ञानावर वर आधारित नसून जात, धर्म, वर्ण, परंपरा याशी निगडित आहेत. त्यामुळे ज्ञानाच्या आधारे त्या दूर होतील अशी शक्यता उरत नाही. अंधश्रद्धा एकूणच वाईट पण शिक्षितांच्या अधिक वाईट कारण ते त्या अंधश्रद्धांचं समर्थन करतात.

शिक्षितांच्या अंधश्रद्धेची जी प्रमुख कारणे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी सांगितली आहेत ती खालीलप्रमाणे आहेत. 

वर्ग संघर्ष. धार्मिक आणि जातीय अस्मितेची जपणूक ही वर्ग संघर्षाच्या मुळाशी आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावाने ज्या समाजामध्ये अस्मिता बळकट, टोकदार आणि धारधार करण्याचा कार्यक्रम सुरू असतो तिथे अंधश्रद्धेला खतपाणी मिळतच राहते. धर्माचं बाजारीकरण, सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढवणं, लोकांची धार्मिकता धर्मांधतेकडे वळविण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी अंधश्रद्धा निर्मूलनास बाधक ठरतात. 

अदृष्टाची भीती मृत्यू कधी येणार या अदृष्टाची भीती प्रत्येकाच्या मनात वसत असते आणि त्यापासून मुक्तता करण्यासाठी कोणी म्हणाले की अमुक तमुक गंडा, ताईत घाल, जप कर, नवस उपासतापास कर तेव्हा निर्भय नसलेली मने चटकन तिकडे वळतात. मृत्यु ही इतकी अकल्पित गोष्ट आहे की वाटतं हे करून बघायला काय हरकत आहे.

पुढचे महत्वाचे कारण म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या पदरी येणारी अगतिकता आणि दुसरी समाज जीवनामध्ये अनेक कारणांनी वेढून राहिलेली अस्थिरता. मागच्या वर्षी ज्या खर्चात माझं भागत होतं त्यात आता भागत नाही किंवा मी सरकारी बंगल्यात राहत होतो आता नौकरी संपल्यामुळे तो सोडून स्वतःचे घर बांधावे लागणार जे परवडणारे नसतं ही झाली अगतिकता. आणि अस्थिरता म्हणजे कितीही चांगला खेळाडू असला तरी त्याला माहिती नसतं आपण उद्यापासून शून्यावर बाद होणार आहे का? कितीही चांगला अभिनेता असला तरी त्याला माहिती नसतं येणारे क्रमशः सिनेमे कशामुळे फ्लॉप जातील? कितीही उत्तम उद्योग व्यवसाय असेल त्याला हे समजत नाही की माझ्या गावात स्फोट झाला आणि माझेच दुकान त्यात उध्वस्त झाले तर काय?

अतृप्त कामनांची पूर्ती. प्रत्येकाच्या मनात अनेक इच्छा आकांक्षा असतात ज्या सर्वकाही पूर्ण होत नाहीत. पण त्या पूर्ण होण्यासाठीचा अस्तित्वात नसलेला एखादा मार्ग जर कोणी दाखवत असेल तर माणसं तिकडे धावू लागतात. मी जर एका बाबाकडे गेलो बाबाने जर मला कृपाशीर्वाद दिला आणि लॉटरीचं तिकीट किंवा गुप्तधन मिळण्याची शक्यता निर्माण होत असेल तर माझ्या अतृप्त कामनांची पूर्तता होते.

अपराधी भावना. आपल्या उपजीविकेचे साधन नैतिक मार्गाने नसल्यास म्हणजेच दोन नंबरच्या कामातून पैसे मिळत असल्यास त्यातुन अपराधीपणाची भावना निर्माण होते. ती दूर होण्यासाठी दान धर्म मोठ्या प्रमाणावर केला जातो. धार्मिक स्थळांना देणग्या दिल्या जातात. ज्यामुळे अपराधी भावना कमी होण्यास मदत होते.

यासोबतच महाग होत जाणारी आरोग्य व्यवस्था हे एक बुवा बाबांचं प्रस्थ वाढण्याचं एक महत्वाचे कारण आहे. ज्या वेळेला गरज असते त्या वेळेला योग्य स्वरूपाची आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसेल तर अपरिहार्यपणे अंधश्रद्धांचा आधार घेतला जातो.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा असे शिक्षणक्रमात लिहले आहे. आपल्या संविधानात ही वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार करणं हे नागरिकांचे कर्तव्य आहे असे लिहलेले आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीतच असल्याचे दिसून येते. कारण शिक्षितांची अंधश्रद्धा हा केवळ विज्ञानाच्या प्रसाराचा भाग नाही त्याने ती जाणार नाही. 

शिक्षितांच्या अंधश्रद्धा या अशिक्षितांच्या अंधश्रद्धेपेक्षा समाजासाठी आणि देशासाठी अधिक घातक आहेत त्यामुळे त्यांचे समूळ उच्चाटन करणे अपरिहार्य ठरते. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्भय कृतीशीलता हा एक प्रभावी उपाय आहे. आपल्या देशाच्या तुलनेत प्रगत देशांमध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण नगण्य असण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन फक्त शिक्षणापुरता मर्यादित न राहता ज्या प्रमाणात तो कृतीद्वारे शिक्षितांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनेल त्या प्रमाणात शिक्षितांच्या अंधश्रद्धांचं निर्मूलन होईल. विवेकवादी विचारांनी इथल्या जनसमुदायाची पकड घेतली तर लोकांच्या प्रश्नांचे खरे लढे उभारतील आणि स्वाभाविकच देशातील सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल. ज्यामुळे धार्मिक आणि जातीय अस्मिता मागे पडेल, सांस्कृतिक राष्ट्रवाद कमी होऊन संविधानाला अभिप्रेत असलेली धर्मनिरपेक्षता प्रभावी होईल.



संदर्भ - डॉ. नरेंद्र दाभोळकर व्यख्यान पुणे विद्यापीठ दि. २७/०२/२०१०.